वर्धा लोकसभा निकाल 2019: रामदास तडस पुन्हा येणार की चारुलता टोकस बाजी मारणार?

    • Author, श्रीकांत बंगाळे
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

"रामदास तडस साहेबांना उमेदवारी न मिळाल्यास दत्ता मेघे आणि सागर मेघे यांचे पुतळे गावोगावी जाळण्यात येईल," असं वक्तव्य अतुल वांदिले यांनी केलं आणि वर्धा मतदारसंघातील राजकारणाची चर्चा सुरू झाली.

वांदिले हे मनसेचे वर्धा जिल्हाध्यक्ष असून ते तेली समाजातून येतात. फेब्रुवारी महिन्यात तेली समाजातील मेळाव्यात त्यांनी वरील वक्तव्य केलं. त्यांच्या या वक्तव्यावरून वर्ध्याचे खासदार रामदास तडस यांना सारवासारव करावी लागली.

"मला फक्त तेली समाजच नाही, तर सगळ्या समाजातील लोक मतदान करतात," असं स्पष्टीकरण तडस यांना द्यावं लागलं.

वर्धा लोकसभा मतदारसंघासाठी भाजपनं विद्यमान खासदार रामदास तडस यांना उमेदवारी दिली आहे. तर काँग्रेसनं महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष चारुलता टोकस यांना उमेदवारी दिली आहे. प्रत्येक निवडणुकीप्रमाणे याही वेळेस वर्ध्यात जातीय समीकरणं महत्त्वाची ठरतील, असं जाणकारांचं म्हणणं आहे.

"सध्या वर्ध्यात तेली विरुद्ध कुणबी समाज अशी लढत झाली आहे. वांदिले यांनी उपस्थित केलेल्या वादामुळे तेली-कुणबी हा मुद्दा निवडणुकीच्या केंद्रस्थानी आला आहे आणि विकासाचा मुद्दा थोडा बाजूला पडला आहे. चारुलता टोकस या कुणबी समाजाच्या आहेत, तर खासदार रामदास तडस हे तेली समाजाचे आहेत. वर्ध्यात कुणबी समाजाच्या मतदारांची संख्या सर्वाधिक आहे. त्यापेक्षा काही हजारांनी कमी तेली समाजाच्या मतदारांची संख्या आहे," वर्ध्यातील टाइम्स ऑफ इंडियाचे पत्रकार बळवंत ढगे सांगतात.

तडस की टोकस?

"वर्ध्यात मुख्य लढत तडस आणि टोकस यांच्यामध्ये आहे. तडस यांचं काम चांगलं आहे. तडस यांनी वर्ध्यात पासपोर्ट कार्यालय सुरू केलं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रेल्वेचे 7 ते 8 स्टॉपेज सुरू केले. सिंचन योजनाही मार्गी लावली. त्यांचा जनसंपर्क चांगला आहे. खासदार निधीच्या खर्चाचं प्रमाण उत्तम आहे. याशिवाय सामान्यांसाठी ते नेहमी उपलब्ध असतात, याचा त्यांना फायदा होऊ शकतो. दुसरं असं की, तडस यांच्यासाठी जमेची बाजू म्हणजे आजही मोदींचा करिष्मा थोड्या प्रमाणात कायम आहे," ज्येष्ठ पत्रकार प्रशांत देशमुख सांगतात.

"असं असलं तरी परवाच वर्ध्यातल्या 70 टक्के ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे निकाल लागले. यामध्ये काँग्रेस आणि भाजप यांना जवळपास सारख्याच जागा मिळाल्या आहेत. ही आश्चर्याची गोष्ट अशासाठी आहे की, आतापर्यंत नगरपरिषद, जिल्हापरिषद, आमदार, खासदार सगळ्या ठिकाणी भाजपला बहुमत मिळालं होतं. हा पहिला ट्रेंड असा आहे की, लोकांनी काँग्रेसला थोडसं सावरून घेतलं आहे. यामुळे मग भाजपचे नेते थोडे संभ्रमात पडले आहेत," ते पुढे सांगतात.

काही स्थानिक पत्रकार तडस यांच्यासमोरील आव्हानं सांगतात.

"बेरोजगारी, सिंचनाचा प्रश्न, अनेक तालुक्यांमध्ये एमआयडीसी नाही, असे मूलभूत प्रश्न आजही कायम आहेत. संघटन पातळीवर भाजप मजबूत असलं, तरी 5 वर्षांत जी काही आश्वासन दिली होती, ती पूर्ण न होणं, हे तडस यांच्यासमोर आव्हान आहे. काही विकासकामं झालीत पण हमीभावासारखे प्रश्न कायम आहेत," असं स्थानिक पत्रकार सांगतात.

टोकस यांच्यासमोर काँग्रेसच्या गटातटांना एकत्रित आणण्याचं आव्हान आहे, असं स्थानिक पत्रकार सांगतात.

"टोकस या दोन वर्षांपूर्वी वर्ध्यात आल्या आहेत. त्या दिल्ली मुक्कामी असतात. पण माझी शेती इथं आहे, मी शेतीसाठी इथं येत असते. पक्षसंघटनेच्या कामासाठी मात्र मला दिल्ली-मुंबईला राहावं लागतं, असा टोकस यांचा दावा आहे. तसंच गेल्या 6 ते 7 निवडणुकांपासून वर्ध्यात चेहरापालट सुरू आहे. म्हणजे एकदा निवडून आलेला खासदार परत येत नाही, असा ट्रेंड आहे. आता टोकस यांच्या नवीन चेहऱ्याला लोक संधी देतील का, हे पाहावं लागेल," देशमुख सांगतात.

