तालिबान: रेफ्युजी कॅम्प ते वर्ल्ड कप- अफगाणिस्तान क्रिकेटची अविश्वसनीय भरारी

    • Author, पराग फाटक
    • Role, बीबीसी मराठी

रेफ्युजी कॅम्पमध्ये राहणं हे नाईलाजाचंच असतं. स्वत:चं घरदार सोडून असं राहावं लागताना प्रत्येक गोष्टीवर मर्यादा येतात. रोजच्या जगण्याची, रोजीरोटीची, जिवंत राहण्याची धडपड सुरू असते. हे उसनं आयुष्य सुटावं यासाठी प्रार्थना केल्या जातात.

चहूबाजूंनी कोंडी झालेल्या स्थितीत खेळांचा विचार सुटणं अविश्वसनीय. पण अफगाणिस्तानच्या बाबतीत हे खरं आहे. वाळवंटात ओअसिस असावं त्याधर्तीवर अफगाणिस्तान क्रिकेटचं मूळ रेफ्युजी कॅम्पमध्ये आहे.

अफगाणिस्तानचा संघ वर्ल्डकपमध्ये खेळतोय. यापैकी अनेक खेळाडूंनी रेफ्युजी कॅम्पचं जीणं अनुभवलं आहे. परिस्थितीचं रडगाणं न गाता अचंबित करणाऱ्या महत्वाकांक्षेसह अफगाणिस्तान क्रिकेटने वाटचाल केली आहे.

अफगाणिस्तानला क्रिकेट नवीन नाही. इतिहासात नजर टाकली तर 1839 मध्ये ब्रिटिश सैन्याने अफगाणिस्तानात क्रिकेट खेळल्याची नोंद आहे. मात्र ब्रिटिशांच्या वसाहती असलेल्या अन्य राष्ट्रात क्रिकेट रुजलं तसं अफगाणिस्तानमध्ये झालं नाही.

युद्ध, रक्तपात, शस्त्रं, गरिबी, उपासमारी या सगळ्यातून वाचल्यावर रेफ्युजी कॅम्पचा आधार असतो. रोज जिवंत राहण्याची शर्यत असताना क्रिकेटबाबत सूचणं अविश्वसनीय आहे परंतु अफगाणिस्तानने हे करून दाखवलं आहे.

अफगाणिस्ताच्या नागरिकांना का घ्यावा लागला रेफ्युजी कॅम्पमध्ये आश्रय

आशिया खंडाच्या मध्य, पश्चिम आणि दक्षिण भाग यांच्या मध्यस्थानी अफगाणिस्तान आहे. अफगाणिस्तानमध्ये काय होतंय यावर अमेरिका आणि रशिया या दोन शीतयुद्ध खेळणाऱ्या बड्या राष्ट्रांचं लक्ष होतं. सोव्हिएत रशियाने 1979 मध्ये अफगाणिस्तानला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला.

याचा अफगाणिस्तानने कडवा प्रतिकार केला. हा संघर्ष दहा वर्षांपर्यंत चालला. अफगाणिस्तानमधील टोळ्यांना रशियाचा विरोधक असलेल्या अमेरिकेने मदत केली. कोंडी असह्य झाल्यावर रशियाने 1989मध्ये अफगाणिस्तानातून माघार घेतली. याबरोबरंच अमेरिकेचं अफगाणिस्तानातलं स्वारस्य संपलं.

अफगाणिस्तानमध्ये सक्षम सरकार स्थापन होण्याआधीच दोन मोठ्या राष्ट्रांनी काढता पाय घेतल्याने कट्टरतावद्यांनी देशावर नियंत्रण मिळवलं. नव्वदीच्या दशकात अफगाणिस्तानात तालिबान राजवटीचा अंमल होता. तालिबानने 1996 ते 2001 या कालावधीत अफगाणिस्तानवर राज्य केलं.

