You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
लोकसभा निकालः नरेंद्र मोदी आणि भाजप यांच्या यशाची 10 कारणं
लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपनं गेल्या वेळेच्याच कामगिरीची पुनरावृत्ती केली आहे. काही एक्झिट पोलनं भाजपच्या जागा घटतील, असा अंदाज व्यक्त केला होता. मात्र हे अंदाज फोल ठरवत मतदारांनी नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब केलं.
भाजपच्या या यशामागची नेमकी कारणं आहेत तरी काय?
1. मोदींचा करिश्मा
"पंतप्रधान नरेंद्र मोदींचा करिश्मा हा त्यांच्या घोडदौडीसाठी कारणीभूत आहे. मोदींनी ही निवडणूक 'मोदी विरुद्ध इतर सगळे' अशी केली होती. त्यांच्यासमोर विरोधी पक्ष निष्प्रभ ठरला आहे," असं ज्येष्ठ पत्रकार व्यंकटेश केसरी सांगतात.
2. मोदींचं आव्हान न ओळखण्याची चूक
केसरींनी सांगितलं, की पंतप्रधान मोदींची भाषा, त्यांची स्ट्रॅटेजी आणि त्यांचं आव्हान नेमकं कसं आहे, हे ओळखण्यात विरोधी पक्ष कमी पडला. "मोदींचं प्रचाराचं तंत्र, त्याचं नियोजन कसं आहे, हे ओळखून या रणनीतीला काटशाह देऊ शकेल अशी रणनीती विरोधी पक्षाला आखता आली नाही.
"उलट भाजपनेच विरोधकांची रणनीती ओळखून त्यांच्याविरोधात जोरात प्रचार केला. 'चौकीदार चोर है' या घोषणेचा मोदींनाच अधिक फायदा झाला, असं केसरी म्हणाले.
3. पश्चिम बंगालमध्ये मिळालेला प्रतिसाद
"गेल्या निवडणुकीत भाजपला उत्तर प्रदेशात 72 जागा मिळाल्या होत्या. यावेळी उत्तर प्रदेशात एवढ्या जागा मिळू शकणार नाहीतच, हे हेरून भाजपनं ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये आपली शक्ती वाढवण्यास सुरुवात केली.
"ममता बॅनर्जी या अल्पसंख्यांकांचं लांगूलचालन करत आहेत हा संदेश जनतेपर्यंत पोहोचवण्यात भाजप यशस्वी ठरलं. ओडिशामध्ये मिळत असलेला प्रतिसाद हा काही त्यांना एका रात्रीत मिळाला नाही. त्यासाठी ते कित्येक दिवसांपासून झटत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये त्यांना काही फायदा झाला नाही," असं केसरी यांनी सांगितलं.
4. राहुल गांधी लोकांपर्यंत पोहोचू शकले नाहीत
राहुल गांधी यांची रणनीती अनेक स्तरांवर फ्लॉप झाली, असं मत ज्येष्ठ पत्रकार रशीद किडवई यांनी व्यक्त केलं. ते म्हणाले, "राहुल गांधी यांनी ज्या योजना सांगितल्या किंवा या सरकारविरोधात त्यांनी रान उठवण्याचा प्रयत्न केला, ते मुद्दे लोकापर्यंत पोहोचलेच नाहीत, असं दिसतंय.
"मोदींविरुद्ध कोण, असा प्रचार भाजपनं केला. त्यांच्याविरोधात आपण एक सशक्त पर्याय आहोत, हे दाखवण्यास राहुल गांधी कमी पडले. काँग्रेस प्रचारात कमी पडलं हे देखील एक कारण असू शकतं. न्याय योजना नेमकी काय आहे, हे देखील लोकांपर्यंत पोहचलं नाही."
5. सुरक्षा विषयक मुद्द्यांना महत्त्व
सुरक्षा विषयक मुद्द्यांना या निवडणुकीत महत्त्व आल्याचं दिसलं. या गोष्टीचा परिणाम मतदारांवर झाला का, असं विचारलं असता संरक्षणतज्ज्ञ नितीन गोखलेंनी सांगितलं, की "सुरक्षा हा जिव्हाळ्याचा मुद्दा असतो. समाजातील सर्वच स्तरातील लोक सुरक्षाविषयक मुद्द्यांमध्ये उत्सुक असतात. नरेंद्र मोदींच्या रूपाने देशाला एक भक्कम नेतृत्व मिळेल आणि ते देशाच्या सुरक्षाविषयीचे निर्णय खंबीरपणे घेऊ शकतील असं लोकांना वाटलं. हीच गोष्ट लोकांनी मतदानातून सांगितली."
6. रफालमध्ये खरंच भ्रष्टाचार झाला का?
रफालमध्ये भ्रष्टाचार झाला आणि तो पंतप्रधान मोदींनी स्वतः केला, असं म्हणत राहुल गांधींनी 'चौकीदार चोर है' अशी घोषणा दिली. प्रचाराच्या वेळी ते म्हणायचे 'चौकीदार...?' तर त्यांच्यासमोर बसलेली गर्दी म्हणायची, "...चोर है!".
त्यांच्या या प्रचाराचा काहीच फायदा काँग्रेसला झाला नाही का, असं विचारल्यावर गोखले सांगतात, "रफालमध्ये नेमका काय भ्रष्टाचार झाला, हे राहुल गांधी सांगूच शकले नाहीत. त्यामुळे लोकांनी त्यांच्या या घोषणेकडे दुर्लक्ष केलं."
