IndvsNew: ईश सोधी, भारतीय वंशाचा ईश असा बनला न्यूझीलंडचा फिरकीपटू

    • Author, पराग फाटक
    • Role, बीबीसी मराठी

आई-वडिलांनी देश बदलला की मुलांचं भावविश्व बदलतं. लुधियाना ते ऑकलंड हे संक्रमण पेलणारा ईश सोधी वर्ल्ड कपमध्ये न्यूझीलंडच्या संघाचा अविभाज्य भाग आहे. स्थलांतराची जागतिक घडामोडीतील आणखी एक कहाणी.

2019 वर्ल्ड कपसाठी 23 एप्रिल ही डेडलाईन होती. न्यूझीलंडने एकवीस दिवस आधीच म्हणजे 2 तारखेला संघ जाहीर केला. या संघातल्या दोन नावांवर चर्चा झाली. एक होता टॉम ब्लंडेल. संघ जाहीर झाला तेव्हा त्याने एकही वनडे खेळलेली नव्हती. त्यामुळे न्यूझीलंडने वर्ल्ड कपसाठी अनुनभवी कीपरला संधी दिली.

या संघातलं दुसरं चर्चित नाव म्हणजे ईश सोधी. भारतात जन्मलेला आणि न्यूझीलंडच्या वर्ल्ड कप संघात निवड झालेला ईश पहिलाच खेळाडू ठरला होता. ईशची कहाणी स्थलांतराच्या जागतिक प्रक्रियेला साधर्म्य साधणारी.

ईश सोधी असं चार अक्षरी काटेकोर नाव असलेल्या इशचं संपूर्ण नाव आहे इंदरबीर सोधी. त्याचा जन्म लुधियानाचा. अगदी 'पंजाब दा पुत्तर'.

ईशचे बाबा डॉ. राज सोधी हे डोळ्यांचे डॉक्टर आहेत. इशची आई शिक्षिका आहेत. ईश चार वर्षांचा असताना डॉ. सोधी यांनी न्यूझीलंडला जाण्याचा निर्णय घेतला.

सोधी कुटुंबीय ऑकलंडला स्थायिक झालं. इशचं भावविश्व बदललं. लुधियानासारख्या गजबजलेल्या शहरातून ईश थेट सुशेगात ऑकलंडमध्ये गेला.

आर्थिकदृष्ट्या सुखवस्तू पार्श्वभूमी असल्याने इशचं बालपण चांगल्या वातावरणात गेलं. करिअरमध्ये महत्त्वाच्या टप्प्यावर इशने वडिलांना क्रिकेट आवडत असल्याचं सांगितलं.

क्रिकेटमध्येच करिअर करण्याचा विचार असल्याचं ईशने सांगितलं. न्यूझीलंडमध्ये शिस्तबद्ध क्रीडा संस्कृती आहे. बहुतांश मुलं शिक्षण सुरू असताना कोणता ना कोणता खेळ खेळतातच. डॉक्टर पालकांची मुलं डॉक्टर होतात असं दिसतं. परंतु डॉ. सोधींनी असा अट्टाहास केला नाही.

वडिलांच्या सल्ल्यानुसार इशने घराजवळच्या पेपटेयटो क्रिकेट क्लबमध्ये प्रवेश घेतला. क्रिकेटर होण्याचा ईशचा संकल्प पक्का होता. परंतु पेपटेयटो हे न्यूझीलंड क्रिकेटच्या मुख्य प्रवाहापासून थोडं बाजूला आहे. म्हणून ईशने दीपक पटेल आणि मॅट हॉर्न या न्यूझीलंडच्या माजी क्रिकेटपटूंकडे प्रशिक्षण घ्यायला सुरुवात केली.

ईशने वेगवान गोलंदाज म्हणून खेळायला सुरुवात केली. परंतु पटेल यांनी ईशला स्पिनर होण्यासंदर्भात सूचना केली. पटेल यांचा सल्ला ईशने प्रमाण मानला. वेगवान गोलंदाजी हे न्यूझीलंडचं अस्त्र. एकापेक्षा एक वेगवान गोलंदाज न्यूझीलंडच्या फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये घडतात.

परंतु दर्जेदार स्पिनरची त्यांना चणचण जाणवते. डॅनियल व्हेटोरीने वर्षानुवर्षे स्पिन बॉलिंगची जबाबदारी सांभाळली. परंतु व्हेटोरीच्या निवृत्तीनंतर न्यूझीलंडला एका अव्वल स्पिनरची आवश्यकता होती.

स्वत: ऑफस्पिनर असणाऱ्या पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली स्पिनर ईश सोधी म्हणून उदयाला आला.

नॉदर्न ड्रिस्ट्रिक्ट या न्यूझीलंडमधील स्थानिक संघाचं ईश प्रतिनिधित्व करतो. या संघासाठी खेळताना चांगली कामगिरी केल्याने ईशची निवड न्यूझीलंड अ संघासाठी करण्यात आली.

2012 मध्ये झालेल्या U19 वर्ल्डकपमध्ये उन्मुक्त चंदच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने जेतेपदाची कमाई केली होती. त्याच स्पर्धेत ईश न्यूझीलंड संघाचा भाग होता.

2013 मध्ये न्यूझीलंडने इशला कसोटी पदार्पणाची संधी दिली. बांगलादेशमध्ये चितगावच्या फिरकीला पोषक खेळपट्ट्यांवर न्यूझीलंडने इशला संघात समाविष्ट केलं. दोनच वर्षांत ईशने न्यूझीलंडची वनडे जर्सी परिधान केली. 2 ऑगस्ट 2015 रोजी ईशने हरारेत झिम्बाब्वेविरुद्ध वनडे पदार्पण केलं.

