विधानसभा निवडणूक: शरद पवार, देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे, उद्धव ठाकरे, प्रकाश आंबेडकर यांच्या प्रचारावेळी गाजलेल्या 8 गोष्टी

    • Author, श्रीकांत बंगाळे
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीचा प्रचार संपला आहे. यंदाच्या निवडणुकीचा प्रचार अनेक अर्थांनी लक्षात राहिल. यात प्रचारातील मुद्दे असो की प्रचारासाठी वापरलेली भाषा, अनेक गोष्टींमुळे ही निवडणूक वैशिष्ट्यपूर्ण राहिल. आता पाहूया या निवडणुकीतील 8 गोष्टी ज्यांच्यामुळे प्रचार गाजला.

1. शरद पवार विरुद्ध देवेंद्र फडणवीस

या निडणुकीतील भाजपच्या प्रचाराचा चेहरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हाच राहिला. 2014च्या विधानसभा निवडणुकीप्रमाणे भाजपचा यंदाचा प्रचार नरेंद्र मोदी केंद्रित नव्हता. नरेंद्र मोदींच्या राज्यात काही सभा झाल्या, पण प्रचाराची संपूर्ण धुरा देवेंद्र फडणवीस यांनी उचलली.

2014मध्ये 'केंद्रात नरेंद्र, राज्यात देवेंद्र' ही घोषणा खूप चर्चेत होती. यंदा मात्र देवेंद्र फडणवीस हेच भाजपच्या प्रचाराच्या केंद्रस्थानी राहिले. याशिवाय यंदाची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार विरुद्ध देवेंद्र फडणवीस अशीच पाहावयास मिळाली.

देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या जवळपास प्रत्येक भाषणात शरद पवार यांच्यावर टीका केली, तर शरद पवारांनीही प्रत्येक सभेतून फडणवीस यांना प्रत्युत्तर दिलं.

देवेंद्र फडणवीस यांच्या 'तेल लावलेले पैलवान' या वक्तव्याला शरद पवारांनी 'पैलवान असे नसतात' असं प्रत्युत्तर शरद पवारांनी दिलं. तसंच "मी 80 वर्षांचा तरुण आहे," असंही म्हटलं.

प्रचार संपायच्या दोन दिवस आधी म्हणजेच 18 तारखेला शरद पवार यांची साताऱ्यातली सभा गाजली ती पावसामुळे. शरद पवारांनी पावसात केलेलं भाषण सोशल मीडियावर व्हायरल झालं.

2. नाराजीनाट्य

यंदाच्या निवडणुकीत अनेक नेत्यांचं नाराजीनाट्य बघायला मिळालं.

ज्येष्ठ नेते नारायण राणे नाराज असल्याचं समोर आलं. त्यांचा भाजप प्रवेश रखडणं हा अपमानाचा प्रश्न आहे, असं त्यांनी बीबीसी मराठीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं. भाजपप्रवेशाच्या प्रश्नावर ते म्हणाले, "काही योगायोग लागतात. एक तर असं होऊ नये, असं मला वाटतं. अपमानाचाही प्रश्न आहेच हा. पण ते आता भाजपने पाहावं. उद्या मी भाजपमध्ये जाणार. पण लोकंच म्हणतील की 'अरे! पक्षप्रवेशाला एक-दीड वर्षं लागलं यांना.' याचा विचार पक्षानं करायला हवा आहे."

याशिवाय भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाख खडसेही विधानसभेचं तिकीट न मिळाल्यामुळे नाराजी होतं. भाजपनं मलाच तिकीट द्यावं, अशी त्यांची भूमिका होता. पण पक्षानं मात्र त्यांची कन्या रोहिणी खडसे यांना तिकीट दिलं.

"मला हा निर्णय पटलेला नाही. मला वाटतं माझ्यावर अन्याय झाला," असं त्यांनी बीबीसी मराठीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं.

याव्यतिरिक्त राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी एका मुलाखतीत बाळासाहेब ठाकरेंच्या अटकेबाबत विधान करून छगन भुजबळ यांची नाराजी ओढवून घेतली.

अजित पवार म्हणाले, "बाळासाहेबांना झालेली अटक अयोग्य होती. आमच्या मंत्रिमंडळातील काही वरीष्ठांच्या हट्टापायी ही अटक झाली होती. आम्ही त्यास विरोध केला होता. इतक्या टोकाचं राजकारण कोणी करू नये, असं आम्ही सांगितलं होतं. परंतु त्यावेळी आमच्या मताला एवढी किंमत नव्हती."

