You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कारगिल युद्धात वडील लढले त्याच बटालियनमध्ये मुलाने घेतला प्रवेश
- Author, प्रीत गराला
- Role, बीबीसी गुजराती प्रतिनिधी
12 जून 1999चा तो दिवस. टोलोलिंग पर्वतरांगांमध्ये कारगिल युद्धादरम्यान लान्स नायक बचन सिंह यांना आपला जीव गमवावा लागला होता. तेव्हा त्यांचा मुलगा हितेश फक्त सहा वर्षांचा होता. पण वडिलांसारखंच आपणही एक दिवस सैन्यात जाऊ, देशासाठी लढु, असा निर्धार त्यानं लहानपणीच केला होता.
आणि नुकतंच त्यानं त्याचं स्वप्न पूर्णही केलं. आणि केवळ सैन्यातच नाही, तर आपले वडील ज्या तुकडीमध्ये होते, त्याच राजपुताना रायफलच्या सेकंड बटालियनमध्ये तो लेफ्टनंट म्हणून दाखल झाला आहे.
"गेल्या 19 वर्षांपासून माझं एकच स्वप्न होतं. मी सैन्यात जावं असं माझ्या आईचंसुद्धा स्वप्न होतं. आता ते पूर्ण होतंय. मी देशाची प्रामाणिकपणे सेवा करेन," असं हितेश बीबीसी गुजरातीशी बोलत होता.
नुकतंच देहरादूनमधल्या इंडियन मिलिटरी अॅकेडमीमध्ये त्यानं प्रशिक्षण पूर्ण केलं, आणि ज्या बटालियनमध्ये त्याचे वडील होते, त्याच बटालियनमध्ये तो रुजू झाला आहे.
जूनमध्ये पार पडलेल्या पासिंग आऊट परेडनंतर हितेश आणि त्याची आई मुझफ्फरनगर या आपल्या मूळ गावी गेले. तिथे सिव्हिल लाईन्स भागात लान्स नायक बचन सिंह यांचा पुतळा आहे. तिथं त्यांनी दोघांनी श्रद्धांजली वाहिली.
आपल्या आईच्या संघर्षामुळे आणि प्रार्थनेमुळे आपल्याला यश मिळाल्याचं सांगत हितेशनं आईचे आभार मानले. त्याच्या मामानं बचन सिंह यांच्याबरोबर काम केल्याचं हितेशनं बीबीसी गुजरातीला सांगितलं.
"माझ्या मुलानं त्याच्या वडिलांसारखं भारतीय सैन्यात जावं असं माझं स्वप्न होतं," हितेशची आई कमेश बाला सांगत होत्या.
"आता मला दुसरं काहीही नकोय. त्याचे वडील गेल्यानंतर आमचं आयुष्य कठीण होतं. हितेश सैन्यात गेल्यामुळे मला त्याचा गर्व वाटतो. हेमंत या माझ्या लहान मुलालासुद्धा भारतीय सैन्यात जाण्याची इच्छा आहे," कमेश बाला सांगत होत्या.
वडील कडक शिस्तीचे
राजपुताना रायफलने टोलोलिंगवर ताबा मिळवला होता. कारगिल युद्धातला तो सगळ्यांत मोठा विजय होता. त्यामुळे पुढच्या विजयाचा पाया रचला गेला होता. पण त्या युद्धात हितेशने आपल्या वडिलांना गमावलं होतं.
हितेश सांगतो, "त्या दिवशी माझा भाऊ, मी आणि माझी आई आमच्या आजोबांच्या गावात गेलो होतो. मी माझ्या भावाबरोबर खेळत होतो. माझी आई काम करत होती. अचानक फोन वाजला. फोनवर ऋषिपाल मामा होते. त्यांनी बाबा गेल्याची बातमी दिली. आम्हांला प्रचंड धक्का बसला."
"नंतर आम्ही आमच्या घरी परत गेलो. काही दिवसांनंतर वडिलांचं पार्थिव शरीर आलं. आम्ही आमच्या जमिनीवरच बाबांचा पुतळा तयार केला."
मग जीवाच्या अनिश्चिततेची माहिती असूनही हितेशनं सैन्यात जाण्याचा निर्णय का घेतला?
या प्रश्नाला उत्तर देताना हितेश म्हणाला, "जेव्हा मला शाळेत विचारलं गेलं की तुला मोठं झाल्यावर काय व्हायचंय, तेव्हा मी सैन्यात जवान व्हायचंय, असं उत्तर दिलं. सगळी मुलं माझ्याकडे बघायला लागली. नंतर मी पॅरेन्टल क्लेम केला. पॅरेन्टल क्लेम हा एक प्रकारचा दावा असतो ज्यानुसार मुलाला वडिलांच्या बटालियनमध्ये दाखल होता येतं. म्हणून मला तेच बटालियन मिळालं."
हे सगळं सांगताना हितेशनं आपल्या एका वाढदिवसाची आठवण काढली. तो म्हणाला, "मी आणि माझा भाऊ जुळे आहोत. आमचा चवथा की पाचवा वाढदिवस होता. तेव्हा संपूर्ण कुटुंब आमचा वाढदिवस साजरा करायला तिथे होते. आम्ही केक म्हणून गुलाबजाम कापले होते. ही अतिशय सुंदर आठवण आहे."
आपल्या वडिलांच्या आठवणी हितेश सांगतो, "माझे वडील अतिशय कडक शिस्तीचे होते. त्यांनी फालतू प्रकार खपवून घेतले नाही. संध्याकाळी आठ नंतर घराच्या बाहेर पडायचं नाही, असा नियम आईनं केला होता. आम्हाला कधीच पॉकेटमनी सारखा प्रकार नव्हता. ज्या गोष्टी आम्हाला हव्या आहेत त्या आम्हाला मागाव्या लागायच्या."
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)