कोरोना व्हायरस : 'ज्या तीन महिन्यात कमाई होते, त्याचवेळी घरी बसलोय. आता आम्ही जगायचं कसं?'

फोटो स्रोत, Getty Images
- Author, अमृता कदम
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
"घुंगराच्या जिवावर जगणारे लोक आम्ही… आमच्या कमाईवरच दहा जणांचं कुटुंब चालतं. पण आता सगळंच बंद पडलंय... मुलांना कसं जगवायचं, हा प्रश्नच आहे," उषा काळे हतबल होऊन बोलत होत्या.
उषा काळे चौफुला कला केंद्रात काम करतात. कोरोनामुळे गावोगावीच्या यात्रा-जत्रा रद्द झाल्या आणि तमाशा कलावंतांसमोर रोजच्या जगण्याची भ्रांत निर्माण झाली. उषा काळे त्यांच्यापैकीच एक.
तमाशाचे फड, कला केंद्र बंद असल्यामुळे त्या बीड जिल्ह्यातल्या आपल्या गावात केजला परत आल्या आहेत. सध्या आपल्या भावाच्या घरी राहणाऱ्या उषा काळेंसमोर मोठं प्रश्नचिन्ह आहे.
"कलाकेंद्रातले सगळेच कलाकार घरी गेले आहेत. सुपाऱ्याच नाहीत तर करणार काय?"
तमाशा ही महाराष्ट्राची लोककला… फड आणि कला केंद्रातून जिवंत राहिलेली. गावाखेड्यांमध्ये आजही यात्रा आणि जत्रांच्या काळात तमाशाचे फड रंगतात. साधारणतः चैत्र महिन्यापासून महाराष्ट्रात वेगवेगळ्या गावांच्या यात्रा सुरू होतात. तमाशा कलाकारांसाठी हा सुगीचा काळ. मार्च, एप्रिल आणि मे या तीन महिन्यात या कलाकारांची वर्षभराची कमाई होते.


पण यावेळी नेमकं याच काळात कोरोनाचं संकट आलं. कोरोनाचा संसर्ग टाळण्याचा सगळ्यात प्रभावी मार्ग कुठला तर गर्दी टाळणं. त्यामुळेच देशभर लॉकडाऊनचा निर्णय घेतला गेला.
राज्यात गर्दी टाळण्यासाठी जे निर्णय घेण्यात आले, त्यांपैकी एक होता गावातल्या यात्रा-जत्रा रद्द करण्याचा. याच काळात तमाशा कलाकारांना गावोगावी कार्यक्रमासाठी सुपाऱ्या मिळतात. लहान-मोठ्या तमाशा फडांची आर्थिक उलाढाल ही कोट्यवधींच्या घरात जाते.
गेल्यावर्षीच्या आकडेवारीचा विचार करता शंभरहून अधिक तमाशा फडाचं बुकिंग झालं होतं. यावेळेस मात्र कलाकेंद्रं आणि तमाशाच्या राहुट्या ओस पडल्या आहेत.

- वाचा - कोरोनाचा माझ्या जीवाला किती धोका आहे?
- वाचा -आधी कोव्हिड-19ची किट बनवली, मग बाळाला जन्म दिला
- वाचा-कोरोना व्हायरसची शरीरातील प्राथमिक लक्षणं कशी ओळखाल?
- वाचा- कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा - क्वारंटाईन, आयसोलेशन किंवा विलगीकरण म्हणजे नेमकं काय?
- वाचा - 'गो कोरोना': या लोकांनी केली कोरोना व्हायरसवर मात
- वाचा - कोव्हिड-19 पँडेमिक जाहीर, पण याचा नेमका अर्थ काय?

