सांगली पाऊस: ब्रह्मनाळ दुर्घटनेतून बचावलेल्या यल्लवा सांगतात एका टायरच्या ट्यूबनं आम्हा पाच जणांना वाचवलं

    • Author, हलिमा कुरेशी
    • Role, बीबीसी मराठीसाठी

"आपण आता बुडालो, वाचणार नाही असं वाटलं. पण टायरची ट्यूब हाती आली म्हणून मी वाचले. माझ्यासमोर लोकं वाचवा-वाचवा म्हणून बुडाली. अजूनही अंग थरथरतंय" हे शब्द आहेत ब्रह्मनाळच्या बोट दुर्घटनेतून वाचलेल्या यल्लव्वा मारुती चुंग यांचे.

सांगली जिल्ह्यातील ब्रह्मनाळ गावाजवळ पुराच्या पाण्यात बोट उलटून झालेल्या दुर्घटनेत नऊ जणांचा मृत्यू झाला. यल्लव्वा चुंग याच बोटीत होत्या. ट्यूबचा आधार मिळाल्यानं त्या वाचल्या.

मूळच्या कर्नाटकमधील असलेल्या यल्लव्वा शेतमजुरी करण्यासाठी कर्नाटकातून सांगली जिल्ह्यात आलेल्या आहेत. ब्रह्मनाळपासून जवळच असलेल्या पाटील मळ्यात शेतमजुरी करतात. गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर आणि पुरामुळे त्या मळ्यात न जाता गावातच थांबून होत्या.

त्या दुर्दैवी दिवसाबद्दल यल्लव्वा सांगतात, "तीन दिवसांपासून अख्ख्या गावाला पुराचा वेढा पडला होता. सोमवारी आमच्या घरात पुराचं पाणी शिरलं म्हणून मग आम्ही घराच्या मागच्या गच्चीत गेलो. गावातले सगळे जण बाहेर पडण्यासाठी धडपडत होतो."

"सोमवारी सकाळी बोट लागली. पटापट लोकं त्यात चढली. जवळपास 30-35 लोकं त्या बोटीत चढली. बोट चालवणारे म्हणत होते इतके लोकं नका चढू. पण कोणी उतरायला तयार नव्हते. कारण लोकं तीन दिवसांपासून वाट पाहत होते आणि प्रत्येकाला बाहेर पडायचं होतं. मग तशीच बोट निघाली. पुढच्या भागात जास्त लोकं बसली होती. बोट थोडीशी पुढं गेली आणि एकदम पलटली."

"बोट जशी पलटली तसा वाचवा-वाचवा, बुडालो-बुडालो असं प्रत्येक जण ओरडू लागला. पण कोण कोणाला वाचवणार? प्रत्येक जण आपल्याला कुठला आधार मिळतोय का ते पाहायला लागला. मला तर पोहायलाही येत नाही. दोन - तीन गटांगळ्या मी खाल्ल्या. आता आपण गेलो असंच वाटलं. पण तेवढ्यात माझ्या हातात टायरची ट्यूब आली. मी आणि माझ्या घरातल्या माणसांनी ट्यूब धरून ठेवली. आम्ही पाच लोकं एक ट्यूबच्या मदतीनं एका झाडाजवळ पोहचलो. झाडाचा बुंधा मोठा होता म्हणून तो पकडून ठेवला. थोड्या वेळानं लोकं आली आणि त्यांनी पुरातून आमची सुटका केली."

ज्यांना पोहता येत होतं आणि ज्यांना आमच्यासारख्या ट्यूबचा आधार मिळाला ती लोकं वाचली, पण ज्यांना पोहता येत नाही ती वाचू शकली नाहीत असं यल्ल्व्वा सांगतात.

घटना घडून 24 तास उलटून गेले आहेत पण अजूनही यल्लव्वा धक्क्यातून सावरू शकलेल्या नाहीत. त्या सांगतात, "अजूनही अंग थरथरतंय, भीती वाटल्यासारखं वाटतंय. झोपेत असताना एकदम दचकल्यासारखं वाटून जाग येतेय."

यल्लवा त्यांच्या आई, त्यांची भावजय, भाचा आणि भावजयीचे आजोबा बोटीच्या अपघातातून बचावले. घटनेनंतर ही मंडळी काही वेळ माळेवाडी गावात थांबली आणि आता सगळे जण कर्नाटकमध्ये आपल्या गावी गेले आहेत. बोट बुडून ज्या नऊ लोकांचा मृत्यू झाला त्यातील काही जण यल्लव्वा यांचे दूरचे नातेवाईक होते.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)