इम्तियाज जलील: पत्रकार ते खासदार असा होता प्रवास

    • Author, हलिमा कुरेशी आणि रोहन नामजोशी
    • Role, बीबीसी मराठीसाठी

विधानसभेच्या 2014 च्या निवडणुकांच्या वेळची ही गोष्ट आहे. इम्तियाज जलील यांनी पत्रकारितेचा राजीनामा देण्याची घोषणा पत्रकार मित्रांशी बोलताना केली होती. या निर्णयाने त्यांच्या मित्र परिवाराला धक्का बसला होता.

23 मे जेव्हा लोकसभेच्या निकालांची मतमोजणी सुरू होती. चंद्रकांत खैरे आणि इम्तियाज जलील यांच्यात चुरशीची लढत सुरू असताना याच मित्र परिवाराचं लक्ष या निकालाकडे लागलं होतं.

यंदाच्या लोकसभेत महाराष्ट्रात भाजपने 41 जागा जिंकल्या तर काँग्रेसला चंद्रपूरमध्ये केवळ एक विजय मिळवता आला. मात्र सगळ्यात लक्षवेधी लढत ठरली ती औरंगाबादची. चार वेळा लोकसभेत निवडून गेलेल्या चंद्रकांत खैरेंचा MIM चे इम्तियाज जलील यांनी चुरशीच्या लढतीत पराभव केला. 2014 मध्ये पत्रकारितेची नोकरी सोडून राजकारणात येणाऱ्या जलील यांचा प्रवासही तितकाच रंजक आहे.

इंग्रजी माध्यमात शिक्षण घेतलेल्या जलील यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून पत्रकारितेत पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी लोकमत टाइम्समधून पत्रकार म्हणून कारकीर्द सुरू केली.

पुढे त्यांना टीव्ही चॅनेल मध्ये संधी मिळाली आणि पुण्यात NDTVचे ब्यूरो चीफ म्हणून त्यांनी काम केलं. इम्तियाज जलील यांनी औरंगाबाद आणि पुण्यात लोकमत आणि एनडीटीव्ही मध्ये एकूण 23 वर्षं पत्रकारिता केली.

मात्र ही वाट सोडून त्यांनी राजकारणाची कास धरली. त्यांना 'आप'तर्फे निवडणुकीला उभं राहण्याची गळही काही जणांनी घातली होती. MIM पक्षाचे संस्थापक असदुद्दीन औवेसी यांचे नातेवाईक असलेल्या जलील यांनी MIM मध्ये प्रवेश करून अनेकांना धक्का दिला.

MIM पक्षाने त्यांना विधानसभेसाठी उमेदवारी दिली. पहिल्याच प्रयत्नात शिवसेनेच्या प्रदीप जयस्वाल यांचा पराभव करत ते विधानसभेवर निवडून आले. पुढे 2019 मध्ये देखील लोकसभा निवडणुकीत पहिल्याच प्रयत्नात जायंट किलर ठरत सलग चार टर्म खासदार असलेल्या शिवसेनेच्या चंद्रकांत खैरेंचा पराभव केला.

आश्चर्यकारक कामगिरी

"पहिल्याच प्रयत्नात आमदार आणि पहिल्याच प्रयत्नात खासदार ही इम्तियाज जलील यांची आश्चर्यकारक कामगिरी असल्याचं पुण्यातील वरिष्ठ पत्रकार योगेश जोशी यांचं म्हणणं आहे. "इम्तियाज जलील यांनी आपल्या प्रचारात कधीही नरेंद्र मोदींच्या विरोधात टीका केली नाही, ना कधी त्यांनी हिंदुत्वाचा मुद्दा पुढे आणला. खरंतर MIM हा कट्टरतावादी पक्ष, मतांचं ध्रुवीकरण करणारा, पण जलील यांनी केवळ औरंगाबाद शहराच्या विकासाच्या मुद्द्यावर खैरेंवर टीका केली."

"हीच इम्तियाज जलील यांच्या राजकारणाची खेळी होती. औरंगाबादमध्ये ध्रुवीकरण होऊन मत विभागली जाणार नाहीत याची काळजी घेतली त्यामुळे मुस्लीम दलित वंचित घटकांची मतं त्यांना मिळाली तर इतर उमेदवारांच्या मध्ये मतविभागणी होऊन पराभव झाला." असं ते पुढे म्हणाले.

"आजपर्यंत अनेक पत्रकार खासदार झालेत. मात्र जनतेतून निवडून लोकसभेत जाणाऱ्या अतिशय थोड्या पत्रकारांमध्ये जलील यांची गणना होते," असं पुण्यातील ज्येष्ठ पत्रकार प्रतिभा चंद्रन यांना वाटतं.

