ब्रह्मनाळ दुर्घटनेतील मृतांची संख्या 16 वर

    • Author, हलिमाबी कुरेशी
    • Role, बीबीसी मराठीसाठी, ब्रह्मनाळहून

सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातल्या ब्रह्मनाळमधील गावकरी पुरातून सुटका करण्यासाठी बोटीनं जात असताना ही बोट उलटली आतापर्यंत 16 लोकांचा यामध्ये मृत्यू झालेला आहे.

कालपर्यंत या दुर्घटनेतील 12 जणांचे मृतदेह सापडले होते. आज सकाळपासून चार मृतदेह सापडले आहेत. त्यामध्ये एका लहान मुलाचा आणि एका युवतीचा समावेश आहे. ब्रह्मनाळ येथील संदीप राजोबा यांनी मृतांची संख्या आणकी वाढण्याची भीती व्यक्त केली आहे.

सांगली जिल्ह्यातल्या ऊस पट्ट्यामधल्या ब्रह्मनाळ गावाजवळ कृष्णा आणि येरळा या दोन नद्यांचा संगम होतो. त्यामुळे पुराचा धोका या गावाला होताच. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गावकरी हवालदिल झालेले होते.

गुरुवारी सकाळपर्यंत गाव पुराच्या पाण्याने वेढले गेले. त्यातूनच ग्रामपंचायतीच्या बोटीतून बाहेर पडण्याचा निर्णय झाला. सकाळी नऊच्या सुमारास 30 जणांना घेऊन ही बोट निघाली होती. त्यानंतर बोटीतील 16 जणांचा मृत्यू झाला आहे.

ब्रह्मनाळ गावातील नागरिक आणि स्वाभिमानी संघनेचे कार्यकर्ते संदीप राजोबा यांनी याबाबत सांगितले की, "गेले तीन दिवस गावचे सरपंच आणि पोलीस पाटील प्रशासनाकडे बोटी मागत होते. पण त्यांनी आम्हाला बोटी दिल्या नाहीत. त्यांनी आम्हाला सांगितले की तुमचे गाव बॅकवॉटर्समध्ये येते त्यामुळे तुम्हाला बोटी देऊ शकत नाहीत."

ते पुढे म्हणतात, "आज आणि काल अशी भयानक परिस्थिती निर्माण झाली की संपूर्ण ब्रह्मनाळ गावात पाणी शिरले आहे. त्यामुळे लोकांना राहायचे की मरायचे असा प्रश्न निर्माण झाला होता. ज्या बोटीतून लोकं निघाली होती, त्या बोटीची क्षमता 18 लोकांची आहे आणि जवळपास 30 लोक निघाले होते. त्यानंतर ही घटना घडली."

दुर्घटना घडल्यानंतरही प्रशासनाची मदत मिळाली नसल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. संदीप राजोबा पुढे म्हणाले की, "आम्हाला प्रशासनाची कुठलीही मदत मिळाली नाही. आमच्या गावच्या सरपंचांनी बोटी मागितल्या तेव्हा आम्ही बोटी देऊ शकत नाही असं सांगितलं. आपत्तीनंतरही प्रशासनानं कोणतीही मदत वेळेत दिली नाही. घटना घडून अडीच तास झाले तरी प्रशासनाकडून कोणीही या गावात पोहचलेलं नाही. प्रशासनाची वेळेत मदत पोहचली नाही आणि शेजारच्या गावातील लोकं आमच्या मदतीला पोहचली."

मुख्यमंत्र्यांनी काय दिले उत्तर?

गावकऱ्यांनी प्रशासनावर केलेल्या आरोपाबाबत बीबीसी मराठीच्या वतीने स्वाती पाटील-राजगोळकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला. त्यावर मुख्यमंत्र्यांनी उत्तर देताना म्हटले की, "त्याठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन सुरुच होते. काही गावं पहिली येतात आणि काही नंतर येतात. या गावात ग्रामपंचायतीची स्वत:ची बोट होती आणि त्यांनी ती बोट काढली. बोटीत क्षमतेपेक्षा जास्त लोकं बसली. तरीही ती बोट निघाली.

पुढे ते म्हणाले, "पण जी काही प्राथमिक माहिती आहे त्यानुसार बोटीत फांदी फसल्यानं तोल गेला आणि बोट उलटली. लोकांना पुरातून बाहेर काढण्यासाठी जो प्राधान्यक्रम ठरवला आहे, त्यामध्ये पहिले प्राधान्य ज्या गावांमध्ये लोकांना इमारतींच्या छतावर आसरा घ्यावा लागला आहे त्यांना आहे. त्यामध्येही महिला, मुलं आणि आजारी व्यक्तींची सुटका करणे याला प्राधान्य आहे. त्यानंतर इतरांना प्राधान्य दिले जात आहे."

विरोधकांची सरकारवर टीका

दरम्यान ब्रह्मनाळमधील या दुर्घटनेवरून विरोधी पक्षानेही सरकारला धारेवर धरले असून बोट उलटून गेलेले बळी हे प्रशासकीय बेपर्वाईचे बळी असल्याचं म्हटलंय.

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटलंय की, "प्रशासनाने हात वर केल्यामुळे गावकऱ्यांना नाईलाजास्तव ग्रामपंचायतची गळकी बोट वापरावी लागली व हा अपघात घडला. प्रशासनाने वेळीच बोट पुरवली असती किंवा ग्रामपंचायतची बोट वापण्यासाठी प्रशिक्षित कर्मचारी पाठवले निरपराध नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले नसते. त्यामुळे सरकारला या अपघाताची जबाबदारी नाकारता येणार नाही."

"एक तर राज्य सरकारने पुरेशी उपाययोजना केली नाही. आवश्यक तेवढ्या बोटी जिल्हा प्रशासनाला उपलब्ध करून दिल्या नाहीत. शिवाय प्रशासकीय अधिकाऱ्यांनी बेपर्वाई केल्याने हा अपघात झाला असून, सरकारने याची नैतिक जबाबदारी स्वीकारली पाहिजे, असे अशोक चव्हाण यांनी म्हटलंय.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)