कोरोना व्हायरस : नोटा आणि सुट्या पैशातून विषाणू पसरतो का?

    • Author, प्रशांत चहल
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

कोरोना व्हायरसच्या फैलावाला आळा घालण्यासाठी करण्यात येत असलेल्या अनेक उपायांपैकी एक उपाय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सुचवलेला आहे. लोकांनी रोखीत व्यवहार करू नये. त्याऐवजी डिजिटल पेमेंट करावं, असा सल्ला आरबीआयने दिला आहे.

रिझर्व्ह बँकेचे मुख्य व्यवस्थापक योगेश दयाल यांनी म्हटलं आहे, "रोख रक्कम पाठवणं किंवा बिल पेमेंट करण्यासाठी गर्दीच्या ठिकाणी जाण्याची गरज असते. शिवाय, यामुळे दोन व्यक्तींमध्ये थेट संपर्क येतो. मात्र, सध्या हे टाळण्याची गरज आहे."

याऐवजी लोकांनी NEFT, IMPS, UPI किंवा BBPS यासारख्या 24 तास सुरू राहणाऱ्या सेवांचा लाभ घ्यावा, असं रिझर्व्ह बँकेचं म्हणणं आहे.

रिझर्व्ह बँकेआधी अखिल भारतीय व्यापारी महासंघाने (CAIT) देखील रोख व्यवहारांवर चिंता व्यक्त केली होती.

CAITचे राष्ट्रीय अध्यक्ष बी. सी. भारतीय आणि सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून संदेश दिला होता, की "कागदापासून बनलेल्या नोटा जागतिक आरोग्य संकट बनलेल्या कोरोना विषाणूच्या फैलावासाठी कारणीभूत ठरू शकतात."

पॉलिमरच्या नोटांचा पर्याय

"सद्य परिस्थिती बघता केंद्र सरकारने सिंथेटिक पॉलिमरने तयार होणाऱ्या नोटा आणण्याचा विचार करावा. कागदी नोटांपेक्षा सिंथेटिक पॉलिमरच्या नोटांमधून संसर्गाचा धोका कमी असल्याचं सांगितलं जातं", असं आवाहनही CAITने पंतप्रधानांना केलं आहे.

सोशल मीडियावरही याविषयावर चर्चा सुरू आहे. चीन आणि दक्षिण कोरियातील बँका त्यांच्या नोटा निर्जंतुक करत असल्याच्या बातम्या लोक पोस्ट करत आहेत.

याहू फायनान्सवर चीनच्या मध्यवर्ती बँकेचा दाखला देत एक वृत्त प्रकाशित करण्यात आलं. त्यानुसार चीनमध्ये अल्ट्राव्हायलेट लाईटच्या माध्यमातून नोटा निर्जंतुक केल्या जात आहेत. यानंतर जवळपास 14 दिवस नोटा सील करून ठेवण्यात येतील आणि नंतरच त्या जनतेमध्ये वितरीत केल्या जातील.

चीनच्या सरकारी प्रसार माध्यमानुसार, "फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यातच, ज्यावेळी कोव्हिड-19 मुळे मरणाऱ्यांची संख्या 1500 हून अधिक झाली होती, त्याचवेळी चीनमधील सर्व बँकांना नोटा निर्जंतुक करण्याचे निर्देश देण्यात आले होते."

नोटा आणि सुट्टे पैसे संक्रमित होऊ शकतात का?

कोव्हिड 19 हा कोरोना कुटुंबातील नवीन विषाणू आहे. हा विषाणू मानवी शरीरात फुफ्फुसाशी संबंधित आजार निर्माण करतो.

या विषाणूसंबंधित आतापर्यंत जेवढं संशोधन झालं आहे त्यात नोटा आणि सुट्ट्या पैशातून हा विषाणू पसरतो का, यावर संशोधन झालेलं नाही.

कोरोना विषाणू ड्रॉपलेट्स म्हणजेच सूक्ष्म थेंबांच्या माध्यमातून नाक आणि तोंडावाटे शरीरात प्रवेश करतो, असं डॉक्टर सांगतात.

म्हणजेच संक्रमित बिल, नोट किंवा सुट्टे पैसे हाताळल्यानंतर हात स्वच्छ धुतले नाही तर ते घातक ठरू शकतं.

जागतिक आरोग्य संघटनेनेही याबाबत हेच सांगितलं आहे.

SARS ची साथ

मात्र, कागदी नोटा आणि सुट्ट्या पैशांना संसर्ग होऊ शकतो?

चीन आणि दक्षिण कोरियामध्ये कागदी नोटा आणि सुट्ट्या पैशांचं निर्जंतुकीकरण सुरू झालं, तेव्हा हाच प्रश्न विचारण्यात आला.

याच्या उत्तरादाखल 2003 साली आलेल्या SARS साथीच्यावेळी करण्यात आलेल्या एका संशोधनाचा दाखला देण्यात आला.

अमेरिकेत झालेल्या या संशोधनात आढळून आलं होतं की 'SARS कोरोना विषाणू कागदावर 72 तास तर कपड्यांवर 96 तास सक्रीय राहू शकतो.'

आणि नुकत्याच झालेल्या संशोधनात आढळलं आहे की कोरोना कुटुंबातील SARS आणि कोव्हिड 19 या विषाणुंमध्ये बरंच संरचनात्मक साम्य आहे. मात्र, कोव्हिड 19 मुळे होणारा मृत्यूदर SARS पेक्षा कमी आहे.

हे सगळं बघता कागदी नोटा आणि सुट्टे पैसे संक्रमित एजंटचं काम करू शकतात आणि परिणामी कोरोना विषाणुचा फैलाव करण्यासाठीही कारणीभूत ठरू शकतात.

म्हणूनच अशा आव्हानात्मक काळात डिजिटल व्यवहार करा, हे रिझर्व्ह बँकेने केलेले आवाहन लोकांसाठी एक उत्तम पर्याय आहे.

मात्र, ज्या लोकांना कागदी नोटा हाताळण्याशिवाय पर्याय नाही किंवा कागदी नोटा वापरण्याशिवाय गत्यंतर नाही त्यांनी जागतिक आरोग्य संघटनेचा सल्ला पाळला पाहिजे.

जागतिक आरोग्य संघटनेने म्हटलं आहे की, "तुम्ही संक्रमित नोटांच्या संपर्कात आलात तरीसुद्धा त्या दिल्या किंवा घेतल्यानंतर हात साबणाने स्वच्छ धुवून या संकटावर मात करू शकता."

"ज्या देशांमध्ये कोरोना विषाणूचा फैलाव झाला आहे तिथल्या नोटा किंवा सुट्टे पैशांना हात लावल्यानतंर त्याच हाताने चेहऱ्याला स्पर्श करू नका", असा सल्लाही जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)