You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
शरद पवार यांच्या साताऱ्यातील सभेनंतर राष्ट्रवादीवर मतांचा पाऊस पडेल?
- Author, नामदेव अंजना
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
शरद पवार यांची साताऱ्यात भर पावसात सभा झाली. अंगावर पावसाच्या सरी कोसळत असतानाही शरद पवारांनी आपलं भाषण न थांबवता सत्ताधाऱ्यांवर टीका केली.
उदयनराजेंना तिकीट देणं ही आपली चूक होती, अशी कबुली देत पवारांनी उदयनराजेंसह भाजपलाही पराभूत करण्याचं आवाहन केलं.
शरद पवारांनी पाऊस सुरू झाल्यानंतरही भाषण थांबवलं नाही. त्यामुळं समोरील उपस्थित कार्यकर्त्यांमध्येही मोठा उत्साह पाहायला मिळाला. घोषणा आणि शिट्ट्यांनी परिसर दुमदुमला.
सोशल मीडियावर पवारांचे पावसाचे फोटो व्हायरल झाले. पण प्रश्न हा आहे की याचा निवडणुकीवर परिणाम होईल का? याबद्दल पत्रकार, विश्लेषक, मार्केटिंग तज्ज्ञ आणि सोशल मीडिया तज्ज्ञांना काय वाटतं ते आम्ही जाणून घेतलं.
79व्या वर्षी मैदानात
महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकांच्या आधी महिना-दोन महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेना-भाजपमध्ये गेलेल्यांची संख्या लक्षणीय आहे. उदयनराजे भोसले, शिवेंद्रराजे भोसले, जयदत्त क्षीरसागर, गणेश नाईक, सचिन अहिर, भास्कर जाधव, चित्रा वाघ यांच्यासारख्या लोकप्रिय नेत्यांनी राष्ट्रवादीची साथ सोडली.
त्या सुमारास राष्ट्रवादी पक्षही शिवस्वराज्य यात्रेच्या पलीकडे प्रभावी असे प्रचारतंत्र वापरताना दिसली नाही. त्यामुळं पक्षाला एक प्रकारची मरगळ आल्याचं चित्र होतं.
अशातच राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि देशाचे माजी कृषी मंत्री शरद पवार हे स्वत:च मैदानात उतरले आणि त्यांनी प्रचाराची धुरा खांद्यावर घेतली. शरद पवारांनी राज्यभर दौरे सुरू केले. राज्यात ठिकठिकाणी प्रचारसभा, रॅली, संवादयात्रा काढल्या.
शरद पवारांच्या साताऱ्यातील सभेने मात्र महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलं. उदयनराजेंनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर साताऱ्यात पहिल्यांदाच शरद पवार गेले होते आणि तिथं त्यांना प्रचंड प्रतिसाद लाभला. त्यानंतर राज्यातील त्यांच्या सभांची संख्याही वाढली.
त्यानंतर काही दिवसांच्या अंतरानं काल झालेली साताऱ्यातील दुसरी सभाही पवारांनी पावसात भाषण केल्यानं गाजली आणि आता 'वातावरण फिरलं' असं राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्ते सांगू लागले.
पावसातल्या सभेचा राष्ट्रवादीला फायदा होईल?
एकीकडे साताऱ्यातील सभेनं राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये शरद पवारांनी उत्साह भरला. दुसरीकडे शरद पवार या 79 वर्षांच्या नेत्यातली ऊर्जा पाहून अनेकांनी आश्चर्यही व्यक्त केलं.
मात्र विरोधी पक्षांच्या निवडणुकीतली कामगिरी निराशाजनक होत असताना, शरद पवारांचा हा झंझावात महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसला उभारी देईल का, हा प्रश्न या निमित्तानं पुन्हा चर्चेत आला.
याबाबत महाराष्ट्र टाइम्सचे वरिष्ठ सहाय्यक संपादक विजय चोरमारे म्हणतात, "भाजपचा जो निष्ठावंत मतदार आहे, तो बदलण्याचं काहीच कारण नाही. मात्र जो काठावरचा मतदार आहे, त्यावर निश्चितच परिणाम होऊ शकतो."
