You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना व्हायरस : मुंबई ते काश्मीर सायकलवर निघालेल्या आरिफला जेव्हा CRPFची मदत मिळते
- Author, दिलनवाझ पाशा
- Role, बीबीसी प्रतिनिधी
माझ्या वडिलांचे प्राण सीआरपीएफमुळेच वाचू शकले. मी आयुष्यभर त्यांचा ऋणी राहीन.
हे बोलता बोलता आरिफ यांच्या डोळ्यात अश्रू दाटून आले होते.
आरिफ मुंबई ते काश्मीरच्या राजौरीपर्यंतचा 2100 किलोमीटरचा प्रवास करण्यासाठी सायकलवरच निघाले होते. आपल्या वडिलांना जिवंत पाहू शकतो की नाही याबाबत त्यांच्या मनात शंका होती.
पण आता आरिफ यांचे वडील चंदिगढच्या पीजीआय हॉस्पिटलमध्ये दाखल आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू असून आरिफसुध्दा त्यांच्यासोबत आहेत.
- वाचा- महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती आणि त्याच्यापासून कसं संरक्षण करता येतं?
- वाचा -कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा - क्वारंटाईन, आयसोलेशन किंवा विलगीकरण म्हणजे नेमकं काय?
- वाचा -लहान मुलांना कोविड 19 चा धोका किती?
- वाचा - व्हेंटिलेटर्स काय असतात? कोरोनाच्या लढ्यात ते इतके महत्त्वाचे का आहेत?
- वाचा - कोरोनाच्या तडाख्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था अजूनच संकटात?
कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी भारत सरकारने 25 मार्चपासून 21 दिवसांचं लॉकडाऊन केलं होतं. त्यामुळे 14 एप्रिलपर्यंत देशात सगळं काही बंद आहे.
पण यादरम्यान आरिफ यांना घरून फोन आला. त्यांचे वडील वजीर हुसेन यांची तब्येत बिघडल्याचं कळल्यानंतर आरिफ अस्वस्थ झाले होते.
घरी जाण्याची काही सोय होईल का, याची त्यांनी चाचपणी केली. पण कोणताच मार्ग उपलब्ध नसल्यामुळे त्यांनी मुंबई ते काश्मीर सायकलवर जाण्याचा निर्णय घेतला.
सीआरपीएफची मदत कशी मिळाली?
आरिफ यांनी आपल्या संपूर्ण प्रवासाचा घटनाक्रम बीबीसीला फोनवर सांगितला.
ते सांगतात, माझ्या वडिलांना हृदयविकाराचा झटका बसला होता. लॉकडाऊन असल्यामुळे जायची कोणतीच सोय नव्हती. मी प्रयत्न केला, पण काहीच मदत मिळू शकली नाही. म्हणून मग मी सायकल विकत घेतली आणि 2 एप्रिलला घरी काश्मीरला निघालो.
आरिफ रस्त्यावरून काश्मीरच्या दिशेने पुढे जात होते. लोक त्यांना पाहून विचारपूस करत होते. दीपेश नामक एका तरूणाने आरिफ यांचा व्हीडिओ बनवून सोशल मीडियावर शेअर केला.
काही लोकांनी आरिफ यांची कहाणी सीआरपीएफच्या हेल्पलाईवर शेअर केली. आरिफ यांच्याबद्दल माहिती मिळताच सीआरपीएफ तातडीने त्यांच्या मदतीसाठी पुढे आली.
जम्मू-काश्मीरमध्ये सीआरपीएफचे विशेष महासंचालक झुल्फिकार हसन यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं, आम्ही आरिफशी संपर्क साधला. त्यांना थांबवण्यासाठी प्रयत्न केले. दरम्यान आमचं पथक त्यांच्या वडिलांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करत होतं.
हसन सांगतात, राजौरीमध्ये आम्ही आरिफच्या पत्त्यावर गेलो. त्यांच्या वडिलांची तब्येत खूपच बिघडली होती. त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात नेण्यात आलं. त्यांनी जम्मूला घेऊन जाण्याचा सल्ला दिला. तिथं त्यांना हेलिकॉप्टरने नेलं. पण जम्मूतल्या डॉक्टरांनी त्यांना चंदीगढला नेण्यास सांगितलं. त्यामुळे आरिफच्या वडिलांना पीजीआय हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. सध्या इथंच त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
झुल्फिकार हसन पुढे सांगतात, दुसरीकडे आम्ही आरिफ यांनासुद्धा चंदीगढला पोहोचवण्यासाठी प्रयत्न करत होतो. आम्ही रस्त्यातील राज्यांकडून मदत मिळवली आणि अखेर आरिफ यांना त्यांच्या वडिलांकडे पोहोचवण्यात आलं.
आरिफ सांगतात, तीन दिवस सायकल चालवून बडोद्याला पोहोचल्यानंतर मला सीआरपीएफची मदत मिळाली. तिथं सीआरपीएफच्या मुख्यालयात मला नेण्यात आलं. त्यांनी मला जेवण दिलं. तसंच दोन हजार रुपयेसुद्धा दिले.
झुल्फिकार हसन सांगतात, सीआरपीएफची हेल्पलाईन 2017 मध्ये सुरू करण्यात आली होती.
अडचणीत सापडलेल्या लोकांची मदत करणं, हा या हेल्पलाईनचा उद्देश आहे.
ते सांगतात, जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या वर्षी 5 ऑगस्टपासून लॉकडाऊन आहे. तेव्हापासून या हेल्पलाईनच्या माध्यमातून देशभरात राहणाऱ्या काश्मिरी लोकांची आणि विद्यार्थ्यांची मदत करण्यात आली आहे.
सीआरपीएफ एक केंद्रीय सुरक्षा संस्था आहे. देशातील प्रत्येक भागात यांचं पथक आहे. देशात कोणत्याही भागात राहणाऱ्या काश्मिरी लोकांना या हेल्पलाईनचा चांगला उपयोग होतो.
केंद्रशासित प्रदेश काश्मीरमध्ये भारतीय सैन्यदल मोठ्या संख्येने तैनात आहे. यामध्ये सीआरपीएफचा प्रामुख्याने समावेश आहे.
झुल्फिकार हसन यांच्या मते, या हेल्पलाईनच्या माध्यमातून सीआरपीएफ काश्मिरी लोकांमध्ये विश्वास निर्माण करत आहे.
आरिफ पुन्हा पुन्हा सीआरपीएफचे आभार मानताना सांगतात, माझे वडील सीआरपीएफमुळेच जिवंत आहेत. मी त्यांना भेटू शकलो, यामुळे मी प्रचंड ऋणी आहे.
हेवाचलंतका?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, , ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)