You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
भारतीय लष्कराची स्वयंसिद्धता वाढवणारी स्वदेशी 'धनुष' तोफ काय आहे?
- Author, जुगल पुरोहित
- Role, बीबीसी प्रतिनिधी
14 फेब्रुवारी रोजी पुलवामात झालेल्या भीषण हल्ल्याने सारा देश हादरला. संरक्षण मंत्रालयाच्या कार्यालयात या हल्ल्याची गंभीरता आणि त्याला कशा प्रकारे प्रत्युत्तर द्यावे, यावर खल सुरू होता. मात्र त्यासोबतच त्याच कार्यालयात 18 फेब्रुवारी रोजी एक महत्त्वाचा निर्णयही घेण्यात आला.
हा निर्णय होता भारतीय शस्त्रास्त्र निर्मिती कारखाना म्हणजेच ऑर्डिनन्स फॅक्ट्रीला 155 मिलीमीटर 45 कॅलिबरच्या 114 'धनुष' तोफांची ऑर्डर देण्याचा. त्या दिवशी संरक्षण मंत्रालयाकडून ऑर्डिनन्स फॅक्ट्री बोर्डाला (OFB) या तोफांसाठी 'बल्क प्रॉडक्शन क्लिअरन्स (BPC)' देण्यात आले.
आणि एका औपचारिक समारंभात या ऑर्डरची पहिली खेप भारतीय लष्कराला सुपूर्द करण्यात आली.
संरक्षण मंत्रालयाचा हा निर्णय दूरगामी का आहे, याविषयी माहिती करून घेण्याआधी जरा त्याची पार्श्वभूमी बघूया.
भारतीयांनी पहिल्यांदा टीव्हीवर बघितलेले युद्ध म्हणजे 1999 सालचे कारगिल युद्ध. या युद्धाची जी प्रतिमा आपल्या मनावर कोरली गेली ती धनुषची कथा समजून घेण्यात महत्त्वाची आहे.
अतिशय उंचीवरच्या प्रदेशात युद्ध सुरू होते. बर्फाच्छादीत डोंगराळ भागात शिरकाव केलेल्या पाकिस्तानी घुसखोरांना हाकलून लावण्यासाठी भारतीय तोफा एकापाठोपाठ एक तोफगोळ्यांचा मारा करत होत्या. त्या तोफा होत्या 'बोफोर्स'.
हे नाव संरक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचारासाठी कुप्रसिद्ध झालं असलं तरी बोफोर्सनेच लक्ष्याचा अचूक भेद घेणाऱ्या तोफा, काय साध्य करू शकतात, हेदेखील दाखवून दिले होते.
बोफोर्सची हीच यशोगाथा आणि या युद्धानंतर उद्भवलेल्या परिस्थितीतून धनुषचा जन्म झाला.
भारताने 1980 साली बोफोर्स तोफेचे 410 सुटे भाग विकत घेतले. मात्र त्यावेळी करण्यात आलेल्या तंत्रज्ञान हस्तांतरण कराराची (ट्रान्सफर ऑफ टेक्नॉलॉजी-ToT) कागदपत्रं अपुरी होती. बोफोर्स खरेदीत भ्रष्टाचाराचे आरोप झाले आणि त्यामुळे पुढच्या तंत्रज्ञान विकासाला खीळ बसली.
आणि अशाच परिस्थितीत अचानक कारगिल युद्ध पेटले.
या युद्धाने तोफेचे यश अधोरेखित केले असले तरी याच युद्धात भारतीय तोफखान्याची शान असलेल्या बोफोर्सचे तंत्रज्ञान किती कालबाह्य आहे, हेदेखील दिसले. कारण 155 मिमी. दारुगोळा क्षमता असणाऱ्या या 39 कॅलिबर तोफेची भेदक क्षमता केवळ 29 किलोमीटरपर्यंतच होती. या तंत्रज्ञानात सुधारणा करून ती 45 कॅलिबर करण्यात आली. यामुळे तिचा पल्ला वाढला.
बोफोर्स तोफांना अपग्रेड करण्याच्या भारताच्या प्रयत्नांना यश मिळाले. मात्र तरीदेखील या तोफेची मारक क्षमता 30 किलोमीटरच्या पुढे जाऊ शकली नाही.
अखेर ऑक्टोबर 2011 मध्ये संरक्षण मंत्रालयाने 'धनुष' निर्मितीचा मार्ग मोकळा केला.
या तोफेची निर्मिती आणि भारतीय लष्कराला त्याचा पुरवठा, यावर धनुषचे यश अवलंबून होते.
नोव्हेंबर 2012 नंतर भारताच्या वेगवेगळ्या हवामानात आणि वेगवेगळ्या प्रदेशात धनुषच्या चाचण्या घेण्यात आल्या. ऑर्डिनन्स फॅक्ट्रीच्या माहितीनुसार धनुषने वाळवंट, मैदानी भाग आणि सियाचीन बेस कॅम्पजवळ 4599 राउंड फायर केले आहेत.
या कार्यक्रमाची क्षमता, गती आणि गुणवत्ता यावर प्रश्नही उपस्थित करण्यात आले होते. भरीस भर म्हणजे 2017 साली सीबीआयने या तोफेमध्ये हलक्या प्रतीचे चीनी सुटे भाग वापरण्यात आल्याच्या आरोपाची चौकशीही सुरू केली होती.