पवारांच्या महाराष्ट्र दौऱ्यात तरुणांचा सहभाग मोठा दिसून आला. त्याबद्दल विजय चोरमारे सांगतात, "शरद पवारांचा युथ कनेक्ट पहिल्या सभेपासून खूप वाढलाय. त्याचं कारण असं असावं की, पक्षातील लोक सोडून गेले. यातून पवार उभे राहिले, त्यामुळं तरुण जोडले गेले. पूर्वी पवारांबद्दल तरुणांच्या मनात द्वेष होता. ते सर्व पवारांनी बदललंय, हे नक्की."
मात्र, ज्येष्ठ पत्रकार आणि तरुण भारतचे माजी संपादक भाऊ तोरसेकर म्हणतात, "शरद पवारांचा पाय दुखतोय, त्यांनी पावसात भाषण केलं हे ठीक आहे. मात्र हे माध्यमांवरून दाखवलं गेलं. पण एखादं न्यूज चॅनेल पाहणारे लोक किती आहेत, हेही पाहावं लागेल. पावसात पवार भिजले, हे किती लोकांनी पाहिलं, यावरून त्याचा परिणाम होईल, हे ठरवता येईल."
एखाद्या घटनेनं निवडणुकीचं चित्र बदललंय का?
एखाद्या घटनेनं निवडणुकीचं चित्र बदलल्याच्या घटना घडल्या आहेत. 1984 साली इंदिरा गांधी यांची हत्या झाल्यानंतर लगेचच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस प्रचंड बहुमत मिळालं होतं.
तसेच 1991 साली लोकसभेची निवडणूक सुरू असतानाच राजीव गांधी यांची हत्या झाली. निवडणुका 55 टक्के उरकल्या होत्या. मात्र, ऊर्वरीत 45 टक्के निवडणुकीवर या घटनेचा परिणाम झाल्याची आकडेवारी सांगते.
भाऊ तोरसेकर सांगतात, "भारतात अशा घटना क्वचित घडल्यात, ज्यामुळं संपूर्ण निवडणुकीवर परिणाम झालाय."
"बांगलादेशी घुसखोरांबाबत भूमिका घेऊन पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी सत्तेवर आल्या. त्याआधी त्यांनी लोकसभेच्या अध्यक्षांच्या तोंडावर कागदपत्र फेकले होते. त्या प्रसंगाचा पश्चिम बंगालमध्ये त्यांना फायदा झाला. मात्र, अशा फारशा घटना दिसत नाहीत," असं भाऊ तोरसेकर सांगतात.
महाराष्ट्रातल्या घटनेचाही भाऊ तोरसेकर उल्लेख करतात. ते सांगतात, "चाळीस वर्षांपूर्वी शिवाजी पार्कात शिवसेनेचा दसरा मेळावा होता. त्यावेळी पाऊस आला आणि बाळासाहेब ठाकरेंनी भिजत भाषण केलं होतं. तेव्हा व्यासपीठावर अभिनेत्री वैजयंतीमाला आणि तिचा नवरा डॉ. बाली हेही व्यासपीठावर भिजतच बसले होते. मात्र, त्याचा निवडणुकीत फायदा झाला नव्हता."
सोशल मीडियावरील प्रचारातून किती फायदा?
पवारांच्या साताऱ्यातील भर पावसातल्या सभेचे छोटे-छोटे व्हीडिओ सोशल मीडियावर फिरत आहेत. विशेष म्हणजे, हिंदी, मराठीसह दाक्षिणात्य सिनेमातल्या गाणीही या व्हीडिओ लावण्यात आली आहेत.
एकूणच या सभेच्या व्हीडिओ किंवा फोटोंच्या माध्यमातून राष्ट्रवादीकडून लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न होताना दिसतोय.
सोशल मीडियावरील या प्रचाराचा किती फायदा होईल, याबाबत 'डिजिटल पत्रकारिता' पुस्तकाचे लेखक आणि हिंदुस्तान टाइम्स मराठीचे संपादक विश्वनाथ गरूड यांनी बीबीसी मराठीशी बातचीत केली.