यानंतर छगन भुजबळ यांनी अजित पवारांच्या आमदारकीच्या राजीनाम्यावर बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं, "मला असं वाटतं, की त्यांनी आपल्या भावना दोन दिवस दाबून ठेवायला पाहिजे होत्या. त्यामुळं पुढचे दोन दिवस महाराष्ट्रात फक्त EDची आणि पवारांवरच्या अन्यायाची चर्चा झाली असती. ते वातावरण निवडणुकीला जास्तीत जास्त पोषक झालं असतं. परंतु त्याच दिवशी राजिनाम्याची घोषणा केल्यामुळे एकदम फोकस तिकडे वळला. त्यामुळं शरद पवार बाजूला पडले, ईडी बाजूला पडली."

3. प्रचारातील मुद्दे - कलम 370 विरुद्ध इतर

भाजपनं या निवडणुकीत कलम 370चा मुद्दा प्रचारात आणला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री अमित शहा, पंतप्रधान नरेंद्र मोदी या सगळ्यांनी त्यांच्या प्रचार सभेत कलम 370च्या मुद्द्याचा उल्लेख केला.

"यंदा स्वातंत्र्य दिनाला आपण राज्यात तिरंगा फडकवत असताना, तिकडे जम्मू-काश्मीरमध्येही तिरंगा फडकवला गेला," असं मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या प्रत्येक सभेत सांगितलं. तर कलम 370 आणि महाराष्ट्राचा संबंध विचारणाऱ्यांना मोदींनी 'डूब मरो'चा सल्ला दिला.

पण, कलम 370 आणि महाराष्ट्राचा काय संबंध, असा प्रश्न विरोधकांनी उपस्थित केला.

महाराष्ट्रातील शेतकरी आणि तरुणांचे प्रश्न महत्त्वाचे आहेत, असं मत शरद पवार यांनी बीबीसी मराठीला दिलेल्या मुलाखतीत मांडलं.

याव्यतिरिक्त राज ठाकरे यांची ईडीकडून झालेली चौकशी, शरद पवार यांची ईडी कार्यालयाला भेट, शिवसेनेनं 10 रुपयांत जेवणाच्या थाळीचं वचन हे इतर मुद्दे या निवडणुकीत पाहायला मिळाले.

4. प्रचाराची भाषा - बांगड्या, हिरवे साप आणि चंपा

यंदाची निवडणूक प्रचारातल्या भाषेनंही चर्चेत राहिल. निवडणूक प्रचारात नटरंग, कुंकू, तेल लावलेले पैलवान, हिरवा साप, हिरवे झेंडे, चंपा, अशा अनेक शब्दांचा वापर करण्यात आला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या प्रत्येक सभेत म्हटलं की, "आमचे पैलवान निवडणूक लढण्यासाठी तेल लावून सज्ज झालेत, पण विरोधकांकडे लढायला कुणीच तयार नाही."

तर शरद पवार यांनी अहमदनगरमधील श्रीगोंद्यातील सभेत भाजप नेते बबनराव पाचपुतेंना बांगड्या घालण्याचा सल्ला दिला. ते म्हणाले, "पाचपुते 13 वर्षे मंत्री होते. इतकी वर्षे मंत्रिपद देऊनही त्यांना काहीच करता आलं नसेल, तर त्यांनी बांगड्या घातल्या पाहिजे."

उद्धव ठाकरे यांनी औरंबादमधील सभेत 'हिरवे साप' हा शब्दप्रयोग केला. त्यांनी म्हटलं, "औरंगाबादला हिरव्या सापांनी विळखा दिला आहे. औरंगाबादमध्ये हिरवा झेंडा रोवला गेला आहे. आपल्याला तो उखाडून फेकायचा आहे. या झेंड्याला गाडायचं आहे."

याव्यतिरिक्त राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी त्यांच्या जाहीर सभांमध्ये चंपा हा शब्दप्रयोग वापरला. याद्वारे त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर अप्रत्यक्षरीत्या टीका केली.

5. मतदारसंघात अडकलेले नेते

भाजप नेत्या पंकजा मुंडे, काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण तसंच पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात या नेत्यांचा प्रचार काही मतदारसंघापुरता मर्यादित राहिल्याचं दिसून आलं.

"या सगळ्यांसाठी त्यांच्या मतदारसंघातली निवडणूक आव्हानात्मक होती," असं महाराष्ट्र टाइम्सचे वरीष्ठ संपादक विजय चोरमारे सांगतात.

