You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना व्हायरस रोगातून भारतातले सर्वांत म्हातारे ’बाबा’ असे बरे झाले
- Author, इमरान कुरैशी
- Role, बीबीसी हिंदीसाठी बेंगलुरूहून
ते 90 वर्षांपेक्षा जास्त वयाचे आहेत तर त्यांच्या पत्नीचं वय 88 वर्षं. दोघांनाही कोरोना व्हायरसची लागण झाली होती.
त्यांना रुग्णालयात अतिदक्षता विभागात ठेवण्यात आलं होतं, त्यामुळे दोघंही चीडचीड करत होते, डॉक्टरांवर नाराज होते. शेवटी दोघांनाही दोन खोल्या मिळाल्या आणि मध्ये काचेचं एक पार्टिशन होतं, जेणेकरून दोघं एकमेकांना पाहू शकतील.
आणि आता ते बरे झालेत.
कोरोना व्हायरस 60 पेक्षा जास्त वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांसाठी अधिक धोकादायक आहे. तसंच ज्यांना डायबेटीस, हृदयविकाराचा त्रास आहे, अशा रूग्णांसाठी जास्तच घातक ठरू शकतो.
काही वृत्तांनुसार 90 वर्षांहून अधिक वय असलेले हे आजोबा कोरोना व्हायरसविरोधात लढा जिंकणारे जगातले दुसरे वयोवृद्ध आहेत.
जगभरात या व्हायरसने हजारो लोकांचे बळी घेतले आहेत. केरळमधील कोट्टायम वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.आर. पी. रेनजिन यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं, "कोरोना व्हायरससारख्या जीवघेण्या आजारातून बरे झालेले 96 वर्षाचे एक वयोवृद्ध या ठिकाणी गेल्या 20 दिवसांपासून उपचार घेत आहेत. आम्ही सगळे त्यांना बाबा म्हणतो."
एक दिवस आधी झालेल्या कोव्हिड-19 टेस्टमध्ये पतीची टेस्ट निगेटिव्ह तर ज्यांना संपूर्ण रुग्णालय आई म्हणतं अशा त्यांच्या पत्नीचीही टेस्ट निगेटिव्ह आली.
तीन आठवड्यांपूर्वी रुग्णालयात दाखल
तीन आठवड्यांपूर्वी दोघांची कोरोना कोव्हिड-19 टेस्ट पॉझिटीव्ह आणि या दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
दोघंही त्यांची मुलगी आणि जावयाच्या संपर्कात आले होते, जे नुकतेच इटलीहून परतले होते. त्यांना 'इटली कपल' म्हणून ओळखलं जातंय.
एक मोठं पथक त्यांचा शोध घेत होतं. या पथकाचे नेतृत्व एक वरिष्ठ IAS अधिकारी करत होते.
विमानतळावर होत असलेली स्क्रीनिंग न करताच त्यांनी तिथून पळ काढला होता. त्यामुळे त्यांची शोधाशोध सुरू झाली होती.
वयोवृद्ध जोडप्याची उपचारावर काय प्रतिक्रिया होती ?
डॉ. रेनजिन यांनी सांगितलं, "जेव्हा आम्ही त्यांना काचेचे विभाजन असलेल्या अतिदक्षता विभागात ठेवले तेव्हा ते आनंदात होते. एकदा तर त्यांनी दूध न पिण्याचा हट्ट धरला. त्यांना फक्त साबुदाणा खाण्याची इच्छा होती, तोसुद्धा त्यांच्या शेतातलाच. ते त्यांच्या भागातले प्रसिद्ध शेतकरी आहेत."
- वाचा - कोरोनाचा माझ्या जीवाला किती धोका आहे?
- वाचा -आधी कोव्हिड-19ची किट बनवली, मग बाळाला जन्म दिला
- वाचा-कोरोना व्हायरसची शरीरातील प्राथमिक लक्षणं कशी ओळखाल?
- वाचा- कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा - क्वारंटाईन, आयसोलेशन किंवा विलगीकरण म्हणजे नेमकं काय?
