कोरोना व्हायरस : मालेगावमधल्या कोव्हिड -19 रूग्णांची संख्या अचानक कशी वाढली?

    • Author, अनघा पाठक
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

मालेगावमध्ये कोरोनाचे 13 नवे रुग्ण सापडले आहेत. हे सर्व रुग्ण आधी सापडलेल्या रुग्णांच्या जवळ राहाणाऱ्या लोकांपैकी आहेत. काही दिवसांपूर्वी इथं अगदी कमी संख्येने रुग्ण होते. मात्र आता इथं रुग्णांची संख्या वाढली आहे. मालेगावमध्ये दोन रुग्णांचा आज मृत्यू झाला आहे.

मालेगावात दोन दिवसात रुग्णांची संख्या वाढल्यानं आता मालेगाव कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलं आहे. याआधी 8 एप्रिल एकाच दिवशी इथे पाच कोरोना पॉझिटिव्ह लोक सापडले. आता मालेगावात अजून चार जण पॉझिटिव्ह असल्याचं आढळून आलं आहे तर एक व्यक्ती चांदवड तालुक्यातली आहे.

रुग्णांची संख्या वाढल्यानंतर आता मालेगावात संपूर्ण संचारबंदी लागू केली आहे. याला लागून असलेल्या अनेक गावांच्या सीमा सील केल्या आहेत. कोरोनाचा किती फैलाव झाला आहे हे शोधण्यासाठी जिल्हा प्रशासनाने 400 टीम्स तयार केल्या आहेत आणि या टीम्स घरोघरी जाऊन सर्व्हे करणार आहेत. कंटेनमेंट झोनमधून कोणी बाहेर येणार नाही आणि नागरिकांना लागतील त्या गोष्टी त्यांच्या घरी जाऊन पुरवणार असल्याची माहिती नाशिकचे कलेक्टर सुरज मांढरे यांनी दिली.

चार दिवसात अचानक रुग्णसंख्या वाढली कशी?

त्यासाठी मालेगावमधली परिस्थिती समजून घ्यावी लागेल. मालेगाव उत्तर महाराष्ट्रातलं एक मोठं शहर आहे आणि महाराष्ट्राचं टेक्स्टाइल हब म्हणून ओळखलं जातं. या भाग मुस्लीमबहुल आहे. दाटीवाटीने पसरलेल्या इथल्या वस्त्यांमध्ये कोरोना व्हायरस पसरण्याचा धोका सर्वाधिक आहे.

लॉकडाऊन झाल्यापासून इथे कोणी बाहेरची व्यक्ती आली नसल्याचा किंवा इथून कोणी बाहेर न गेल्याचा दावा इथले स्थानिक डॉक्टर अखलाक अन्सारी यांनी केला आहे. "लोक लॉकडाऊन पाळत आहेत. फक्त जीवनावश्यक गोष्टी घेण्यासाठी घराबाहेर पडत आहेत त्यामुळे मालेगावात कोरोनाच्या केसेस का वाढत आहेत हे आम्हालाही न उलगडलेलं कोडं आहे," ते म्हणतात.

पण मालेगावात इतर कोरोनाबाधित देशांमधून तसंच देशातल्या इतर भागातून अनेक लोकांनी ये-जा केली हा त्याचाच परिणाम असल्याचं प्रशासनाचं म्हणणं आहे.

"मालेगावात तबलीगी जमातच्या कार्यक्रमातून आलेले, दुबईमधून, सौदी अरेबियामधून आलेले तसंच उमरा या मुस्लीमांच्या धार्मिक यात्रेसाठी मक्केला जाऊन आलेले अनेक लोक आहेत. बुलंदशहरमध्ये ज्यांच्या परिवारात 2 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला त्या परिवारातले लोकही आधी मालेगावला येऊन गेल्याची माहिती आहे. यातल्या अनेक लोकांचा इतरांशी संबंध आले, त्यामुळे या लोकांमुळे इथे धोका वाढला आहे." अशी माहिती सुरज मांढरे देतात.

तबलीगी जमातच्या लोकांमुळे मालेगावमध्ये कोरोना पसरला, अशा आशयच्या पोस्ट सोशल मीडियावर फिरत आहेत. पण अखलाक अन्सारी या शक्यतेचा इन्कार करतात. "चुकीची माहिती सोशल मीडिया आणि मीडियातूनही प्रसारित होत आहे. एकतर माहिती देणारे चुकत आहेत किंवा ती घेणाऱ्यांचा गैरसमज होतोय. तबलीगी जमातच्या कार्यक्रमाला जाऊन आलेल्या जितक्या लोकांची इथे टेस्ट झाली आहे, ते सगळे निगेटिव्ह आहेत. इतर लोकांना प्रशासन शोधून काढतंय. इंटेलिजन्सची नजर आहे. अनेकांना घरात क्वारंटिन केलंय," ते म्हणतात.

श्वसनसंस्थेच्या आजारांचं माहेरघर

मालेगाव महाराष्ट्राच्या वस्रोद्योगाचं केंद्र आहे. इथे जवळपास तीन लाख पॉवरलूम्स आहेत आणि इथले बहुतांश रहिवाशी आपल्या उपजीविकेसाठी पॉवरलूमवर अवलंबून आहेत.

