You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कारगिल विजय दिवस: भारताच्या शिफारशीनंतर पाकिस्तानी सैनिकाला मिळाला सर्वोच्च शौर्य पुरस्कार
- Author, रेहान फजल
- Role, बीबीसी प्रतिनिधी
20 वर्षांपूर्वी कारगिलच्या पर्वतांवर भारत आणि पाकिस्तानदरम्यान युद्ध झालं. या युद्धाच्या आठवणी आणि माहिती सांगणाऱ्या लेखमालेचा हा तिसरा भाग.
शत्रू राष्ट्राचं सैन्य एखाद्या सैनिकाच्या धाडसाला दाद देत त्याच्या सैन्याला पत्र लिहून त्याच्या शौर्याचा सन्मान करायला सांगणं, तशी दुर्मिळ बाब. मात्र 1999च्या कारगिल युद्धादरम्यान हे घडलं होतं.
टायगर हिलच्या आघाडीवर पाकिस्तानी सैन्याचे कॅप्टन कर्नल शेर खान इतक्या धाडसाने लढले होते की भारतीय सैन्यानेही त्यांच्या शौर्याला दाद दिली होती.
त्या ठिकाणी कमांड हाती असलेले ब्रिगेडियर MPS बाजवा सांगतात, "जेव्हा तिथलं युद्ध संपलं तेव्हा मी त्या अधिकाऱ्याच्या शौर्याने भारावून गेलो. मी 71च्या युद्धातही सहभागी झालो होतो. मी कधीच पाकिस्तानच्या अधिकाऱ्याला नेतृत्व करताना बघितलेलं नव्हतं. इतर सर्व पाकिस्तानी कुर्ता-पायजामा घालून होते. एकटे ते ट्रॅक सूटमध्ये होते."
आत्मघातकी हल्ला
नुकताच कारगिलवर "Kargil: Untold Story from the War" हे पुस्तक लिहिणाऱ्या रचना बिश्त रावत सांगतात, "कॅप्टन कर्नल शेर खान नॉर्दन लाईट इन्फंट्रीत होते. टायगर हिलवर त्यांनी पाच ठिकाणी चौक्या उभारल्या होत्या. सुरुवातीला 8 शिखांना त्या ताब्यात घेण्याचं कार्य सोपवण्यात आलं. मात्र त्यांना ते करता आलं नाही. नंतर जेव्हा 18 ग्रेनेडिअर्सनाही त्यांच्या मदतीसाठी पाठवण्यात आलं तेव्हा त्यांना कशीबशी एक चौकी ताब्यात घेण्यात यश मिळालं. मात्र कॅप्टन शेर खान यांनी प्रत्युत्तरादाखल एक हल्ला केला."
"एकदा अपयशी ठरल्यानंतर त्यांनी त्यांच्या जवानांना 'रिग्रुप' करून पुन्हा हल्ला चढवला. जे कुणी हा हल्ला बघत होते त्यांचं म्हणणं होतं हा 'आत्मघातकी' हल्ला आहे. भारतीय जवानांची संख्या खूप जास्त असल्याने ही मोहीम यशस्वी होणार नाही, याची त्यांना पूर्ण कल्पना होती."
खिशात पाठवली चिठ्ठी
ब्रिगेडियर MPS बाजवा सांगतात, "कॅप्टन शेर खान धिप्पाड होता. तो अतिशय शौर्याने लढला. शेवटी आमचा एक जवान कृपाल सिंह जो जखमी होऊन पडला होता, त्याने अचानक उठून 30 फुटांच्या अंतरावरून एक बर्स्ट मारला आणि कर्नल शेर खानला धारातीर्थी पाडण्यात त्याला यश आलं."
शेर खान पडल्याबरोबर त्यांच्या हल्ल्याची धार बोथट होत गेली. ब्रिगेडियर बाजवा सांगतात, "आम्ही तिथे 30 पाकिस्तानी जवानांचे मृतदेह पुरले. मात्र, मी सिव्हिलियन पोर्ट्स पाठवून कॅप्टन कर्नल शेर खान यांचं पार्थिव खाली आणायला सांगितलं. आधी आम्ही त्याला ब्रिगेड हेडक्वार्टरमध्ये ठेवलं."
जेव्हा त्यांचं पार्थिव पाकिस्तानला पाठवण्यात आलं तेव्हा ब्रिगेडिअर बाजवा यांनी त्यांच्या खिशात एक चिठ्ठी ठेवली. त्यावर लिहिलं होतं, "Captain Colonel Sher Khan of 12 NLI has fought very bravely and he should be given his due."
म्हणजे12 NLIचे कॅप्टन कर्नल शेर खान अतिशय शौर्याने लढले आणि त्यांचा योग्य सन्मान झाला पाहिजे.
नावामुळे अनेक अडचणी
कॅप्टन कर्नल शेर खान यांचा जन्म उत्तर-पश्चिम सीमेजवळच्या प्रांतातल्या नवा किल्ले या गावात झाला होता. त्यांचे आजोबा 1948च्या काश्मीर मोहिमेत सहभागी झाले होते.
