जेव्हा गर्दीच्या ठिकाणी पुरुषच पुरुषांचं लैंगिक शोषण करतात...

    • Author, नवीन नेगी
    • Role, बीबीसी हिंदी प्रतिनिधी

"मी फॉर्म भरण्यासाठी लाईनमध्ये उभा होतो. तेव्हा त्यानं त्याच्या प्रायव्हेट पार्टने मला मागून स्पर्श केला," विक्रम त्यांच्यासोबतचा अनुभव सांगतात.

विक्रम यांनी ही बाब आपल्या मित्रांना सांगितली, तेव्हा त्यांचे तीन मित्र जोरजोरात हसू लागले. मग पुढे काय झालं, असं त्यांनी विक्रम यांना एका सुरात विचारलं.

"माझ्या मागे 50 वर्षांचा एक माणूस उभा होता. मी लाईनमध्ये उभा असेपर्यंत तो असंच करत राहिला. मी त्यावेळी कॉलेजात जात होतो. मी त्यांना व्यवस्थित उभं राहायला सांगितलं तेव्हा त्यांनी हसत-हसत म्हटलं की, 'काय झालं? राहू दे ना'," विक्रम पुढे सांगतात.

विक्रम दिल्लीत राहतात. आठ वर्षांपूर्वी त्यांच्यासोबत घडलेली ही घटना आजही त्यांना स्पष्टपणे आठवते.

"त्या व्यक्तीच्या वयाचा विचार करत मी बराच वेळ ते सर्व सहन करत राहिलो. पण शेवटी मी त्यांना चांगलंच सुनावलं," असा घटनाक्रम विक्रम स्पष्ट करतात.

इतक्या वर्षांनंतर पहिल्यादांच आपण ही बाब कुणासमोर तरी मांडत आहोत, हेही विक्रम यांनी बीबीसीबरोबर बोलताना स्पष्ट केलं. "यापूर्वी असा एकही मित्र मिळाला नाही जो संवेदनशीलतेने ही बाब समजून घेऊ शकेल."

खरं तर ज्यावेळी विक्रम संवेदनशीलतेवर बोलत होते त्यावेळी त्यांचे मित्र हसत होते. यातून त्यांच्या मित्रांची असंवेदनशीलता समोर येत होती.

बसमध्ये जागा देण्याच्या कारणावरून शोषण

याप्रकारची घटना उत्तर प्रदेशात राहणाऱ्या कपिल शर्मा यांच्यासोबतही घडली आहे. 10 वर्षांचे असताना पहिल्यांदा कपिलसोबत असा प्रकार घडला.

"आजही सरकारी बसमधून प्रवेश करताना ती गोष्ट मला अस्वस्थ करते," कपिल सांगतात. कपिल सध्या सरकारी नोकरीत आहे.

"कामानिमित्त मी लखनौहून दिल्लीला आलो. बहुतांशवेळी बसमधूनच प्रवास करायचो. एक दिवस एका वयस्क माणसानं मला त्याच्या शेजारच्या सीटवर बसण्यासाठी जागा दिली. मीही त्या सीटवर बसलो. काही वेळानंतर मात्र तो माणूस मला 'तिथे' स्पर्श करू लागला. आधी मला वाटलं की बसमध्ये गर्दी असल्यानं त्याचा हात चुकून लागला असेल. पण तो वारंवार मला हात 'तिथे' लावत राहिला. मी कुणालाही काही सांगू शकलो नाही. चूप बसून सहन करत राहिलो," कपिल सांगतात.

अशा प्रकारच्या घटना घडल्यानंतर मुलं गप्प का राहतात, यावर कपिल सांगतात, "यामागे एक प्रकारची भीती असते, ती म्हणजे, आपल्यासोबत असं घडल्याचं सांगितल्यावर आपले मित्र आपल्याला कमकुवत पुरुष तर नाही समजणार ना? त्यांना हीच चिंता सतावत असते. यामागे अजून एक कारण असतं. ते म्हणजे आपला समाज मुलांना सुरुवातीपासूनच कणखर, कधी न डगमगणारे, कधी न रडणारे, अशा विशेषणांमध्ये बांधून ठेवतो. 'मर्द को दर्द नहीं होता...' म्हणतात ना, तसं."

हा तर एक आजार आहे

विक्रम आमि कपिल यांच्यासोबत सार्वजनिक ठिकाणी झालेल्या शोषणानंतर इतर पुरुषही ही बाब मान्य करतात. पण अशी कोणती गोष्ट आहे ज्यामुळे पुरुष मंडळी लैंगिक शोषणावर बोलायचं टाळतात?

यावर दिल्लीतील मनोचिकित्सक डॉ. प्रवीण त्रिपाठी सांगतात की, "यामागचं प्रमुख कारणं म्हणजे समाजाची भीती असते. आपण हे सांगितलं तर मित्र, नातेवाईक आपल्यावर हसतील, असं पुरुषांना वाटत असतं. शिवाय पुरुषांच्या मनात पुरुषत्वाची कल्पना घर करून असते. ही कल्पनासुद्धा या प्रकारची बाब सांगण्यापासून त्यांना अटकाव करत राहते."

