You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
IAF AN-32: भारतीय वायुसेनेचं शक्तिशाली मालवाहू विमान कुठे बेपत्ता झालं?
- Author, जुगल पुरोहित
- Role, बीबीसी प्रतिनिधी
सोमवार 3 जून रोजी दुपारी 12.27 ची वेळ. आसाममधल्या जोरहाट विमानतळावरून भारतीय वायुदलाच्या AN-32 मालवाहू विमानाने झेप घेतली. पण दुपारी 1 वाजता विमानाचा एअर ट्रॅफिक कंट्रोलशी संपर्क तुटला आणि तेव्हापासून या विमानाचा आणि त्यात असलेल्या हवाई दलाच्या 13 कर्मचाऱ्यांचा कुणालाच पत्ता नाही.
भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोदेखील जोरहाट आणि अरुणाचल प्रदेशच्या मेचुका या भागात बेपत्ता झालेल्या विमानाचा शोध घेते आहे. त्याशिवाय सुखोई 30 MKI, MI17, चिता आणि अत्याधुनिक हेलिकॉप्टर, तसंच C130J सारखी लढाऊ विमानं आणि AN32चं एक मोठं पथक शोधमोहिमेच्या कामी लागलेत.
एवढी सगळी यंत्रणी कामाला लागली असूनही सहा दिवस उलटून गेल्यामुळे हा शोध आता आशा आणि भीती यादरम्यान हिंदोळे घेतोय. आता तर वायुदलाने या विमानाची खात्रीलायक माहिती पुरवणाऱ्याला 5 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं आहे.
शोधमोहिमेच्या सुरुवातीला भारतीय नौदलाची हंटिंग पोसाइडन 8I पाणबुडी, भारतीय सैन्याचे ड्रोन (मानवरहित हवाई वाहन - Unmanned ariel vehicle UAV), इतकंच नाही तर कार्टोसॅटपासून ते रिसॅटपर्यंत भारतीय उपग्रहांचीदेखील मदत घेतली गेली. ही विमानं भारतीय संरक्षण दलाच्या आधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज असलेल्या उड्डाण क्षमतेचा कणा आहेत.
आतापर्यंत या शोध घेणाऱ्या विमानांनी 100 तास उड्डाण केलं आहे. तरीदेखील बेपत्ता झालेल्या मालवाहू विमानाचा काही थांगपत्ता नाही.
अनेकांना यात आश्चर्य वाटतंय. मात्र आत काम करणाऱ्यांना त्यात काहीच नवल वाटत नाहीये.
वायुदलाचा बाहुबली - AN32
AN32च्या तीन हजार तास उड्डाणाचा अनुभव असलेले एक निवृत्त अधिकारी सांगतात, "या संपूर्ण प्रदेशात आकाशातून केवळ नद्याच दिसतात. उर्वरित भाग जंगलाने वेढलेला आहे. AN32 खूप मोठं असू शकतं, मात्र कुठल्याही सुगाव्याशिवाय त्याचा केवळ अंदाजच बांधता येतो."
AN32चा शोध घेणाऱ्या C130J, नौदलाची P8I, सुखोई यांसारखी विमानं अहोरात्र माहिती गोळा करत आहेत.
विमान कोसळण्याच्या संभाव्य ठिकाणातून इन्फ्रारेड आणि लोकेटर ट्रान्समिटरचे सिग्नल पकडण्याचा प्रयत्न तज्ज्ञ करत असल्याचं भारतीय हवाई दलाने सांगितलं.
फोटो आणि तांत्रिक सिग्नलच्या आधारावर काही विशिष्ट ठिकाणी हेलिकॉप्टर कमी उंचीवरून उडवले जात आहेत.
मात्र आतापर्यंत केवळ हवेतून जमिनीवरच्या पथकाशी ताळमेळ बसवण्यातच यश आलंय. एका माजी अधिकाऱ्याने सांगितलं, "सर्वांत शेवटी विमान ज्या ठिकाणी होतं तिथूनच आमची शोधमोहीम सुरू होते. त्यानंतर शोधमोहिमेचा परिघ वाढतो."
AN32 हे भारतीय वायुदलासाठी केवळ एक विमान नाही. ते एक असं विमान आहे जे वायुदलासाठी खास बनवण्यात आलं होतं.
वायुदलातील वरिष्ठांपासून कनिष्ठांपर्यंत सर्वच सांगतात की हे विमान इतकं शक्तिशाली आणि दणकट आहे की ते वायुदलाच्या मालवाहतुकीसाठीचा कणा आहे. तसंच ते छोट्या आणि तात्पुरत्या धावपट्टीवरदेखील उतरू शकतं. म्हणून या विमानाच्या देखभालीवरही बराच खर्च होतो.
एक निवृत्त अधिकारी सांगतात, "आमच्याकडे जवळपास 100 AN32 विमानं आहेत. ही विमानं आम्ही 1984 मध्ये सोव्हियत युनियनकडून खरेदी केली होती. काही अपघात झाले आहेत. मात्र या अपघातांची तुलना विमानाच्या व्यापक वापराशी केल्यास विमान वापराचं पारडं जड दिसतं."
असं असलं तरीदेखील काळजीचे काही संकेत आधीपासून मिळत होते.
AN32 मध्ये बिघाड असल्याचा अंदाज होता
22 जुलै 2016 सालीदेखील एक AN32 विमान बेपत्ता झालं होतं. त्यात 29 कर्मचारी होते. त्यावेळी ते विमान पोर्ट ब्लेअर आणि चेन्नईजवळच्या तांबराम यांच्यादरम्यान उड्डाण करत होतं. त्याचा अजूनही शोध लागलेला नाही.
