वर्ल्ड कप 2019 : धोनीला 'ते' ग्लोव्ह्ज घालण्याची परवानगी ICCने नाकारली

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या वर्ल्ड कप स्पर्धेत लष्कराच्या पॅरा कमांडो दलाचं बोधचिन्ह असलेले ग्लोव्ह्ज घालता येणार नाहीत. यासंदर्भात बीसीसीआयने केलेली विनंती आयसीसीने फेटाळली आहे.

विकेटकीपिंग ग्लोव्ह्जवर अशा स्वरुपाचं बोधचिन्ह वापरता येणार नाही असं आयसीसीने स्पष्ट केलं आहे.

आयसीसीच्या प्रसिद्धी पत्रकानुसार, स्पर्धेच्या नियमांनुसार खेळाडूंना कपडे किंवा अन्य कोणत्याही गोष्टीवर कोणताही वैयक्तिक संदेश, लोगा लावता येणार नाही. याव्यतिरिक्त विकेटकीपिंग ग्लोव्ह्जसंदर्भातील नियमांचं हे उल्लंघन आहे.

भारतीय संघाने वर्ल्ड कपची सुरुवात दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या विजयाने केली. मात्र या सामन्यापेक्षा धोनीच्या ग्लोव्ह्जचीच चर्चा झाली.

अशा स्वरुपाचं बोधचिन्ह असलेले ग्लोव्ह्ज घालू नये असं आयसीसीने बीसीसीआयला सूचित केलं होतं. मात्र हे बोधचिन्ह कोणत्याही व्यावसायिक उपक्रमाचा भाग नाही. धार्मिक विषय नाही तसंच यातून कोणत्याही राजकीय विचारसरणी मांडण्याचा प्रयत्न नाही असं बीसीसीआयने आयसीसीला सांगितलं. कोणत्याही नियमांचा भंग होत नसल्याने धोनीला बोधचिन्ह असलेले ग्लोव्ह्ज वापरण्याची परवानगी द्यावी असं बीसीसीआयने म्हटलं होतं.

यानंतर सोशल मीडियावर धोनीला मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळाला होता. धोनीला हे ग्लोव्ह्ज घालू द्यावेत असं अनेकांनी म्हटलं होतं.

आयसीसीच्या नियमांनुसार आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात खेळाडूला कोणतेही राजकीय, धार्मिक किंवा वांशिक संदेश दाखवता येत नाहीत.

त्याचाच आधार घेत धोनीनं या पुढील वर्ल्ड कपच्या सामन्यात इंडियन पॅरा स्पेशल फोर्सच्या रेजिमेंटल डॅगरचं चिन्ह असलेले ग्लोव्ह्ज घालू नयेय अशी विनंती ICCने BCCIकडे केली आहे.

ग्लोव्ह्ज तयार करणाऱ्या कंपनीचा लोगो सोडून इतर कोणतंही चिन्ह नसावं, असं ICCने सांगितलं आहे.

टीम इंडियाने वर्ल्ड कप अभियानाची सुरुवात दमदार विजयाने केली. 2019च्या वर्ल्ड कपमधली दक्षिण आफ्रिकेविरुद्धची पहिली मॅच भारताने 6 विकेट्सनी जिंकली आहे.

जसप्रीत बुमराह, युझवेंद्र चहल आणि रोहित शर्मा या विजयाचे शिल्पकार ठरले. मात्र मॅचनंतर महेंद्रसिंग धोनीच्या ग्लोव्ह्जची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.

धोनीचं लष्कराप्रती प्रेम सर्वश्रुत आहे. याआधी धोनीचे कॅमाफ्लॉज ग्लोव्ह्ज चर्चेत होते. बुधवारी झालेल्या मॅचमध्ये धोनीच्या ग्लोव्ह्जवर इंडियन पॅरा स्पेशल फोर्सच्या रेजिमेंटल डॅगरचं चिन्ह होतं. धोनीचे ग्लोव्ह्ज दाखवणारे स्क्रीनशॉट्स सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत.