ईशने आतापर्यंत 30 वनडे आणि 17 टेस्टमध्ये न्यूझीलंडचं प्रतिनिधित्व केलं आहे. ईशचे आकडे संस्मरणीय नक्कीच नाहीत. मात्र न्यूझीलंड संघाचा आक्रमक फिरकीपटूचा शोध ईशच्या रूपात पूर्ण झाला आहे. ईशच्या बॉलिंगवर जोरदार आक्रमण करण्याचा बॅट्समनचा प्रयत्न असतो. यातूनच त्याच्या बॉलिंगवर भरपूर रन्स होतात. परंतु यातूनच ईशला विकेट्स मिळतात. जशा संधी मिळतील तशी ईशच्या कामगिरीत, आकडेवारीत सुधारणा होईल.

शमुळे डावपेच कळू शकतात

ईशला इंग्रजीच्या बरोबरीने पंजाबी आणि हिंदी या दोन्ही भाषा व्यवस्थित येतात. त्यामुळे भारत आणि पाकिस्तानविरुद्ध खेळताना प्रतिस्पर्धी खेळाडू काय बोलत आहेत हे ईशला रीतसर कळतं.

आयपीएल पदार्पण

आयपीएलमध्ये स्पिनर्सची कामगिरी चांगली होत असूनही इश सोधीकडे आयपीएल लिलावात दुर्लक्ष झालं होतं. मात्र गेल्या वर्षी राजस्थानने 16वर्षीय स्पिनर झहीर खानऐवजी ईश सोधीला संघात समाविष्ट केलं. याआधी ईशकडे ऑस्ट्रेलियातील बिग बॅश ट्वेन्टी-20 स्पर्धेत अडलेड स्ट्रायकर्स संघासाठी खेळण्याचा अनुभव होता.

चंदिगडमध्ये भेटतात सोधी कुटुंबीय

ईश आणि त्याचे कुटुंबीय ऑकलंडमध्ये राहत असले तरी त्यांचे नातेवाईक भारतात, पंजाबमध्ये आहेत. आयपीएल स्पर्धेच्या निमित्ताने ईश दीड महिना भारतात असतो. राजस्थान रॉयल्सच्या मॅचेस चंदिगडला असल्या की सोधी कुटुंबीयांचं गेट टुगेदर होतं. खन्ना, फिल्लोर आणि पंचकुला या ठिकाणची नातेवाईक मंडळी चंदिगडमध्ये जमतात.

श भारताकडून खेळू शकला असता का?

पालक भारतातच राहिले असते तर इश देशातच लहानाचा मोठा झाला असता. परंतु आपली लोकसंख्या प्रचंड आहे. संघात अकरा खेळाडू असतात पण या अकरात येण्यासाठी हजारो जण शर्यतीत असतात. गेल्या दहा वर्षांत भारताने वनडेत वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, जयंत यादव, युझवेंद्र चहल, करण शर्मा, अक्षर पटेल, परवेझ रसूल, रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा यांना संधी दिली आहे. ही नावं पाहता, ईशला भारताकडून खेळण्याची शक्यता अत्यंत कमी होती. मात्र न्यूझीलंडमध्ये ईशचं स्वप्न साकार होऊ शकलं.

न्यूझीलंडचे भारतीय खेळाडू

न्यूझीलंडच्या संघात याआधी भारतीय वंशाचे अनेक खेळाडू खेळले आहेत. 1992 वर्ल्डकपमध्ये न्यूझीलंडने दीपक पटेल या ऑफस्पिनरला पहिली ओव्हर देण्याचा प्रयोग केला होता. मात्र दीपक यांचा जन्म केनियातील नैरोबी इथं झाला होता. त्यांनी इंग्लंडमध्ये वुस्टरशायर काऊंटी संघाचं अनेक वर्ष प्रतिनिधित्व केलं. योगायोग म्हणजे दीपक हेच ईशचे प्रशिक्षक आहेत.

वेलिंग्टनमध्ये लहानाचा मोठा झालेल्या जीतन पटेलने न्यूझीलंडच्या टेस्ट संघात स्थान मिळवलं होतं. ऑकलंडमध्ये राहणारा रॉनी हिरा न्यूझीलंडच्या ट्वेन्टी-20 संघात होता. मात्र त्याचं राष्ट्रीय संघातलं अस्तित्व नाममात्र ठरलं.

मूळच्या आंध्र प्रदेशच्या तरुण नेथुलाने न्यूझीलंडमध्ये प्रदीर्घ काळ फर्स्ट क्लास क्रिकेट खेळलं. नेथुलाने पाच वनडेत न्यूझीलंडचं प्रतिनिधित्वही केलं. मात्र वाढत्या वयामुळे त्याला मिळणाऱ्या संधी मर्यादित राहिल्या.

गुजरातची पार्श्वभूमी असणारा जीत रावल हा आता न्यूझीलंडचा टेस्ट ओपनर म्हणून स्वत:ला प्रस्थापित करत आहे. मजबूत तंत्रकौशल्य हे जीतच्या बॅटिंगचं वैशिष्ट्य आहे.

ईशच्या वर्ल्ड कपवारीने न्यूझीलंडमधील भारतीय वंशाच्या तसंच भारतात जन्मलेल्या मात्र आता न्यूझीलंडमध्ये राहणाऱ्या खेळाडूंना नवी संजीवनी मिळाली आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)