You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
CAB: Jamia Milia Islamia विद्यापीठाबद्दल या गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का?
नरेंद्र मोदी सरकारने मागच्या आठवड्यात नागरिकता दुरुस्ती विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये मंजूर करून घेतलं. त्यामुळे या विधेयकाचं आता कायद्यात रुपांतर झालं आहे. पण यातील काही तरतुदींवर आक्षेप घेत आसामसह देशात काही ठिकाणी या कायद्याविरोधात आंदोलन सुरू आहेत.
नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात सर्वांत हिंसक आंदोलन कुठे झालं असेल तर ते जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात. जामिया मिलियाच्या विद्यार्थ्यांनी या कायद्याला विरोध दर्शवण्यासाठी विद्यापीठ ते संसद असा मोर्चा काढण्याचं ठरवलं. पण हिंसक रूप येत असल्याचं सांगत पोलिसांनी हे आंदोलन नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला.
पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्यांसह बळाचा वापर केल्यामुळे या दरम्यान कित्येक विद्यार्थी जखमी झाले. हे प्रकरण गेले दोन ते तीन दिवसांपासून सगळ्याच माध्यमांवर चर्चेत आहे.
आता देशातील इतर काही विद्यापीठं या विद्यार्थ्यांवर झालेल्या मारहाणीचा निषेध करण्यासाठी पुढे येत आहेत. या पार्श्वभूमीवर अनेक विद्यापीठांमध्ये परिक्षाही पुढे ढकलण्यात आल्या आहेत. आता सरकार हे प्रकरण कसं हाताळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.
दिल्लीच्या दक्षिण-पूर्व भागातील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठ हे देशातलं एक नावाजलेलं केंद्रीय विद्यापीठ म्हणून ओळखलं जातं. या विद्यापीठाला मोठा इतिहास लाभलेला आहे.
1920 साली स्थापना
जामिया मिलिया विद्यापीठाची स्थापना अलिगडमध्ये 1920 साली झाली. मौलाना महमूद हसन, मौलाना मोहम्मद अली जौहर, जनाब हकीम अजमल खान, डॉ. मुख्तार अहमद अन्सारी, जनाब अब्दुल माजीद ख्वाजा आणि डॉ. झाकीर हुसेन यांच्या संकल्पनेतून हे विद्यापीठ स्थापन झालं. उर्दूमध्ये जामियाचा अर्थ होतो विद्यापीठ आणि मिलियाचा अर्थ होतो राष्ट्रीय. महात्मा गांधी आणि रविंद्रनाथ टागोर यांनी हे विद्यापीठ स्थापन करण्याला पाठिंबा दिला होता. हे विद्यापीठ शेकडो विद्यार्थ्यांच्या आयुष्याला आकार देईल, असं त्यांचं मत होतं.
1925 मध्ये जामिया अलिगडहून दिल्लीच्या करोलबागला स्थानांतरित करण्यात आली. नंतर ओखला परिसरातील सध्याच्या जागेवर विद्यापीठासाठी जागा शोधण्यात आली. विद्यापीठ 1936 पासून याच ठिकाणी सुरू आहेत. या कॅम्पसमध्ये टप्प्याटप्प्याने अनेक विषयांचे विभाग सुरू होत गेले. 1988 ला एका कायद्याअंतर्गत जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाला केंद्रीय विद्यापीठाचा दर्जा देण्यात आला. सध्या नजमा अख्तर या विद्यापीठाच्या कुलगुरू आहेत.
50 टक्के मुस्लिम आरक्षण
जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात 50 टक्के जागा मुस्लिमांसाठी आरक्षित असतात. यातल्या 30 टक्के जागा मुस्लिम विद्यार्थ्यांसाठी, 10 टक्के मुस्लिम विद्यार्थिनींसाठी तर 10 टक्के, इतर मागास मुस्लिम तसंच अनुसूचित जातींकरिता आणि बाकीच्या 50 टक्के जागा खुल्या गटातील विद्यार्थ्यांसाठी आहेत. यापैकी पाच टक्के जागा दिव्यांगांसाठीही आरक्षित आहेत.
आरक्षित काही जागा शिल्लक राहिल्यास त्याठिकाणी खुल्या गटातील विद्यार्थ्यांना संधी देण्यात येते. एखादा हुशार विद्यार्थी चांगल्या मार्कांनी पास झाल्यास त्याला खुल्या गटात टाकण्यात येतं, अशी माहिती जामिया मिलिया इस्लामियाच्या जनसंपर्क अधिकारी साएमा सईद यांनी दिली.
कायदा, अभियांत्रिकी तसंच पत्रकारितेचं शिक्षण
जामिया मिलियामध्ये कायद्यापासून ते अभियांत्रिकी, आर्किटेक्ट, पत्रकारिता यांसारखे विविध विभाग आहेत. सध्या या विद्यापीठात 38 शैक्षणिक विभाग तर 27 अभ्यासकेंद्र आहेत. भारतासह इतर देशांतील विद्यार्थीसुद्धा या विद्यापीठात प्रवेश घेतात. या विद्यापीठाच्या अंतर्गत एकूण 9 महाविद्यालयं आहेत. पीएचडी करण्याची सुविधासुद्धा इथं उपलब्ध आहे. जामिया मिलियाच्या ग्रंथालयात 4 लाखांपेक्षा जास्त पुस्तकं, संदर्भग्रंथ आणि इतर साहित्य उपलब्ध आहे. 2015 मध्ये या विद्यापीठाला NAAC कडून A मानांकन मिळालं.
23 हजार विद्यार्थी
सध्या सुमारे 23 हजार विद्यार्थी जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात शिक्षण घेत आहेत. यामध्ये पदवीचं शिक्षण घेणारे सुमारे 8 हजार तर पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 4 हजारांच्या जवळपास आहे. या विद्यापीठातून अनेक नामांकित विद्यार्थ्यांचं शिक्षण झालेलं आहे. यामध्ये नावाजलेले अभिनेते, नेते तसंच शास्त्रज्ञांचा समावेश आहे.
विद्यार्थ्यांनो, मी तुमच्या सोबत आहे - जामियाच्या कुलगुरू
जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाच्या कुलगुरू प्रा. नजमा अख्तर यांनी पोलिसांच्या कारवाईचा निषेध केला. तसेच, काल घडलेल्या संपूर्ण घटनेबाबत दु:ख व्यक्त केलं.
"माझ्या विद्यार्थ्यांसोबत झालेल्या क्रूरपणाचे चित्र पाहून खूप दु:ख होतंय. कॅम्पसमध्ये पोलिसांनी विनापरवानगी येणं आणि लायब्ररीत घुसून निरपराध मुलांना मारहाण करणं अस्वीकारार्ह आहे. मी माझ्या विद्यार्थ्यांना सांगू इच्छिते की, ते या संकटासमयी एकटे नाहीत, मी त्यांच्यासोबत आहे. पूर्ण विद्यापीठ तुमच्यासोबत आहे," असं प्रा. नजमा अख्तर म्हणाल्या.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)