कोल्हापूर सांगलीत पुरामुळे शेकडो जनावरांचा मृत्यू : 'दुभत्या जनावरांचा अंत कासावीस करणारा'

    • Author, स्वाती पाटील-राजगोळकर
    • Role, बीबीसी मराठीसाठी

कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात आलेल्या भीषण पूर परिस्थितीतून इथले लोक हळूहळू सावरत आहेत. पण 8 ते 10 दिवस पाण्यात बुडालेल्या या जिल्ह्यातलं चित्र आता अनेक आव्हानं दाखवणारं आहे.

पुराच्या पाण्यात अनेकांची घरं वाहून गेली. संसार चिखलात गेलेत. कोल्हापूर जिल्ह्यातल्या आंबेवाडी आणि प्रयाग चिखली या गावात अनेकांकडे दुभती जनावरं होती.

प्रयाग चिखलीचे अनिल पाटील आणि दादासो पाटील या भावांची चार जनावरं पुराच्या पाण्यात मृत पावली. तर चार जनावरांना ते वाचवू शकले.

रविवारी पुराचं पाणी वाढायला लागल्याने पाटील यांनी जनावरांना हलवण्यास सुरुवात केली. पण केवळ चार जनावरांना ते वाचवू शकले.

पाटील सांगतात, "प्रयाग चिखली गावात जवळपास 50 ते 55 जनावरं मृत्युमुखी पडली आहेत. दुभत्या जनावरांचा असा अंत कासावीस करणारा आहे."

आता जी जनावरं वाचली आहेत त्यांची देखभाल करण्यासाठी उपचार सुरू केले आहेत. आमच्या घरात 7 फूट पाणी भरलं होतं. गोबरगॅसच्या टाकीवर चढवून अशा अवस्थेत केवळ तोंड पाण्याबाहेर ठेवून ही जनावरं तग धरून होती. त्यामुळे म्हशींना ताप थकवा असे आजार झाले आहेत आता त्यांना योग्य औषधोपचार पुरवण्यासाठी स्वखर्चाने डॉक्टर बोलावला, असं पाटील पुढे सांगतात.

तर आंबेवाडीचे अनिल आंबी यांनी स्थानिक तरुणांसह गावातील बहूंतांश जनावरं उंच टेकडीवर नेऊन वाचवली, पण आता त्याच्यासमोर जनावरांच्या चाऱ्याचा मोठा प्रश्न आहे.

मृतदेहांची विल्हेवाट कशी लावणार?

जनावरांच्या मृतदेहांची विल्हेवाट लावणं हे मोठं जिकिरीचं आणि तितकंच तातडीने करणं गरजेचं आहे. कारण पाण्यात मृत पावलेली जनावरं वेगाने सडायला लागतात. यामुळे जनावरांच्या शरीरातून मोठ्या प्रमाणात जंतुसंसर्ग होतो. परिणामी वेगवेगळे आजार पसरण्याची शक्यता असते. या मृतदेहांची विल्हेवाट लावण्यासाठी मोठी मोहीम राबवणं गरजेचं आहे.

आंबेवाडी आणि प्रयाग चिखली या दोन्ही गावांमध्ये पाण्यातून वाहून आलेली मृत जनावरं मुख्य रस्त्यांवर पडून आहेत.

या मृतदेहांची विल्हेवाट लावण्यासाठी पशुसंवर्धन विभागाकडून चिखली गावात सकाळपासून काम सुरू केल्याचं जिल्हाधिकारी डॉ. दौलत देसाई यांनी सांगितलं.

"मृत जनावरांच्या देहाची विल्हेवाट लावण्यासाठी आंबेवाडी आणि प्रयाग चिखली या गावांमध्ये शास्त्रीय पद्धतीने काम सुरू आहे. हे मृतदेह ज्या ठिकाणी जमीन उपलब्ध आहे त्या ठिकाणी नेऊन पुरले जाणार आहेत."

यासाठी जेसीबी ने खड्डे खणले जात आहेत. तर मृतदेह नेताना पाण्यात पडू नये याचीही विशेष काळजी घेतली जात आहे. मृतदेहांची विल्हेवाट लावण्यासाठी carbolic ऍसिड चा वापर करण्यात येत असल्याची माहिती डॉ देसाई यांनी दिली.

जिल्ह्यात ठिकठिकाणी पाणी ओसरल्यावर प्रशासनाकडून काम केलं जाईल, असंही देसाई यांनी सांगितलं.

सांगली जिल्ह्यातल्या मिरजमध्ये एका एनजीओकडून या बाबत पुढाकार घेण्यात आला आहे. रुग्ण सेवा प्रकल्प नावाची ही संस्था 28 वर्षं झाली काम करतेय. पुराच्या पाण्यात वाहून आलेल्या जनावरांना पुरण्याचं मोठं आव्हान या संस्थेने स्वीकारलं आहे.

जिल्हा प्रशासनाने त्यांना एक जेसीबी आणि ट्रॅक्टर उपलब्ध करून दिले आहेत. सध्या या संस्थेचे राजीव नागेशकर आणि ओंकार गोसावी यांच्या 12 जणांच्या पथकाने पलूस तालुक्यात काम सुरू केल्याची माहिती संस्थेचे सचिव डॉक्टर भालचंद्र साठे यांनी दिली.

मेलेली जनावरं त्या त्या ठिकाणी खड्डे खणून पुरली जाणार आहेत. यासाठी मोठ्या प्रमाणात मिठाचा वापर करण्यात येणार आहे. खड्डयात मीठ घालून त्यावर मृतदेह ठेवून पुन्हा मीठ घालून खड्डे बुजवण्यात येणार आहेत.

मिठामुळे कुजण्याची प्रक्रिया वेगाने होते, तसंच दुर्गंधी येत नाही. शिवाय मोकाट कुत्री असे मृतदेह जमिनीतून शोधून काढू शकत नाहीत. यासाठी लागणारं मीठ जनावरांच्या मालकाकडून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मिठाचा वापर करून विल्हेवाट लावणं ही पारंपरिक पद्धत असल्याचं डॉ. साठे यांनी सांगितलं.

दरम्यान, या भागात रोगराई पसरू नये म्हणून रूग्ण सेवा प्रकल्प मिरज आणि थिसेनकृप इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेडनंसुद्धा त्यांच्या परिनं काम हाती घेतलं आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)