लोकसभा निकाल: 17व्या लोकसभेत नरेंद्र मोदी यांच्या भाजपला विरोधी पक्ष फक्त नावापुरता असेल

    • Author, संजॉय मुजूमदार
    • Role, डेप्युटी एडिटर, बीबीसी भारतीय भाषा

या लोकसभा निकालांकडे कोणत्याही दृष्टिकोनातून पाहिलं तरी ते उल्लेखनीयच आहेत. आणि ऐतिहासिकही.

इंदिरा गांधीनंतर लोकसभा निवडणुकांमध्ये सलग बहुमत मिळवणारे नरेंद्र मोदी हे पहिलेच पंतप्रधान आहेत. भाजपने पश्चिम आणि उत्तर भारतातले त्यांचे गड तर राखलेच, शिवाय पूर्व आणि दक्षिण भारतातही मुसंडी मारली.

काँग्रेसने आपल्या मतांचा टक्का वाढवला खरा, पण त्यांना आपल्या जागा काही विशेष वाढवता आल्या नाहीत.

काँग्रेससाठी सगळ्यांत मोठा धक्का राहुल गांधींचं अमेठीमधून निवडणूक हरणं, हा होता. 1999 नंतर पहिल्यांदाच काँग्रेसचा हा गड ढासळला आहे. स्वतंत्र भारताच्या इतिहासात आजवर फक्त तीनदा काँग्रेसच्या हातून अमेठीची जागा गेली आहे.

मोदींची जादू

भाजपचा दणदणीत विजय हा फक्त आणि फक्त मोदींमुळे झाला. नरेंद्र मोदी हे इंदिरा गांधींनंतरचे सगळ्यांत शक्तिशाली पंतप्रधान बनले आहेत, असं म्हटलं तरी वावगं ठरू नये.

अनेक कमकुवत बाजू असताना, विशेषतः अनेक उमेदवारांनी मागच्या निवडणुकीत दिलेली वचनं पूर्ण केली नसताना, मोदी थेट मतदारांशी संवाद साधण्यात यशस्वी ठरले.

याचाच अर्थ असा की विरोधी पक्षांनी जात, धर्म, वर्ग, शहरी, ग्रामीण या मुद्द्यांवर विभागलेल्या जनतेला एकत्र करण्याचा प्रयत्न केला असला तरी मोदींच्या करिष्मापुढे तो फिका पडला.

नरेंद्र मोदींनी हे सिद्ध केलं की हिंदुत्वाचा मुद्दा राष्ट्रवादाच्या मुद्द्याला जोडला की रोजगार, आर्थिक प्रगती, शेतीसंकट असे महत्त्वाचे मुद्दे बाजूला सारता येतात.

विरोधी पक्षांचा धुव्वा

विरोधी पक्षांच्या सुमार कामगिरीला राहुल गांधीच जबाबदार आहेत असं चित्र रंगवलं जात आहे आणि काही अशी त्यात तथ्यही आहे.

नरेंद्र मोदींवर हल्ला करण्यासाठी त्यांनी दिलेली 'चौकीदार चोर है' ही घोषणा त्यांच्यावरच उलटली. प्रादेशिक पक्षांशी आघड्या न करण्याचं धोरण किंवा त्यात आलेलं अपयश, उमेदवारांची उशीराने केलेली निवड आणि प्रियंका गांधींना शेवटच्या मिनिटाला प्रचारात आणण्याचा निर्णय यामुळे त्यांच्या अपयशावर शिक्कामोर्तब झालं.

पण तरीही भाजपने फक्त राहुल गांधीचं नाही तर प्रत्येक मोठ्या विरोधी पक्षनेत्याला धोबीपछाड दिली हे सत्य नाकारून चालणार नाही.

अखिलेश यादव आणि मायावती यांनी एकत्र येत उत्तर प्रदेशमध्ये महाआघाडी स्थापन केली. सुरुवातीला असं वाटलं होतं की महागठबंधन भाजपला चांगली लढत देईल, पण तसं काही होताना दिसलं नाही.

तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जींनी नरेंद्र मोदींविरुद्ध युद्ध पुकारलं होतं, पण त्यांना त्यांच्याच अंगणात, पश्चिम बंगालमध्ये मात मिळाली .

जुने मित्रपक्ष जे आता भाजपसोबत नव्हते, त्यांनाही अपयशाचा सामना करावा लागला. ओडिशाचे नविन पटनायक आणि TRS चे नेते चंद्रशेखर राव, ज्यांनी विरोधी पक्षांची मोट बांधण्याचा प्रयत्न केला आणि स्वतःला पंतप्रधान पदाचे दावेदार म्हणून प्रोजेक्ट केलं, एक प्रकारे भाजपने त्यांना आपली जागा दाखवून दिली.

विस्तारवादी भाजप

भारताचा राजकीय पटलावर आज भाजपचंच साम्राज्य दिसतं आहे. आश्चर्य आहे की भाजपने 2014 सारखंच यश संपादित केलं आहे. किंबहुना थोडं जास्तच. गुजरात, राजस्थान, हिमाचल प्रदेश, दिल्ली, उत्तराखंड, झारखंड, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशमधले भाजपला जोरदार यश मिळालं आहे.

