You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
उर्मिला मातोंडकर वि. गोपाळ शेट्टी: उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात वाढलेल्या मतदानाचा अर्थ
- Author, गणेश पोळ
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात मतदानासह महाराष्ट्रातील मतदान सोमवारी संपलं. राज्यात यंदा एकूण चार टप्प्यांसह मतदान 60.68 टक्के झालं आहे.
पण 2014च्या लोकसभा निवडणुकांच्या तुलनेत यंदा उत्तर मुंबई मतदारसंघात मतदान सुमारे 6 टक्क्यांनी वाढलं. गेल्या वेळी 53 टक्के मतदान झालं होतं तर यंदा 59 टक्के. त्यामुळे काँग्रेसच्या उर्मिला मातोंडकर आणि भाजपचे गोपाळ शेट्टी यांच्यातली चुरस वाढली आहे.
या मतदारसंघाचा एक वेगळा इतिहास आहे.
माजी पेट्रोलियम मंत्री राम नाईक हे इथून पाच वेळा खासदार राहिलेले. पण 2004ला राम नाईकांविरोधात कॉंग्रेसने अभिनेता गोविंदा यांना उमेदवारी दिली. तेव्हा गोविंदा मोठ्या मताधिक्याने निवडून आले होते.
त्यानंतर 2009ला कॉंग्रेसचे संजय निरुपम हे निवडून आले.
2014 लोकसभा निवडणुकीत गोपाळ शेट्टी (6,64,004 मतं) यांनी काँग्रेसच्याच संजय निरुपम (2,17,422 मतं) यांचा दारुण पराभव केला होता.
त्यामुळे आता गोविंदा यांच्यानंतर कॉंग्रेसनं पुन्हा सेलिब्रिटी कार्ड खेळत अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांना यंदा उमेदवारी दिल्यानं हा मतदारसंघ चर्चेत राहिला.
उत्तर मुंबईमध्ये बोरिवली, दहिसर, मागोठाने, कांदिवली पूर्व, चारकोप, मालाड-पश्चिम हे विधानसभा मतदारसंघ येतात.
1977 सालची टक्केवारी वगळता उत्तर मुंबई मतदारसंघात आतापर्यंत मतदानाची टक्केवारी निराशाजनक राहिली आहे. आतापर्यंत 1991 मध्ये सर्वात कमी म्हणजे 40.41 टक्के मतदान झालं होतं. त्यावेळी भाजपचे राम नाईक निवडणून आले होते. तर 1977साली 64.06 मतदान झालं होतं त्यावेळी भारतीय लोक दलाचे (BLD) मृणाल केशव गोरे निवडून आल्या होत्या.
वाढलेल्या मतदानाचा काय अर्थ असू शकतो?
ज्येष्ठ पत्रकार अभय देशपांडे सांगतात की उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाची 2004मध्ये पुनरर्चना झाल्यानंतर हा नवीन मतदारसंघ भाजपला पोषक आहे. "सेलेब्रिटी मतदारांमुळे हा मतदारसंघ चर्चेतही आला आणि स्पर्धाही वाढली. त्यामुळे या ठिकाणी मतदार उत्साहाने बाहेर पडू लागले, असं दिसतं. पण वाढलेल्या मतदानाचा विरोधी उमेदवाराला फायदा होईल, असं म्हणता येणार नाही," असं ते बीबीसीशी बोलताना म्हणाले.
"आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मतदार याद्या अद्ययावत केल्यानं बऱ्याच मतदारांची नावं गळाली आहेत. 2014 पेक्षा 2019 मध्ये एकूण मतदारांची संख्या कमी झाली आहेत. त्यामुळे प्रत्यक्षरीत्या किती मतदान वाढलं, हेही पाहावं लागणार आहे.
"उत्तर मुंबई हा भाजपचा परंपरागत मतदारसंघ आहे. त्यामुळे वाढलेल्या मतदानाचा शेट्टी यांना फटका बसेल, असं म्हणता येणार नाही," देशपांडे यांनी सांगितलं.
पण काँग्रेस पक्षात आणि निवडणुकीच्या राजकारणात काही दिवसांपूर्वीच प्रवेश करणाऱ्या उर्मिला मातोंडकर यांनी आधीही खासदार राहिलेले गोपाळ शेट्टी यांना चांगली चुरस दिल्याचं देशपांडे सांगतात.
"उर्मिला मातोंडकर या फक्त सेलेब्रिटी नाहीत तर त्या चळवळीतल्या घरात वाढलेल्या आहेत. त्यांना राष्ट्रीय सेवा दलाची पार्श्वभूमी आहे. त्यांच्या प्रचारात धार होती. त्यामुळे मातोंडकरांनी शेट्टींना मोठं आव्हान दिलं आहे," असं ते सांगतात.
