शरद पवार: ईडी प्रकरणातून नेमकं काय साध्य केलं?

"आता चौकशीला येऊ नये, अशी ईडी आणि मुंबई पोलिसांनी विनंती केली आहे. पोलीस आयुक्तांनी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न तयार होण्याची शक्यता आहे, असं मला सांगितलं. त्यामुळे मी ईडी कार्यालयात न जाण्याचा निर्णय घेतला आहे." असं म्हणत शरद पवारांनी काल (27 सप्टेंबर) दुपारच्या सुमारस अचानक ईडी कार्यालयात न जाण्याचा निर्णय घेतला.

24 सप्टेंबर रोजी पत्रकार परिषद घेऊन ईडी कार्यालयात स्वत: जाणार असल्याचे पवारांनी सांगितलं होतं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे 26 सप्टेंबर रोजीही पवार आपल्या भूमिकेवर ठाम होते. त्यामुळं 27 तारखेला म्हणजे पवार ईडी कार्यालयात हजेरी लावणार, याकडे सगळ्यांचं लक्ष होतं.

मात्र ऐनवेळी शरद पवारांनी कायदा व सुव्यवस्थेचं कारण देत ईडीच्या कार्यालयात जाण्याचं रद्द केल्याचं सांगितलं.

"ईडीचे अधिकारी पोलिसांच्या विनंतीस अनुसरून तसेच मुंबई शहर व राज्यातील तणावाच्या परिस्थितीची सर्वसामान्य नागरिकांना झळ पोहोचू नये म्हणून मी आज मुंबई येथील ईडी कार्यालयास भेट देण्याचा निर्णय तूर्तास तहकूब करत आहे." असं पवारांनी म्हटलं असलं तरी 24 सप्टेंबरपासून कालपर्यंत म्हणजे 27 सप्टेंबरपर्यंत शरद पवार हेच माध्यमांच्या केंद्रस्थानी राहिल्याचे दिसून आले.

ईडीच्या कार्यालयात जाण्याचं सांगून आणि कायदा व सुव्यवस्थेचं कारण देत ईडीच्या कार्यालयात जाणं रद्द करून पवारांनी काय साधलं, हा प्रश्न आता चर्चेत आलाय. बीबीसी मराठीनं या प्रश्नाच्या उत्तराचा कानोसा घेण्याचा प्रयत्न केला.

वरिष्ठ पत्रकार पवन दहाट म्हणतात, "ईडीच्या कार्यालयात जाण्याची घोषणा करून, ऐनवेळी कायदा व सुव्यवस्थेच्या कारणास्तव माघार घेत कुठल्याही प्रकारचा गोंधळ होऊ दिला नाही. तुम्ही विनंती केल्यावर मी माघार घेतोय, हेही दाखवून दिलं. त्यामुळं आपण एक प्रगल्भ राजकारणी आहोत, हेही पवारांनी दाखवून दिलं."

'पवारांनी कार्यकर्त्यांमध्ये नवी उमेद भरून सक्रिय केलं'

"शरद पवारांनी एकतर जिल्ह्या-जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना त्यांनी सक्रिय केलं. अनेक ठिकाणचे कार्यकर्ते तर मुंबईच्या दिशेनेही आले." असं पवन दहाट म्हणतात.

तर वरिष्ठ पत्रकार सुधीर सूर्यवंशी म्हणतात, "आपला ऐंशी वर्षांचा नेता जर लढू शकतो, तर आपण का नाही? हा संदेश राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचला. कार्यकर्त्यांमध्ये नवी उमेद निर्माण करण्याचं काम पवारांनी या निमित्तानं केलं."

शिवाय, "पवारांच्या या सर्व घडामोडींमुळं 2014 साली ज्या जागा पाच-दहा हजारानं गेल्या किंवा आताही काठावर जिंकू शकत होत्या, त्या जागा सुरक्षित होण्यास यामुळं मदत होईल. राष्ट्रवादीचं तिकीट घ्यायचं की नाही, अशा द्विधा मनस्थिती असलेले उमेदवारही तिकीट घेण्याबाबत ठाम होतील." असं सुधीर सूर्यवंशी म्हणतात.

"शरद पवार ही फक्त व्यक्ती नाही, तर ते मास लीडर आहेत. शरद पवारांशी महाराष्ट्रातील शेतकरी वर्ग, बहुजन वर्ग भावनिकरित्या जोडला गेलाय. या वर्गाशी पवारांनी पन्नास वर्षांपासून नातं जोडलंय. त्यामुळं पवारांना टार्गेट करणं म्हणजे या वर्गाला दुखावणं हे होतं. त्यामुळं दोन दिवस ज्या प्रतिक्रिया उमटत आहेत, ते पक्षाच्या पलीकडे या वर्गाचीही प्रतिक्रिया दिसून येते." असंही सुधीर सूर्यवंशी सांगतात.

