You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
नारायण राणे: अखेर देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश, पक्षही केला विलीन
अखेर नारायण राणेंनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत त्यांनी त्यांचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्षही भाजपमध्ये विलीन केला.
कणकवलीमध्ये आज आयोजित फडणवीस यांच्या प्रचारसभेत राणे तसंच त्यांचे चिरंजीव निलेश राणे यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला.
त्यांचे कनिष्ठ चिरंजीव नितेश राणे यांनी यापूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केला होता. ते कणकवली मतदारसंघातून भाजपचे अधिकृत उमेदवार आहेत. मात्र इथून शिवसेनेही आपला उमेदवार दिल्याने युतीतल्या दोन मित्रपक्षांमध्येच युद्ध होणार आहे.
"शिवसेनेनं आमच्यापुढे आव्हान उभं केलं आहे, असं आम्हाला वाटत नाही. साहेब तिथं येऊन थांबलेले असताना त्याच ठिकाणी मी शिवसेनेचं डिपॉझिट घालवलं आहे. काही राहिलेलं नाही शिवसेनेचं," असा आत्मविश्वास नारायण राणे यांनी काही दिवसांपूर्वी बीबीसी मराठीच्या पाजक्ता पोळ यांच्याशी बोलताना व्यक्त केला होता.
भाजपप्रवेश लांबणं हा एकप्रकारे अपमानच असल्याचं ते महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोलताना म्हणाले होते. त्यांची ही 9 ऑक्टोबरची मुलाखत पुन्हा एकदा प्रकाशित करण्यात येत आहे.
पाहा संपूर्ण मुलाखत-
भाजप प्रवेशाला उशीर का झाला?
उशीर माझ्याकडून नाही भारतीय जनता पक्षाकडून झालेला आहे. त्यामुळे याचं उत्तर मुख्यमंत्री देऊ शकतील.
नितेशला आता एबी फॉर्म देण्यात आलाय. नितेश भाजपचा उमेदवार म्हणून देवगडमधून निवडणूक लढवतो आहे. पण तो आता प्रश्न नाहीये. मुख्यमंत्री जेव्हा सिंधुदुर्गात येतील तेव्हा बाकीच्या सगळ्यांच्या पक्ष प्रवेश जाहीर सभेत होईल.
तुमचा प्रवेश रखडण्याला शिवसेना जबाबदार आहे, असं तुम्हाला वाटतं का?
कुणाला दोष देत नाहीये. भाजपला जर पक्ष वाढवायचा असेल तर त्यांनी तसं पाहावं. त्यांनी कुणाची बंधनं घेऊ नयेत.
ती झुगारून निर्णय घ्यायला हवेत. तरच सरकार येऊ शकतं. आजही येऊ शकतं, पण तसा प्रयत्न होताना दिसत नाहीये.
नितेश राणेंना फॉर्म दिला. त्यांचं उमेदवार म्हणून नाव आलं. पण शिवसेनेसुद्धा तिथं उमेदवार उभा केलेला आहे. तो अद्याप मागे घेतलेला नाहीये. राज्यात या दोन्ही पक्षांची युती आहे. पण कणकवली विधानसभा मतदारसंघात ती दिसत नाहीये. याबद्दल तुम्हाला काय म्हणायचंय.
हा शिवसेनेचा रडी गेम आहे. शिवसेना पक्षप्रमुखांनी हेतुपुरस्सर त्यांचा अधिकृत उमेदवार तिथं उभा केलेला आहे.
राज्यात तर भाजप-सेना युती आहे, मग कणकवलीत नेमकं असं काय घडलंय? कणकवलीत अन्याय झाला तर आम्ही सहन करणार नाही, असं का म्हणतायंत ते?
काय करणार शिवसेना? काय हिंमत आहे त्यांची? सारखं आपलं 'सहन करणार नाही... सहन करणार नाही' म्हणत असतात. कुठेय पुरुषार्थ तो दाखवा तरी. नुसतंच आपलं बोलतात. विचारतोय कोण तुला? मैदानात ये जरा, मग बघू.