प्रतिभा चंद्रन पुढे सांगतात, "इम्तियाज बरोबर काम केल्याचा नेहमीच आनंद वाटतो. अतिशय सुरक्षित नोकरी सोडून राजकारणात जाण्याचा त्याचा निर्णय त्याने काही दिवसातच खरा करून दाखवला होता. तो ज्या पक्षात आहे त्या पक्षाशी 100% मतभेद असू शकतात मात्र 'इम्तियाज कँडिडेट ऑन मेरिट' आहे. औंरगाबादमध्ये चंद्रकांत खैरे सातत्याने निवडून येत होते मात्र शहराचा विकास मात्र होत नव्हता."

2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत वंचित बहुजन आघाडीची घोषणा झाली. औंरगाबादमधून बी. जी. कोळसे पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली होती. मात्र औरंगाबाद मधील स्थानिक नेत्याला संधी द्यावी अशी मागणी जलील यांनी केली आणि शेवटी इम्तियाज जलील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली.

ज्येष्ठ पत्रकार अद्वैत मेहता सांगतात, "पहिल्याच फटक्यात आमदार आणि पहिल्याच फटक्यात खासदार ही कामगिरी अतिशय कौतुकास्पद आहे. मोदींच्या लाटेत वंचित बहुजन आघाडीचा राज्यातला एकमेव विजेता खासदार म्हणून निवडून येणं विशेष असल्याचं ते म्हणतात.

पत्रकार अरुण म्हेत्रे यांच्या मते,"मित्र-सहकारी खासदार झाला याचा आनंद खूप आहे. पत्रकार म्हणून वेगवेगळे विषय विविधांगाने मांडण्याची शैली इम्तियाज यांच्याकडे होती. पक्ष कुठलाही असू दे, व्यक्ती म्हणून इम्तियाज यांचं सामाजिक भान उत्तम आहे. त्याची प्रचितीही आलीये. एक सुशिक्षित नेता महाराष्ट्राचं, मराठवाड्याचं चांगलं प्रतिनिधित्व करेल याची खात्री वाटते.

AIMIM म्हणजेच आताचा ऑल इंडिया मजलिस -ए- इत्तेहादुल मुस्लिमीन या पक्षाची स्थापना 1935 साली झाली. या पक्षाने नांदेड महापालिकेत 2012 मध्ये प्रवेश केला आणि पुढे2014 इम्तियाज जलील विधानसभेवर निवडून गेले. त्यांच्या नेतृत्वाखाली औरंगाबाद महापालिकेच्या निवडणुकीत 25 जागाही मिळवून दिल्या.

पक्षाला विरोध असला तरी व्यक्तीला नाही

ज्येष्ठ पत्रकार व हैद्राबाद मुक्तिसंग्रामाचे अभ्यासक निशिकांत भालेराव MIM बद्दल बोलताना म्हणाले की, इम्तियाज जलील यांचा वैयक्तिक विरोध नाही. पण ज्या पक्षात ते आहेत तो पक्ष कट्टरतावादी आहे. पक्ष जातीयवादी आणि धर्मांध आहे. त्याला धोरणं नाहीत.

"अलीकडे जलील यांच्या भूमिकांमधून विसंगती दिसून येत आहे. त्यामुळे इम्तियाज सेक्युलर भूमिका घेणार का याकडे लक्ष राहील. इम्तियाज यांनी रफीक झकेरिया, सलीम काझी यांच्याप्रमाणे काम करावं. खासदार म्हणून ते काय भूमिका बजावतात याकडे लक्ष आहे. मात्र MIM ला वैयक्तिक विरोध आहे," असं मत भालेराव यांनी व्यक्त केलं.

ज्येष्ठ पत्रकार आणि लोकसत्ता नागपूर आवृत्तीचे माजी निवासी संपादक प्रवीण बर्दापूरकर सांगतात, "जलील यांचा पक्ष कट्टरतावादी असला, जरी जलील MIMच्या तिकिटावर निवडून आले असला तरी ते कट्टरतावादी नाहीत. जलील अतिशय सुसंस्कृत आणि उच्च शिक्षित आहेत."

औरंगाबादचे रेंगाळलेले प्रश्न सोडवणं हे त्यांच्यासमोरचं मोठं आव्हान आहे. कारण औरंगाबादला प्रभावी लोकप्रतिनिधी नाही. खैरे यांचा पराभव होण्याचं हे एक महत्त्वाचं कारण आहे. खैरेंचं नेतृत्व प्रभावशून्य होतं. त्यामुळे औरंगाबादच्या नागरी समस्या सोडवणं आणि त्यासाठी योग्य समन्वय साधणं महत्त्वाचं असल्याचं ते पुढे सांगतात.

धार्मिक सलोखा बिघडू न देणं हे देखील जलील यांच्यासमोरचं मोठं आव्हान आहे, असं ज्येष्ठ पत्रकार प्रवीण बर्दापूरकर यांना वाटतं.

एकूणच जलील यांचा प्रवास रंजक असला तरी औरंगबादकरांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचं काटेरी आव्हान त्यांच्यासमोर आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)