पुरुषांसोबत होणाऱ्या लैंगिक शोषणामध्ये एक बाब समोर येते, ती म्हणजे या प्रकारचं शोषण करणारे खुद्द पुरुषच असतात.

याप्रकारचं शोषण करणाऱ्या लोकांच्या मानसिकतेबद्दल डॉ. प्रवीण सांगतात, "या प्रकारचं वर्तन करणाऱ्या माणसांना फ्रोटेरिज्म नावाचा आजार असतो. या आजाराची व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीच्या प्रायव्हेट पार्ट्सना स्पर्श करून समाधान मिळवत असते. यासाठी ती व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीची परवानगीही घेत नाही."

या आजारात अजून काय काय होतं?

"लैंगिक शोषणाशी संबंधित बहुतांश प्रकरणांमध्ये आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न केलेला असतो. पुरुषांनी पुरुषांचं लैंगिक शोषण केलेल्या प्रकरणांत ताकदीचं प्रदर्शन अधिक असतं," डॉ. प्रवीण सांगतात.

"एका पुरुषावर दुसरा पुरुष बलात्कार करत असेल तर त्यामध्ये लैंगिक सुख अनुभवण्यापलीकडे आपल्या ताकदीचं प्रदर्शन करण्याचा हेतू असतो, असं अनेक अहवालांमधून स्पष्ट होतं. लैंगिक शोषणाचा जितका परिणाम महिलांवर होतो तितकाच पुरुषांवरही होत असतो," डॉ. प्रवीण पुढे सांगतात.

यातून बाहेर येण्यासाठी याला बळी पडलेल्या व्यक्तींना अनेक वर्षं लागतात, असं डॉक्टरांचं म्हणणं आहे.

कपिल सांगतात, "ती घटना आठवली की आजही माझ्या अंगावर काटा येतो आणि येणाऱ्या पिढीने या घुसमटीत राहू लागू नये, असं मला वाटतं. आपल्यासोबत होणाऱ्या लैंगिक शोषणाची त्यांनी जाहीरपणे तक्रार करायला हवी."

पोलिसात तक्रार का नाही दाखल करत?

कपिल शर्मा यांनी वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्यासोबत झालेल्या गैरवर्तणुकीबद्दल सांगितलं तेव्हा पोलिसात तक्रार का नाही केली, असा प्रश्न त्यांना विचारणं साहजिकच होतं.

ते चटकन उत्तर देतात, "पुरुषांसोबत लैंगिक शोषण झालं असेल, यावर कुणीच विश्वास ठेवत नाही. आणि कुणी विश्वास ठेवलाच तर भारतीय कायदाही अशा प्रकरणांत पुरुषांच्या बाजूनं नसतो."

तर मग अशा पीडितांसाठी कायदा काय सांगतो?

भारतीय दंड संहितेच्या कलम 354अंतर्गत लैंगिक शोषणाची प्रकरणं दाखल केली जातात. याबद्दल दिल्ली उच्च न्यायालयाचे वकील विभाष झा सांगतात की, "याशिवाय कलम 376 आणि 509 अंतर्गतही याप्रकारची प्रकरणं दाखल केली जातात. कायद्यात म्हटलंय की यात पीडित ही महिला आहे. तसंच कलम 509मध्ये महिलेच्या मर्यादेचं हनन करण्याबद्दल म्हटलेलं आहे. याप्रकारे कायदा पुरुषांच्या विरोधात जातो आणि पुरुष या कलमांतर्गत खटला दाखल करू शकत नाहीत."

"18 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या मुला-मुलींचं लैंगिक शोषण झाल्यास त्यासाठी POCSO कायदा तरी आहे. पण प्रौढ पुरुषांचं लैंगिक शोषण झाल्यास कायदा त्यांच्या बाजूनं नसतो," विभाष पुढे सांगतात.

वकील अनुजा कपूर यांचं मत मात्र थोडं वेगळं आहे. पुरुषांचंही लैंगिक शोषण होतं, ही बाब अनुजा नाकारत नाहीत. पण त्यांच्या मते, पुरुषांचं लैंगिक शोषण होत असल्यास या संदर्भातल्या प्रकरणांना याच कलमांतर्गत दाखल करायला हवं.

"पुरुषांचं लैंगिक शोषण होत असेल तर त्यांनी पोलीस स्थानकात जाऊन तक्रार दाखल करायला हवी आणि पोलीस तक्रार दाखल करून घेत नसतील तर याविरोधात जनहित याचिका दाखल करायला हवी," त्या सांगतात.

"जोपर्यंत असे पीडित पुरुष एकत्र येऊन आपल्या हक्कांसाठी लढा देणार नाहीत, तोपर्यंत कायद्यात बदल होणार नाहीत. यासंबंधीचं उत्तम उदाहरण म्हणजे महिला आहेत. आपल्याविरोधात होणाऱ्या घटनांविरोधात एकत्र येत महिलांनी आवाज उठवला आणि अनेक कायद्यांत बदल घडवून आणले."

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)