'नयनतारा सहगल यांचे विचार आयोजकांना आधी माहीत नव्हते काय?'

    • Author, ओंकार करंबेळकर, जान्हवी मुळे
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

नयनतारा सहगल यांना यवतमाळमध्ये होणाऱ्या 92व्या साहित्य संमेलनाच्या उद्घाटनासाठी आमंत्रित करण्यात आलं होतं. मात्र नंतर त्यांना "काही अपरिहार्य कारणांमुळे संमेलनास उपस्थित राहू नये," असं आयोजकांकडून रविवारी कळवण्यात आलं.

त्यानंतर अनेक साहित्यिकांनी, विशेषत: नव्या पिढीच्या लेखक आणि कवींनी घडल्या प्रकाराच्या पार्श्वभूमीवर संमेलनावर बहिष्कार टाकण्याची भूमिका घेतली आहे. आसाराम लोमटे, आशुतोष जावडेकर, संजय आवटे, श्रीकांत बोजेवार, दिशा पिंकी शेख, बालाजी सुतार, नामदेव कोळी यांचा त्यात समावेश आहे.

ग्रामीण वास्तवाचं चित्रण करणारे साहित्य अकादमी विजेते कथालेखक आसाराम लोमटे यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत संमेलनातून माघार घेतली आहे. लोमटे हे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे सदस्यही आहेत.

"झुंडशाहीच्या दबावाखाली येऊन केलेली ही कृती उद्वेगजनक, संतापजनक आणि निषेधार्हच आहे. एका ज्येष्ठ लेखिकचा उपमर्द होत असताना अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळानं कणखर आणि रोखठोक भूमिका घ्यावी, हे संमेलनच रद्द करून टाकावे अशी माझी भूमिका आहे."

नयनतारा सहगल यांचं संमेलनात होणारं भाषण बीबीसी मराठीवर प्रसिद्ध करण्यात आलं, जे तुम्ही पूर्ण इथे वाचू शकता. या भाषणात त्यांनी व्यक्त केलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याबाबतच्या मतांवर चर्चा सुरू झाली आहे.

त्या संदर्भात बीबीसी मराठीने साहित्य, कला क्षेत्रातील साहित्यिकांची मतं जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

नयनतारांचं भाषण सिद्ध करण्याचेच प्रयत्न - ज्येष्ठ साहित्यिक किरण नगरकर

नयनतारा सहगल यांच्या भाषणामध्ये त्यांनी ज्या संयत शब्दांमध्ये काळजी व्यक्त केली आहे, ती भीती काही संघटना सिद्ध करून दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. नयनतारा यांची मतं ही आपल्या सर्वांना पटण्यासारखीच आहेत. त्यांचं हे भाषण नेहमीसारखं सुलभ आणि संयत शब्दांमध्ये आहे. बोलताना, मुद्दा मांडताना कधीही त्यांचा तोल जात नाही.

आगरकर, आंबेडकर याच मातीमध्ये जन्मले, त्यांचे विचार येथेच वाढले तर आपण त्यांना विसरूच कसे शकतो, याबद्दल महाराष्ट्रातील लोकांनी विचार केला पाहिजे. आपला वारसा सर्वव्यापी, सर्वसमावेशक आहे, 'हे विश्वची माझे घर' असा आहे, हे सहगल यांनी आपल्या भाषणातून सांगितलं आहे.

नयनताराजींचे वडील मराठी होते, त्यांनी कारागृहात ग्रंथ अनुवादित केलं होतं. त्याचीही आठवण सहगल यांनी करून दिली आहे. त्यामुळे आपण मराठी माणसांनी विचार करण्याची ही वेळ आहे.

नयनतारांनी आपल्यासमोर आरसाच धरला - कवयित्री प्रज्ञा दया पवार

नयनतारा सहगल यांनी आपल्यासमोर आरसाच धरला आहे. ज्या प्रकारच्या शासनपुरस्कृत हिंसेची उदाहरणं त्यांनी दिली आहेत, ती आपल्या बहुआयामी संस्कृती असलेल्या भारतपणाच्या संकल्पनेला तडा कसा जात आहे, हे दाखवणारी आहेत.

सध्या सर्वसमावेशक मूल्यांना नख लावण्याचा प्रयत्न सुरू आहे. विद्यापीठांमध्ये, म्हणजे जिथे युवकांच्या इच्छाशक्तीला धुमारे फुटावेत अशी अपेक्षा असते, तिथे पोलिसी खाक्याचे खुजे तंत्रज्ञ तयार व्हावेत, यासाठी प्रयत्न सुरू आहेत, याचा दाखला सहगल यांनी भाषणात दिला आहे.

त्यांचे शब्द संयत आणि विवेकी भूमिका मांडणारे आहेत. माझ्या मते त्यांचं लेखन आपण कुठे उभे राहोत, हे दाखवत असतं. नयनतारांबरोबर अनेक लेखक उभे राहात आहेत, हे चांगलं चित्र वाटतं. सकारात्मक दबावतंत्राचा वापर करून अभिव्यक्ती सुदृढ करणं हाच या भाषणातून बोध घेतला पाहिजे.

