You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मोदींची 'अराजकीय' मुलाखत घेणारे अक्षय कुमार यांनी मतदान का केलं नाही?
गेल्या काही दिवसांपूर्वी अक्षय कुमारने पंतप्रधान नरेंद्र मोदींची अराजकीय मुलाखत घेतल्यामुळे सोशल मीडियावर प्रतिक्रियाचं वादळ आलं होतं.
मात्र सोमवारी झालेल्या चौथ्या टप्प्यात ते कुठेही दिसले नाहीत. अक्षय कुमार कॅनडाचे मानद नागरिक असल्यामुळे त्याला मतदान करता येणार नाही असा दावा सगळीकडे करण्यात आला होता. मात्र त्याचा हा मुद्दा वादात आहे. यावरून सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटल्या.
पत्रकार राणा अय्यूब यांनी अक्षय कुमार कोणत्या बूथवर दिसतील, असा खोचक प्रश्न विचारला.
अनुराग कुंडू यांनी या प्रकरणाला राजकीय रंग देऊ नये अशी विनंती करतानाच त्यांचं मतही 'अराजकीय' असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.
तर एका कार्यक्रमात पत्रकारांनी अक्षय कुमार यांना मतदान न केल्याबद्दल तुमच्यावर टीका केली जात आहे यावर प्रतिक्रिया द्या असं सांगितल्यावर मात्र त्यांनी त्यावर उत्तर देणं टाळलं आहे.
त्यांचा हा उत्तर टळण्याचा व्हीडिओसुद्धा आता ट्वीटरवर शेअर केला जात आहे.
तर अमर नावाचे ट्विटर युजर लिहिताता की कॅनडाचे नागरिक अक्षय कुमार भारताच्या आंब्याबद्दल इतकी आस्था का दाखवत आहेत?
ज्येष्ठ पत्रकार जतीन देसाई यांनीही म्हटलं की त्यांना अक्षय कुमार कुठल्याही मतदान केंद्रावर दिसले नाहीत. "मला असं कळलं की ते कॅनडाचे नागरिक होते आणि भारताचे नागरिक नाहीत. म्हणून पंतप्रधानांचं त्यांच्यावर प्रेम आहे का?" असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. भक्तांनी प्रकाश टाकावा असंही ते म्हणाले.
तर निष्ठा गौतम यांनी कॅनडाचं मानद नागरिकत्व म्हणजे काय, असा प्रश्न विचारला आहे. माझ्या माहितीनुसार कॅनडाचं मानद नागरिकत्व फक्त सहा लोकांना मिळलं आहे. त्यात मंडेला, मलाला आणि दलाई लामांचा समावेश आहे. अक्षय कुमार यांनी स्पष्टीकरण द्यावं असं त्या पुढे म्हणतात.
तर आर. सिद्दीकी यांनी ट्रोल्सला चिमटा काढला आहे. निवडणुका भारतीय नागरिक लढवू शकतात. अक्षय कुमार तुम्ही निवडणूक लढवू शकत नाही आणि भक्तांना राज्यघटनेची काहीही माहिती नाही.
पुनीत चितकारा यांनी अक्षय कुमार यांच्यावर टीका करणाऱ्यांवर टीका केली आहे. ज्यांनी भारतासाठी काहीही केलं नाही तेच लोक अक्षय कुमार यांना टॅग करून त्यांच्यावर विनोद करत आहेत. ते कॅनडाचे नागरिक असून मतदान करू शकत नाहीत. त्यांनी देशासाठी कितीतरी काम केलं आहे. तुम्ही काय केलं आहे, असा प्रश्न ते विचारतात.
घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांच्यामते जी व्यक्ती भारताची नागरिक नाही त्यांना मतदान करता येत नाही. अक्षय कुमार यांनी जर कॅनडाचं नागरिकत्व स्वीकारलं असेल तर त्यांना मतदान करता येणार नाही.
या संपूर्ण प्रकरणाबाबत आम्ही अक्षय कुमार यांच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांची प्रतिक्रिया उपलब्ध झाली नाही. ही प्रतिक्रिया मिळताच ती या बातमीत दिली जाईल.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)