You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'परीक्षा पे चर्चा'तील उल्लेखावर अनिल कुंबळे यांनी दिली ही प्रतिक्रिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी शाळकरी विद्यार्थ्यांबरोबर 'परीक्षा पे चर्चा' करत होते.
तेव्हा एका विद्यार्थ्याने त्यांना एक प्रश्न विचारला - दहावी-बारावीच्या परीक्षेवळी दडपण असतं. अपयश पदरी पडलं तर काय अशी भीतीही असते. अशावेळी कुणाकडे पाहून प्रेरणा घ्यावी?
त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी क्रिकेटपटू राहुल द्रविड, व्हीव्हीएस लक्ष्मण आणि अनिल कुंबळे यांचा उल्लेख केला होता.
2001 मध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात कसोटी सामना सुरू होता. कोलकाताच्या ईडन गार्डन्स मैदानावर भारतीय संघावर फॉलोऑनची नामुष्की ओढवली होती. दुसऱ्या डावातही विकेट्सची पडझड सुरू होती.
मात्र राहुल द्रविड आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी अविश्सनीय खेळी साकारत संघाला पराभवाच्या छायेतून बाहेर काढलं. या दोघांनी एकेक बॉल, एकेक सत्र खेळून काढत संघाचा पराभव टाळला.
एवढंच नव्हे तर त्यांनी संघाला विजय मिळवून दिला. फॉलोऑन मिळाला तेव्हा आपला पराभव होणार अशी सगळ्यांची अटकळ होती. मात्र या दोघांनी अतुलनीय धैर्यासह खेळ करत बाजी पलटवली. द्रविड-लक्ष्मण या दोघांच्या मॅरेथॉन खेळींमुळे भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाच्या बलाढ्य संघाला चीतपट केलं.
काय झालं होतं कोलकाता कसोटीत?
ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदा बॅटिंग करताना 445 धावांची मजल मारली. कर्णधार स्टीव्ह वॉने 110 धावांची तर मॅथ्यू हेडनने 97 धावांची खेळी केली. हरभजन सिंगने 7 विकेट्स घेतल्या.
ऑस्ट्रेलियाच्या भेदक गोलंदाजीसमोर भारतीय संघाचा पहिला डाव 171 धावांतच आटोपला. व्हीव्हीएस लक्ष्मणने सर्वाधिक 59 धावा केल्या. ऑस्ट्रेलियातर्फे ग्लेन मॅकग्राने 4 विकेट्स घेतल्या. प्रचंड आघाडी हाताशी असल्याने ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाला फॉलोऑन देण्याचा निर्णय घेतला.
फॉलोऑन देण्यात आलेला संघ बहुतांश वेळा पराभूत होतो. घरच्या मैदानावर फॉलोऑन मिळणं हे प्रतिस्पर्धी संघाच्या प्रचंड वर्चस्वाचं लक्षण मानलं जातं.
दुसऱ्या डावातही भारतीय संघ अडखळत होता. मात्र राहुल द्रविड-व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी 376 धावांची मॅरेथॉन भागीदारी करत संघाला पराभवाच्या छायेतून बाहेर काढलं. लक्ष्मणने 44 चौकारांसह 281 धावांची खेळी केली. द्रविडने 20 चौकारांसह 180 धावा केल्या. या दोघांच्या बळावर भारतीय संघाने दुसरा डाव 7 बाद 657 धावांवर घोषित केला आणि ऑस्ट्रेलियाला 384 धावांचं आव्हानात्मक लक्ष्य मिळालं. हरभजन सिंगने दुसऱ्या डावातही कमाल करत सहा विकेट्स घेतल्या आणि ऑस्ट्रेलियाचा डाव 212 धावांतच आटोपला.
ही मॅच जिंकत टीम इंडियाने तीन मॅचची सीरिज 1-1 अशी बरोबरीत राखली.
अँटिगा कसोटीची गोष्ट
"परिस्थिती प्रतिकूल असते, परंतु एका माणसाने ठरवलं तर तो अनेकांसाठी प्रेरणादायी ठरू शकतो," हे सांगताना पंतप्रधानांनी भारताचा महान फिरकीपटू अनिल कुंबळेचं उदाहरण दिलं.
2002 मध्ये भारतीय संघ वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर होता. अनिल कुंबळेला दुखापत झाली, जबड्याला झालेली दुखापत संवेदनशील असते. अनिलला प्रचंड वेदना होत होत्या. मात्र त्याने खेळायचं ठरवलं. त्याने संघाला ब्रायन लाराची महत्त्वपूर्ण विकेट मिळवून दिली. तो सामना अनिर्णित राहिला.
अनिलने वेदनेची पर्वा केली नाही कारण देशासाठी खेळताना दु:ख विसरायला होतं. त्याने संघहिताला प्राधान्य दिलं आणि अशक्य वाटणारा विजय प्रत्यक्षात साकारला.
टीम इंडियाने 2002 अँटिगा कसोटीत 513 धावांची मजल मारली. व्हीव्हीएस लक्ष्मणने 130 तर अजय रात्राने 115 धावांची खेळी केली. वासिम जाफरने 86 धावांची खेळी केली.
प्रत्युत्तरादाखल खेळताना वेस्ट इंडिजने 629 धावांवर डाव घोषित केला. कार्ल हूपर, शिवनारायण चंद्रपॉल आणि रिडले जेकब्स यांनी शतकी खेळी साकारल्या. ही मॅच अनिर्णित राखत टीम इंडियाने पाच सामन्यांची सीरिज 1-1 अशी बरोबरीत राखली.
'परीक्षा पे चर्चा'मधील या उल्लेखासाठी माजी फिरकीपटू अनिल कुंबळेने पंतप्रधान मोदींचे आभार मानले आहेत.
"माझ्यासाठी ही सन्मानची गोष्ट आहे. मोदीजी, मनापासून धन्यवाद. परीक्षेसाठी बसणाऱ्या विद्यार्थ्यांना मन:पूर्वक शुभेच्छा!" अशा शब्दांत अनिल कुंबळेंनी पंतप्रधान मोदींचे आभार मानले आहेत.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)