You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
CAB: दिल्लीत निदर्शनं, जामिया मिलिया विद्यापीठात बसेसची जाळपोळ
नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावरून आसाममध्ये पेटलेलं लोण राजधानीतही पोहोचलं.
रविवारी संध्याकाळी मथुरा रोडवर अनेक बसेसना आंदोलकांनी पेटवून दिलं. ती आग विझवण्यासाठी आलेल्या अग्निशमन दलाच्या गाड्यांनाही आंदोलकांनी पेटवून दिलं.
ओखला, कालिंदी कुंज आणि जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठ परिसरात जाळपोळ पाहायला मिळाली.
जामियामध्ये गेल्या काही दिवसांपासून एकीकडे आंदोलन करत असलेले विद्यार्थी आणि दुसरीकडे दिल्ली पोलीस, असा संघर्ष सुरू आहे, तो रविवारी दुपारीही पाहायला मिळाला.
आधी मोर्चा काढून नागरिकत्व दुरुस्ती कायद्याचा विरोध करत असलेल्या विद्यार्थ्यांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून लाठीचार्ज झाला. त्यानंतर रविवारी काही बसेस तसंच सार्वजनिक संपत्तीची नासधूस करण्यात आल्यानंतर आंदोलन हिंसक झालं.
मात्र आपलं आंदोलन शांततापूर्ण असून या हिंसाचारासाठी आपण जबाबदार नसल्याचं जामिया मिलियाच्या आंदोलक विद्यार्थ्यांनी म्हटलं आहे.
पोलिसांच्या सल्ल्यावरून दिल्ली मेट्रोच्या काही स्टेशन्सचे प्रवेशद्वार बंद करण्यात आले आहेत. मात्र फक्त जामिया विद्यापीठच नव्हे तर दिल्लीत ठिकठिकाणी रविवारी दिल्ली परिवहन मंडळाच्या काही बसेस पेटवून देण्यात आल्या.
दरम्यान, लोकसभा आणि नंतर राज्यसभेत हे विधेयक गृहमंत्री अमित शाह यांनी मांडलं, तेव्हापासूनच आसामही धगधगतंय. आजही राज्यभरात अनेक ठिकाणी आंदोलनं आणि जाळपोळ सुरू आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे.
आतापर्यंत या आंदोलनात चार जणांचा मृत्यू झाला.
पोलिसांचा आंदोलकांवर गोळीबार
आसाममधल्या सोनितपूर जिल्ह्यात कॅबविरोधात आंदोलनकर्त्यांनी तेलाचा टँकर पेटवून दिला. हा टँकर उदालगुरी जिल्ह्यातील सिपाझार इथे पेट्रोलची टाकी रिफिल करून परतत असताना संतप्त जमावाने धेकिआजुईली गावाजवळ टँकरला पेटवून दिला. या प्रकारात टँकरचा चालक होरपळला.
त्याला जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. त्याला मृत घोषित करण्यात आलं.
याआधी, आसामच्या डिब्रूगड येथे निदर्शकांवर पोलिसांनी फायरिंग केल्याचं वृत्त आहे. डिब्रूगड येथे कर्फ्यू लागला असूनही अनेक लोक रस्त्यावर उतरले. त्यांना नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना फायरिंग करावं लागलं. या फायरिंगमध्ये काही जण जखमी झाल्याचं स्थानिक पत्रकारांनी बीबीसी हिंदीला सांगितलं. गुवाहाटीमध्ये इंटरनेट बंद करण्यात आलं.
असोम जातीयबादी युवा छात्र परिषद आणि 30 स्थानिक संघटनांनी कॅबविरोधात आंदोलन सुरू केलं आहे. गायक, विद्यार्थी, बुद्धिजीवी, शिक्षक अशा समाजातील विविध क्षेत्रातील व्यक्तींनी त्यांना पाठिंबा दिला आहे.
रेल्वे रोको, धरणे आणि उपोषण
आंदोलनकर्त्यांनी रेल्वे रोको, धरणं, उपोषण अशा विविध मार्गांनी कॅबविरोधात निषेध व्यक्त केला. आंदोलनकर्त्यांनी गुवाहाटीहून विविध भागात जाणाऱ्या ट्रेन रोखून धरल्या. आम्हाला लोकांना त्रास देऊन त्यांना वेठीस धरायचं नाहीये मात्र देशभरातल्या लोकांचं याकडे लक्ष जावं यासाठी आम्ही आंदोलन करत आहोत असं एजीवायसीपीचे सरचिटणीस पलाश चांगमी यांनी सांगितलं. संघटनेतर्फे 16 डिसेंबरला गण अनशनची हाक देण्यात आली आहे. 18 डिसेंबरपासून राज्यभरात गावसभा घेतल्या जाणार आहेत.