- वाचा - 'गो कोरोना': या लोकांनी केली कोरोना व्हायरसवर मात
- वाचा - कोव्हिड-19 पँडेमिक जाहीर, पण याचा नेमका अर्थ काय?
त्यांच्या या हट्टाचं डॉक्टरांनाही आश्चर्य वाटत होते.
डॉक्टर रेनजिन यांनी सांगितलं, "आम्ही अखेर त्यांचा हट्ट पुरवला. 60 किमी दूरवर राहात असलेल्या नातेवाईकांनी त्यांच्यासाठी साबुदाणा आणले. आम्हाला याची परवानगी द्यावी लागली, कारण अशा प्रकरणांमध्ये रुग्णांना आनंदी ठेवणंही गरजेचं असते."
बाबांची प्रकृती खालावली
उपचारादरम्यान बाबांची प्रकृती खालावली आणि त्यांना व्हेंटिलेटवर ठेवावं लागलं. 24 तासांनी त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आणि त्यांचं व्हेंटीलेटर काढण्यात आलं. यानंतर त्यांना केवळ आराम करण्यासाठी सांगितलं गेलं.
डॉ. रेनजिन यांनी सांगितलं, "त्यांना बेडवरून खाली उतरून चालायचं होतं. त्यामुळे त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी त्यांच्या खोलीत एक नर्स ठेवावी लागली."
रुग्णालयाला एक नर्स आणि सहकार्य करणारा काही स्टाफ दर चार तासांनी बदलावा लागायचा, म्हणजेच दिवसाला सहा नर्सेसची ड्युटी लावावी लागत होती.
नर्सला ते आवाजाने ओळखत होते
डॉ. रेनजिन सांगतात, "अतिदक्षता विभागात सगळ्यांनाच मास्क आणि इतर सुरक्षेची काळजी घ्यावी लागत होती. त्यामुळे कुणाचेच चेहरे ओळखता येत नव्हते. पण ते नर्सेसना आवाजाने ओळखायचे. एक नर्स गाणं गायची. तिनं आदल्या दिवशी जे गाणं गायलं तेच गाणं गाण्याचा हट्ट ते धरायचे."
आई शांत होती. त्यांना जास्त वेळ झोपून राहता येत नव्हतं. डॉक्टर सांगतात, "आम्हाला त्यांना सांगावं लागायचं की तुम्ही झोपून आराम करायचा आहे. आमचे कर्मचारी सतत त्यांच्याशी गप्पा मारायचे."
"बाबा आम्हाला भन्नाट गोष्टी सांगायचे. त्यांनी सांगितलेल्या गोष्टी आम्ही सार्वजनिक करू शकत नाही, पण आम्ही कधीतरी त्यावर पुस्तक लिहू..."
बाबांनी आवडता पदार्थ खाण्याचा हट्ट धरला तेव्हा
त्यांचा नातू आपल्या पत्नी आणि मुलांसह तिथे उपस्थित होता.
त्यांनी बीबीसीशी बोलताना सांगितले, "डॉक्टर आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी त्यांच्यावर उत्तम उपचार केले. त्यांची काळजी घेतली. त्यांना टॅपीओका खाण्याचा हट्ट धरला."
त्यांची मुलगी आणि जावयाला सोमवारी रुग्णालयातून सोडण्यात आलंय. तर या वयोवृद्ध जोडप्याला आज सोडण्याचं ठरवण्यात आलं होतं.
पण वैद्यकीय मंडळाने त्यासाठी दोन बैठका घेतल्या. त्यानंतर त्यांना एसी नसलेल्या खोली ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला, जेणेकरून घरी जाण्यापूर्वी त्यांना एसी नसल्याची सवय करता येईल.
डॉ. रेनजिन यांनी सांगितलं, "केवळ काही वैद्यकीय कारणांमुळे आम्ही त्यांना रुग्णालयात ठेवलंय. एक तासाचा प्रवास करून त्यांना आपल्या घरी पोहचायचंय. 14 दिवस त्यांनी कुणालाही भेटू नये."
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)