दरम्यान ICCच्या या विनंतीनंतर धोनीने त्याचे ग्लोव्ह्ज मॅचमध्ये वापरावेत असं त्याच्या चाहत्यांचं म्हणणं आहे. ट्विटरवर #DhoniKeepTheGlove असा ट्रेंड सध्या चालू आहे.

उज्ज्वल चौधरी ट्विटरवर लिहितात, "त्या (ग्लोव्ह्जवरील) चिन्हाचा अर्थ बलिदान असा होतो. ते आमच्या लष्कराचं बोधचिन्ह आहे. ती आमची ओळख आहे. धोनीला त्याचे ग्लोव्ह्ज काढायला सांगू नका, ही आमची विनंती आहे. धोनी आम्ही तुझ्यासोबत आहोत."

अजय यादव लिहितात, "बलिदान म्हणजे त्याग. हे इंडियन पॅरा स्पेशल फोर्सचं बोधवाक्य आहे. धोनीसारख्या माणसानं ते त्याच्या खेळातही आणलं आहे."

या व्यतिरिक्त राजकीय पक्षांकडूनही धोनीला पाठिंबा मिळत आहे.

धोनीने ICCच्या कोणत्याही नियमांचं उल्लंघन केलं नसल्याचं काँग्रेसचे नेते अभिषेक मनु सिंघवी यांनी म्हटलं आहे.

2011 मध्ये धोनीला पॅराशूट रेजिमेंटमध्ये लेफ्टनंट कर्नल हे मानद पद देण्यात आलं. चार वर्षांनंतर धोनीने पॅरा ब्रिगेडचं प्रशिक्षणही पूर्ण केलं होतं.

भारतीय टीमचे माजी कर्णधार जगदीश डांगी म्हणतात, महेंद्रसिंग धोनीला सलाम. त्याने आपल्या विकेटकीपिंग ग्लोव्ह्जवर बलिदान लिहिलेला इनसिग्निया प्रिंट करून घेतला आहे.

विवेक सिंग म्हणतात, "धोनीचे ग्लोव्ह्ज नीट पाहिले तर हा रेजिमेंटल डॅगर लिजंडरी दर्जाचा आहे. या कारणांमुळेच धोनीचे चाहते जगभर पसरले आहेत. लष्कराप्रति आदर व्यक्त केल्याबद्दल मनापासून धन्यवाद. रेजिमेंटल डॅगर इनसिग्निया भारतीय पॅरा स्पेशल फोर्सचं प्रतीक आहे."

राम नावाच्या युझरने ट्वीट केलंय की "याचसाठी आम्ही तुझ्यावर प्रेम करतो धोनी. तू आपल्या पॅरा मिलटरीप्रती जे प्रेम आणि पाठिंबा व्यक्त केलास त्याबद्दल आभारी आहोत."

भारतीय लष्करातील पॅराशूट युनिट जगातील सगळ्यांत प्रदीर्घ इतिहास असलेल्या एअरबोर्न युनिटपैकी एक आहे. 50व्या भारतीय पॅराशूट ब्रिगेडची स्थापना 27 ऑक्टोबर 1941 रोजी झाली होती.

ब्रिटिशांच्या 151 पॅराशूट बटालियन, ब्रिटिश इंडियन आर्मी 152 भारतीय पॅराशूट बटालियन, 153व्या गोरखा पॅराशूट बटालियन यांचं मिळून पॅराशूट युनिट तयार झालं होतं.

पॅराशूट रेजिमेंटचे नऊ स्पेशल फोर्सेस, पाच एअरबोर्न, दोन टेरिटोरिअल आर्मी आणि एक काऊंटर इन्सरजन्सी (राष्ट्रीय रायफल्स) बटालियन आहेत.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)