मालेगावात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाग इतक्या पटकन का झाला याची दोन महत्त्वाची कारणं जिल्हाधिकारी सुरज मांढरे सांगतात.

"इथे लोक प्रचंड दाटीवाटीने राहातात. एका 10 बाय 10 च्या घरात 15-15 लोक राहात असतात. परिस्थिती अशी आहे, की सकाळी पावरलूममधले लोक परत आले की रात्रपाळीला दुसरे लोक बाहेर पडतात. रात्रपाळीचे लोक गेल्याशिवाय दिवसपाळीच्या लोकांना झोपता सुद्धा येत नाही. इतक्या कंजेस्टेड घरात राहाताना संसर्गाच्या धोका अनेकपटीने वाढतो."

दुसरी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथल्या लोकांना आधीपासूनच असणारे श्वसनसंस्थेचे आजार. सतत पावरलूममध्ये काम केल्याने या लोकांच्या छातीत अत्यंत छोटे कण, धागे, धूळ जाऊन त्यांची श्वसनयंत्रणा आधीच कमजोर झालेली असते. मालेगावमध्ये टीबीचा प्रादुर्भावही प्रचंड आहे. इथल्या लोकांना सतत अनारोग्यात जगावं लागतं त्यामुळे त्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी झालेली असते. कोव्हिड -19 सारख्या आजाराला ते फार लवकर बळी पडू शकतात.

पॉझिटिव्ह - निगेटिव्हच्या सीमेवर

अचानक कोव्हिड -19 चे पेशंट्स वाढल्याने मालेगावकरांमध्ये भीतीचं वातावरण तयार झालं आहे. इथले रहिवासी आसिफ आणि त्यांच्या परिवाराला भीती आणि सुटका दोन्हीचा सामना करावा लागला आहे. आसिफ यांच्या आई सध्या कोरोना पॉझिटिव्ह संशयित आहेत आणि त्यांना आयलोलेशनमध्ये ठेवण्यात आलं आहे.

ते सांगतात, "माझ्या आईची ना ट्रॅव्हल हिस्ट्री आहे, ना त्यांचा दिल्लीतल्या मरकजच्या लोकांशी काही संपर्क आला होता. पण गेल्या काही दिवसांपासून त्यांना सतत खोकला येत होता. आधी आम्ही खाजगी डॉक्टरांकडे गेलो, त्यांनी आम्हाला सिव्हिल हॉस्पिटलला जायला सांगितलं. तिथे दोन दिवस ठेवल्यानंतर त्यांना बरं वाटलं. पण त्यावेळेस त्यांचा थ्रोट स्वॅब घेण्यात आला नव्हता. आम्हीही जागरूक नव्हतो, त्यामुळे आम्हीही काही म्हटलं नाही."

दोन दिवसांनी त्यांच्या आईचा त्रास पुन्हा वाढला आणि त्यांना पुन्हा सिव्हीलमध्ये दाखल करण्यात आलं. यावेळी त्यांना आयसोलेशनमध्ये ठेवलं.

"रात्री दोन वाजता आम्हाला फोन आला आणि सांगितलं की तुमच्या अम्मी कोरोना पॉझिटीव्ह आहेत. आणि आम्हालाही क्वारंटिन करून निरीक्षणाखाली ठेवणार असल्याचं सांगितलं. आम्हाला धक्काच बसला. आमच्या घरात लहान मुलं आहे, बायका आहेत. काय करावं सुधरत नव्हतं. पण आज सकाळी पुन्हा फोन आला आणि म्हणाले की नावात गोंधळ झाल्यामुळे तुमच्या अम्मी पॉझिटीव्ह आहेत असं सांगण्यात आलं. त्यांचे रिपोर्टस अजूनही आलेले नाही," आसिफ सांगतात.

थोड्या वेळासाठी त्यांनी सुटकेचा निश्वास सोडला असला तरी त्यांच्या डोक्यावर भीतीची टांगती तलवार अजून कायम आहे.

प्रशासनाचं पुढचं पाऊल काय?

जिल्हा प्रशासनाने ज्या भागात कोरोनाबाधित लोकांचं वास्तव्य होतं ते भाग सील केले आहेत. त्या लोकांच्या परिवाराला क्वारंटिन केलं आहे आणि त्यांच्यावर लक्ष आहे. संशयितांना ठेवण्यासाठी एक शाळा प्रशासनाने घेतली आहे. इतर संशयितांचा शोध घेण्यासाठी कोम्बिग ऑपरेशन सुरू केल्याची माहिती नाशिक ग्रामीणच्या एसपी आरती सिंह यांनी दिली. शहरात संपूर्ण संचारबंदी लागू केलीये आणि या भागात अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचंही पोलिसांनी म्हटलं आहे.

"कोरोनाबाधितांची संख्या वाढत असली तरी घाबरून जाण्याचं कारण नाही. परिस्थिती हाताबाहेर गेलेली नाही," असं जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)