पण उद्धव ठाकरेंचं मन वळवण्यासाठी भाजप कमी पडलंय का?
ते मला माहीत नाही. ते मुख्यमंत्री पाहतील.
पण मग शिवसेनेचा उमेदवार मागे घेतलेला नाही, मग भाजप वजन वापरायला कमी पडली, असं वाटत नाही का?
नाही, मी काही असं म्हणणार नाही. त्यांनीच आत्मपरीक्षण करावं. एकतर आम्हाला उमेदवारी दिली आणि तेही शिवसेनेचा अधिकृत उमेदवार टाकून. हा माझा कमीपणा नाहीये.
अनेक आमदार आणि बाहेरून आलेल्या नेत्यांचे मुख्यमंत्री किंवा अमित शहांच्या उपस्थितीत प्रवेश झाले. परंतु नारायण राणेंचा प्रवेश अजून रखडलाय आणि नितेश राणेंचा प्रवेश कणकवलीत जिल्ह्याध्यक्षांच्या उपस्थितीत झाला. काय कारण असेल यामागे?
मी यात काही बोलावं, असं काही नाहीये. या सगळ्याला माननीय मुख्यमंत्र्यांनी उत्तर द्यावं. त्यांनीच मला भाजपमध्ये बोलावलं. अनेक ऑफर्स देऊ केल्या.
आता जर ते शब्द पाळत नसतील तर मी काय बोलायला हवं. मी रीतसर आमदारकीचा राजीनामा देऊन आलो तर त्यांनीच पाहावं आता.
त्यांनी काय ऑफर दिल्या होत्या?
त्याची चर्चा आता होऊन गेलेली आहे.
तुम्ही माजी मुख्यमंत्री आहात, ज्येष्ठ नेते आहात. महाराष्ट्राच्या राजकारणात तुमची मोठी भूमिका आहे. अशा वेळेस प्रवेश रखडवणं हा तुम्हाला तुमचा अपमान नाही का वाटत?
काही योगायोग लागतात. एक तर असं होऊ नये, असं मला वाटतं. अपमानाचाही प्रश्न आहेच हा. पण ते आता भाजपने पाहावं. उद्या मी भाजपमध्ये जाणार. पण लोकंच म्हणतील की 'अरे! पक्षप्रवेशाला एक-दीड वर्षं लागलं यांना.' याचा विचार पक्षानं करायला हवा आहे.
असं वागून तुमचं महत्त्व कमी केलं जातंय, असं सांगितलं जातंय?
छे! माझं जनमाणसांमध्ये महत्त्व आहे. कुण्या एका व्यक्तीमुळे ते कमी होणार नाहीये. माझं जे योगदान आहे, ते पाहूनच जनता मला मानसन्मान देते. म्हणून तर मी अजून राजकारणात आहे, नाहीतर केव्हाच बाहेर पडलो असतो.
आम्ही मुख्यमंत्र्याशी याविषयी बोलतो तेव्हा ते कायम बोलणं टाळतात. त्यांच्यापासून शिवसेना लांब जाईल, असं त्यांना वाटत असेल का?
असं असेल तर त्यांनी माझ्याशी बोलायला पाहिजे. एक कुठलीतरी बाजू घ्यायला पाहिजे.
तुमच्या प्रवेशाबाबात काही संकेत आहेत का? तुमचा संपूर्ण स्वाभिमानी पक्ष भाजपमध्ये विलीन होणार का?
हो, विलीन होणार आहे. येत्या 10 तारखेपर्यंत होईल.
नितेश राणे आणि शिवसेना समोरासमोर ठाकलेत, काय आव्हानं जाणवतायंत?
आम्हाला काहीही आव्हानं वाटत नाहीत. साहेब तिथं येऊन थांबलेले असताना त्याच ठिकाणी मी शिवसेनेचं डिपॉझिट घालवलं आहे.
काही राहिलेलं नाही शिवसेनेचं. 50-50 पाहिजे म्हणताना 124 घेऊन गप्प बसलेत ना.
