कोरोना व्हायरसः 'आमच्या मुलीच्या लग्नाला यायचं नाही बरं का...'

    • Author, स्वाती पाटील
    • Role, बीबीसी मराठीसाठी, कोल्हापूर

कोरोना व्हायरसचा संसर्ग वाढू नये या उद्देशाने कोल्हापुरातील शेलार कुटुंबाने साधेपणाने लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे.

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाने जमावबंदीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे दक्षता म्हणून शेलार कुटुंबाने हा निर्णय घेतला आहे.

पन्हाळा तालुक्यातल्या वाघवे गावातील संजय शेलार यांनी मुलीचा विवाह साध्या पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला.

ऋतुजा हिचा विवाह गारगोटी येथील किरण शिंदे यांच्या सोबत उद्या म्हणजे 18 मार्च रोजी गारगोटी येथे धुमधडाक्यात होणार होता. त्यासाठी दोन्ही कुटुंबांनी मोठ्या प्रमाणात खरेदी केली होती. पण आता हा लग्न समारंभ मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत होणार आहे.

नातेवाईकांना लग्नाच्या पत्रिका वाटणारे हे कुटुंबीय आता लग्नाला येऊ नका असा निरोप देत आहेत. जवळपास तीन हजार लोकांना या लग्नाचे निमंत्रण देण्यात आलं होतं.

"सर्वांप्रमाणे माझी देखील धुमधडाक्यात लग्न करण्याची इच्छा होती तशी तयारी देखील करण्यात आली होती पण लग्नाला उपस्थित हजार भर माणसांमध्ये एखाद्याला कोरोना विषाणूचीची लागण जालेली असेल तर त्याची लागण इतरांना होऊ शकते हा धोका लक्षात घेऊन सरकारने घेतलेल्या निर्णयाचे आम्ही पालन करू", असं नववधू ऋतुजा शेलार हिने सांगितलं.

सरकारच्या या निर्णयामुळे सध्याच्या परिस्थितीत कमीत कमी लोकांमध्ये समारंभ करावेत, गर्दी होईल असे कार्यक्रम टाळावेत असा सल्ला ही ऋतुजाने दिला

"एकुलत्या एक मुलीचा विवाह सोहळा मोठ्या दणक्यात करण्याची हौस होती पण आता तसं करता येणार नसल्याने वाईट वाटत असल्याचं शेलार यांनी सांगितले. गेला महिनाभर गावोगावी जाऊन नातेवाईकांना लग्नाच्या आमंत्रण पत्रिका वाटल्या होत्या पण आता सर्वांना फोन करून लग्नाला येऊ नका असे कळवलं आहे", असं मुलीची आई जयश्री शेलार यांनी सांगितलं.

नातीच्या लग्नासाठी मोठी खरेदी केली आहे पण रोगाची साथ रोखण्यासाठी आपणही सहकार्य करूया असा आपुलकीचा सल्ला नववधुची आजी बबूबाई शेलार यांनी मुलगा आणि सुनेला दिला याचं वाईट वाटून न घेता लग्न समारंभ ठरलेल्या वेळेत पण घरगुती माणसांच्या उपस्थितीत उरकण्याचा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं.

अशा प्रकारे लोकांनी सहकार्य केले तर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखणे शक्य होणार आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)