मात्र 18 फेब्रुवारी 2019 रोजी धनुषची निर्मिती करणाऱ्या चमूला बल्क प्रॉडक्शन क्लिअरन्स मिळाल्याने या सर्व वादांवर पडदा पडला आणि धनुष तोफांच्या तंत्रज्ञान विकासाला यश मिळून त्याच्या निर्मितीचा मार्गही मोकळा झाला.
बरेच चढ-उतार बघितल्यानंतर तयार करण्यात आलेल्या या धनुष तोफांची वैशिष्ट्ये काय आहेत, ते पाहूया.
धनुषच्या एका तोफेचे वजन जवळपास 13 टन आहे आणि किंमत 13 कोटी रुपये. ही तोफ स्वयंचलित आहे. म्हणजेच या तोफेने अचूक लक्ष्यभेद करता येतो. शिवाय ही तोफ स्वतःच स्वतःचे स्थान म्हणजे पोझिशन बदलू शकते. पोझिशन बदलण्याच्या या क्षमतेमुळे प्रतिहल्ल्यापासून बचाव करता येतो. स्वतंत्र ट्रकने ही तोफ वाहून नेतात. मात्र धनुष स्वतःदेखील पाच किलोमीटर प्रति तास या वेगाने धावू शकते.
2012 सालापासून धनुष प्रकल्पाशी संलग्न असलेले जबलपूरमधील गन कॅरिएज फॅक्ट्रीचे वरिष्ठ संचालक राजीव शर्मा सांगतात, "आम्ही सुरुवातीला भारतीय लष्कराला डिसेंबर 2019मध्ये 18 तोफा देणार आहोत. त्यानंतर 2022च्या शेवटापर्यंत संपूर्ण डिलिव्हरी देण्याचा आमचा मानस आहे." ते पुढे सांगतात, "114 तोफांची डिलिव्हरी पूर्ण होईपर्यंत धनुषची मागणी आणखी वाढलेली असेल. 155 मिमी गटातील आर्टिलरी तोफ यंत्रणेत हळूहळू बदल करण्याचा निर्णय लष्कराने घेतला आहे. त्यामुळे धनुषची मागणी आणखी वाढण्याची पूरेपूर संधी आहे."
अपुऱ्या तंत्रज्ञान हस्तांतरण कागदपत्रांपासून सुरू झालेली ही गाथा इथवर येऊन पोचली आहे. याने ऑर्डिनन्स फॅक्ट्री, भारतीय लष्कर आणि संबंधित संस्थांनी केलेल्या प्रयत्नांमध्ये विश्वास निर्माण केला आहे. मात्र, तोफांची मागणी आणि त्याची क्लिष्टता लक्षात घेता तोफांचे उत्पादन सुरळीत सुरू ठेवणे आणि सैन्याला पाठिंबा देणे, हे पूर्णपणे वेगळं आव्हान असेल.
तोफखान्याचे माजी डायरेक्टर जनरल असलेले लेफ्टनंट जनरल (नि.) पी. आर. शंकर यांच्या शब्दात सांगायचे तर धनुष भारतीय तोफखान्याचा मुख्य आधारस्तंभ असणार आहे आणि लवकरच पूर्ण होऊ घातलेल्या अनेक आर्टिलरी प्रोजेक्ट्सपैकी धनुष एक आहे.
गेल्या नोव्हेंबरमध्ये 145 M777 A2 अल्ट्रा लाईट होवित्झर (155 मिमी X 39 कॅलिबर) या तोफेची पहिली खेप लष्करात दाखल झाली. या तोफेचे वजन साडे चार टनांपेक्षा कमी आहे आणि कुठल्याही भूप्रदेशात ती सहज आणि कमी वेळेत तैनात करता येते. M777 A2 व्यतिरिक्त K9 वज्र ही तोफही भारतीय सैन्यात दाखल झाली आहे. ही tracked आणि self-propeled तोफ आहे. म्हणजेच ही तोफ शत्रूचा अचूक वेध घेऊन स्वतःची पोझिशन बदलून हल्ला करू शकते. ही तोफ वाळवंट तसेच मैदानी भागातही वापरता येते. एकूण 100 K9 वज्र तोफा लवकरच भारतीय सैन्यदलात सामील होणार आहेत.
लेफ्ट. जन. (नि.) पी. आर. शंकर म्हणतात, "कारगिल युद्धात भारतीय लष्कराने केवळ 22 बोफोर्स तोफा तैनात केल्या होत्या. धनुषमुळे शत्रूसमोर आपण किती मोठं आव्हान उभं करू शकणार आहोत, याची जरा कल्पना करा. त्यात महत्तवाची भर म्हणजे भारतीय तोफखाना सध्या क्रांतीकारी आणि अत्याधुनिक आयुध निर्मितीच्या टप्प्यावर आहे. त्यामुळे एक वैश्विक शक्ती म्हणून आपली गणना होईल, असे म्हणण्यात मला अजिबात संकोच वाटत नाही. यापैकी बरेच तंत्रज्ञान स्वदेशी आहे, परदेशातून आयात केलेले नाही, ही आणखी एक जमेची बाब आहे."
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)