कोरोना व्हायरस मुंबई : वांद्रे रेल्वेस्टेशनबाहेर हजारो स्थलांतरितांची गर्दी

मुंबईच्या वांद्रे स्टेशनच्या पश्चिमेकडे आज दुपारी शेकडो लोकांनी गर्दी केली. कोरोनाचा मुंबई हॉटस्पॉट असताना शेकडो लोक रस्त्यांवर आल्यामुळे पोलिसांची आणि प्रशासनाची धावपळ झाली.

लोकांना पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्जही करावा लागला.

पाहा नेमकं काय झालं -

"हे मजूर जवळच्याच छोट्या छोट्या कारखान्यांमध्ये काम करतात. आता ते कारखाने बंद आहेत. यांना भीती वाटतेय, पण आम्ही त्यांची समजूत काढलीये आणि आता परिस्थिती नियंत्रणात आहे," अशी माहिती वांद्रे पूर्वचे काँग्रेस आमदार झिशान सिद्दिकी म्हणाले,

याविषयी एबीपी माझाशी बोलताना गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले, "हे इतर राज्यांमधून आलेले स्थलांतरित मजूर आहेत आणि आज त्यांना वाटलं की लॉकडाऊन संपेल आणि आपापल्या गावी परत जाता येईल, म्हणून ते रेल्वे स्टेशनजवळ जमले."

सध्या जिल्हा आणि राज्यांच्या सीमा बंद करण्यात आल्यामुळे या मजुरांना मुंबई सोडून कुठेही जाता येणार नाहीये. पंतप्रधान मोदींनी आजच घोषणा केलीये की देशातला लॉकडाऊन 3 मेपर्यंत वाढवण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रात्री 8 वाजता राज्याला संबोधित करताना या स्थलांतरित मजुरांना हिंदीतून काळजी न करण्याचं आवाहन केलं. "कुणीतरी पिलू सोडलं की ट्रेन सुरू होणार. त्यांना असं वाटलं की 14 तारखेला ट्रेन सुरू होईल, म्हणून ते बाहेर आले. लॉकडाऊन म्हणजे लॉकअप नाही. काळजी करू नका.

राजकारण पेटलं

"हे चित्र मनाला व्यथित करणारे आहे. परराज्यातील मजुरांची व्यवस्था करणे, त्यांना योग्य जेवण, सुविधा देणे, ही राज्य सरकारची जबाबदारी आहे," असं विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवंद्र फडणवीस यांनी ट्वीट केलं आहे.

"तशी व्यवस्था होत नसल्याचे गेल्या अनेक दिवसांपासून आम्ही निदर्शनास आणून देत आहोत. तरीही राज्य सरकारने तसे उपाय केलेले नाहीत. आजच्या घटनेतून तरी राज्य सरकारने धडा घ्यायला हवा आणि यापुढे असे प्रकार होणार नाहीत, याची खबरदारी घ्यायला हवी," असं फडणवीस म्हणाले.

वांद्रे रेल्वेस्थानकाबाहेरील गर्दी आता नियंत्रणात आली असून, ही घटना तसंच सुरतमध्येही जे मजूर रस्त्यावर येऊन आंदोलन करत होते, हे सगळं केंद्र सरकारनं स्थलांतरित मजुरांना घरी परतण्यासाठी काही योग्य व्यवस्था निर्माण न केल्यानं झालंय, असं पर्यटन मंत्री आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.

"या लोकांना अन्न किंवा घर नकोय, तर त्यांना घरी परत जायचंय. ट्रेन बंद केल्यानंतर महाराष्ट्र सरकारनं रेल्वे 24 तास सुरू ठेवण्याबाबत केंद्र सरकारला विनंतीही केली होती, जेणेकरून कामगार आपापल्या घरी परत जाऊ शकतील. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही पंतप्रधानांसोबतच्या व्हीडिओ कॉन्फरन्सिंगवेळी हा मुद्दा उपस्थित केला होता, आणि स्थलांतरितांना परतण्यासाठी रोडमॅपची विनंती केली होती.

"एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाण्यासाठी केंद्र सरकारनं योग्य रोडमॅप केल्यास नक्कीच मदत होईल. मजूर सुरक्षितरीत्या घरी परततील केंद्र सरकारसमोर आम्ही वेळोवेळी हा मुद्दा उपस्थित केलाय."सुरतमध्ये जी स्थिती झाली, तशीच इथं झालीय. हे लोक राहण्यासाठी नकार देत आहेत. 6 लाखांहून अधिक लोक महाराष्ट्रात सरकारच्या तात्पुरत्या निवाऱ्यात राहत आहेत," असं आदित्य ठाकरे म्हणाले.

काही दिवसांपूर्वी गुजरातच्या सुरत शहरामध्ये मोठ्या संख्येने स्थलांतरित मजूर रस्त्यांवर आले होते. त्यांनी काही दुकानांना आगही लावली होती.

मात्र वांद्र्यातील परिस्थितीसाठी विरोधकांनी राज्य सरकारला धारेवर धरलं आहे.

विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी, "अशा स्थितीतही आपली जबाबदारी झटकून केंद्र सरकारवर टीका करून पळ काढला जात असेल तर ते आणखी दुर्दैवी आहे. कोरोनाविरूद्धचा लढा हा राजकीय नाही, हे कृपया आतातरी लक्षात घ्या. हा लढा आपल्याला गांभीर्यानेच लढावा लागेल, ही पुन्हा एकदा माझी कळकळीची विनंती आहे." असं म्हटलं आहे.

भाजप नेते नितेश राणे यांनी ट्वीट करत "मुख्यमंत्री सतत बोलत आहे जिथे आहात तिथेच रहा सरकार तुमची काळजी घेईल. असं होत नाही आहे म्हणूनच उद्रेक होत आहे!!" असं म्हटलं आहे.

"मुंबईमधल्या 10 बाय 10च्या खोलीत त्यांना धान्य तरी सरकारनी द्यावे नाहीतर त्यांचा ही असाच उद्रेक होईल!!!" असंही ते म्हणाले.

तर वांद्रे पूर्वचे काँग्रेस आमदार झिशान सिद्दिकी म्हणाले, "आम्ही आमच्याकडून अन्नधान्याचं वाटप केलंय. मात्र लोकांमध्ये भीती आहे, कारण लॉकडाऊन वाढत जातंय. त्यांना त्यांच्या कुटुंबासोबत राहायचंय. त्यामुळं ते गावी जाऊ इच्छित आहेत.

आदित्य ठाकरेंची सारवासारव

वांद्र्याच्या घटनेची केंद्र सरकारने दखल घेतली असून राज्य सरकारला त्यांचं पूर्ण सहकार्य आहे, असं ट्वीट आदित्य ठाकरेंनी आता केलं आहे.

"आम्ही केंद्र आणि राज्य सरकारांसमोरचा यक्षप्रश्न समजतो. मी पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांचे आभार मानतो की ते परिस्थिती समजून स्थलांतरितांच्या राज्यांची सुरक्षितता पाहत आहेत," असं आदित्य म्हणाले.

स्थलांतरितांचा प्रश्न सगळीकडे कायम आहे. आम्ही सहा लाख स्थलांतरित मजुरांच्या राहण्या-खाण्याची सोय करतोय आणि केंद्र व राज्य सरकारांमध्ये त्यासाठीचा समन्वय सुरू आहे. सर्व मजुरांची काळजी घेतली जाईल, असंही ठाकरे म्हणाले.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)