कोरोना लॉकडाऊन: इंडिया पोस्ट कोव्हिड-19 संकटात औषधं देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणार

    • Author, आएशा परेरा
    • Role, बीबीसी प्रतिनिधी, दिल्ली

भारतीय टपाल सेवा जगातली सर्वांत मोठी टपाल सेवा आहे, आणि कोरोना विषाणूच्या काळात या विभागाने लोकसेवेचा आणखी एक नवा विडा उचलला आहे.

लॉकडाऊन असल्याने देशातल्या अनेक ठिकाणी जीवनावश्यक औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे. भारतीय टपाल सेवेमार्फेत आता अशा भागांमध्ये औषधांचा पुरवठा करण्यात येतोय.

पोस्टाची लाल गाडी प्रत्येक भारतीयाच्या ओळखीची आहे. रोज रस्त्यांवर भारतीय टपाल खात्याच्या या गाड्या फिरत असतात.

भारतीय टपाल खात्याची देशभरात सहा लाख गावांमध्ये कार्यालयं आहेत. पत्र आणि पार्सल व्यतिरिक्त भारतीय टपाल विभाग इतर अनेक सेवा पुरवतो. टपाल खात्याच्या बचत बँक, जीवन विमा, पेंशन फंड अशा अनेक सेवांचा लाखो भारतीय लाभ घेत असतात.

कोरोनाविरोधात लढण्यासाठी 'भारतीय डाक' मैदानात

आज लॉकडाऊनमुळे वाहतूक व्यवस्था पूर्णपणे बंद आहे. त्यामुळे ज्या भागांमध्ये वैद्यकीय साहित्य आणि औषधांची सर्वाधिक गरज आहे, तिथपर्यंत या वस्तू पोहोचवण्याचं काम टपाल खातं करत आहे.

कोव्हिड-19 आजाराच्या फैलावाला आळा घालण्यासाठी 24 मार्चपासून संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. जीवनावश्यक सेवा वगळता इतर सर्व उद्योग-व्यवसाय बंद करून लोकांना घरी थांबण्यास सांगण्यात आलं.

मात्र, घोषणा झाल्यानंतर अगदी चारच तासात लॉकडाऊन सुरू केल्याने कोरोनाचा सामना करण्यासाठी सर्वाधिक गरजेच्या असलेल्या हॉस्पिटल्स, औषध निर्मिती कंपन्या आणि पॅथोलॉजी लॅब यासारख्या सेवांवरही मोठा परिणाम झाला. त्यांना कुठलीच पूर्वतयारी करायला वेळ मिळाला नाही.

इंडियन ड्रग्ज मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे (IDMA) कार्यकारी संचालक अशोक कुमार मदान यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं, "आम्हाला बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागतोय. ग्राहकांपर्यंत आमची उत्पादनं पोचवण्यासाठी आम्ही कुरियर सेवेवर अवलंबून असतो. मात्र, त्यापैकी कुणीच आता काम करायला तयार नाही. कदाचित त्यांच्याकडे कर्फ्यू पास किंवा डिलिव्हरी करणारी माणसं नाहीत."

त्यांची अनेक उत्पादनं हृदयासंबंधीचे आजार, कॅन्सर यासारख्या मोठ्या आजारांमध्ये लागणारी अत्यावश्यक औषधं असल्याचंही त्यांनी सांगितलं.

आम्ही बोलत असतानाच त्यांना उत्तर प्रदेशातल्या टपाल विभागातले वरिष्ठ निरीक्षक आलोक ओझा यांचा फोन आला.

गुजरातमध्ये टपाल विभागाने IDMA शी संपर्क करून अत्यावश्यक औषधं आणि वैद्यकीय साहित्य पोहोचवण्याची जबाबदारी घेतली होती. तशीच सेवा उत्तर प्रदेशातही पुरवण्यासंबंधी आलोक ओझा चर्चा करत होते.

मदान म्हणाले, "आम्हाला कुठलातरी मार्ग काढायचाच आहे आणि टपाल विभागाचं जाळ तर संपूर्ण देशभर आहे."