त्यांना वर्दीतले जवान आवडायचे. त्यांना नातू झाला तेव्हा त्यांनी त्याचं नाव कर्नल शेर खान ठेवलं. मात्र या नावामुळे आपल्या नातवाच्या आयुष्यात अनेक अडचणी येतील, याची त्यांना कल्पना नव्हती.
कारगिलवर लिहिलेलं 'Witness to Blunder : Kargil Story Unfold' हे प्रसिद्ध पुस्तक लिहिणारे कर्नल अशफाक हुसैन सांगतात, "कर्नल हा शेर खान यांच्या नावाचा भाग होता आणि हे नाव ते अभिमानाने मिरवायचे. अनेकदा या नावामुळे समस्या निर्माण व्हायच्या."
"ते फोन उचलून 'लेफ्टनंट कर्नल शेर खान स्पीकिंग...' म्हणायचे तेव्हा फोन करणाऱ्याला वाटायचं की तो कमांडिग ऑफिसरशी बोलतोय आणि तो त्यांच्याशी 'सर' म्हणूनच बोलायचा. तेव्हा ते हसायचे आणि सांगायचे की मी सध्या लेफ्टनंट आहे आणि मी लगेच कमांडिंग ऑफिसरला तुमचा निरोप देतो."
लोकप्रिय अधिकारी
कर्नल शेर खान 1992 साली पाकिस्तानी मिलिट्री अकादमीमध्ये दाखल झाले. ते पोहोचले तेव्हा त्यांना दाढी होती. त्यांना दाढी काढण्याचे आदेश देण्यात आले. मात्र त्यांनी स्पष्ट नकार दिला.
त्यांच्या शेवटच्या सत्रात त्यांना पुन्हा सांगण्यात आलं की त्यांची कामगिरी उत्तम होती आणि दाढी काढली तर तुमची चांगल्या ठिकाणी पोस्टिंग होऊ शकते. त्यांनी पुन्हा नकार दिला. मात्र तरीही त्यांना बटालियन क्वार्टर मास्टर हे पद देण्यात आलं.
त्यांना एक वर्ष ज्युनिअर असलेले कॅप्टन अलीउल हसनैन सांगतात, "पाकिस्तानी मिलिट्री अकॅडमीमध्ये सीनिअर रॅगिंगच्या वेळी बऱ्याचदा ज्युनिअर्सना शिवीगाळ करायचे. मात्र मी कॅप्टन शेर खान यांच्या तोंडून कधीच शिवी ऐकली नाही. त्यांचं इंग्रजी उत्तम होतं. ते इतर अधिकाऱ्यांसोबत 'स्क्रॅबल' खेळायचे आणि जिंकायचेदेखील. जवानांमध्येही ते सहज मिसळायचे आणि त्यांच्यासोबत लुडो खेळायचे."
अधिकाऱ्याच्या आदेशानंतर परतले
जानेवारी 1998 मध्ये ते डोमेल सेक्टरमध्ये तैनात होते. थंडीमध्ये भारतीय जवान मागे गेले तेव्हा ती जागा ताब्यात घेण्याची त्यांच्या युनिटची इच्छा होती.
यासाठी ते वरिष्ठांकडून परवानगी घेण्याचा विचार करतच होते. तेवढ्यात कॅप्टन कर्नल शेर खान यांनी संदेश पाठवला की ते शिखरावर पोचले आहेत.
कर्नल अशफाक हुसैन त्यांच्या 'Witness to Blunder : Kargil Story Unfold' पुस्तकात लिहितात, "कमांडिग ऑफिसर द्विधा मनस्थितीत होता. त्याने त्याच्या वरिष्ठांना माहिती दिली आणि ती भारतीय चौकी ताब्यात ठेवण्याची परवानगी मागितली. मात्र परवानगी नाकारण्यात आली आणि कॅप्टन शेर खान यांना माघारी येण्याचे आदेश देण्यात आले. ते परतले. मात्र भारतीय चौकीतून काही ग्रेनेड, भारतीय सैनिकांचा गणवेष, वाइकर गनच्या मॅगझीन, गोळ्या आणि काही स्लीपिंग बॅग्ज घेऊन गेले."
टायगर हिलवर घेतला अंतिम श्वास
4 जुलै 1999 रोजी कॅप्टन शेर खान यांना टायगर हिलवर जाण्यास सांगण्यात आलं. तिथे पाकिस्तानच्या सैन्याने रक्षणाच्या तीन रांगा तयार करून ठेवल्या होत्या. त्यांना 129 A, B आणि C अशी नावं देण्यात आली होती. त्यांची दुसरी नावं होती कलीम, काशिफ आणि कलीम पोस्ट.
भारतीय जवान 129 A आणि B यांना वेगळं पाडण्यात यशस्वी झाले होते. कॅप्टन शेर संध्याकाळी 6 वाजता तिथे पोचले. परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर त्यांनी दुसऱ्या दिवशी सकाळी भारतीय सैन्यावर हल्ला चढवण्याची योजना आखली.