साहित्यिकांचा बहिष्कार

तृतीयपंथी कवयित्री दिशा पिंकी शेख यांनी फेसबुक पोस्टद्वारा आपण संमेलनावर बहिष्कार टाकत असल्याचं जाहीर केलं आहे.

"एक तर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आमचं नाहीच हे माहित असताना मी अ.भा. मराठी साहित्य संमेलनाचे आमंत्रण स्वीकारलं होत. वाटलं काही नाही तर किमान समुदायाच्या प्रश्नांना मांडता येईल.

"पण नयनतारा सेहगल यांना आमंत्रण देऊन परत त्यांना येऊ नये म्हणून सांगणे, मला वाटत हा प्रत्येक लिहित्या हाताचा अपमान आहे. म्हणून मी ह्या साहित्य संमेलनाच्या बहिष्कार करते आणि मराठी साहित्य संमेलन संयोजकांचा निषेध नोंदवते" असं दिशा यांनी लिहिलं आहे.

तर कवी नामदेव कोळी यांनी "माझ्या कोणत्याही मंचावरील सहभागाने खरं तर काहीच फरक पडणार नाही. पण ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांचा निमंत्रण नाकारून जो अपमान केलाय, त्याचा निषेध म्हणून मी या संमेलनाचा बहिष्कार करतो." अशा शब्दांत आपली भूमिका मांडली आहे.

समकालीन मराठी कवितेत योगदान देणारे कवी म्हणून ज्यांचा अनेकदा उल्लेख केला जातो, त्या नामदेव कोळी यांना यंदा पहिल्यांदाच कविता वाचनासाठी निमंत्रण मिळालं होतं.

'नयनतारा यांचे विचार आधीपासूनच जगजाहीर'

ज्येष्ठ पत्रकार श्रीकांत बोजेवार साहित्य संमेलनातील एका परिसंवादात सहभागी होणार होते. पण आता त्यांनी आपला निर्णय बदलत निषेध व्यक्त केला आहे.

"नयनतारा सहगल यांचे विचार काय आहेत, त्यांची भूमिका काय आहे हे काही लपून राहिलेलं नाही. आयोजकांना ते आधीपासून माहिती होतं. त्यांनी भाषणात मांडलेले मुद्दे काही पहिल्यांदा मांडलेले नाहीत. त्यामुळं त्यांना जेव्हा पाहुणे म्हणून बोलावलं, तेव्हाच विचार करायला हवा होता की त्यांचे जे विचार आहेत ते आपल्या व्यासपीठावरून मांडलेले आपल्याला रुचतील की नाही. एकदा त्यांना बोलावल्यावर असा अपमान करणं चुकीचं होतं." असं मत बोजेवार यांनी बीबीसी मराठीशी बोलताना मांडलं आहे.

"नयनतारा यांनी भाषणात काय विचार मांडले, ते योग्य आहेत की अयोग्य हा वेगळा मुद्दा झाला. पण तुम्ही त्यांना बोलावलंत तर त्यांच्या मताचा आदर करायला हवा होता. हे महाराष्ट्रासाठी लांछनास्पद आहे. हा साहित्य महोत्सव आहे आणि आयोजकच जर अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करणार असेल तर तुम्हाला हा उत्सव करण्याचा अधिकारच नाही. त्या संमेलनाला काही अर्थच राहात नाही. अशा संमेलनाच्या व्यासपीठावर जाऊन बोलणं मला प्रशस्त वाटलं नाही." असंही बोजेवार म्हणाले.

संयोजकांनी विचार केला आणि सहगल यांना सन्मानपूर्वक उपस्थित राहण्याची विनंती केली आणि त्या जर आल्यास आपण व्यासपीठावर जायला तयार असल्याचं बोजेवार सांगतात.

लेखक आशुतोष जावडेकर यांनाही हा मार्ग निघू शकतो असं वाटतं. "तसं झालं तर संमेलन सुरळीत पार पडेल आणि निदान नवोदितांवर, साहित्यप्रेमींवर, छोट्या प्रकाशकांवर अन्याय होणार नाही. अर्थात हे होण्याची शक्यता इतकी धूसर आहे! त्यामुळे संमेलनात सहभागी न होणं हे आपल्या हाती राहतं आणि ते मी करतोय!" असं फेसबुकवरून जाहीर केलं आहे.

