उद्धव ठाकरेंचा गोंधळ 'सामना'ला दिलेल्या मुलाखतीतून समोर आलाय का?

उद्धव ठाकरे यांनी 'सामना'चे संपादक संजय राऊत यांना दिलेल्या मुलाखतीचा दुसरा भाग दसऱ्याच्या दिवशी (8 ऑक्टोबर) प्रसिद्ध झाला. या भागात उद्धव आरेमधील मेट्रो कार शेड, नाणार, ईडी, आर्थिक मंदी या विषयावर बोलले आहेत.

उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतींबाबत राजकीय विश्लेषकांचे निरीक्षण आहे, की या मुलाखतीत विरोधाभास, प्रश्नांना समाधानाकारक उत्तर न मिळाल्याचं स्पष्टपणे दिसत आहे. तसंच ठाकरे भाजपवर अप्रत्यक्षपणे टीका करतात. पण थेट टीका करणे टाळत आहेत.

युती आणि तडजोडीबाबत उद्धव ठाकरेंना विचारलं गेल्यावर ते म्हणतात, "मी केली युती. युतीसाठी तडजोड केली. कुणासाठी केली, तर माझ्या महाराष्ट्रासाठी केली."

यानंतर जेव्हा संजय राऊतांनी म्हटलं, की तुम्ही 124 जागांवर तडजोड केली....तर त्यावर उद्धव ठाकरेंनी म्हटलं, "तडजोड नाही केली. भाजपकडून सतत सांगत होते, की आमची अडचण समजून घ्यावी. ती अडचण मी समजून घेतली."

उद्धव ठाकरे हे एकीकडे तडजोड केली हे मान्य करत आहेत, तर लागोलग मी तडजोड केली नाही असं सांगताहेत.

कलम 370 हा विधानसभा निवडणुकीत प्रचाराचा मुद्दा होऊ शकतो का ? या प्रश्नावर उद्धव ठाकरे म्हणतात, "370 कलम हा विषय म्हटला तर महाराष्ट्राचा आहे, म्हटला तर नाही..पण शेवटी देशाचा आहे."

ईडीच्या संदर्भात विचारल्यावर उद्धव ठाकरे म्हणतात की, सत्तेचा आणि अधिकाराचा दुरपयोग किंवा गैरवापर होता कामा नये. सूडाने कोणी राज्य करू नये या मताचा मी आहे.

त्याच अनुषंगाने पुढचा प्रश्न विचारला गेला शरद पवार आणि ईडीबाबत. त्यावर उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरेंवर झालेल्या खटल्याचा उल्लेख करून म्हणतात की "जर हे सूडबुद्धीने असेल (शरद पवारांचे प्रकरण) तर त्यावेळेचे राजकारण (बाळासाहेब ठाकरेंच्या प्रकरणात) याहीपेक्षा अधिक सूडबुद्धीचं होतं."

सध्या ईडी आणि सीबीआयचा वापर राजकारणासाठी होत आहे का, असं विचारल्यावर उद्धव यांनी सांगितलं, की ईडीचं मला माहीत नाही. पण सीबीआयचा राजकीय वापर काही आजच होत नाही. जे काल पेरले तेच आज उगवत आहे."

आर्थिक मंदीच्या बाबत उद्धव ठाकरे एका प्रश्नावर म्हणतात की "मंदी आहेच. नाकारून काय होणार?" पण पुढच्याच प्रश्नाच्या उत्तरात म्हणतात, "आर्थिक मंदी आहे की नाही ते नंतर बघूयात."

विरोधाभासाची कबुली?

उद्धव ठाकरेंच्या या वक्तव्यांबाबत 'फ्री फ्रेस जर्नल' या इंग्रजी दैनिकाचे राजकीय संपादक प्रमोद चूंचुवार सांगतात, "उद्धव ठाकरेंची मुलाखत म्हणजे त्यांच्या राजकारणातील विरोधाभासाची एकप्रकारची कबुली आहे. ते स्वत:च सांगतात की समृद्धी मार्गाला आमचा विरोध होता पण आम्ही सरकारला अडचणीत येऊ दिलं नाही. तुमचा जर विरोध होता तर तुम्ही लोकांना समजावून सरकार वाचवण्याचे उद्योग कशासाठी केले ? तुमच्याच पक्षाचे मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे समृद्धी महामार्गाची जबाबदारी होती. तेच त्यासाठी पुढाकार घेत होते आणि तुम्ही दुसरीकडे विरोध करत होता. हे तर टोकाच्या विरोधाभासाचे उदाहरण होते. आरे प्रकरणीही त्यांचा विरोधाभास दिसून आला आहे. एकीकडे ते म्हणतात,की मुंबईकरांनी रस्त्यावर उतरायला पाहिजे. मग आरेच्या एकाही झाडाला हात लावल्यास रस्त्यावर उतरू या तुमच्या घोषणेचं काय झालं?"

उद्धव ठाकरेंना विचारलं गेलं , की 2014 साली आपण स्वबळाची भाषा केली होती. चार वर्षे आपण स्वबळासाठी संघर्ष केला...त्यावर त्यांनी म्हटलं, की बरोबर आहे.

पुढे त्यांना विचारलं गेलं, की 288 जागा लढवण्यासाठी आपण पूर्ण तयारी केली, वातावरण निर्माण केले. पण युतीमुळे त्याला पूर्णविराम मिळाला. त्यावर उद्धव ठाकरे म्हणतात, "तयारी ही 288 जागांची असायलाच पाहिजे. तयारी म्हणजे केवळ निवडणुका लढवणं, हरणं, जिंकणं नाही..." ही तयारी निवडणुका लढवण्यासाठी नाही तर कशासाठी हा प्रश्न अनुत्तरितच राहतो.

विरोधाभासामुळे गोंधळ?

'डीएनए' या दैनिकाचे प्रतिनिधी सुधीर सूर्यवंशी यांचं म्हणणं आहे, की उद्धव ठाकरेंचा गोंधळ या मुलाखतीमधून समोर येत आहे.

"उद्धव ठाकरेंचा विरोधाभास या मुलाखतीतून स्पष्ट होत आहे. हा विरोधाभास त्यांच्या गोंधळलेल्या अवस्थेतून आला आहे आणि त्यांची ही गोंधळलेली परिस्थिती भाजपसोबत युती करताना जी अवस्था झाली आहे त्यातून आली आहे. भाजपसोबत उद्धव ठाकरेंचे संबंध म्हणजे धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय असे झाले आहेत. सध्या युती करण्याशिवाय पर्याय नाही आणि पण मनापासून युतीची इच्छा तर नाही ही उद्धव ठाकरेंची अवस्था जागोजागी त्यांच्या मुलाखतीतून दिसते. युती केली नाही तर भाजप एकट्याने सत्तेत येऊ शकतो आणि विरोधात बसावं लागेल याची त्यांना भीती आहे. कोणत्याही व्यक्तीची भूमिका स्पष्ट नसेल तर त्या व्यक्तीचा गोंधळ वारंवार दिसून येतो. हिंदुत्वाचा मुद्दा आत्ता सेनेऐवजी भाजपचा झाला आहे. मराठीचा मुद्दा तितकासा प्रभावी राहिलेला नाही. यामुळे आता नेमक्या कोणत्या मुद्द्यावर भर द्यायचा हा शिवसेनेचा गोंधळ आहे."

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)