You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
लोकसभा निकाल : अमेठीच्या जनतेचा कौल स्पष्ट, स्मृती इराणींचं अभिनंदन - राहुल गांधी
'अमेठीच्या जनतेनं कौल दिला आहे. स्मृती इराणी इथून जिंकल्या आहेत आणि मी त्यांचं अभिनंदन करतो,' असं म्हणत राहुल गांधींनी अमेठीमधला आपला पराभवच मान्य केला.
लोकसभा निवडणुकीच्या निकालांचे कल स्पष्ट झाल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये राहुल गांधींनी केलेल्या या विधानानंतर अनेक तर्क-वितर्क सुरू झाले. कारण निवडणूक आयोगानं अधिकृत निकाल जाहीर करण्याआधीच राहुल गांधींनी स्वतःच स्मृती इराणींच्या विजयाची घोषणा केली.
'कौन कहता है आसमां में सुराख नहीं हो सकता...' असं ट्वीट करून स्मृती इराणी यांनी अमेठीच्या निकालावर सूचक भाष्य केलं.
काँग्रेसचा परंपरागत मतदारसंघ असलेल्या अमेठीमधून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी पिछाडीवर आहेत. भाजपच्या स्मृती इराणी जवळपास 35 हजार मतांनी आघाडीवर आहेत.
भाजपच्या झंझावातासमोर काँग्रेसची वाताहत झालेली असताना अमेठीची जागा गमावणं हा काँग्रेससाठी मोठा धक्का ठरू शकतो.
राहुल गांधी अमेठीसोबत वायनाडमधून निवडणूक लढवत होते. वायनाडमधून मात्र ते मोठ्या फरकानं आघाडीवर आहेत.
अमेठी हा काँग्रेसचा परंपरागत मतदारसंघ आहे. काँग्रेसला अमेठीमध्ये केवळ दोनदाच पराभव पत्करावा लागला होता.
1977 साली जनता दलाचे उमेदवार रवींद्र प्रताप सिंह यांनी संजय गांधींना हरवलं होतं. दुसऱ्यांदा 1998 मध्ये भाजपचे उमेदवार संजय सिंह यांनी काँग्रेसच्या कॅप्टन सतीश शर्मा यांचा पराभव केला होता.
राहुल गांधी 2004 पासून अमेठीचे खासदार
2004 पासून राहुल गांधी अमेठीचं प्रतिनिधीत्व करत आहेत. 2014 साली स्मृती इराणी यांनी राहुल गांधींना कडवी लढत दिली होती. मात्र राहुल यांनी दीड लाखांच्या मताधिक्यानं विजय मिळवला होता.
पराभवानंतरही स्मृती इराणी मतदारसंघात बऱ्याच कार्यरत होत्या. अनेक सरकारी योजना अमेठीमध्ये आणण्यातही स्मृती इराणी यांचा मोठा वाटा होता. मात्र तरीही राहुल गांधी पराभवाच्या उंबरठ्यावर असतील, अशी कल्पना राजकीय विश्लेषकांनीही केली नव्हती.
लखनऊमधील ज्येष्ठ पत्रकार अमिता वर्मा यांनी निवडणूक प्रचाराच्या काळात बीबीसीशी बोलताना सांगितलं होतं, की अमेठीमध्ये स्मृती इराणी राहुल गांधींना आव्हान देऊ शकतात, मात्र हरवू शकत नाहीत. त्या इथं येत राहिल्या हे खरं असलं तरी राहुल गांधींचेही गेल्या पाच वर्षांत इथे बरेच दौरे झाले आहेत. राहुल गांधींच्या कुटुंबातील अन्य सदस्यांनीही अमेठीचं प्रतिनिधीत्व केलं आहे आणि गांधी परिवाराचं अमेठीशी वेगळं नातं आहे. त्यामुळे अमेठीतील लोक राहुल गांधींना पराभूत करणार नाहीत.
प्रियंका गांधींनी सांभाळली होती प्रचाराची धुरा
काँग्रेसनं उत्तर प्रदेशमध्ये प्रचाराची जबाबदारी प्रियंका गांधींवर सोपवली होती. अमेठीमध्ये राहुल गांधींपेक्षाही प्रियंका गांधींनीच जास्त दौरे केले होते. राहुल गांधींनी निवडणूक अर्ज भरताना एकदाच अमेठीमध्ये मोठा रोड शो केला होता.
वायनाडमधून निवडणूक लढवण्याचा निर्णय
राहुल गांधींनी अमेठीसोबत केरळमधील वायनाडमधून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर भाजपनं त्यांच्यावर प्रचंड टीका केली होती. राहुल गांधी पराभवाच्या भीतीनं अमेठी सोडून पळ काढत असल्याचं भाजपनं म्हटलं होतं. मोदींच्या काळात उत्तर भारत आणि दक्षिण भारतात निर्माण झालेली दरी भरून काढण्यासाठी राहुल गांधी केरळमधूनही निवडणूक लढवत आहेत, असं काँग्रेसनं म्हटलं होतं.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)