You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
लोकसभा निकाल आणि सेन्सेक्स: निवडणूक निकालांमुळे शेअर बाजार का वधारतात?
भाजपला स्पष्ट बहुमत मिळणार आणि पुन्हा एकदा नरेंद्र मोदी सरकार बनवणार, असं सकाळपासून आलेल्या आकड्यांमधून स्पष्ट होताना दिसल्यावर सेन्सेक्सनेही मुसंडी मारली आहे.
भाजपने सकाळी अकरा वाजेपर्यंत 300हून अधिक जागांवर आघाडी घेतल्यानंतर मुंबई शेअर बाजार 40 हजार अंकांच्या पुढे गेला आहे तर निफ्टीने 12 हजार अंकांची पातळी गाठली आहे.
रुपयाही डॉलरच्या तुलनेत 0.26 पैशांनी वधारून 69.40 रुपये प्रति डॉलर झाला आहे.
आकड्यांमधून स्थिर सरकार येण्याचे संकेत असतील किंवा निकालांमधून केंद्रात प्रबळ सरकार येण्याची शक्यता दिसली की शेअर बाजारात तेजी येते. हे आतापर्यंत अनेकदा दिसून आलं आहे.
अगदी यंदाचे एक्झिट पोलचे आकडे आल्यानंतरसुद्धा मार्केटमध्ये चांगलीच उसळी दिसून आली.
जगभरातल्या आणि आशियातील प्रमुख शेअर बाजारांमध्ये पडझड होत असताना भारतीय शेअर बाजारात मात्र सकारात्मक वातावरण दिसत आहे.
शेअर बाजार आणि स्थिर सरकार, शेअर बाजार आणि सरकारी धोरणं, यांचा नेमका संबंध काय आहे? लोकसभा निकालांच्या दिवशी स्थिर सरकार येण्याचं चित्र दिसताच निर्देशांक उसळी का घेतात? किंवा कडबोळं सरकारची शक्यता दिसताच बाजार का घसरतात?
निवडणूक निकाल आणि शेअर बाजार कनेक्शन
राजकीय स्थैर्य. उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष यांची युती भाजपला पछाडेल, असा अंदाज वर्तवण्यात आला होता.
मात्र एक्झिट पोल्सनुसार NDA बाजी मारेल, असं चित्र जाहीर करण्यात आल्याने धास्ती कमी झाली आणि शेअर बाजाराने उसळी घेतली. लोकसभा निकाल हाती येताच बाजाराने आणखी झेप घेतली.
राजकारण आणि आर्थिक घडामोडी यांचा परस्परसंबंध जवळचा आहे. कोणत्या विचारसरणीचं सरकार येतं? राजकीय स्थिरता राहील का? आर्थिक धोरण कसं असेल आणि आर्थिक सुधारणांच्या कार्यक्रमाची अंमलबजावणी कशी होईल, यावर अनेक गोष्टी अवलंबून असतात.
1999 मध्ये अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील NDAला सत्तास्थापनेसाठी सर्वाधिक संधी असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. तेव्हा सेन्सेक्स 6.6 टक्क्यांनी उसळला होता.
2014मध्ये मोदीप्रणित भाजप सत्तेत येणार, अशा अंदाजांनंतर सेन्सेक्स 6.8 टक्क्यांनी वधारला होता. मात्र NDAला बहुमत गाठता येणार नाही, असा दावा करण्यात आल्यानंतर निर्देशांक 7.5 टक्क्यांनी घसरला होता.
2009 मध्ये UPA सत्तेवर येणार या अंदाजानंतर सेन्सेक्स फक्त 1.9 अंशांनी वधारला होता.
निकालांनी हुरळून जाऊ नका
आर्थिक क्षेत्रात कार्यरत कंपन्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना निकालाच्या पार्श्वभूमीवर काळजीपूर्वक व्यवहार करण्याचा सल्ला देतात. यासंदर्भात मेलच्या माध्यमातून सल्लाही दिला जात आहे.
शेअर बाजारातून मिळणारा परतावा हा आंतरराष्ट्रीय बाजारातील प्रवाह, कच्च्या तेलाच्या किमती, वित्तीय तूट, भाववाढ, व्याजदर, परकीय चलनाचं मूल्य यावर अवलंबून असतं. आंतरराष्ट्रीय बाजारात व्याजदर वाढण्याचं प्रमाण कमी झालं आहे आणि पैशांचा ओघ विकसनशील देशांच्या दिशेने सध्यातरी दिसत आहे.
सध्याच्या स्थितीबाबत बीबीसी मराठीने अर्थतज्ज्ञ अभय टिळक यांच्याशी चर्चा केली तेव्हा त्यांनी सांगितलं की, "शेअर बाजार अपेक्षा-आकांक्षांवर चालतो. स्थिर सरकार येणार हे स्पष्ट झालं की अनिश्चिततेचं सावट दूर होतं. स्थिर सरकार चांगल्या योजना राबवणार अशी बाजाराला खात्री असते."
ते पुढे म्हणतात, "शिवाय निर्णय प्रक्रिया आघाडी किंवा कडबोळं सरकारच्या तुलनेनं अधिक गतिशील असते. मित्रपक्षांच्या जागा वाढल्या तर राष्ट्रीय आर्थिक धोरणात प्रादेशिक मुद्यांचा विचार केला जाईल. संघराज्य व्यवस्थेवरील विश्वास बळकट होईल, असा विश्वास जर बाजाराला एक्झिट पोल किंवा निवडणूक निकालांमधून दिसला तर बाजारात उत्साह संचारतो."
आधीच्या सरकारने राबवलेलं धोरणं नवं सरकार पुढे चालवणार का, यात शेअरशी निगडीत व्यक्तींना स्वारस्य असतं. आधीचेच सरकार पुन्हा येणार असेल आणि त्यांचा सुधारणावादी कार्यक्रम बाजाराला पूरक वाटत असेल तर शेअर बाजाराशी संबंधित व्यक्तींकरता अंतर्गत आघाडी बळकट होते.
पण त्याच वेळी आंतरराष्ट्रीय स्तरावर तेलाचे भाव, चीन-अमेरिका व्यापारी युद्ध यावर आपलं नियंत्रण नाही. पण सरकार स्थिर असेल तर एका पातळीवरच्या गोष्टी सोप्या होतात, असं अर्थतज्ज्ञ अजय वाळिंबे सांगतात.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)