You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना व्हायरस: मुंबईत लोकल रेल्वे प्रवासावर निर्बंध
मुंबई महानगर परिसरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन, प्रशासनाने फक्त अत्यावश्यक सेवेतील व्यक्तींनाच रेल्वेने प्रवास करू देण्याचा निर्णय घेतला आहे.
या आदेशानुसार मुंबई महानगर परिसरातील चर्चगेट ते बोर्डी रोड, मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते खोपोली, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कसारा, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल, ठाणे-वाशी, पनवेल-अंधेरी, पनवेल-डहाणू, दिवा-वसई, नेरळ-माथेरान मार्ग अशा सर्व मार्गांवर सामान्य नागरिकांना 22 मार्च म्हणजेच रविवारी मध्यरात्रीपासून प्रवेश मिळणार नाही.
कोकण विभागीय आयुक्त शिवाजी दौंड यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली. अनावश्यक लोकल प्रवास करणार्या प्रवाशांवर निर्बंध घालण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आलं आहे. पुढील आदेशापर्यंत ही प्रवेशबंदी लागू असणार आहे.
ज्यांचा अत्यावश्यक सेवेशी संबंध नाही अशा लोकांनी अनावश्यक प्रवास टाळावा. त्यांना रेल्वे स्थानकावर प्रवेशही दिला जाणार नाही. शिवाय अत्यावश्यक सेवेतील अधिकारी/कर्मचाऱ्यांची ओळखपत्र पाहून खात्री करण्यात येईल. अत्यावश्यक सेवेतील शासकीय कर्मचारी वगळता वैद्यकीय सेवेची तात्काळ आवश्यकता असणाऱ्या व्यक्तींनाच रेल्वे स्थानकावर प्रवेश दिला जाईल.
- वाचा - महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग; पाहा सर्व ताजे अपडेट्स
- वाचा -कोरोना व्हायरस महाराष्ट्रात असा पसरला
- वाचा-कोरोना व्हायरसची शरीरातील प्राथमिक लक्षणं कशी ओळखाल?
- वाचा- कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा - क्वारंटाईन, आयसोलेशन किंवा विलगीकरण म्हणजे नेमकं काय?
- वाचा - 'गो कोरोना': या लोकांनी केली कोरोना व्हायरसवर मात
- वाचा - कोव्हिड-19 पँडेमिक जाहीर, पण याचा नेमका अर्थ काय?
रेल्वे स्थानकात प्रवेशाद्वारांच्या ठिकाणी पथक नियुक्त करण्यात येणार आहे. या पथकात शासकीय रेल्वे पोलीस, रेल्वे पोलीस, महसूल विभागाचे प्रतिनिधी, वैदयकीय कर्मचारी यांचा समावेश असेल.
ज्या व्यक्तींना रेल्वे स्थानकावर प्रवेश दिला आहे त्या व्यक्तींची वैद्यकीय कर्मचारी थर्मल स्कॅनरद्वारे तपासणी करतील. कोणतीही प्रतिकूल बाब आढळल्यास त्यांना अलगीकरण कक्षात कार्यवाहीसाही पाठवण्यात येईल.
ज्या प्रवाशांना लांब पल्ल्याच्या रेल्वेने बाहेरगावी जायचं आहे त्यांच्या तिकिटाची तपासणी करून त्यांना रेल्वे स्थानकावर प्रवेश द्यावा असे आदेश देण्यात आले आहेत.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)