अफगाणिस्तान हा कट्टरतावाद्यांचा अड्डा झाला. सप्टेंबर 2011 मध्ये अमेरिकेतील ट्वीन टॉवर्सवर झालेल्या हल्ल्यानंतर चित्र बदललं. अमेरिका आणि नाटोच्या फौजांनी तालिबानी राजवट खालसा केली. 2014च्या अखेरीस अमेरिकेच्या सैन्याने अफगाणिस्तानमधून माघार घेतली.

देशात युद्धज्वर असताना तसंच तालिबानी राजवटीच्या काळात हजारो अफगाण नागरिकांनी पाकिस्तानमध्ये आश्रय घेतला. अनेकांनी सीमेपल्याडच्या रेफ्युजी कॅम्पमध्ये आश्रय घेतला. तेच त्यांचं आयुष्य झालं.

कशी झाली क्रिकेटला सुरुवात?

ताज मलिक या पाकिस्तानात रेफ्युजी कॅम्पमध्ये राहणाऱ्या मुलाने अफगाण क्रिकेट क्लबची स्थापना केली. आज आंतरराष्ट्रीय स्तरावर लढवय्या वृत्तीने खेळणाऱ्या अफगाणिस्तान संघाची ही प्रशासकीय मुहूर्तमेढ म्हणता येईल.

नव्वदीच्या दशकात, अफगाणिस्तानमध्ये तालिबान राजवट होती. खेळ हा विषय त्यांच्या अजेंड्यावर नव्हता. क्रिकेटमध्ये कोणताही शारीरिक संपर्क नसल्याने तसंच ड्रेसकोडसंदर्भात सर्व अटींचं पालन होत असल्याने तालिबानने क्रिकेटला अनुमती दिली. याचाच परिणाम म्हणजे अला दाद नूर यांनी 1995 मध्ये अफगाण क्रिकेट फेडरेशनची स्थापना केली.

मात्र ही फक्त सुरुवात होती. या फेडरेशनला क्रिकेट नियंत्रित करणाऱ्या आयसीसी अर्थात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून अफिलिएट स्टेटस मिळायला सहा वर्षं गेली. आयसीसीच्या संघांसाठीच्या रचनेत अफिलिएट स्टेटस तिसऱ्या श्रेणीच्या संघांना मिळतं.

पाकिस्तानमधल्या रेफ्युजी कॅम्पमध्ये जगण्याचा संघर्ष सुरू असतानाही क्रिकेटचा ध्यास जपणाऱ्या ताज मलिक यांना प्रशिक्षकपदी नेमण्यात आलं. नोकरी-व्यवसायाचे व्याप सांभाळून अफगाणिस्तानचे क्रिकेटपटू खेळू लागले. सरावासाठी, स्पर्धांसाठी त्यांच्याकडे अत्याधुनिक सोयीसुविधा नव्हत्या मात्र उपजत गुणवत्तेला मेहनतीची जोड देण्यात ते जराही कमी नव्हते.

अफलिएट स्तरावर जगभरात अनेक संघ खेळत असतात. त्यांच्या स्पर्धाही होत असतात. या संघांना टक्कर देत वाटचाल करणं सोपं नाही पण अफगाणिस्तानने संघर्ष कायम सुरू ठेवला. 2008 मध्ये अफगाणिस्तानचा संघ वर्ल्ड क्रिकेट लीगच्या डिव्हिजन 5साठी पात्र ठरला. पुढच्याच वर्षी म्हणजे 2009मध्ये त्यांनी 2011 वर्ल्ड कपसाठी पात्र ठरण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. मात्र कॅनडाविरुद्ध पराभव झाल्याने वर्ल्ड कपमध्ये खेळण्याचं स्वप्न दुरावलं. मात्र सातत्यपूर्ण चांगल्या प्रदर्शनामुळे आयसीसीने अफगाणिस्तानला वनडेचा दर्जा दिला.

