अजित पवार म्हणतात, 'माझ्या मनात जे येतं ते मी करतो, राजीनामा देणं असो की आणखी काही...' : विधानसभा निवडणूक

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्यावर बाळासाहेबांच्या अटकेवरून ताशेरे ओढले आहेत. तर भुजबळांनी अजित पवारांनी असं बोलायला नको होतं असा पवित्रा घेतला आहे.

तुम्ही ही भूमिका का घेतली?

``मला वाटतं म्हणून....'' असं आपल्या वागण्याचं कारण देत अजित पवार आपल्या प्रत्येक भूमिकेवर ठाम असल्याचं दिसतं आहेत.

बीबीसी मराठीला दिलेल्या मुलाखतीत मयुरेश कोण्णूर यांच्याशी बोलताना त्यांनी सत्ताधारी पक्षाचा निवडणुका प्रचार, भावनांचं वादळ, राजीनामा आणि छगन भुजबळ अशा अनेक गोष्टींवर चर्चा केली.

राजीनामा का दिला असं विचारलं असता पवार सांगतात, "राष्ट्रीय पातळींवरच्या पाच प्रमुख लोकांमध्ये शरद पवारांचा समावेश होतो. त्यांचा घोटाळ्याशी दुरान्वयानेही संबंध नव्हता. त्यांच्यासारख्या नेत्यावर ईडीची कारवाई करवायची हे गलिच्छ राजकारण आहे."

"घोटाळा झालाय हे सिद्ध करणारं एकतरी डॉक्युमेंट दाखवता येतंय का? मला हे सगळं अजिबात पटलं नाही म्हणून मी राजीनामा दिला. मला वाटतं तेच मी करतो. मी कुणाला विचारायला गेलो असतो, तर अर्थात कुणी मला त्याची परवानगी दिली नसती. मला वाटलं, पटलं म्हणून मी ते केलं. ईडीच्या कारवाईनंतर अजित पवारांनी राजीनामा दिला," त्याबद्दल ते बोलत होते.

राजीनामा दिला असला, माझी मतं वेगळी असली तरीही मी पक्षाच्या निर्णयानुसारच चालतो असंही अजित पवार म्हणाले. मी नाराज नाही आणि मी तसा वागतही नाही. लोकशाही आहे आपण आपली मतं मांडू शकतोच. पण म्हणून मी पक्षाच्या निर्णयाबाहेर कधीही गेलेलो नाही, असंही ते म्हणाले.

"तुम्ही तुमच्या भावनांना दोन दिवस दाबून ठेवायला हवं होतं, असं छगन भुजबळ बीबीसीला दिलेल्याच मुलाखतीत म्हणाले होते.

"भुजबळांनी त्यांचं मत मांडलं. मी माझं मांडतो. जितके व्यक्ती तितकी मतं असतात. प्रत्येकाला आपापल्यानुसार योग्य अयोग्य वाटत असतात. मी योग्य अयोग्य बघत नाही. माझ्या मनात एखादी गोष्ट आली की मी ती करतो. परिणाम बघायला आम्ही बसलेलो नाही. माझ्या सद्सदविवेकबुद्धिला जे वाटतं तेच मी करतो", असं पवार सांगत होते.

छगन भुजबळ आणि तुमच्यात काही मतमतांतरं आहेत का, या प्रश्नाचा त्यांनी साफ इन्कार केला. ते म्हणाले की, "माझं छगन भुजबळ काय, राष्ट्रवादीतल्या कुणाशीच वाद नाहीत, मतभेद नाहीत. मी पक्षाच्या निर्णयावर चालणारा माणूस आहे."

भुजबळ आणि पवार यांच्यातल्या मतमतांतरांच्या चर्चेचा निवडणुकीवर परिणाम होण्याची शक्यताही त्यांनी फेटाळून लावली आहे.

सत्ताधारी पक्षाच्या निवडणूक प्रचाराबाबतही ते सांगत होते, समोर विरोधी पक्ष नाही वगैरे सत्ताधारी पक्ष म्हणतो आहे. यांचा सध्याच्या मुख्यमंत्र्यांवर इतका विश्वास आहे. मग दर 15 दिवसांत 20 ठिकाणी सभा घ्यायला पंतप्रधानांना, अमित शाह यांना महाराष्ट्र आणि हरियाणात का जावं लागतंय? असा सवालही अजित पवारांनी उपस्थित केला.

