You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
औरंगाबादमध्ये हर्षवर्धन जाधव विरुद्ध शिवसेना वाद का पेटला? - विधानसभा निवडणूक
- Author, तुषार कुलकर्णी
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबाबत अनुचित उद्गार काढल्याच्या काही तासानंतरच शिवस्वराज्य स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष आणि शिवसेनेचे एकेकाळचे आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या घरावर दगडफेक झाली. ही दगडफेक शिवसैनिकांनीच केली असा आरोप हर्षवर्धन जाधव यांनी केला आहे.
या घटनेला पार्श्वभूमी अशी आहे की उद्धव ठाकरे जेव्हा औरंगाबादमध्ये आले होते तेव्हा ते म्हणाले होते की "औरंगाबादला हिरव्या सापांनी विळखा दिला आहे." लोकसभेत एमआयएमचा खासदार निवडून आला आहे. याच संदर्भात ते म्हणाले की "औरंगाबादमध्ये हिरवा झेंडा रोवला गेला आहे. आपल्याला तो उखाडून फेकायचा आहे. या झेंड्याला गाडायचं आहे."
त्यांच्या या वक्तव्याला एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन औवेसी यांनी मालेगावमध्ये उत्तर दिलं. त्यावेळी ते म्हणाले "हिरव्याला गाडणं इतकं सोपं नाही. महाराष्ट्रात 50 ठिकाणी हिरवा झेंडा फडकणार आहे."
शिवसेना आणि एमआयएममध्ये जुंपलेली असतानाच शिवसेनेचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांचं एक वक्तव्य वादग्रस्त ठरलं. हिरव्याचा तुम्हाला इतका तिटकारा आहे तर अब्दुल सत्तार हे कोण आहेत अशा आशयाचं ते वक्तव्य होतं. हे बोलताना जाधव यांनी ज्या भाषेचा वापर केला त्यामुळे शिवसैनिक संतापले.
हर्षवर्धन जाधव आणि शिवसेनेतला वाद
हर्षवर्धन जाधव हे आधी मनसेमध्ये होते नंतर ते शिवसेनेत गेले. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर ते शिवसेनेतून बाहेर पडले. शिवसेनेत हुजरेगिरी करणाऱ्यांनाच महत्त्व आहे असंही ते यावेळी म्हणाले होते. हर्षवर्धन जाधव हे लोकसभा निवडणुकीला औरंगाबादमधून अपक्ष उमेदवार म्हणून उभे होते.
"हर्षवर्धन जाधव यांच्यामुळे मतांची विभागणी होऊन चंद्रकांत खैरे यांचा पराभव झाला," असं स्थानिक शिवसैनिकांना वाटतं. लोकसभा निवडणुकीत चंद्रकांत खैरे यांचा पाच हजार मतांनी पराभव झाला होता. जाधव यांना या निवडणुकीत 2 लाख 83 हजार मतं मिळाली होती.
एमआयएमचे इम्तियाज जलील हे हर्षवर्धन जाधवांनी मत फोडल्यामुळेच जिंकले असं शिवसैनिकांना वाटण्याचं आणखी एक कारण आहे ते म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीवेळी इम्तियाज जलील यांच्या कार्यकर्त्यांनी हर्षवर्धन जाधव यांच्या नावाने घोषणाबाजी केली त्यांचा जयजयकार केला होता.
हर्षवर्धन जाधव आणि चंद्रकांत खैरे यांच्यातही नेहमी ठिणग्या उडाल्याचं औरंगाबादकरांनी पाहिलं आहे. खैरे यांनी हिंदुत्वाचा बाजार मांडल्याचा आरोपही जाधव यांनी केला होता. तर खैरे यांनी जाधव यांना विश्वासघातकी आणि इतर विशेषणं दिली होती.
पूर्ण राज्यात वेगळा प्रचार मग औरंगाबादमध्येच बदल का?
उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे महाराष्ट्रभर प्रचार करत आहेत. राज्यात ज्याही ठिकाणी उद्धव ठाकरे जात आहेत त्या ठिकाणी ते पीकविमा, कर्जमाफी अशा मुद्द्यांवर बोलत आहेत. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही असं त्यांनी सांगितलं आहे.
तसेच शिवसेनेचा 10 रुपयांत थाळीचा मुद्दाही खूप गाजतोय. पण औरंगाबादमध्ये जिल्ह्यात झालेल्या सभांमध्ये त्यांनी म्हटलं की "भगव्याशी केलेली गद्दारी माफ केली जाणार नाही." हर्षवर्धन जाधव यांच्या कन्नडमध्येच ठाकरेंनी सभा घेतली तिथे ते हेच बोलले की "एका व्यक्तीच्या विश्वासघातामुळे औरंबादवरचा भगवा खाली उतरला अशी गद्दारी आम्ही सहन करणार नाही."
त्यांचं हे बोलणं जाधव यांना जिव्हारी लागल्याचं बोललं जातं.
काही दिवसांपूर्वीच काँग्रेसचे नेते अब्दुल सत्तार हे शिवसेनेत आले. त्यांच्यासाठी उद्धव ठाकरे यांनी भाजपकडे असलेला सिल्लोड मतदारसंघ सोडवून घेतला आणि त्यांच्या हातावर शिवबंधन बांधलं. "मुस्लीम व्यक्तीचा इतका तिटकारा जर उद्धव ठाकरे यांना असेल तर सत्तार यांना उमेदवारी का दिली," या आशयाचा सवाल त्यांनी केला. त्यानंतर औरंगाबादचं वातावरण ढवळून निघालं आहे.
त्यांच्या या वक्तव्यानंतर चंद्रकांत खैरे यांनी जाधव यांच्याविरोधात जिल्हाधिकारी आणि पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. जाधव यांच्याविरोधात जातीय भावना भडकवल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे.