पंकजा मुंडे

भाजप नेत्या आणि केंद्रीय ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचा प्रचार मतदारसंघ परळीपुरताच मर्यादित राहिला. त्या राज्याच्या इतर भागात प्रचार करताना दिसल्या नाहीत. त्यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परळीत सभा घेतली, तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही सभा घेतली.

अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण

काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हेसुद्धा नांदेड जिल्ह्याच्या बाहेर प्रचार करताना दिसून आले नाहीत. त्यांचा प्रचार मतदारसंघ भोकर केंद्रित राहिला. तर पृथ्वीराज चव्हाण हेसुद्धा कराडपुरते मर्यादित राहिले.

राधाकृष्ण विखे पाटील

भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्यभर पक्षाचा प्रचार केला नाही, त्यांचं लक्ष शिर्डी या मतदारसंघापुरतं मर्यादित राहिलं.

विनोद तावडे

माजी शिक्षणमंत्री आणि भाजप नेते विनोद तावडे यांना भाजपनं विधानसभेची उमेदवारी दिली नाही. यानंतर ते पक्षाच्या प्रचारात दिसले नाहीत.

6. 'लाव रे तो व्हीडिओ' आणि वंचित फॅक्टर

लोकसभा निवडणुकीत मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या प्रचाराची खूप चर्चा झाली. किंबहूना त्यांच्या प्रचाराची 'लाव रे तो व्हीडिओ...' स्टाईल सोशल मीडियावर खूप गाजली.

पण विधानसभेच्या प्रचारात ही स्टाईल गायब दिसली. राज यांनी राज्यात अनेक ठिकाणी सभा घेतल्या, पण त्यात लोकसभेसारखी आक्रमकता दिसली नाही.

"राज ठाकरे यांची ED चौकशी झाली आणि त्यांनी बोलणं कमी केलं," असं अजित पवार यांनी म्हटलं होतं.

याशिवाय, "वंचित बहुजन आघाडीनं लोकसभा निवडणूक ढवळून काढली. लोकसभेत वंचितचा जसा प्रभाव होता, तो विधानसभा निवडणुकीत दिसला नाही, त्यामुळे वंचित फॅक्टर जास्त चालणार नाही," असं राजकीय विश्लेषक संजीव उन्हाळे सांगतात.

दरम्यान, विधानसभेच्या तोंडावर AIMIM बाहेर पडल्यामुळे वंचित बहुजन आघाडी तुटली आणि कोणत्या मतदारसंघात कोण उमेदवार उभा आहे, याचा संभ्रम निर्माण झाला.

7. सोशल मीडियावर तुल्यबळ स्पर्धा

या निवडणुकीत सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये सोशल मीडियावर तुल्यबळ स्पर्धा बघायला मिळाली.

विरोधकांनी #मोदी_निघा हा ट्रेंड ट्वीटवर चालवला, तर सत्ताधाऱ्यांनी 'पुन्हा आणूया आपले सरकार' या टॅगलाईनसह छोटे-छोटे व्हीडिओ सोशल मीडियावर प्रसिद्ध केले.

याव्यतिरिक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एक व्हीडिओही व्हायरल झाला. यात एक शेतकरी त्यांच्या कर्जमाफीचं काय झालं, असं विचारत आहे. तर त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री 'भारत माता की जय'च्या घोषणा देताना दिसतात.

8. मंदीचा प्रचाराला फटका?

सध्या देशात आर्थिक मंदीविषयी चर्चा आहे. याचा निवडणूक प्रचाराला फटका बसला का, याविषयी राजकीय विश्लेषक हेमंत देसाई सांगतात, "मंदीचा अधिकृत किंवा अनधिकृत असा परिणाम राजकीय पक्षांच्या देणग्यांवर झाला आहे. यातही फडणवीस सरकारनं आचारसंहिता सुरू होण्यापूर्वीपासून जाहिरातींचा सपाटा लावला. त्या तुलनेत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या जाहिरातींची संख्या खूपच कमी होती. विरोधकांच्या प्रचाराच्या फेऱ्याही खूप कमी दिसल्या."

पण, चर्चित मंदीचा प्रचाराला फटका बसला नाही, असं ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांना वाटतं.

ते म्हणतात, "निवडणूक लढवणारे उमेदवार खूप वर्षांपासून त्यासाठीची तयारी करत असतात. निवडणुकीसाठी लागणाऱ्या खर्चाच्या आर्थिक तरतुदी करतात. त्यामुळे मंदीचा फटका त्यांच्या प्रचाराला बसला असं वाटत नाही."

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)