'बाळासाहेबांबाबत वक्तव्य करणं अयोग्य'

तसंच सत्ताधारी पक्षात कुणीही असू दे परंतु त्यांनी चौकशीचा ससेमिरा लावून कुणाचंही खच्चीकरण करू नये, असं ठाम मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं. कुठल्याही सरकारच्या काळात एखाद्या जनतेची संस्था, बँक, इन्स्टिट्यूट असेल, त्यामध्ये चुका झाल्या असतील तर कायद्यानं चौकशी करण्याचा अधिकार असतो. पण वस्तुस्थिती समजून घेतली पाहिजे. चौकशा मागे लावून खच्चीकरण करणं हे अत्यंत खालच्या पातळीवरचं आणि गलिच्छ राजकारण असल्याचंही ते म्हणाले.

बाळासाहेबांच्या अटकेबद्दल अजित पवारांनी उत्तर द्यायला नको होतं, असं भुजबळ म्हणाले आहेत. त्यावर अजित पवार सांगत होते, की आम्ही त्यावेळेस अतिशय ज्युनिअर होतो. निर्णय प्रक्रियेत सगळ्यांचाच समावेश नसायचा. मी जे काही बोललो ते मला वाटलं म्हणून. माझं मत आहे ते. भुजबळांना जे वाटतं ते बोललेत.

शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरेंनी शरद पवारांच्या टीकेला उत्तर देताना स्वयंपाक करू पण पाणी अजित पवारांच्या धरणाचं नको असं वक्तव्य केलं होतं.

त्यावर, उद्धव ठाकरेंकडे बोलण्यासारखं काहीही उरलेलं नाही, म्हणून ते जुने मुद्दे उकरून काढत असल्याचं अजित पवारांनी म्हटलं आहे. हेच उद्धव ठाकरे म्हणाले होते, की आमची युती करून 25 वर्षं सडली. पण तेच आता त्यांच्या मांडीला मांडी लावून बसलेत.

उद्धव ठाकरेंच्या चिरंजीवांनी लुंगी घालून फोटो काढलेत. उद्धव यांचेच वडील सांगत होते की वाजवा पुंगी हटवा लुंगी... आता ते सगळं संपलंय वाटतं.

'त्यांच्याकडे दाखवण्यासाठी कामच नाही'

ते जुनी प्रकरणं उकरून काढतायंत, कारण त्यांच्याकडे पाच वर्षांत काय कारभार केलाय हे सांगायला काही नाही. पीकविमा मिळालेला नाही, कर्जमुक्ती झालेली नाही. हे पोरकट राजकारण असल्याची टीका अजित पवारांनी केली आहे. छत्रपतींचा भगवा ही काही कुणाची मक्तेदारी नाही. जातीपलिकडची भावना आहे ती. शिवसेना उगाच तो खांद्यावर घेतल्याचं भासवत होती. पण आम्ही वारकरी झेंडाही जपतो आणि भगवाही.

तसंच, 370च्या मुद्द्यावर मी सर्वांत आधी एकट्यानंच भूमिका मांडली होती, याचीही त्यांनी आठवण करून दिली. मला जी गोष्ट आवडली ती मी व्यक्त करतोच, असंही यावेळी त्यांनी पुन्हा स्पष्टपणे सांगितलं. परंतु लोकसभेतलं एकही वचन न पाळल्यानं आजचा तरुण वर्ग नाराज झाला आहे. त्यांचा विचार करायला हवा, अशी तरुणांची भूमिका अजित पवारांनी स्पष्ट केली.

राजकारण नको शेती करू या या ट्वीटबद्दल अजित पवारांना विचारलं असता, ते म्हणाले, की मी राजकारणात जे काही उन्हाळे पावसाळे पाहिले त्यानंतरचं माझं हे मत आहे. म्हणून बोललो. कारण सध्याचं राजकारण अत्यंत गलिच्छ पातळीवर सुरू आहे.

घरातली पुढची पिढी पार्थ पवार यांच्या राजकारणात असण्याबद्दलही ते म्हणाले, "त्याच्या सदसदविवेकबुद्धिला जे पटेल ते त्यानं करावं. राजाकरण सगळ्यांना जमणारं नाही. समाधान मिळत असेल तर नक्की करावं किंवा सरळ व्यवसाय करावा. असं माझं मत आहे. पण ते समोरच्यानं ऐकलंच पाहिजे असा माझा हट्ट नाही."

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)