औषधांच्या अवैध साठ्याला आळा बसण्यास मदत

टपाल खात्याचं देशभर विणलेलं जाळ बघूनच त्यांचा समावेश अत्यावश्यक सेवेत करण्यात आला आहे आणि लॉकडाऊनमध्येसुद्धा या विभागाचं काम सुरू आहे.

आलोक ओझा यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं, "आम्हाला वाटलं की आम्ही हे करू शकतो, कारण आमची पुरवठा साखळी अबाधित आहे. यामुळे बाजारात औषध पुरवठा होईल आणि औषधांचा अवैध साठा करून कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्यांना आळा बसेल, असं अनेकांनी सांगितलं."

टपाल खात्याच्या या नव्या उपक्रमाविषयी कळताच औषध उत्पादन करणाऱ्या अनेक कंपन्यांनी टपाल विभागाशी संपर्क करायला सुरुवात केली आहे.

लखनौची कोव्हिड-19 डायग्नोस्टिक किट्सची एक ऑर्डर दिल्लीत अडकून पडली होती. त्यावेळी मी आलोक ओझा यांना संपर्क केल्याचं लखनौमधल्या संजय गांधी पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेसमध्ये मायक्रोबायलॉजिस्ट असणाऱ्या डॉ. उजाला घोशाल यांनी सांगितलं.

त्या म्हणाल्या, "इंस्टिट्युट ऑफ मेडिकल रिसर्चकडून आम्हाला फोन आला आणि त्यांनी सांगितलं की ते ज्या कुरिअर कंपनीमार्फत साहित्य पाठवायचे ती बंद असल्याने आम्हालाच दिल्लीला जाऊन किट्स आणाव्या लागतील. मात्र, लॉकडाऊन असल्यामुळे आम्ही काहीच करू शकत नव्हतो."

या कामी टपाल खात्याने मोलाची मदत केल्याचंही त्यांनी सांगितलं. टपाल खात्याने दिल्लीतून कोव्हिड-19 डायग्नोस्टिक किट्सची ऑर्डर उचलली आणि ते पार्सल पोस्ट ऑफिसमध्ये जमा न करता थेट आमच्या संस्थेत आणून दिल्याचं डॉ. घोशाल यांनी सांगितलं. डॉ. घोशाल यांनी ओझा यांना फोन केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांना त्यांच्या किट्स मिळाल्या.

इतरही अनेक संस्था आणि कंपन्यांनीही या कंपनीला विनंती केली आहे. लॉकडाऊन सुरू झाल्यापासूनच पोस्टाच्या लाल गाड्यांतून मोठ्या शहरात आणि वेगवेगळ्या राज्यांमध्ये अत्यावश्यक औषधं, कोव्हिड-19 डासग्नोस्टिक किट्स, N95 मास्क, व्हेंटिलेटर्स, इतर वैद्यकीय साहित्य अशा सगळ्यांची डिलिव्हरी करायला सुरुवात केल्याचं ओझा यांनी सांगितलं.

'भारतीय टपाल सेवा सध्याच्या काळात महत्त्वाची भूमिका बजावेल'

दूरच्या अंतरासाठी किंवा तात्काळ डिलिव्हरीची गरज असेल तेव्हा विमानसेवेची मदत घेण्यात आली. तामिळनाडूमधून डिफ्रिब्रिलेटर (हृदयासंबंधीच्या आजारात वापरलं जाणारं उपकरण) कार्गो विमानामधून उत्तर प्रदेशात पोचवण्यात आले. कधीकधी ऑर्डर खूप काळजीपूर्वक हाताळावी लागते. एका औषध निर्मिती कंपनीने त्यांच्या औषधांना कोल्ड स्टोरेज म्हणजेच शीतपेट्यांची गरज असल्याचं सांगितलं. मात्र, टपाल विभागाकडे आजवर ज्यांनी ज्यांनी मदत मागितली त्या सर्वांना विभागाने मदत केली आहे.

ओझा म्हणाले, "भारतात आमची सेवा उत्तम आहे. आम्ही सगळीकडे आहोत. आणि या परिस्थितीत आम्ही मदत करू शकतो, हे आम्हाला माहिती होतं."

भारतात लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. त्यामुळे येणाऱ्या आठवड्यात भारतीय टपाल सेवा कोव्हिड-19चा सामना करण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल, अशी आशा ओझा यांनी व्यक्त केली आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)