2010 मध्ये त्यांनी वर्ल्ड ट्वेन्टी-20 म्हणजेच ट्वेन्टी-20 वर्ल्ड कपसाठी पात्र ठरण्याचा मान मिळवला. त्यांचं आव्हान प्राथमिक फेरीतच संपुष्टात आलं. मात्र ते हौशीगवशी नाहीत हे त्यांच्या खेळातून स्पष्ट झालं. अफगाणिस्तानच्या वाटचालीत आयसीसीकडून मिळालेल्या आर्थिक मदतीचा वाटा मोलाचा आहे.

क्रिकेटची वाढ सकस व्हावी यादृष्टीने आयसीसीकडून नव्या सदस्य राष्ट्रांना आर्थिक निधीपुरवठा केला जातो. अफगाणिस्तानने या मदतीचा सकारात्मक उपयोग करून घेतला.

2013 मध्ये अफगाणिस्तानचा अफिलिएट दर्जा बदलून त्यांना असोसिएट दर्जा देण्यात आला. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने अफगाणिस्तान क्रिकेटसाठी सामंजस्य करार केला. यानुसार पाकिस्तानकडून प्रशिक्षण शिबिरं, अंपायरिंग तसंच क्युरेटर, प्रतिभाशोध शिबिरं यांच्या आयोजनात मदत केली जाते.

आणखी दोन वर्षात 2015 मध्ये अफगाणिस्तानने वर्ल्डकपसाठी पात्र ठरण्याचा मान मिळवला. मोठ्या संघांविरुद्ध खेळण्याची अफगाणिस्तानला पहिल्यांदाच संधी मिळाली. प्राथमिक फेरीच्या सहापैकी पाच सामन्यात त्यांचा पराभव झाला. स्कॉटलंडवर त्यांनी विजय मिळवला. वरकरणी ही कामगिरी सर्वसाधारण वाटू शकते परंतु जेमतेम वीस वर्षांपूर्वी औपचारिकदृष्ट्या सुरूवात करणाऱ्या अफगाणिस्तानने इतक्या कमी कालावधीत क्रिकेटमधल्या सर्वोच्च स्पर्धेत खेळण्याचा मान पटकावला.

सातत्यपूर्ण प्रदर्शन असणाऱ्या अफगाणिस्तानला आयसीसीने 22 जून 2017 रोजी कसोटी खेळण्याचा दर्जा बहाल केला. गेल्या वर्षी 14 ते 18 जून या कालावधीत बेंगळुरू इथे भारताविरुद्ध अफगाणिस्तानने कसोटी पदार्पण केलं.

सध्या सुरू असलेल्या वर्ल्ड कपमध्ये केवळ दहाच संघ आहेत. यापैकी आठ संघ आयसीसी क्रमवारीत अव्वल आठ असल्याने पात्र ठरले आहेत. वेस्ट इंडिज आणि अफगाणिस्तान संघांनी क्वालिफायर स्पर्धेत तुल्यबळ संघांवर मात करत वर्ल्ड कप वारी पक्की केली. वर्षानुवर्षे खेळणारे संघही अफगाणिस्तानला लिंबूटिंबू समजत नाहीत यावरूनच त्यांच्या बावनकशी खेळाचा प्रत्यय यावा.

डम्बुला ते डेहराडून

सुरक्षिततेच्या कारणांमुळे तसंच आयसीसीच्या मानकांनुसार स्टेडियम नसल्याने अफगाणिस्तानचे सामने तटस्थ ठिकाणी होतात. घरच्या मैदानावर मॅचेस होणं हा प्रत्येक संघासाठी महत्त्वाचा मुद्दा असतो. याचं कारण घरच्या मैदानावर खेळपट्टी कशी असणार याचा निर्णय यजमानांना घेता येतो. प्रतिस्पर्धी खेळाडूंचे कच्चे दुवे हेरून त्यानुसार खेळपट्ट्या बनवल्या जातात.