कर्नल अशफाक हुसैन लिहितात, "रात्री त्यांनी सर्व जवानांना एकत्र करून हौतात्म्यावर भाषण केलं. सकाळी 5 वाजता त्यांनी नमाज पठण केलं आणि कॅप्टन उमर यांच्यासोबत हल्ला करण्यासाठी रवाना झाले. ते मेजर हाशीम यांच्यासोबत 129 B चौकीवर होते. त्याचवेळी भारतीय जवानांनी त्यांच्यावर चढाई केली."
या परिस्थितीतून वाचण्यासाठी मेजर हाशीम यांनी आपल्याच तोफखान्यातून स्वतःवरच हल्ला करण्याची मागणी केली. शत्रू जेव्हा खूप जवळ येतो तेव्हा बरेचदा अशी मागणी केली जाते.
कर्नल अशफाक हुसैन पुढे लिहितात, "आमच्या तोफांचे गोळे त्यांच्या सभोवताली पडत होते. पाकिस्तानी आणि भारतीय जवानांची हाताने लढाई सुरू होती. तेवढ्यात एका भारतीय जवानाचा एक संपूर्ण 'बर्स्ट' कॅप्टन शेर खानला लागला आणि ते कोसळले. शेर खान त्यांच्या सहकाऱ्यांसोबत शहीद झाले."
इतर पाकिस्तानी सैनिकांना तर भारतीय जवानांनी तिथेच पुरलं. मात्र कॅप्टन शेर खान यांच्या पार्थिवाला आधी श्रीनगर आणि नंतर दिल्लीला नेण्यात आलं.
मरणोत्तर निशान-ए-हैदर
ब्रिगेडिअर बाजवा सांगतात, "मी त्यांचं पार्थिव खाली उतरवण्यास सांगितलं नसतं आणि ते पाकिस्तानला पाठवण्याचा आग्रह केला नसता तर त्यांचं नाव कुठेही आलं नसतं. त्यांना मरणोत्तर पाकिस्तानचा सर्वोच्च वीरता पुरस्कार असलेला निशान-ए-हैदर देण्यात आला. हा सन्मान आपल्या परमवीर चक्राच्या बरोबरीचा आहे."
त्यांनंतर त्यांचे थोरले भाऊ अजमल शेर यांनी एक प्रतिक्रिया दिली, "मी अल्लाचा आभारी आहे की आमचे शत्रूही भेकड नाही. भारत भेकड आहे, असं जर कुणी म्हणालं तर मी म्हणेन नाही. कारण त्यांनी कर्नल शेर हिरो होते, हे जाहीरपणे म्हटलं."
अंतिम निरोप
कॅप्टन कर्नल शेर खान यांच्या पार्थिवाचं अंतिम दर्शन घेण्यासाठी 18 जुलै 1999च्या मध्यरात्रीपासूनच कराची आंतरराष्ट्रीय विमानतळावर शेकडो सैनिक गोळा होऊ लागले होते. त्यांच्या मूळ गावाहूनही त्यांचे दोन भाऊ आले होते.
कर्नल अशफाक हुसैन लिहितात, "पहाटे 5 वाजून 1 मिनिटांनी विमानाने धावपट्टीला स्पर्श केला. त्याच्या मागच्या बाजूने दोन शवपेट्या काढण्यात आल्या. एकात कॅप्टन कर्नल शेर खान यांचं पार्थिव होतं. दुसऱ्यात ठेवलेल्या मृतदेहाची ओळख अजून पटलेली नव्हती."
त्या शवपेट्या अॅम्ब्युलन्समधून त्या स्थळी नेण्यात आल्या जिथे हजारो सैनिक आणि सामान्य नागरिक जमलेले होते. बलूच रेजिमेंटच्या जवानांनी त्या पेट्या उतरवून लोकांसमोर ठेवल्या. शवपेट्या जमिनीवर ठेवण्यात आल्या आणि एकाने नमाजे जनाजा वाचली.
नमाज पठणानंतर शवपेट्या पु्न्हा पाकिस्तानी हवाई दलाच्या विमानात चढवण्यात आल्या.
कॅप्टन कर्नल शेर खान यांच्या पार्थिवाला कोर कमांडर मुजफ्फर हुसैन उस्मानी, सिंध प्रांताचे गर्व्हर्नर मामून हुसैन आणि खासदार हलीम सिद्दिकी यांनी खांदा दिला.
तिथून विमान इस्लामाबादेत पोहोचलं. तिथे पुन्हा एकदा नमाजे जनाजाचं पठण झालं. विमानतळावर पाकिस्तानचे राष्ट्रपती रफीक तारड उपस्थित होते.
त्यानंतर कॅप्टन कर्नल शेर खान यांचं पार्थिव त्यांच्या मूळ गावी नेण्यात आलं. तिथे हजारो लोकांनी पाकिस्तानी सैन्याच्या या शूर शिपायाला अंतिम निरोप दिला.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)