योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल ट्वीट करणाऱ्या पत्रकाराची तातडीने सुटका करा- सुप्रीम कोर्ट

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल आक्षेपार्ह ट्वीट केल्याप्रकरणी अटकेत असलेले पत्रकार प्रशांत कनौजिया यांची तातडीने सुटका करण्याचा आदेश सुप्रीम कोर्टाने दिला आहे.

प्रशांत यांची सुटका करून उत्तर प्रदेश सरकारने मनाचा मोठेपणा दाखवावा, असं न्यायमूर्ती अजय रस्तोगी आणि इंदिरा बॅनर्जी यांच्या खंडपीठानं म्हटलं.

व्यक्तिस्वातंत्र्य हे अतिशय पवित्र असून त्याबाबतीत कोणतीही तडजोड केली जाऊ शकत नाही. घटनेनं प्रत्येकाला हा अधिकार दिला आहे आणि त्यावर अतिक्रमण केलं जाऊ नये, असं न्यायमूर्ती इंदिरा बॅनर्जींनी स्पष्ट केलं.

प्रशांत यांच्या सोशल मीडियावरील पोस्ट्स अतिशय प्रक्षोभक असल्याचा युक्तिवाद उत्तर प्रदेश सरकारच्या वकिलांनी प्रशांत यांच्या अटकेचं समर्थन करताना केला. प्रशांत यांनी असे ट्वीट करायला नको होतं, हे मान्य. पण त्यासाठी थेट अटकेची कारवाई का? असा प्रश्न इंदिरा बॅनर्जींनी उपस्थित केला.

प्रशांत यांच्या अटकेविरोधात हायकोर्टात का दाद मागितली नाही, असा प्रश्न इंदिरा बॅनर्जींनी जिगीषा अरोरा (प्रशांत यांची पत्नी) यांना केला होता.

या प्रश्नाला उत्तर देताना जिगीषा यांनी हे हेबियस कॉपर्सचं प्रकरण असल्याचं म्हटलं. त्यामुळेच आपण थेट सुप्रीम कोर्टात धाव घेतल्याचं त्यांनी सांगितलं.

काय आहे हे प्रकरण?

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह टिप्पणी केल्याबद्दल उत्तर प्रदेश पोलिसांनी प्रशांत कनौजिया या पत्रकाराला अटक केली होती. शनिवारी (8 जून) त्यांना दिल्लीमधल्या घरात अटक करून लखनौला नेण्यात आलं.

प्रशांतची पत्नी जिगीषा अरोरा यांनी बीबीसीला सांगितलं, की प्रशांतने ट्विटरवर एक व्हीडिओ अपलोड केला होता. त्यात एक महिला स्वतःला योगी आदित्यनाथांची प्रेयसी म्हणवत होती. या व्हीडिओबरोबर योगींचा उल्लेख करून त्यांनी टिप्पणीही केली होती.

या प्रकरणी लखनौमधील हजरतगंजमधील एका पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदवण्यात आला. प्रशांत यांच्याविरोधात आयटी कायद्याच्या कलम 66 आणि आयपीसीच्या कलम 500 नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

प्रशांत कनौजिया यांनी योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात आक्षेपार्ह ट्वीट करून त्यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप प्रशांत यांच्यावर या एफआयआरमध्ये ठेवण्यात आला. एफआयआरनुसार, पोलिसांना शुक्रवारी दुपारी 12.07 वाजता याची माहिती मिळाली. तक्रारदाराचे नाव विकास कुमार आहे. ते हजरतगंज ठाण्यात पोलीस निरीक्षक आहेत.

तक्रार करण्याचं कारण त्यांना विचारल्यावर म्हटल्यावर ते म्हणाले, त्यांनी आमच्या मुख्यमंत्र्यांविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. त्यासाठी मी तक्रार केली. यापुढील माहिती तुम्ही एसएचओ साहेबांकडून घ्या. प्रशांत द वायरमध्ये कार्यरत होते. आता ते मुक्त पत्रकार आहेत.

दरम्यान, सोमवारी (10 जून) 'एडिटर्स गिल्ड ऑफ इंडिया'नं प्रशांत कनौजिया यांच्या अटकेचा निषेध करणारं एक पत्रक प्रसिद्ध केलं. कनौजियांविरोधात करण्यात आलेली कारवाई ही कायद्याचा दुरूपयोग असून अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालण्याचा प्रयत्न असल्याची टीका 'एडिटर्स गिल्ड ऑफ इंडिया'नं या पत्रकाद्वारे केली.

प्रशांत यांना अटक केल्याबद्दल समाजवादी पार्टीनंही टीका केली होती. कायदा सुव्यवस्थेच्या विषयात नापास झालेले सरकार आपला राग पत्रकारांवर काढत असल्याचं समाजवादी पक्षानं म्हटलं होतं.

'हे प्रकरण आमच्या अधिकार क्षेत्रात येत नाही'

जेव्हा लखनौच्या हजरतगंजच्या पोलीस ठाण्याचे प्रमुख राधारमण सिंह यांना याबाबत विचारणा केली असता ते म्हणाले हे प्रकरण आमच्या अधिकार क्षेत्रात येत नाही.

हजरतगंजच्या पोलीस स्टेशनहून प्रशांत कनौजिया यांना अटक करण्यासाठी टीम गेली होती का असं विचारलं असता सिंह यांनी सांगितलं की याबाबत मला काही माहिती नाही.

प्रशांतचे माजी सहकारी अमित सिंह यांनी सांगितलं की शनिवारी त्यांच्याकडे एका अनोळखी व्यक्तीचा फोन आला आणि त्याने प्रशांतचा पत्ता मागवला.

त्या व्यक्तीने सांगितलं की, तो प्रशांतचा मित्र आहे. मी त्याला पत्ता दिला नाही पण प्रशांतचा नंबर दिला. त्यानंतर प्रशांतचा मला मेसेज आला की माझ्या पत्नीशी बोलून घे. नंतर मला कळलं की दोन लोक साध्या वेशात आले आणि प्रशांतला सोबत घेऊन गेले.

"प्रशांतला अशा ट्वीटसाठी अटक करण्यात आली आहे. जे ट्वीट हजारो लोकांनी शेअर केलं आहे. ते ट्वीट गमतीशीर होतं. या व्यतिरिक्त मी आणखी काय सांगू?" अशी प्रतिक्रिया प्रशांत यांच्या पत्नी जिगीषा अरोरा यांनी या कारवाईनंतर व्यक्त केली होती.

या प्रकरणी पोलिसांनी टीव्ही न्यूज चॅनेलच्या संपादकांना अटक केली आहे. प्रकरणाची चौकशी न करता मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची बातमी प्रसारित केली असा आरोप त्यांच्यावर आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)