शरद पवारांची सातारा येथे पावसात सभा: वणवा की स्टंटबाजी, सोशल मीडियावर कमेंट्सचा पाऊस- विधानसभा निवडणूक

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची साताऱ्यातील सभा सोशल मीडियावर चांगलीच गाजते आहे. पवार यांच्या सभेनंतर व्हॉटसअपवर हा व्हीडिओ व्हायरल झाला आहे. त्याचबरोबर त्यांचा हा फोटो अनेकांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.

'मी व्यथांची वेधकाळा, मी नभीचा मेघकाळा

वाळवंटा ऐक माझे, मीच उद्याचा पावसाळा'

या काव्यपंक्तीचा संदर्भ देत पृथ्वीराज बोऱ्हाडे यांनी शरद पवार यांच्या साताऱ्यातील भर पावसात केलेल्या भाषणाचं कौतुक केलं आहे.

'मुसळधार पावसात तो वणवा, आज मी पुन्हा भडकताना पाहिला

महाराष्ट्राचा आधारवड, तोफेसारखा मी धडाडताना पाहिला'

अशा शब्दांत शरद पवारांचं कौतुक सागर नलगे यांनी केलं आहे.

हा फोटो निवडणुकीची ओळख बनून राहील असं मत सोशल मीडियावर व्यक्त केलं जात आहे. "हा फोटो मोमेंट ऑफ द इलेक्शन ठरेल. जगण्याची आणि पुन्हा जोमानं उभं राहण्याची इतकी दुर्दम्य महत्वाकांक्षा प्रत्येकास मिळो. बाकी राजकीय मतभेदांसह या तरण्या युवकाला शुभेच्छा" अशी प्रतिक्रियाही उमटत आहे.

मात्र सगळेच नेटिझन्स पवारांचं कौतुक करणारे नाहीत. तुमची तळमळ दिसते. या वयात आपणास एवढा अट्टाहास करावा लागतोय अशी टीकाही काही लोकांनी केली आहे.

आता किती पळून काय फायदा नाही. कर्माची फळं अशा शब्दांत टीका केली आहे. 'सह्याद्रीसारखा ऊन पावसात महाराष्ट्रासाठी उभा एक बुलंद बुरुज शरद पवार' अशा शब्दात काहींनी कौतुक केलं आहे.

'कचरा वेचला मोदीजींनी ती स्टंटबाजी, पावसात पवार साहेबांनी भिजत भाषण केलं तर ते प्रेरणादायी- वाह रे! अशा पद्धतीने काहींनी टीका केली आहे.

शरद पवार यांनी या वयामध्ये गेले काही दिवस सतत सलग प्रचार केल्याबद्दल फेसबुकवर अनेक लोकांनी त्यांचं कौतुक केलं होतं. त्यांचे पाय सुजले असतानाही ते प्रचार करत आहेत असा एका फोटोही गेले दोन दिवस फेसबुकवर शेअर केला जात होता. त्यानंतर पाठोपाठ कालपासून साताऱ्यातील भाषणाचा फोटो प्रसिद्ध होत आहे. अनेक लोकांनी पवार यांच्या या फोटोतून सर्वांनी प्रेरणा घेतली पाहिजे असं लिहिलं आहे.

जेव्हा जीवनात सगळं संपलं आणि रस्ता खूप खडतर झाला आहे असं वाटलं तर एक करा- या व्यक्तीकडे बघा आणि नव्याने संघर्षाला सुरुवात करा. विजय आपलाच असेल असं म्हटलं आहे.

भर पावसात, वयाच्या 79व्या वर्षी वाखाणण्याजोगी ही प्रचंड ऊर्जा, म्हणूनच शरद पवारांचं व्यक्तिमत्व मनापासून भावतं असं एका नेटिझनने म्हटलं आहे.

फिरुनी नवी जन्मेन मी. यांचं राजकारण कधीच पटले नाही. पण यांची जिद्द, जिगर आणि मेहनत वाखाखण्याजोगी आहे यात शंकाच नाही, असं शरद मराठे यांनी म्हटलं आहे.

अकेला काफी है. सर्व जवळच्या माणसांनी धोका देऊन सुद्धा एकटा लढवय्या नेता अशा शब्दांमध्ये पवार यांच्या गेले काही दिवस चाललेल्या प्रचाराचं कौतुक सोशल मीडियावर होत आहे.

अफाट इच्छाशक्ती असलेला माणूस असं एका नेटिझनने म्हटलंय.

लोकांच्या भल्याची आस्था आणि लोकांबद्दल मनात प्रेम असलं की ना छताची गरज पडते न छत्राची अशा शब्दांत एका नेटिझनने कौतुक केलं आहे.

झुकल्या वाकल्या गर्विष्ठ माना या महाराष्ट्र दरबारी पवार साहेब तुमचाही सार्थ अभिमान आम्हाला असं काहींनी म्हटलं आहे.

अशा वाक्यांमध्ये त्यांच्या फोटोचं वर्णन केलं जात आहे.

शरद पवार यांच्या या फोटोवर आणि त्यांनी पावसात भिजत असतानाही भाषण करण्यावर टीकाही होत आहे.

डोक्यावर छत्री धरण्यासाठी पवार यांच्याजवळ कोणीही नाही अशी टीका केली जात आहे. काही नेटिझन्सनी आता पवार यांनी निवृत्त व्हावे असं मत व्यक्त केलं आहे.

शरद पवार यांच्यावरून सुरू झालेली चर्चा थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही गेली. महाबलीपुरम येथील समुद्रकिनाऱ्यावर मोदींनी कचरा वेचला होता. त्यावेळी देखील सोशल मीडियावर प्रतिक्रिया आल्या होत्या. त्याची देखील काही जणांनी आठवण काढली.

'पवारांचं कौतुक मग मोदींवर टीका कशासाठी?'

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तामिळनाडूच्या समुद्रकिनाऱ्यावर कचरा उचलणं हे नाटक वाटत होतं तर मग काल शरद पवार यांनी पावसात भिजणं हे नाटक का वाटत नाही अशा आशयाचे प्रश्न ट्विटरवर विचारले जात आहे.

सत्ता होती तेव्हा कामं केली असती तर आता पावसात उभं राहून भाषण द्यायची गरज पडली नसती, नौटंकी आहे. सतरंज्या उचलणारे कार्यकर्ते असताना एकालाही त्यांच्या डोक्यावर छत्री धरता आली नाही?

धंदा वाचवण्यासाठी चाललेली शेवटची धडपड आहे. एवढी वर्ष राजकारण केलं पण छत्री धरणारा एक कार्यकर्ता नाही मिळाला असंही म्हटलं आहे.

निवृत्ती घेऊन घरी आराम करावा कारण आता काहीही केलं तरी उपयोग नाही कारण मतदार राजा हुशार झाला आहे असा टोला काही नेटिझन्सनी लगावला आहे.

वॉटरप्रुफ मंडपात भाषण करणारा मुख्यमंत्री भर पावसात भाषण करणाऱ्या जखमी पवारांना कुस्तीचं आव्हान देतो अशी तुलना काहींनी केली आहे.

शरद पवार यांच्या पावसातल्या सभेतील फोटोला संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)