हो, उत्तर प्रदेशमध्ये भाजपला फटका बसला, त्यांच्या काही जागा कमी झाल्या. पण बिहार, महाराष्ट्र, कर्नाटक आणि आसाममध्ये चांगली कामगिरी करत त्यांनी आपल्या जागा वाढवल्या आहेत.

पण भाजप आणि मोदी-शाह या जोडगोळीसाठी सगळ्यांत आनंदाची बातमी म्हणजे नव्या राज्यांमध्ये पाय रोवणं.

बंगाल, ओडिशा आणि तेलंगणामध्ये भाजपचा रितसर प्रवेश झाला आहे. भाजपचा या राज्यांमध्ये वाढता प्रभाव प्रादेशिक पक्षांसाठी धोकादायक आहे.

भाजपने पश्चिम बंगालमध्ये विलक्षण कामगिरी केली आहे. मुळात आपल्याला इतकं यश मिळेल याची आशी आशा भाजपलाही नसेल. भरीस भर म्हणून डाव्यांना धुळ चारून आपण ही कामगिरी केली याचा भाजप, विशेषतः राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला आनंद असेल. कम्युनिस्टांचा गड असणाऱ्या पश्चिम बंगालमध्ये आता त्यांचा एकही खासदार नाही.

घराणेशाहीचा अंत

राहुल गांधींचा अमेठीमधला पराभव दाखवून देतो की भारतात घराणेशाहीच्या राजकारणाला घरघर लागली आहे.

अर्थात भाजपमध्येही घराणेशाही आहे. हिमाचल प्रदेशमध्ये अनुराग ठाकूर, राजस्थानमध्ये दुष्यंत सिंग आणि महाराष्ट्रात पंकजा मुंडे किंवा पुनम महाजन अशी काही उदाहरणं देता येतील, पण घराणेशाहीचं प्राबल्य काँग्रेस आणि इतर प्रादेशिक पक्षांत जास्त आहे.

त्यामुळेच कदाचित मतदारांनी काँग्रेस आणि इतर पक्षांच्या घराणेशाहीला नाकारलं आहे. राहुल गांधी सोडून ज्योतिरादित्य सिंधिया, मिलिंद देवरा, अशोक चव्हाण अशा नावांनाही मतदारांनी नाकारलं आहे.

या यादीत मुलायम सिंह यादव यांची सून डिंपल यादव, लालू प्रसाद यादव यांची मुलगी मिसा भारती आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांची मुलगी कविता यांचीही नावं टाकायला हवीत.

सगळेच हरले असं नाही. महाराष्ट्रात सुप्रिया सुळे आणि तामिळनाडूमध्ये डीमकेचे माजी प्रमुख करूणानिधी यांची मुलगी कन्नीमोळी आणि पुतण्या दयानिधी मारन यांचा विजय झाला. पण या निवडणुकीत एक गोष्ट स्पष्ट झाली की वाडवडिलांच्या नावावर आता मतं मागता येणार नाहीत.

दक्षिणेकडची राज्यांची काँग्रेसला मदत

भाजपाचा झालेला दणदणीत विजय पाहाता प्रश्न पडतो की भारतातली एकेकाळचा सगळ्यांत मोठा आणि जुना पक्ष काँग्रेस कुठे हरवला आहे? दक्षिणेकडच्या राज्यांनी काँग्रेसला हात दिला नसता तर त्यांचं अस्तित्वच राहिलं नसतं.

काँग्रेसने ज्या काही 50 जागा जिंकल्या आहेत त्यातल्या जवळपास 30 तर केरळ, तामिळनाडू, कर्नाटक आणि तेलंगणांमधून आल्या आहेत. उरलेल्या पंजाबमधून.

महाराष्ट्र, बिहार आणि उत्तर प्रदेशमधून काँग्रेस जवळपास हद्दपार झाली आहे. हरियाणामध्ये त्यांना चांगली कामगिरी करता आली नाही. आणि छत्तीसगड, राजस्थान तसंच मध्य प्रदेशमध्ये त्यांचा प्रभाव ओसरला आहे. गंमत म्हणजे काही महिन्यांपूर्वीच या राज्याच्या विधानसभा काँग्रेसने जिंकल्या होत्या.

राहुल गांधींच्या नेतृत्वावर अनेकांनी प्रश्नचिन्ह लावलं आहे. पण त्यांची बहीण प्रियंका गांधीही फारशी चमक दाखवू शकल्या नाहीत. मग काँग्रेस आता पर्यायी नेतृत्व शोधणार का?

भाजपप्रणित एनडीएला स्पष्ट बहुमत मिळालेलं आहे. जगन मोहन रेड्डींनी भाजपला पाठिंबा दिला तर त्यांची ताकद अजून वाढणार, म्हणजे आता संसदेत विरोधी पक्ष फक्त नावापुरता असेल.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)