WHO: दररोज 10 लाख जण अडकत आहेत लैंगिक आजाराच्या विळख्यात

जागतिक आरोग्य संघटनेनुसार (WHO) दररोज 10 लाख जण लैंगिक आजारा बळी पडत आहेत.

दरवर्षी कोट्यवधी लोकांना गनोरिया, क्लामिडी, सिफिलिस आणि ट्रायकोमोनिएसिससारख्या लैंगिक आजारांना तोंड द्यावं लागत आहे.

लैंगिक आजारांचा प्रसार रोखण्यासाठीचे उपाय अत्यंत मंदगतीनं सुरू आहेत आणि या आकड्यांकडे एक आवाहन म्हणून पाहिलं पाहिजे, असं WHOचं म्हणणं आहे.

ज्या लैंगिक आजाराचा प्रसार औषंधाच्या साहाय्यानं रोखता नाही, अशा आजारांविषयी जाणकारांमध्ये विशेष चिंता आहे.

जागतिक आरोग्य संघटना ही लैंगिक संबंधांतून पसरणाऱ्या 4 आजारांविषयी जागतिक पातळीवर मूल्यांकनाचं काम करते.

2012च्या मूल्यांकनाशी तुलना करता यंदा नवीन अथवा सद्यस्थितीतील लैंगिक आजारांमध्ये फारशी तफावत दिसलेली नाहीये.

या मूल्यांकनानुसार, जगभरात 25 पैकी 1 व्यक्ती लैंगिक संबंधातून पसरणाऱ्या आजाराचा बळी ठरली आहे.

आजाराची लक्षणं

ट्रायकोमोनिएसिस आजार लैंगिक संबंधामुळे होतो, तर गनोरिया, क्लामिडी आणि सिफिलिस हे आजार जीवाणूंच्या प्रसारामुळे होतात.

या आजारांची लक्षणं अगदी सुरुवातीच्या टप्प्यात दिसतील, असं अजिबात नाही. काही लोकांमध्ये ही लक्षणं दिसतंही नाही, पण त्यांना या आजारानं ग्रासलेलं असतं.

लघवी करताना त्रास होणं, लिंग किंवा योनीतील स्राव आणि पाळीच्या काळात होणारा अतिरिक्त रक्तस्राव ही या आजाराची लक्षणं आहेत.

क्लॅमेडिया आणि गनोरिया या आजारांमुळे महिलांना अनेक प्रकारच्या गंभीर समस्या उद्भवू शकतात. योनीच्या आत सूज येणं, वंध्यत्व अथवा हृदयाशी संबंधित आजार होऊ शकतात.

एका गर्भवती महिलेला हा आजार झाल्यास तिच्या मुलांवर याचा गंभीर परिणाम होऊ शकतो. यामुळे वेळेअगोदर प्रसूती होते अथवा अशक्त मूल जन्मास येतं.

जागतिक आरोग्य संघटनेतील डॉक्टर पीटर सलमा सांगतात, "लैंगिक संबंधांतून प्रसारित होणाऱ्या आजारांना रोखण्यात अपयश येत आहे, असं आमच्या निदर्शनास आलं आहे. या आजारांना सामोरं जाण्याचा प्रत्येक व्यक्तीनं प्रयत्न करायला पाहिजे. प्रत्येकाला हे आजार रोखण्यासाठी वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हाव्यात, हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे."

लैंगिक आजारांपासून स्वत:ला वाचवण्यासाठी सुरक्षित लैंगिक संबंध सर्वाधिक गरजेचे आहेत. सेक्स करताना कंडोमचा वापर जरूर करावा आणि वेळोवेळी वैद्यकीय तपासणी करावी, असं जागतिक आरोग्य संघटनेचं म्हणणं आहे.

जीवांणूच्या प्रसारातून होणाऱ्या आजारांचा विचार केल्यास ते औषधांनी बरे होऊ शकतात. पण विशिष्ट प्रकारच्या सिफिलिसचा उपचार पेनिसिलिनच्या कमतरतेमुळे अधिक कठीण झाला आहे.

याव्यतिरिक्त सुपर-गनोरियाच्या प्रकरणांत वाढ झाली आहे, या आजारावर उपचार जवळजवळ अशक्य आहे.

वेलकम ड्रग रेसिस्टेंट इंफेक्शन प्रोग्रामचे प्रमुख डॉ. टिम जिंक सांगतात, "सामान्य संक्रमणातून होणारी गनोरियाची प्रकरणं ही उपचारापलीकडची आहेत. याप्रकारच्या प्रसाराला रोखण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. जसं ज्या जुन्या औषधींचा परिणाम होत नाही, त्यांचा वापर बंद करायला हवा."

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)