"याशिवाय प्रभा राव यांच्या कन्या म्हणून टोकस यांच्यामागे एक वलय आहे. गेल्या दोन वर्षांपासून त्या सातत्यानं मतदारसंघात आहेत. मी जिल्हा परिषद अध्यक्ष असताना 5 वर्षं इथंच होते. त्यानंतर मी कोणतीही निवडणूक लढवली नाही. आता मी निवडून आल्य़ास पूर्ण वेळ इथंच देईन, असा दावा त्या करत आहेत. असं असलं तरी, काँग्रेसचचं संघटन गटातटांत विखुरलं आहे. या सगळ्या गटांचं एकत्रिकरण करून आपल्यामागे त्यांना उभं करणं, हे त्यांच्यासमोरील आव्हान आहे," असं स्थानिक पत्रकार सांगतात.

प्रभा राव या 1999ला खासदार होत्या. देवळी-पुलगावमधून त्या सलग 4 वेळा आमदार म्हणून निवडून आल्या होत्या. महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष त्यांच्याकडे होतं. याशिवाय त्यांनी हिमाचल आणि राजस्थानच्या राज्यपाल पदाचा कार्यभारही सांभाळला होता.

असा आहे वर्धा मतदारसंघ

1990 पर्यंत वर्धा मतदारसंघ काँग्रेसचा गड होता. पण 90नंतर अँटि-काँग्रेस उमेदवार यायला लागले. 1990पूर्वी काँग्रेसचे कमलनयन बजाज, वसंतराव साठे यांनी खासदारकीची हॅट्रिक साधली. त्यानंतर मग माकपचे रामचंद्र घंगारे एकदा निवडून आले. यानंतर भाजपचे विजय मोडे, सुरेश वाघमारे आणि दत्ता मेघे निवडून आले.

काँग्रेसला गड का राखता नाही आला, याविषयी ढगे सांगतात, "2009नंतर वर्ध्यातल्या काँग्रेसमध्ये गटतट निर्माण झाले. जिल्हा काँग्रेसवर कुणाचं वर्चस्व राहील, याविषयीची रस्सीखेच सुरू झाली. यामुळे मग जिल्ह्यात शेखर शेंडे, चारुलता टोकस यांचे भाऊ रणजित कांबळे यांचा गट, दत्ता मेघे आणि अमर काळे यांचे गट असे 4 गट निर्माण झाले. यातही कांबळे गट एकीकडे आणि बाकी तीन गट एकीकडे अशी विभागणी झाली. यामुळे मग काँग्रेस सुस्थितीत राहिली नाही. अजूनही या गटांमध्ये धुसफूस सुरूच आहे."

वर्धा लोकसभा मतदारसंघात 6 विधानसभा मतदारसंघ येतात. यात वर्धा, देवळी-पुलगाव, हिंगणघाट, आर्वी, अमरावती जिल्ह्यातील धामणगाव आणि मोर्शी या दोन मतदारसंघांचा समावेश आहे. यापैकी 3 मतदारसंघ काँग्रेसच्या ताब्यात तर 3 भाजपच्या ताब्यात आहेत. विधानपरिषदेचे दोन्ही आमदार भाजपचे आहेत. एक अरुण अडसट आणि दुसरे रामदास आंबटकर.

2014च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या रामदास तडस यांनी काँग्रेसच्या सागर मेघे यांचा 2 लाखांहून अधिक मतांनी पराभव केला होता. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर मेघे कुटुंबीयानं भाजपमध्ये प्रवेश केला होता.

इतर समीकरणं काय आहेत?

"राज्यात आणि वर्ध्यात काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी आहे, पण राष्ट्रवादीचे नेते खूश नाहीत. प्रचाराचं नियोजन आमच्याकडे द्यावं, असं त्यांना वाटतं. पण तसं झालेलं नाही. त्यामुळे राष्ट्रवादीमध्ये फारसं आशादायक वातावरण नाही," असं देशमुख सांगतात.

"याशिवाय वर्ध्यात तिसऱ्या क्रमांकाची मतं बहुजन समाज पक्षाला मिळतात. यावेळेस शैलेश अग्रवाल बसपाकडून लोकसभेच्या रिंगणात आहेत. एकच मिशन, शेतकरी आरक्षण, असं म्हणत त्यांनी निवडणुकीत उडी घेतलीय. शेतकऱ्यांना नोकरी आणि शिक्षणात आरक्षण मिळावं, अशी त्यांची भूमिका आहे. ते तरुण आहेत. त्यांच्या उमेदवारीचा सर्वाधिक फटका काँग्रेसला बसेल. पण ते हिंदी भाषिक असल्यामुळे भाजपलाही थोडाफार फटका बसेल," असं ढगे सांगतात.

तडस आणि टोकस यांची कारकीर्द

रामदास तडस

  • वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली या विधानपरिषदेतून दोनदा आमदार.
  • देवळी नगरपरिषदेचे अध्यक्ष.
  • 2009मध्ये विधानसभेला पराभव,
  • राष्ट्रवादी काँग्रेसकडून एसटी महामंडळाचं संचालक पद
  • 2014मध्ये भाजपच्या तिकीटावर खासदार

चारूलता टोकस

  • 1990मध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष
  • दिल्लीत स्थायिक
  • 5 ते 7 वर्षं महिला काँग्रेस सचिव
  • महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)