विश्वनाथ गरूड म्हणतात, "राष्ट्रवादीचा सोशल मीडियावरील वावर वाढलाय. एंगेजमेंट, ऑर्गेनिक रीच या गोष्टी वाढल्यात. कारण शरद पवारांच्या व्हीडिओ, पोस्ट, फोटोंवरील कमेंट पाहिल्यास, त्या शेतकरी कुटुंबातील पुढे गेलेली मुलं करत असतात."
विश्वनाथ गरूड सांगतात, "ईडीनं शरद पवारांना चौकशीसाठी बोलावल्याचं वृत्त होतं. मग पवार जायला निघाले आणि ईडीच्या विनंतीनंतर थांबले. या सर्व गोष्टींचा राष्ट्रवादीच्या सोशल मीडियानं पवारांच्या प्रतिमानिर्मितीसाठी चांगला फायदा करून घेतला."
मात्र गरूड असेही म्हणतात की, "सोशल मीडियावर पाहून, वाचून कुणी मतदान करत नाही. पण सोशल मीडिया हा मतदारांना विचार करायला लावणारा एक फॅक्टर नक्कीच आहे. काठारवरच्या लोकांना हे कँपेन नक्कीच बदलवू शकतात."
दुसरीकडे, विजय चोरमारे असं निरीक्षण नोंदवतात की, "साताऱ्यातल्या पवारांच्या पावसातल्या सभेनंतर सोशल मीडियासह सर्वत्र ज्या प्रतिक्रिया येतायत, त्यांना पक्षांच्या सीमा दिसत नाही. त्यामुळं थोड्या प्रमाणात लाभ होईल. शिवाय, जिथं अटीतटीच्या लढती आहेत, तिथंही फायदा होताना दिसेलच."
शिवाय, "2014 सालापासून आपल्याकडे सोशल मीडियावरील कल हा सँपल सर्व्हे म्हणूनच पाहिला जातोय. कारण इथं तरुण वर्ग आहे. हाच वर्ग भाजप समर्थक होता. त्यावरूनच देशात भाजपची हवा असल्याचं दिसलं होतं. तोच ट्रेंड आता बदलताना दिसतोय," असंही चोरमारे आपलं निरीक्षण नोंदवतात.
"विरोधात असणाऱ्या पक्षांना सोशल मीडियाचा अधिक चांगला वापर करता येतो. कारण लोकांचा राग ते व्यक्त करू शकतात. तेच राष्ट्रवादीनं हेरलंय," असं विश्वनाथ गरूड सांगतात.
भावनात्मक प्रतिकं किती प्रभावशाली ठरतात?
जाहिरात तज्ज्ञ भरत दाभोलकर म्हणतात, "पवारांनी साताऱ्यात पावसात भाषण केल्यानं जनमानसावर फारसा प्रभाव पडेल, असं वाटत नाही. कारण सध्या लोकांना रोजगार किंवा विकासाचे मुद्दे महत्त्वाचे वाटतात. भाषणात काय बोललात, हे महत्त्वाचं असतं. कशा प्रकारे बोललात याला महत्त्व नसतं."
"पावसात भिजून सहानुभूतीचाही प्रश्न नाही. आपल्या देशात 80-85 वर्षांची माणसं निवडणूक लढत असतात. सहानुभूती वाटेलही, पण मतांवर फारसा परिणाम होताना दिसणार नाही," असंही दाभोलकर म्हणतात.
मात्र राजकीय रणनितीकार आणि युक्ती मीडियाचे प्रमुख प्रमोद सावंत म्हणतात, "शरद पवारांनी ईडीला स्वत: भेटायला जाण्याची तयारी दाखवणं किंवा भर पावसात सभा घेणं, यातून लोकांच्या भावनेला हात घालता जातो. पवार तेच करतायत."
सावंत म्हणतात, बाळासाहेब ठाकरे हे सुद्धा भावनेला हात घालायचे, पण ते मतांमध्ये रूपांतरित होत नसे. पवार हे भावनेला हात घालून ते मतांमध्ये रूपांतरितही करतात.
"आजही भारतात भावनेवर मतं दिली जातात. तसं होत नसतं, तर राम मंदिराचा मुद्दा आजही निवडणुकीच्या केंद्रस्थानी नसता," असं सावंत सांगतात.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)