शिवसेनेनी समजून घेतलंय, असं उद्धव ठाकरे यांचं म्हणणं आहे?
पण पर्याय काय होता त्यांच्याकडे? उगाच बढाया मारल्या. आपल्यावर समजून घ्यायची पाळी येतेय, हे कळत नव्हतं का त्यांना.
स्वबळावर लढायची हिंमत नाही. एका बाजूला युती करायची नि दुसरीकडे म्हणायचं आमचाच मुख्यमंत्री होईल. 124 जागांमध्ये यांचा मुख्यमंत्री कसा येणार.
पण तुमचा आणि उद्धव ठाकरेंचा नक्की प्रॉब्लेम काय आहे? अनेक नेते शिवसेनेतून बाहेर पडून भाजपत गेले, पुन्हा शिवसेनेत गेले. पण शिवसेना नारायण राणेंच्याच प्रवेशाबाबत आडमुठेपणा का करतेय?
घाबरतायंत ते नारायण राणेला. मी भाजपात गेल्यावर त्यांचं पारडं जड होणारे, याची त्यांना भीती वाटतेय. त्यांना वाटतंय की भाजप पुढे आपल्याला जुमानेल की नाही. प्रॉब्लेम म्हणजे शिवसेनेतून बाहेर पडायला उद्धव ठाकरे हेच कारण आहे. बाळासाहेबांना मी 19 कारणं सांगितली होती, पत्राद्वारे लिहून पण दिलेली होती. मी साहेबांना सांगून निघालो.
नितेश राणेंचा संघाच्या कार्यक्रमातला एक फोटो व्हायरल झालेला आहे. भाजपनं पूर्ण स्वीकारावं म्हणून ते असं करतायंत का?
चुकीचं काही नाहीये त्यात. मीही जाईन उद्या. मीही संघप्रमुखांना भेटेन. जायचं तर मनापासून जायचं.
या प्रकरणाविषयी अधिक वाचा - नितेश राणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात कशासाठी गेले होते?
आधी मराठी माणसाचा, मग हिंदुत्वाचा मुद्दा, मग सेक्युलर भूमिका आणि आता पुन्हा भाजपमध्ये आला आहात. संघाची विचारधारा तुम्ही पूर्णपणे स्वीकारणार का?
हो स्वीकारणार. हिंदुत्ववाद ही माझी मूळ विचारसरणी आहे.
मग काँग्रेसमध्ये तुम्ही सेक्युलर भूमिका कशी घेऊ शकलात?
नाईलाजास्तव. मला तेव्हा राष्ट्रीय पक्षात जायचं होतं. तेव्हा काही मार्ग नव्हता.
तेव्हा भाजपची काही ऑफर होती का?
आत्ता घेणं कठीण आहे, असं ते तेव्हा म्हणाले. प्रमोद महाजनांशी माझं बोलणं झालं होतं. युती असताना आपसात असं करणं योग्य वाटत नाही, असं ते म्हणाले होते.
इतकी वर्षं तुम्ही काँग्रेसमध्ये नाईलाजानं राहिलात?
सहा महिन्यात मुख्यमंत्री करतो म्हणाले मला ते. वाट पाहात होतो. 12 वर्षांत नाही करू शकले ते. शेवटी राम राम केला मी.
तुम्ही आता हिंदुत्वाच्या मुद्द्यावर लढणार का?
हो. भाजपची विचरसरणी घेऊन लढणार.
नारायण राणेंचा राज्यातला रोल कुठे पाहायला मिळणार आहे?
आशावादी राहा. नक्कीच बघायला मिळेल.
तुमची काय आशा आहे?
मला वाटतंय मी पुन्हा येऊ शकेन. राज्याच्या राजकारणात येऊ शकेन, असं वाटतंय.
तुम्हाला दिल्लीत बरं वाटतं की राज्यात?
राज्यातच. भविष्यात नारायण राणे नक्कीच राज्यात येऊ शकतात.