त्यावेळी विमान कोसळण्याचं संभाव्य ठिकाण किंवा सॅटेलाईट नेव्हिगेशनच्या मदतीने विमानाचा शोध घेता येईल, असं पाण्याच्या आत काम करणारं लोकेटर किंवा ऑटोमॅटिक डिपेंडंट सर्विलंस ब्रॉडकास्ट विमानात नव्हतं.
हवाई दलाचं म्हणणं आहे की सध्याच्या AN32मध्ये जुनं इमरजंसी लोकेटर ट्रान्समिटर (ELT) आहे, जे अपघात किंवा आणीबाणीच्या वेळी विमानाची स्थिती सांगू शकेल.
एका अधिकाऱ्याचं म्हणणं आहे, "आतापर्यंत कुठलाच संकेत मिळालेला नाही. स्वाभाविकच अत्याधुनिक आणि अधिक प्रभावी ELTची मदत झाली असती."
आतापर्यंत जवळपास 100 तास झाले आहेत. आतातर त्या ELTची बॅटरीसुद्धा संपली असेल, अशी भीती व्यक्त होते आहे.
भारतीय हवाई दलाला याचा अंदाज होताच. त्यामुळेच 2002-03 साली AN32च्या भविष्यावर चर्चाही करण्यात आली होती.
हवाई दलाच्या एका निवृत्त प्रमुखांनी सांगितलं, "AN32 मध्ये C130J प्रमाणे प्रदेश आणि वातावरणाचा अंदाज सांगू शकणारी रडार यंत्रणा नाही. मला वाटतं की उत्तम रडार यंत्रणा असेल तर AN32 चांगलं आहे. नाहीतर असे समस्या उद्भवू शकतात."
हवाई दलाला अशा प्रकारच्या बिघाडाची आणि या प्रसंगांची कल्पना होती.
विमान अद्ययावतीकरणात झाला विलंब
या विमानाच्या खरेदी कराराची माहिती असणाऱ्या एका जाणकाराने सांगितलं, "विमानाला बदलावं की ते अपग्रेड करावं, यावर दशकभर खल झाला. त्यानंतर आम्ही या निष्कर्षावर पोहोचलो की विमान अपग्रेड करायला हवं.
"युक्रेनच्या अँटोनोव्ह कंपनीने हवाई दलासाठी या विमानाची निर्मिती केली होती. या कंपनीनेदेखील अपग्रेडेशनसाठी प्रस्ताव दिला होता. त्यातल्या अटीही चांगल्या होत्या."
विमानाचं वय बघता त्याच्या पंखांमध्ये बदल व्हावा. विमानाची वयोमर्यादा 25 ते 40 वर्षांनी वाढवण्यासाठी त्यात आधुनिक उपकरणं लावावी, अशी हवाई दलाची इच्छा होती.
मात्र 2014च्या सुरुवातीला अचानक एक वाद निर्माण झाला. रशिया आणि युक्रेन यांच्यात संघर्ष पेटला. या युद्धाचा अनेक गोष्टींवर परिणाम झाला. AN32चं अपग्रेडेशनही त्यापैकीच एक.
हवाई दलाच्या एका माजी अधिकाऱ्याने सांगितलं, "योजनेनुसार काही AN32 युक्रेनमध्ये अपग्रेड झाले. आम्ही कानपूरमधल्या HAL मध्ये किट्स येण्याची वाट बघत होतो. मात्र त्यात विलंब झाला. आम्ही सगळीकडून मदत मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र योजनेनुसार अपग्रेडेशन होऊ शकलं नाही."
हवाई दलाचं म्हणणं आहे की AN32च्या अपग्रेडशनची आशा अजून पूर्णपणे मावळलेली नाही. हे मात्र खरं की त्यात विलंब झालाय.
आता आक्रोशाविषयी बोलू या. AN32 सारख्या जुन्या विमानांच्याही आधी याहूनही जुन्या हॉकर सिडले (HS) एव्हरो 748 या विमानावरही हवाई दलात प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.
सर्वप्रथम जून 1960 मध्ये HS एव्हरो उडवण्यात आलं आणि हे विमान उडवणं दिवसेंदिवस अवघड होत चालल्याचं अधिकारी सांगतात.
हवाई दलासमोर पर्याय काय आहेत?
एका सूत्राने सांगितलं, "संरक्षण मंत्रालयात HS एव्हरोला बदलण्याची फाईल UPA-2 च्या काळापासून धूळ खात पडली आहे. त्या तुलनेत AN32 बरं आहे."
भारतात सरकारी खरेदीबाबत असलेल्या गोंधळाचं वास्तव बघता हवाई दलाला याची पूर्ण कल्पना आहे की जुनं असो किंवा आधुनिक, जे उपलब्ध आहे, त्यातच गरज भागवावी लागणार आहे.
अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की अपग्रेड केलेली AN32 विमानंसुद्धा जवळपास एक दशक वापरली जाऊ शकतात. ते सांगतात, "AN32 उडवण्यात धोके असले तरी आमच्याकडे दुसरा पर्याय काय आहे?"
हवाई दलाच्या एका माजी प्रमुखांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितलं, "यंत्रणेत उत्तरदायित्व नसल्यातच जमा आहे. बालाकोटमध्ये हवाई दलाने केलेल्या कारवाईचं श्रेय घेणं ठीक आहे. मात्र UPA असो किंवा NDA, जेव्हा आम्हाला गरज असते तेव्हा सरकार का ऐकत नाही?"
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)