दुसऱ्या बाजूला मनसेला मानणारा मतदार याठिकाणी चांगल्या प्रमाणात आहे. त्यांच्या मतदानाचा कौल काही प्रमाणात निर्णायक ठरू शकेल, असं देशपांडे यांना वाटतं.
विधानसभा मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी
दरम्यान, याच मुद्द्यावर ज्येष्ठ पत्रकार मृणालिनी नानिवडेकर सांगतात, "उत्तर मुंबई मतदार संघातली लढत चुरशीची झाल्यानं मतदारही मोठ्या प्रमाणात बाहेर पडले आहेत. पण भाजपचा हा परंपरागत मतदारसंघ असल्यानं याठिकाणी सत्तापालट होईल, असं म्हणता येणार नाही.
"उर्मिला मातोंडकर निवडणूक रिंगणात उतल्यामुळं भाजपसमोर एक मोठं आव्हान उभं राहिलं होतं. त्यांनी राजकीय गृहपाठ पक्का केला होता. मीडियाला दिलेल्या पहिल्या मुलाखतीपासून त्यांनी प्रचाराची पातळी चांगली ठेवली.
"या उलट भाजपची प्रचाराची पातळी काही प्रमाणात घसरलेली दिसली. मी मतदारसंघाचा दौरा केला तेव्हा भाजपची यंत्रणा अधिक सक्रीय झालेली मला दिसून आलं. मागाठाणे, कुरार या भागात मनसेला मानणारा मतदार संघ आहे. त्याचा फटका शेट्टींना होऊ शकतो. पण त्याचठिकाणी शिवसेनेनंही त्यांची यंत्रणा बऱ्याच प्रमाणात सक्रीय केली होती, असंही त्या सांगतात.
काँग्रेसनं मात्र उर्मिला मातोंडकर निवडून येतील, असा विश्वास व्यक्त केला आहे. "उत्तर मुंबईतला निकाल हा मोदी विरोधातला असेल. देशभर मोदीविरोधात लाट आहे. याच कारणामुळं मतदार मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडले आणि मोदी विरोधात मतदान केलं. हा निकाल काँग्रेसच्या बाजूनं असेल," असा विश्वास महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी बीबीसीशी बोलताना व्यक्त केला.
तसंच "मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी लोकांसमोर सत्य परिस्थिती मांडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे मनसेला मानणारे मतदार हा काँग्रेससाठी कॅटलिस्ट म्हणून काम करतील," असंही सावंत यांनी सांगितलं.
या वाढलेल्या मतदानाचा भाजपला फटका बसू शकतो का, असं विचारलं असता महाराष्ट्र भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये सांगतात, "नरेंद्र मोदींना मानणारा नवमतदार बाहेर पडल्यानं मतदानाचा टक्का वाढला आहे. त्यामुळे उत्तर मुंबईत भाजपचाच विजय होईल. मनसेची कामगिरी दिवसेंदिवस ढासळत आहे. त्यामुळे मनसेचा उत्तर मुंबईत कोणताही प्रभाव दिसणार नाही."
मतदानाचा टक्का वाढला तर काय होतं?
मतदार जेव्हा मोठ्या संख्येन मतदानासाठी बाहेर पडतात तेव्हा त्यांना सत्ताधारी उमेदवाराला हटवायचं असतं, असं मानलं जातं. पण मतदानाच्या आकडेवारीचा अभ्यास केला तर हा एक भ्रम असल्याचं समजतं.
मतदारांची संख्या वाढल्यामुळं सत्ताधाऱ्यांचा विजयही होऊ शकतो. तसंच मतदान कमी झाल्यामुळं सत्तापालटही होऊ शकते. निवडणूक निकालाची भविष्यवाणी करण्याचा हा काही विश्वासात्मक मार्ग नाहीये.
दिल्लीस्थित Centre for Study of Developing Societies (CSDS) या संस्थेनं केलेल्या अभ्यासात 1951 पासून आतापर्यंत झालेल्या एकूण 15 लोकसभा निवडणुकीच्या आकडेवारीतून हे दिसून आलं आहे.
उत्तर मुंबईत मतदार संघात प्रत्यक्षात किती मतदान वाढलं, हाही एक अभ्यासाचा विषय आहे. कारण निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार गेल्या 5 वर्षांत उत्तर मुंबई मतदारसंघात 1 लाख 76 हजार 605 मतदार कमी झाले आहेत.
2014च्या निवडणुकीच्या वेळी इथे 17 लाख 83 हजार 870 मतदार होते. तर ही संख्या घसरून 16 लाख 7 हजार 265 वर आली आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)