धार्मिक तणाव औरंगाबादला नवा का नाही?
औरंगाबाद आणि धार्मिक तणाव हे समीकरण चंद्र सूर्याइतक जुनं आहे, असं इथं म्हटलं जातं. मे 2018 मध्येच औरंगाबाद येथे शाहगंज भागात दोन धार्मिक समुदायांमध्ये दंगल उसळली होती. पण ही काही या काळातली पहिलीच दंगल नव्हती.
औरंगाबादमध्ये धार्मिक तेढ आणि त्यामुळे तणावाचं वातावरण निर्माण होणं, हे काही नवीन नाही. या तणावाचं मूळ मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या काळातील आहे, असं काही इतिहासकारांचं म्हणणं आहे. निजामाच्या आशीर्वादाने रझाकार नावाची संघटना काम करत होती.
"या संघटनेत आणि येथील हिंदू समुदायात संघर्ष होत असे. रझाकारांच्या विचारांशी सामान्य मुसलमानांना सहानुभूती नव्हती. पण कालांतराने या गोष्टीचा विसर पडून दोन समुदायामधली दरी वाढत गेली," असं इतिहासकार रफत कुरेशी यांनी बीबीसीला सांगितलं होतं.
1948 ते 1986 या काळात औरंगाबादनं शांततेचा अनुभव घेतला. पण दोन्ही समुदायातली तेढ नंतर वाढली, असं माध्यमतज्ज्ञ डॉ. जयदेव डोळे सांगतात.
"मुंबईबाहेर शिवसेना वाढली ती औरंगाबादमधूनच. 86-87 पासून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे इथं सभा घेत असत. या सभांमध्ये ते मुस्लिमांवर कडाडून टीका करत असत. 1988 ला शिवसेनेला औरंगाबाद महानगरपालिकेत 27 जागा मिळाल्या त्याचं बीज हे हिंदू-मुस्लीम ध्रुवीकरणात आहे," असं डोळे सांगतात.
MIM चा मराठवाड्यातला उदय
काँग्रेस हा पक्ष मुस्लिमांचं लांगूलचालन करतोय असं म्हणत शिवसेनेनी मराठवाड्यात पाय रोवले तर धार्मिक पक्षांच्या जाचापासून वाचायचं असेल तर तुम्हाला आमच्याशिवाय पर्याय नाही अशी मांडणी MIM नं करत मराठवाड्यात प्रवेश केला.
आधी नांदेड आणि नंतर औरंगाबादमध्ये महानगरपालिकेची निवडणूक लढवली. दोन्ही ठिकाणी या पक्षाला चांगला प्रतिसाद मिळाला. 2014 मध्ये इम्तियाज जलील हे आमदार म्हणून निवडून आले आणि 2019 मध्ये ते खासदारही बनले.
त्यानंतर औरंगाबादमध्ये हिंदू विरुद्ध मुस्लीम अशी राजकीय मांडणी आणखी टोकदार बनली. "औरंगाबादमध्ये हिंदू-मुस्लीम ध्रुवीकरणाच्या राजकारणाचा इतिहास राहिला आहे. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान प्रत्येक वेळी 'खान हवा की बाण हवा' हा नारा लावण्यात येत होता," अशी आठवण महाराष्ट्र टाइम्सचे जिल्हा प्रतिनिधी प्रमोद माने सांगतात.
'जाधव यांच्याविरोधात तक्रारी दाखल'
"हर्षवर्धन जाधव हे शिवसेनेचे तब्बल साडे चार वर्षं आमदार होते. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर त्यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला. मराठा समाजात जाऊन ते मत मागत आहेत. पण असं असताना पक्षप्रमुखावर टीका करण्यातून काय साध्य होणार आहे?" हा प्रश्न माने यांनी उपस्थित केला.
"त्यांचे आणि चंद्रकांत खैरे यांच्यात मतभेद आहेत हे मान्य आहेत पण पक्षानं काय केलं आहे? आता शिवसेनेनी अनेक पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. हर्षवर्धन जाधव हे फक्त एकाच मतदारसंघात आहेत. त्यापलीकडे प्रभाव नाहीत," असं माने सांगतात.
औरंगाबादचं वातावरण तणावपूर्ण झालं आहे का?
"हर्षवर्धन जाधव यांच्या घरावर दगडफेक झाल्यामुळे तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. हर्षवर्धन जाधव हे त्यावेळी घरी नव्हते. पण जितकं त्यांनी बोलणं चुकीचं आहे तितकंच त्यांच्यावर दगडफेक होणं देखील चुकीचं आहे," असं माने सांगतात.
हर्षवर्धन जाधव हे फक्त एकाच मतदारसंघापुरते मर्यादित आहेत, त्यामुळे पूर्ण जिल्हा तणावात नसल्याचं माने सांगतात.
औरंगाबाद टाइम्स या उर्दू दैनिकाचे मुख्य संपादक शोएब खुसरो सांगतात की "जाधव यांच्या वक्तव्यामुळे पूर्ण जिल्हावर परिणाम होणार नाही. औरंगाबादमध्ये राजकीय पक्ष विकासाच्या मुद्द्यांपेक्षा भावनिक मुद्द्यांनाच हात घालताना दिसतात. पण जनता हुशार झाली आहे. त्यांना चांगलं वाईट कळतं."
हर्षवर्धन जाधव यांची प्रतिक्रिया घेण्याचा बीबीसीनं प्रयत्न केला. पण त्यांच्याशी संपर्क होऊ संपर्क होऊ शकला नाही. तसेच माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्याशीही बीबीसीने संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याशी संपर्क झाल्यावर त्यांची भूमिका इथं मांडण्यात येईल.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)