"मार्च, एप्रिल, मे हे पावसाळ्याच्या आधीचे तीन महिने हा आमचा खरा सीझन असतो. कारण कलाकार पावसाळ्यात घरी बसून असतात. त्यांची सगळी कमाई या तीन महिन्यात होते," न्यू अंबिका कला केंद्राचे संचालक आणि महाराष्ट्र तमाशा थिएटर मालक संघटनेचे अध्यक्ष अशोक जाधव यांनी सांगितलं.
न्यू अंबिका कला केंद्रात 175 कलाकार आहेत. महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यातून हे कलाकार आले आहेत. हे कलाकारही परत गेले आहेत.
"एरवी सीझनच्या वेळेस ढोलकी फड तमाशाचे महिन्याला तीस कार्यक्रम तरी होतात. तीन महिन्यात 80 ते 90 कार्यक्रम होतात. प्रत्येक कार्यक्रमाची सुपारी ही लाख ते दीड लाख असते. त्या हिशोबाने एका सीझनला 80 लाख ते एक कोटी रुपयांची उलाढाल होते. या पैशांमधून प्रवास खर्च, फडातील 100-150 कलाकारांचा पगार भागवला जातो," अशोक जाधव सांगत होते.
फडातले, कला केंद्रातले हे कलाकार करारावर असतात. मिळणाऱ्या सुपाऱ्यांच्या हिशोबानं कलाकारांना आठवड्याला त्यांची ठरलेली रक्कम दिली जाते, असं अशोक जाधव सांगत होते. पण कोरोनामुळे कार्यक्रमच नाहीत, अशावेळी आम्हीपण कलाकारांना फार काही मदत करू शकत नाही, असं त्यांनी सांगितलं.
"पैसे देऊ शकत नसलो तरी कलाकारांना जीवनावश्यक वस्तूंची मदत करण्याचा प्रयत्न आम्ही करतोय. कोणाला किराणा दिलाय. कोणी फोन केला, तर तिथल्या दुकानदारांशी बोलून त्यांना आम्ही पैसे नंतर देऊ या बोलीवर उधारीवर गरजेच्या गोष्टी देण्याची विनंती करतोय."
आता मुलांना कसं जगवायचं?
चौफुला संगीत बारीमधल्या उषा काळे 16 मार्चला बीड जिल्ह्यातील आपल्या गावी, केजला आल्या. त्यानंतर काही दिवसातच लॉक डाऊनचा निर्णय जाहीर झाला आणि त्या गावातच अडकून पडल्या. परत जाऊनही काही उपयोग नव्हता. कारण तमाशाचे फड बंदच आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
"आमच्या घरात आता काहीही नाहीये. कलाकेंद्रातली एक खोली हेच आमचं घर आणि तीन महिने कार्यक्रम करून मिळणारे पैसे हीच वर्षभराची कमाई. आता या कोरोनामुळं सगळं बंद पडलं. सगळं वर्ष आमच्यासाठी अडचणीचं जाणार. आपलं आयुष्य हे असं, निदान पोरांनी तरी शिकावं असं वाटतं. पण आता पैसे नसतील तर त्यांचं काय होणार हा प्रश्नच आहे."
उषा काळे केजला त्यांच्या भावाच्या घरी राहत आहेत. त्यांचा भाऊ रिक्षा चालवतो. पण आता त्याची रिक्षाही बंद आहे. उषा काळेंना दोन मुलं आहेत. एक नववीत आहे, जो आनंदग्रामला त्यांच्या बहिणीकडे असतो. तर त्यांचा दुसरा मुलगा पहिलीत आहे. भावाचंही कुटुंब आहेच.
"भावाला रिक्षा चालवून असे किती पैसे मिळणार? आम्हीच त्याला थोडेफार पैसे पाठवत असतो. केवळ आम्हीच नाही, आमच्यापैकी प्रत्येक मुलगी पैसे साठवून घरी पाठवते. एकेकाच्या जीवावर दहा-बारा जणांचं कुटुंब चालतं. कला केंद्राचे मालकही किती मदत करतील? त्यांचंही उत्पन्न बंद आहे."
गरिबांना, ज्यांचं हातावर पोट आहे त्यांना सरकार धान्य देणार आहे. काही ठिकाणी रेशनचं वाटपही सुरू झालं आहे. तुमच्यापर्यंत काही मदत पोहोचली नाही का, या प्रश्नाचं उत्तर उषा काळे यांनी नकारार्थी दिलं.
"अजूनतरी आम्हाला धान्य वगैरे काही मिळालं नाहीये. आमची नाव नोंदणी करून घेण्यात आलीये. पण धान्याचं वाटप कधी होईल हे आम्हाला सांगितलं नाही."
उषा काळे यांना आता सरकारकडून मदतीची अपेक्षा आहे.
"आम्ही कलाकार आहोत. आता सरकारनंच आम्हाला जगवण्यासाठी मदत करावी. आमचं हातावरचं पोट आहे. कलाकेंद्र बंद आहेत. आता सरकारनंच आम्हाला पैशांच्या स्वरुपात मदत दिली तर आमचं काही खरं आहे."
कसं चालतं तमाशा फडांचं काम?
प्रसिद्ध तमाशा कलावंत आणि तमाशा फड मालक संघटनेचे अध्यक्ष रघुवीर खेडकर यांनी तमाशा फडाचं काम चालतं कसं, त्यांचं आर्थिक नियोजन कसं असतं, याबद्दल सविस्तर माहिती दिली. त्यांचा स्वतःचा रघुवीर खेडकरसह कांताबाई सातारकर तमाशा मंडळ नावाचा फडही आहे.