प्रकाशकांचा बहिष्कार

साहित्य संमेलनात केवळ लेखक आणि कवींची मैफल जमत नाही, तर त्यानिमित्तानं पुस्तकांची विक्रीही मोठ्या प्रमाणात होते. पण शब्द प्रकाशननं आर्थिक नुकसानाचा विचार न करता साहित्य संमेलनावर बहिष्कार टाकत असल्याचं जाहीर केलं आहे. 'शब्द'चे येशू पाटील सांगतात, "आम्ही वेळोवेळी, संमेलनातही वेगवेगळ्या मुद्द्यांवर भूमिका घेत आलो आहोत आणि आमच्या मुक्तशब्द मासिकातून ती मांडतही आलो आहोत. काही नुकसान होईल याची आम्ही पर्वा केलेली नाही आणि भूमिकेशी तडजोड केलेली नाही. नयनतारा यांचा अपमान झाला आहे आणि त्यांनी आता या व्यासपीठावर येऊ नये."

नयनतारा यांना मुंबई किंवा पुण्याला बोलावून पर्यायी संमेलन नाही, पण त्यांची भाषण सभा आयोजित करण्याचा प्रयत्न असल्याचंही येशू पाटील सांगतात.

"ही फारच वाईट गोष्ट आहे, मराठीचीही त्यामुळं नालस्ती झाली. नयनतारा यांना बोलावलं नसतं तरी ठीक होतं, पण बोलावून नंतर येऊ नका असं सांगणं चुकीचं आहे. एका लेखकाचा, पाहुण्यांचा मान राखला जात नाही, तर बाकीच्यांनीही का जावं? साहित्य संमेलनामुळे मराठी साहित्यात काही भर पडली नाही. मोठ्या संमेलनाऐवजी छोटी संमेलने, अनियतकालिकांना प्रोत्साहन,आंतरभाषिक संमेलने,अनुवाद, पुस्तकांची यात्रा अशी कामे व्हायला हवीत." असं मत कवी प्रकाशक हेमंत दिवटे यांनी मांडलं आहे.

भाषणामध्ये 'स्वातंत्र्य'मूल्यावरच भर - लेखक गणेश विसपुते

या भाषणामध्ये स्वातंत्र्य या महत्त्वाच्या मुद्दयावर भर आहे. नयनतारा यांचं आयुष्य अत्यंत खडतर परिस्थितीमध्ये गेलं आहे. त्यांच्या आईवडिलांना वारंवार कारावास भोगावा लागला.

कारावासात त्यांचे वडील र. सी. पंडित अत्यंत गलितगात्र अवस्थेत पोहोचले, तेव्हा त्यांनी अत्यंत धीराने पत्नी विजयालक्ष्मी (नयनतारा यांची आई) यांना पत्र लिहून, 'मी मेल्यावर लोक तुझ्या सांत्वनासाठी येतील. पण मी माझ्या धीरोदात्त पत्नीची कीव करणार नाही. या दुःखावर मात करण्यासाठी बळ तुला तुझ्या अंतरंगातूनच मिळालं पाहिजे' असं लिहिलं होतं.

र. सी. पंडित यांच्या पत्रावरून त्या किती धीट आणि स्वातंत्र्य या एकमेव मूल्यासाठी झटणाऱ्या कुटुंबातील आहेत, हे समजतं. लहान वयातच या मूल्याचं महत्त्व जाणलं होतं, हे त्यांच्या या भाषणातून समजतं.

अभिव्यक्ती स्वातंत्र्याविरोधात घडणाऱ्या घटनांवर त्यांनी नेहमीच आवाज उठवला आहे. एमिल झोलानं फ्रान्समध्ये सरकारविरोधात 'I Accuse' नावाने पत्र लिहिलं होतं. तेव्हा तिथल्या समाजातील वकील, शिक्षक, विद्यार्थी, बुद्धिजीवी पेटून उठले होते आणि सरकारला नमतं घ्यावं लागलं होतं.

बुद्धिजीवींमध्ये लेखकांनी बोलणं आधी अपेक्षित आहे. नयनतारा यांनी बोलून साहित्यिकांची लाज राखली, असं मला वाटतं. 'माणुसकीच्या शेपटावर पाय पडतो तेव्हा चवताळून उठणारे कवीच असतात' असं मनोहर ओकांनी म्हटलं होतं. ते मला पटतं.

राजकीय अजेंडा बाजूला ठेवून या भाषणाकडे पाहावे - लेखिका, ब्लॉगर सानिया भालेराव

कधी व्यक्त व्हावं, कुणी व्हावं, याचे काही नियम नसतात. त्यावर बंधनं आली तर ती अभिव्यक्ती कसली? लेखकानं राजकीय स्थितीबाबत बोलू नये, असंही विनाकारण मत आहे. पण त्याला काहीच अर्थ नाही. लेखकाने जे आहे ते बोलावं.

नयनतारांचं भाषण राजकीय अजेंडा बाजूला ठेवून ऐकण्याची गरज आहे. सध्याच्या स्थितीत नयनतारांनी व्यक्त केलेल्या भावना महत्त्वाच्या वाटतात.

(या लेखातील मतं साहित्यिकांची वैयक्तिक मतं आहेत.)

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)