कोरोना व्हायरस: SARI रोगाचे औरंगाबादमध्ये रुग्ण आढळल्यावर राजेश टोपे म्हणाले...

    • Author, मयांक भागवत
    • Role, मुक्त पत्रकार

कोरोना व्हायरसनं संपूर्ण जगात खळबळ माजवलेली असताना औरंगाबाद शहरात 'SARI'चं संकटही गडद होत चाललं आहे.

SARI विषयी बोलताना आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले, "औरंगाबादमध्ये SARIचे पेशंट सापडले आहेत. याची लक्षणं कोरोनासारखी असतात. त्यावर तातडीनं उपाय शोधणं गरजेचं आहे."

पण, SARI म्हणजे काय?

SARI म्हणजेच सिव्हिअर अॅक्युट रेस्पिरेटरी इलनेस. SARI आणि कोरोना विषाणुमुळे होणारा कोव्हिड-19 दोन्ही आजार श्वसनसंस्थेशी संबंधित आजार आहेत आणि दोन्हीची लक्षणंही जवळपास सारखी असल्याने काळजी जास्त वाढली आहे.

औरंगाबाद शहरात कोरोनापेक्षा 'SARI'ने दगावणाऱ्यांची संख्या जास्त आहे. एका कोरोना रुग्णामागे SARI चे 5 रुग्ण आहेत. शहरात आतापर्यंत कोरोनाचे 17 रुग्ण आढळले आहेत, तर SARI च्या रुग्णांची संख्या 100 पेक्षा जास्त झाली आहे. SARI मुळे 12 जणांचा मृत्यू झाला आहे. 24 मार्च रोजी शहरात SARIने एक रुग्ण दगावला. त्यानंतर 29 मार्च ते 7 एप्रिल या 10 दिवसात 11 जणांचा मृत्यू झाला.

SARI आणि कोव्हिड-19 ची लक्षणं जवळपास सारखीच असल्याने औरंगाबादमध्ये SARIच्या प्रत्येक रुग्णाची कोरोना चाचणी घेतली जात आहे. SARI मुळे दगावलेल्या 11 पैकी 10 जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले होते, तर केवळ एकच रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह निघाला.

सध्या कुणालाही श्वसनासंबंधी काही तक्रारी असल्यास आपल्याला कोरोना विषाणुची लागण तर झाली नाही ना, अशी भीती वाटते. मात्र, ही SARIची लक्षणंही असू शकतात. मुंबईतल्या नानावटी रुग्णालयातले छातीविकार तज्ज्ञ डॉ. सलील बेंद्रे सांगतात, "SARI ला सोप्या शब्दात श्वसनसंस्थेचं इन्फेक्शन म्हणता येईल. श्वसनसंस्थेचा कुठलाही आजार झालेल्या रुग्णाच्या फुफ्फुसाची ऑक्सिजन घेण्याची क्षमता खूप कमी होते. हे रुग्ण श्वास घेऊ शकत नाही. त्यांच्या शरीरातलं ऑक्सिजनचं प्रमाण खूप कमी होतं. शरीरातलं ऑक्सिजनचं प्रमाण कमी झालं तर रुग्ण रेस्पिरेटरी फेल्युअरकडे जातो."

डॉ. बेंद्रे पुढे सांगतात, "SARI (सिव्हिअर अॅक्युट रेस्पिरेटरी इलनेस) असलेली प्रत्येक व्यक्ती कोरोनाग्रस्त असेलच असं नाही. कोरोना हा श्वसनसंस्थेशी निगडीत आजार आहे. त्यामुळे ज्यांना श्वसनासंबंधी आजार आहे, त्यांची कोरोना चाचणी घेणं गरजेचं असतं. कोरोनाचे विषाणू फुफ्फुसावर हल्ला करतात. फुफ्फुसात त्यांची वाढ होते. त्यामुळे शरीराला आवश्यक असणारा ऑक्सिजन पुरेशा प्रमाणात मिेळत नाही."

ठाण्यातले क्रिटिकल केअर स्पेशलिस्ट डॉ विठ्ठल बोमनाळे म्हणतात, "SARI हा आजार नसून मेडिकल कंडिशन आहे. फुफ्फुसामध्ये बॅक्टेरियल इन्फेक्शन, न्युमोनिया, कोव्हिड-19 अशा आजारांमुळे रुग्णाला श्वास घ्यायला खूप त्रास होतो. काही प्रकरणांमध्ये फुफ्फुसामध्ये पाणी जमा होतं. यामुळे फुफ्फुसाची क्षमता कमी होते. फुफ्फुसाला सूज येण्याची शक्यता असते. यालाच आपण सिव्हिअर अॅक्युट रेस्पिरेटरी इलनेस (SARI) म्हणतो."

कोव्हिड-19 आणि SARI यातील साम्य

. दोन्ही श्वसनसंस्थेशी निगडित आजार आहेत.

. दोन्हीमध्ये श्वास घेताना त्रास होतो.

. दोन्ही आजारांमध्ये रुग्णाला ताप येतो आणि हाय टेम्परेचर असू शकतं.

. मधुमेह, उच्च रक्तदाब असे इतर काही आजार असणाऱ्यांच्या मृत्यूचं प्रमाण दोन्हीमध्ये जास्त आहे.

कोव्हिड-19 आणि SARI यातील फरक

पुण्यातले जनरल फिजिशिअर डॉ. संवेद समेळ सांगतात, "श्वसनाचा त्रास असणाऱ्या रुग्णांची रोगप्रतिकार शक्ती कमी असते. सारखं हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यामुळे किंवा वारंवार औषधोपचार घेतल्यामुळे अशा रुग्णांमध्ये अँटीबायोटिक्स रेझिस्टंस दिसून येतो. (शरीर अँन्टिबायोटिक औषधांना प्रतिसाद देत नाही) असे रुग्ण हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यानतंर त्यांच्यावर उपचार करणं आव्हानात्मक बनतं. श्वसनाच्या त्रासाबरोबरच काही रुग्ण मधुमेह, उच्च रक्तदाब यासारख्या आजाराने ग्रस्त असतात. त्यामुळे अशा रुग्णांमध्ये मृत्यूदर अधिक दिसून येतो."

जागतिक आरोग्य संघनटनेने दिलेल्या माहितीनुसार SARI मुळे दरवर्षी जगभरात 40 लाख लोकांचा मृत्यू होतो. यातले 98% मृत्यू हे श्वसन मार्गातली संसर्गामुळे होतात.. मृत्यूमध्ये 5 वर्षांपेक्षा खालील मुलं आणि 60 वर्षांपेक्षा मोठ्या व्यक्तींचं प्रमाण अधिक आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पा