7. राजस्थान, झारखंड आणि मध्य प्रदेशात विधानसभा गमावूनही भाजपची सरशी
विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप राजस्थान, छत्तीसगड आणि मध्य प्रदेश या राज्यात पराभव झाला. या तिन्ही राज्यातल्या काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांना पाच-सहा महिने मिळाले. असं असूनही या राज्यांमध्ये भाजप का पुढं आलं?
रायपूर येथील ज्येष्ठ पत्रकार अलोक कुमार पुतूल सांगतात, "छत्तीसगडमध्ये काँग्रेसने कर्जमाफी दिली, पण त्या कर्जमाफीची प्रक्रिया खूप लांबली. काँग्रेसनं दिलेलं आश्वासन हे फसवं आहे, असं पटवून देण्यात भाजप नेते यशस्वी ठरले. छत्तीसगडच्या निर्मितीपासून ते सध्या जे कल दिसत आहेत, तोपर्यंत 11 पैकी 10 लोकसभेच्या जागा या भाजपकडेच राहिल्या आहेत आणि या निवडणुकीतही हेच चित्र दिसलं. विधानसभेच्या निवडणुकांत तीन राज्यं हाती येऊनही काँग्रेसला त्याचा फायदा लोकसभेसाठी करून घेतला आला नाही," असं केसरींनी सांगितली.
8. जातीपातीचं राजकारण तोडण्यात यश मिळालं
जातीपातीचं राजकारण तोडण्यात मोदींना यश मिळालं, असं बीबीसी हिंदीचे रेडिओ एडिटर राजेश जोशी सांगतात.
"उत्तर प्रदेशमध्ये जातीपातीचं राजकारण हे निवडणुकांच्या केंद्रस्थानी असतं. पण मोदींनी या राजकारणाला छेद जाईल, अशी रणनीती आखली. मोदींनी त्यांची प्रतिमा हे एका उंचीवर नेऊन ठेवली आहे. मोदी हे आपल्यापैकीच एक आहेत, असं सर्व जातीजमातील लोकांना वाटतं. त्यामुळे उत्तर प्रदेशातील लोकांनी जातीचा विचार न करता मोदी म्हणतील त्यालाच मत दिलं.
"मोदींची एक युनिव्हर्सल अपील आहे. त्या अपीलमुळे उत्तर प्रदेशातील जातीची समीकरणं तुटली आहे. त्याचा फायदा भाजपला झाला," असं जोशी सांगतात.
9. हिंदुत्व आणि राष्ट्रवाद
मोदींना जातीचं राजकारण तोडण्यात यश मिळालं, पण त्यांनी धार्मिक अस्मिता आणखी टोकदार केल्याचं जोशी सांगतात.
"हिंदुत्व आणि राष्ट्रवाद हे दोन्ही मुद्दे एकच आहेत हे सांगण्यात मोदी-शाह ही जोडगोळी यशस्वी ठरली आहे. जेव्हा मोदी राष्ट्रवादाचा मुद्दा घेऊन लोकापर्यंत पोहोचतात तेव्हा लोक त्याला प्रतिसाद देतात. त्यांची प्रतिमा अशी आहे की जेव्हा ते राष्ट्रवाद हा शब्द उच्चारतात, तेव्हा असं वाटतं की त्यांच्यासोबत संपूर्ण भाजप, संघ परिवार आणि त्यांचे सर्व स्वयंसेवक एकत्र बोलत आहेत.
"बालाकोटच्या स्ट्राईकनंतर मोदींची तरुणांमधली अपील अधिक वाढली. 'घर में घुस के मारा' या वाक्याचा प्रभाव तरुणाईवर जाणवला. या राष्ट्रवादाच्या भावनेला मतात परावर्तित करण्याचं काम भाजपला करता आलं," असं जोशी सांगतात.
10. लाभार्थींनी दिली साथ
"जनधन योजना, आरोग्यासंबंधी योजना तसेच उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांनी भाजपला साथ दिली असं दिसतंय. मी केवळ राष्ट्रवादाबद्दलच बोलत नाही तर माझ्या योजनांचा लाभ मिळालेले अनेक लोक आहेत, असाच प्रचार मोदींनी केला. त्यांच्या योजनांचा लाभ ज्या लोकांना झाला आहे त्यांनी मोदींना मतदान केलं.
"राहुल गांधी यांनी म्हटलं होतं की जिंकून आल्यानंतर ते न्याय योजना आणतील. या योजनेअंतर्गत गरीब कुटुंबाला वर्षाला 72 हजार रुपये मिळणार होते. या आश्वासनाचा राहुल यांना काही फायदा झाला नाही. कारण एका बाजूला योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचवणारे मोदी होते तर दुसऱ्या हाताला भविष्यात काही देऊ, असं सांगणारे राहुल गांधी. लोकांना मोदी यांना निवडलं,'' असं जोशी सांगतात.
लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपनं गेल्या वेळेच्याच कामगिरीची पुनरावृत्ती केली आहे. काही एक्झिट पोलनं भाजपच्या जागा घटतील, असा अंदाज व्यक्त केला होता. मात्र हे अंदाज फोल ठरवत मतदारांनी नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब केलं.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)