याबरोबरीने घरच्या मैदानावर मॅचेस होतात तेव्हा प्रेक्षकांचा प्रचंड पाठिंबा असतो. स्टेडियम खचाखच भरलेलं असतं. गेट मनी म्हणजे तिकीट काढून स्टेडियममध्ये मॅच बघायला येणाऱ्या चाहत्यांच्या माध्यमातून यजमान बोर्डाला आर्थिक फायदा होतो. मात्र अफगाणिस्तानचे सामने तटस्थ ठिकाणी होत असल्यानं त्यांना हे फायदे मिळत नाहीत.

अफगाणिस्तानने सुरुवातीला श्रीलंकेतल्या डम्बुला इथल्या रनगिरी इंटरनॅशनल स्टेडियममध्ये काही सामने खेळले. त्यानंतर फिरकीला पोषक खेळपट्ट्यांचा विचार करून मध्यपूर्वेतील शारजा इथे सामने खेळण्याचा निर्णय घेतला. मात्र तिथेही त्यांचं बस्तान स्थिरावलं नाही.

अफगाणिस्तान क्रिकेट बोर्ड आणि बीसीसीआय यांच्यातील सामंजस्य करारामुळे अफगाणिस्तानला खेळण्यासाठी आणि सरावासाठी स्टेडियम मिळालं. हे स्टेडियम होतं दिल्लीजवळच्या ग्रेटर नोएडास्थित शहीद विजय सिंग पथिक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स. इथल्या सुविधा चांगल्या असल्याने अफगाणिस्तानच्या बोर्डाने स्टेडियमला होम ग्राऊंड म्हणून घोषित केलं.

2017 मध्ये अफगाणिस्तानने आयर्लंडविरुद्धची पाच सामन्यांची मालिका इथेच आयोजित केली. नामिबियाविरुद्धचे काही सराव सामनेही इथे खेळवण्यात आले. मात्र अफगाणिस्तानच्या वाट्याला स्थिरता नव्हती. खाजगी लीगचं आयोजन केल्याप्रकरणी बीसीसीआयने या स्टेडियमध्ये सामने खेळवण्यास बंदी घातली. अफगाणिस्तानचा होम ग्राऊंडचा शोध पुन्हा सुरू झाला.

डेहराडूनमध्ये हा शोध संपला. डेहराडूनचं राजीव गांधी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम हे आता अफगाणिस्तानचं होम ग्राऊंड झालं आहे. विशेष म्हणजे हे स्टेडियम अनेक दर्दी चाहत्यांनाही ठाऊक नव्हतं. नवं स्टेडियम आहे. शांत वातावरणात वसलेल्या डेहराडूनमध्ये अफगाणिस्तानच्या निमित्ताने आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा नारळ फुटला आहे.

अफगाणिस्तानने बांगलादेश आणि आयर्लंडविरुद्ध मालिका इथे खेळल्या आहेत. निवासी शाळांसाठी प्रसिद्ध डेहराडूनमध्ये अफगाणिस्तानचा डेरा स्थिरावताना दिसतो आहे. मायभूमीत चाहत्यांच्या प्रचंड पाठिंब्यात खेळणं अफगाणिस्तानच्या नशिबी नाही. जे नशिबी नाही त्याने वाईट वाटून घेण्याऐवजी अफगाणिस्तानने पर्यायांचा विचार करून कृतीशील दृष्टिकोन अंगीकारला आहे.

अफगाणिस्तानच्या खेळाडूंच्या नशिबी स्थलांतर होतं. अफगाणिस्तान टीमलाही ते चुकलेलं नाही. श्रीलंकेतल्या डंबुलापासून सुरू झालेला त्यांचा प्रवास डेहराडूनपर्यंत आला आहे. भविष्यात परिस्थिती सुधारली तर अफगाणिस्तानमध्येच आंतरराष्ट्रीय सामने आयोजित झाले तर स्थलांतराचं मोठ्ठं वर्तुळ पूर्ण होईल.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)