'पवार परसेप्शन बॅटल जिंकले'

"शरद पवार परसेप्शन बॅटल (प्रतिमा निर्माण करण्याची चढाओढ) जिंकले. विधानसभा निवडणुकीआधी जो परसेप्शन राऊंड होतो, तो राष्ट्रवादी काँग्रेस आणि पर्यायानं विरोधक जिंकलेत. मग त्यानंतर आता ते याचा पुढे कसा उपयोग करतात, हे पाहावं लागेल." असं सुधीर सूर्यवंशी म्हणतात.

लोकांमध्ये पवांरांप्रती सकारात्मक सहानुभूती निर्माण झाल्याचेही सूर्यवंशी सांगतात.

तर पवन दहाट म्हणतात, "शरद पवारांनी यशस्वीरित्या स्वत:ला चर्चेत ठेवलं. शरद पवार मायलेज घेऊन गेलेत. पवारांमुळे तळागाळातील कार्यकर्ताही जागा झाला, सर्वोच्च नेत्याला ईडीची नोटीस गेल्याचं वातावरण तयार झालं. निवडणूक तोंडावर असताना याचा नक्कीच राष्ट्रवादीला फायदा होईल."

पवाराचं भावनिक राजकारण?

"शरद पवारांचं अंतिम आरोपपत्रात सुद्धा नाहीय. त्यांचं नाव फक्त जनहित याचिकेत होतं. खडसे, अण्णा हजारेंनीही पवारांचं नाव नसल्याचं स्पष्ट केलं होतं. त्यामुळं पवार आक्रमकपणे पुढे आले." असं म्हणत पवन दहाट पुढे सांगतात, "ईडीनं बोलावून हजर राहिले नाहीत, पवार घाबरले, असा संदेश जायला नको म्हणून पवारांनी हे सर्व केल्याचं दिसतं."

मात्र, सुधीर सूर्यवंशी म्हणतात, "लोकांमध्ये काय संदेश गेला की, गेल्या पाच वर्षांत ईडी झुकली. गेल्या पाच वर्षात कुठल्याही विरोधकानं केलं नव्हतं असं, जे पवारांसारख्या मुरब्बी राजकारण्यानं केलं."

"दिल्लीच्या तख्तासमोर झुकणार नाही, असं भावनिक साद पवारांनी घातली आणि नेहमीप्रमाणे आपणच मुरब्बी असल्याचे दाखवून दिलं. बाळासाहेब ठाकरे म्हणायचे की, पवार 'बारामतीचे तेल लावलेले पैलवान' आहेत. आज त्याचा प्रचिती आली." असं सूर्यवंशी म्हणतात.

पी. चिदंबरम यांच्या अटकेच्या घडामोडींचा उल्लेख करत सुधीर सूर्यवंशी म्हणतात, "दिल्लीत पी. चिदंबरम यांच्या अटकेचं नाट्य पाहिलं तर लक्षात येईल, चिदंबरम काही दिवस अनट्रेसेबल होते. पण पवारांनी तसं न करता, मी स्वत:च तुमच्याकडे येतो, असं सांगून ईडी यंत्रणेला आव्हान दिलं. पवारांमध्ये विश्वास दिसून आला. त्यामुळं तीन खासदारांच्या नेत्यानं 303 खासदारांच्या पक्षाला दाखवून दिलं की, सत्याबरोबर असलो की कुठल्याही यंत्रणेला घाबरण्याचं कारण नाही."

सहानुभूती मतात परावर्तित होईल की नाही?

मात्र, या सर्व घडामोडींचा महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकांवर काही परिणाम होईल का, यावर बोलताना सुधीर सूर्यवंशी म्हणतात, "भाजपकडे जे नेटवर्क आहे, ते राष्ट्रवादी काँग्रेसकडे नाही. मात्र, निवडणूक केवळ कार्यकर्ते किंवा नेटवर्कवर लढली जात नाही. त्यात अनेक परसेप्शन, भावना यावरही लढली जाते. जसे गुजरातमध्ये नरेंद्र मोदी दोन-तीन निवडणुका भावनेवर जिंकले. म्हणजे गुजरात विरूद्ध केंद्र सरकार असं चित्र तयार करून मोदी जिंकत जायचे. तशाच प्रकारे महाराष्ट्र विरुद्ध दिल्ली असं चित्र पवार तयार करत आहेत, असं दिसतंय. मात्र या मुद्द्यावरून सुद्धा शरद पवारांना सहानुभूती मिळेल, पण मतांमध्ये परावर्तीत होईल का, हे सांगणं कठीण आहे."

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)