फोटो स्रोत, Getty Images
"महाराष्ट्रात तमाशाचे दहा मोठे आणि 90 हून अधिक लहान फड आहेत. मोठ्या फडात 100 ते 120 कलाकार असतात. लहान फडामध्ये 40 ते 60 कलाकार असतात. पावसाळा संपला, की दसऱ्याला आमचे तमाशाचे फड सुरू होतात. पण ते कनात-तंबूमध्ये तिकीट लावून होतात. 50-70 रुपये तिकीट असतं. होळी पौर्णिमेपर्यंत आम्ही असेच खेळ करतो. पण त्यातून फारसं उत्पन्न मिळत नाही. आमचा खरा सीझन रंगपंचमीनंतर सुरू होतो. बौद्ध पौर्णिमेपर्यंत हे फड सुरू असतात. याच काळात आमची मोठी आर्थिक उलाढाल होते," रघुवीर खेडकर सांगत होते.
याच काळात गावोगावी यात्रा असतात. त्यासाठी तमाशा फडांना आमंत्रणं दिली जातात. एका गावात कधी एकच दिवस कार्यक्रम असतो, तर कधी दोन किंवा तीन कार्यक्रम. त्यानुसार एक लाखापासून दीड ते पावणेतीन लाखापर्यंतची सुपारी ठरते. या काळात मोठ्या फडांची कमाई 90 लाखांपर्यंत होते, लहान फडांची कमाई त्यांच्या सुपारीच्या हिशोबात होते.
"फडातले कलाकार करारावर काम करतात. पावसाळ्याचे तीन महिने ते घरी असतात. त्यांना आम्ही सात महिन्याचा पगार देतो. त्यांचा पगार देण्याची वेळ पण सीझनचे हे दोन महिने असतात. कारण त्याकाळात वर्षभराची कमाई होत असते," रघुवीर खेडकर सांगतात.
"आता कोरोनामुळं सगळं बंद झाल्यानं आमचं खूप नुकसान झालं आहे. माझ्या स्वतःच्या फडात 110 लोक आहेत. नऊ गाड्या आहेत. आपल्याकडे कोरोनाची चर्चा सुरू झाल्यावर मी सगळ्या कलाकारांना एक-एक हजार रुपये देऊन घरी पाठवलं. वाटलं होतं, हे सगळं 31 मार्चपर्यंत संपेल. थोडेतरी कार्यक्रम मिळतील. पण आता सगळंच ठप्प होऊन बसलंय."
नोटाबंदीपासूनच तमाशाच्या फडांना फटका
गेल्या तीन-चार वर्षांचा काळ हा तमाशा फडासांठी कठीण असल्याचंही रघुवीर खेडकर यांनी म्हटलं.
"आम्हाला सगळ्यात मोठा फटका नोटाबंदीच्या काळात बसला होता. त्यावर्षी फार सुपाऱ्या मिळाल्या नाहीत. त्यानंतरच्या वर्षी दुष्काळ पडला. 2019 मध्ये लोकसभेच्या निवडणुका होत्या. आमच्या सीझनच्या काळातच आचारसंहिता होती. त्यानंतर राज्यात पावसानं थैमान घातलं. अगदी दसरा-दिवाळीलाही पाऊस होता. ज्यांच्या जीवावर आम्ही असतो, त्या शेतकऱ्याला पावसानं पार झोपवलं आणि आता कोरोना…आमच्यासमोर मोठाच प्रश्नच उभा राहिलाय."
सरकारच्या लोककलावंतांसाठी काही योजना आहेत का, असं विचारल्यावर रघुवीर खेडकर यांनी सांगितलं, की या सगळ्या योजना वृद्ध कलाकारांसाठी आहेत.
"एरवी ठीक होतं. पण आताच्या परिस्थितीत सरकारनं आम्हाला मदत करावी असं वाटतं. आमच्या कलाकारांचे दोन महिन्याचे पगार दिले तरी आमच्यासाठी खूप आहे. या घडीला सरकारनं आम्हाला मदत केली नाही तर आम्हाला पुन्हा उभंच राहता येणार नाही."
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