आसाममध्येही इनर लाईन परमिट लागू करावं यासाठी 24 डिसेंबर रोजी गण समदल आयोजित करण्यात आलं आहे.
आसाममध्ये 1979 साली विद्यार्थ्यांनी बांगलादेशमधून येत असलेल्या घुसखोरांची ओळख पटविण्याच्या मागणीसाठी आंदोलन सुरू केलं होतं. हे आंदोलन तब्बल सहा वर्षे चाललं, ज्याची परिणती 1985 साली करण्यात आलेल्या 'आसाम करारा'मध्ये झाली. त्यानंतर पहिल्यांदाच आसाममध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर आंदोलन होत आहे.
बुधवारी (11 डिसेंबर) राज्यसभेत चर्चा सुरू असताना आसाममध्ये मोठ्या प्रमाणावर निदर्शनं होत होती. त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांना गोपीनाथ बार्दोलोई विमानतळावरच काही काळ अडकून पडावं लागल्याचं वृत्त पीटीआयनं दिलं.
आसाममधील विद्यार्थी संघटनांकडून नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला मोठ्या प्रमाणावर विरोध होत आहे. या विधेयकामध्ये बांगलादेश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानातून येणाऱ्या धार्मिक अल्पसंख्याकांना भारतीय नागरिकत्व देण्याची तरतूद आहे.
आसाममधील 10 जिल्ह्यांमधील इंटरनेट बंद करण्यात आलं आहे.
आसामचे पोलिस महासंचालक भास्कर ज्योती महंता यांनी PTI या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं, की गुवाहाटीमध्ये बुधवारी (11 डिसेंबर) संध्याकाळी कर्फ्यू लावण्यात आला असून तो गुरुवारी (12 डिसेंबर) सकाळी सात वाजेपर्यंत कायम ठेवण्यात येईल.
ANI या वृत्तसंस्थेनं मात्र गुवाहाटीचे पोलिस आयुक्त दीपक कुमार यांच्या हवाल्यानं वृत्त देताना म्हटलं, की जोपर्यंत परिस्थिती पूर्ववत होत नाही, तोपर्यंत कर्फ्यू कायम राहणार आहे.
आसाम सरकारनं एक सरकारी आदेश प्रसिद्ध केला आहे. 10 जिल्ह्यामध्ये संध्याकाळी 7 वाजल्यापासून 24 तास मोबाईल डेटा आणि इंटरनेट सेवा बंद राहतील. लखीमपूर, तिनसुकिया, धेमाजी, दिब्रुगढ, सराइदेव, सिबसागर, जोरहाट, गोलाघाट, कामरुप (मेट्रो) आणि कामरुप या जिल्ह्यातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आलीये.
कोणत्याही पक्षानं किंवा विद्यार्थी संघटनेनं बंद पुकारला नसला तरी पोलिस आणि सुरक्षा दलांसोबत त्यांचा संघर्ष सुरू आहे. पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज आणि अश्रूधूराचा मारा केला.
नागरिकत्व दुरुस्ती विधेयकामुळे आसाम कराराचं उल्लंघन होईल, असं कारण देत दुरुस्ती विधेयकाचा विरोध होतो आहे. आसाम करार राज्यातील जनतेच्या सामाजिक, भाषिक आणि सांस्कृतिक ओळखीला सुरक्षा प्रदान करतो. 15 ऑगस्ट 1985 रोजी भारत सरकार आणि आसाम चळवळीच्या नेत्यांमध्ये हा करार झाला होता.
कटऑफ डेटवरून विरोध
आसाम करारानुसार प्रवाशांना वैधता देण्याची तारीख 25 मार्च 1971 ही आहे. मात्र, नागरिकत्व दुरुस्ती विधेयकात ही तारिख 31 डिसेंबर 2014 करण्यात आली आहे.
आसाममध्ये सुरू असलेला सर्व विरोध या तारखेवरुनच आहे. नव्या कट ऑफ डेटमुळे जे 31 डिसेंबर 2014पूर्वी आसाममध्ये दाखल झाले आहेत, तेसुद्धा आसाममध्ये बिनदिक्कत आश्रय घेऊ शकतात.
या नव्या कट ऑफ डेटमुळे त्या लोकांनाही नागरिकत्व मिळेल ज्यांची नावं राष्ट्रीय नोंदणी यादी (NRC) प्रक्रियेदरम्यान वगळण्यात आली होती.
मात्र, आसाम करारात आसाममध्ये 25 मार्च 1971 नंतर दाखल झालेल्या हिंदू आणि मुस्लिम सर्वांनाच बाहेर काढण्याची तरतूद होती.
याच विरोधाभासामुळे आसाममधली बहुसंख्य जनता नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला तीव्र विरोध करत आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)