CAA : नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात देशात कुठेकुठे आंदोलनं सुरू आहेत?

नागरिकत्व दुरुस्ती कायदा अस्तित्वात आल्यापासून देशातल्या अनेक भागांमध्ये आंदोलनं होत आहेत.

दिल्लीच्या जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणीनंतर CAA 2019 विरोधातलं आंदोलन अधिक तीव्र झालं. त्यामुळे जामिया विद्यापीठ 5 जानेवारीपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे.

दिल्ली पोलिसांनी या हिंसाचाराची सखोल चौकशी करणार असल्याचं सांगितलं आहे, तर सर्वच राजकीय पक्ष तसंच सुप्रीम कोर्टानेही शांततापूर्ण आंदोलन करण्याचं आवाहन केलं आहे.

गृहमंत्री अमित शाह यांनी सोमवारी झारखंडमध्ये एका प्रचारसभेत बोलताना विद्यार्थ्यांना तसंच देशातील नागरिकांना आवाहन केलं की त्यांनी कुठल्याही चुकीच्या माहितीला बळी पडू नये.

"देशात कुणाचंही नागरिकत्व धोक्यात येणार नाही, उलट लोकांना भारताचं नागरिक होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे कुणीही काँग्रेस, आम आदमी पार्टी आणि तृणमूल काँग्रेसतर्फे पसरवल्या जात असलेल्या चुकीच्या माहितीला बळी पडू नये," असंही त्यांनी म्हटलं.

देशभरातील अनेक शिक्षण संस्थानांमधले विद्यार्थी आपापल्या कँपसमध्ये मोर्चे काढून सहभागी होत आहेत.

जामिया मिलिया इस्लामिया

आग्नेय दिल्लीमधल्या जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये रविवारच्या रात्री नाट्यमय घटना घडल्या. पोलीस विद्यापीठाच्या परिसरामध्ये परवानगी शिवाय घुसल्याचं विद्यापीठाच्या कुलगुरू नजमा अख्तर यांनी सांगितलं.

याआधी जामिया जवळच्या भागामध्ये आंदोलकांनी बसेस पेटवून दिल्या. यानंतर पोलिसांनी विद्यापीठाच्या परिसरात घुसत अश्रुधुराचा वापर केला. पोलीस विद्यार्थ्यांना दांडुक्यांनी मारहाण करत असल्याचे अनेक व्हीडिओ व्हायरल झाले आहेत.

या कॅंपसमधून पोलिसांनी जवळपास 50 जणांना अटक केली होती. दिल्ली पोलीस मुख्यालयाच्या बाहेर मध्यरात्रीनंतर मोठं आंदोलन झाल्यानंतर अटक करण्यात आलेल्यांना सोडून देण्यात आलं. जामिया विद्यापीठाच्या परिसरात अजूनही तणावपूर्ण वातावरण आहे.

अलिगढ मुस्लिम युनिव्हर्सिटी

अलिगढ मुस्लिम विद्यापीठ रिकामं करण्यात येत असून सगळ्या विद्यार्थ्यांना आजच त्यांच्या घरी परत पाठवण्यात येत असल्याचं उत्तर प्रदेशचे पोलीस महासंचालक ओ. पी. सिंह यांनी सांगितलं.

5 जानेवारीपर्यंत विद्यापीठ बंद राहील. पण तिथे हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांना घरी परतावं लागेल. हिंसेमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात येणार असून 15 विद्यार्थ्यांना ताब्यात घेण्यात आल्याच्या वृत्ताला त्यांनी दुजोरा दिलाय.

आसाममध्ये तणाव

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात आसाममध्ये सर्वांत मोठ्या प्रमाणावर आंदोलनं होत आहेत. पोलिसांच्या गोळीबारात आतापर्यंत 4 जण ठार झाले आहेत. राज्यातल्या बहुतेक भागांमध्ये मोबाईल इंटरनेट बंद आहे.

ऑल आसाम स्टुडंट्स युनियन (आसू) या नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधातील आंदोलनाचं नेतृत्व करत आहे. सत्ताधारी एनडीएमध्ये सहभागी असणाऱ्या आसाम गण परिषदेने या नव्या कायद्याला आपण सुप्रीम कोर्टात आव्हान देणार असल्याचं म्हटलंय. पण संसदेत मात्र त्यांनी या विधेयकाला पाठिंबा दिला होता.

लखनौमध्ये झटापट

लखनौमध्ये दारुल उलूम नदवा-तुल-उलेमाचे विद्यार्थी आणि पोलिसांमध्ये झालेल्या झटापटीचे व्हिडिओ समोर आले आहेत. यामध्ये दोनशेपेक्षा जास्त विद्यार्थी आणि पोलिसांमध्ये दगडफेक झाल्याचं समजतंय.

पश्चिम बंगालमध्ये रॅली

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या कोलकात्यामध्ये कॅबच्या विरोधात रॅली घेणार आहेत.

पश्चिम बंगालच्या अनेक भागांमध्ये शनिवारी आणि रविवारी जाळपोळ आणि तोडफोडीच्या घटना घडल्या. आपण राज्यात हा कायदा लागू होऊ देणार नसल्याचं ममता बॅनर्जींनी म्हटलंय.

तामिळनाडूत निदर्शनं

मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी (सीपीएम)शी संलग्न असणारी विद्यार्थी संघटना एसएफआयने तामिळनाडू राज्यामध्ये कॅबच्या विरुद्ध सोमवारी निदर्शनं करण्याचं आवाहन केलंय.

हैदराबाद

मौलाना आझाद नॅशनल ऊर्दू युनिव्हर्सिटीमध्येही या कायद्याच्या विरोधात निदर्शनं झाली असून विद्यार्थ्यांनी परीक्षेवर बहिष्कार टाकला.

पाटणा

पाटण्यातल्या कारगिल चौकात आक्रमक आंदोलकांनी पोलीस चौकीला आग लावली. या आक्रमक आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार केला. या आंदोलकांनी दगडफेकही केली.

केरळ

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला विरोध करणाऱ्यांनी कायदा हातात घेऊ नये असं आवाहन केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी केलंय. तर हे विधेयक घटनेच्या विरोधात असून राज्य सरकार हे लागू करणार नसल्याचं केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी म्हटलंय.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)