You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
Yeti: ‘हिममानवाच्या पावलांचे सापडले ठसे’? नेपाळ सैन्य म्हणतंय ते जंगली अस्वलाचे असतील
भारतीय लष्कराने नेपाळनजीकच्या सीमेवर मकालू बेस कॅम्पजवळ हिममानवाच्या पावलाचे ठसे सापडल्याचा दावा केला आहे. हिममानवाला 'येती' म्हणून संबोधलं जातं.
लष्कराकडून अधिकृत ट्विटर हँडलवर यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. "भारतीय लष्कराच्या गिर्यारोहण चमूला 32 बाय15 इंचाचे ठसे सापडले आहेत. 9 एप्रिलला हे ठसे सापडलेत. याआधी मकालू-बरून राष्ट्रीय उद्यानात अशा स्वरूपाचे ठसे सापडले होते," असं या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
सोशल मीडियावर मात्र या हिममानवाच्या उल्लेखाविषयी उलटसुलट चर्चा आहे.
"टिनटिन बरोबर होता. त्याने पहिल्यांदा येतीला पाहिलं होतं. 'टिनटिन इन तिबेट' वाचण्याची हीच ती वेळ," असं भावातोश सिंग यांनी ट्वीट केलं आहे.
"येती सापडल्याचा पुरावा आपल्याला सापडला आहे. आणखी किती अच्छे दिन हवेत, मित्रों?" असं ट्वीट अभिषेक कुमार यांनी केलं आहे.
"हा सीमेनजीकचा भाग आहे. चीनने त्यांचा रोबो पाठवला असेल. वेगळ्या पद्धतीने विचार करा," अशी प्रतिक्रिया प्रदीप नावाच्या ट्विटर हँडलवरून देण्यात आली आहे.
तर काहींनी येतीची तुलना अश्वत्थामाशी केली आहे.
येतीच्या एकाच पायाचे ठसे? येती लंगडी खेळत होतं का? असे प्रश्न सोल ऑफ इंडिया या ट्वीटर हँडलवरून विचारण्यात आले आहेत.
हे रहस्य हिममानव कोण आहेत?
तिबेट आणि नेपाळमधील लोकप्रिय कथांनुसार, आशियातील सुदूर पर्वतीय प्रदेशात दैत्याकार मकडांप्रमाणे जीव राहतात. त्यांना हिममानव म्हटलं जातं.
अनेक वर्षांपासून खूप सारी माणसं 'येती' बघितल्याचा दावा करत आहेत.
2013 मध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठात करण्यात आलेल्या संशोधनानुसार हिमालय पर्वतराजीत काल्पनिक हिममानव 'येती' हे अस्वलांचीच उपप्रजाती असू शकतात, असं नमूद करण्यात आलं होतं.
प्राध्यापक स्काइज यांनी या मिथकांमागे प्रत्यक्षात एखादा खरा माणूस असू शकतो, असं सांगितलं आहे. असं अस्वल जे आतापर्यंत कोणीही पाहिलेलं नाही, ते अजून अस्तित्वात असू शकतं असं ते म्हणाले.
अमेरिकेचे जीववैज्ञानिक शॉर्लट लिंडक्विस्ट यांनीही यासंदर्भात काम केलं आहे. येतीच्या अवशेषांची डीएनए टेस्ट करून त्याचं विश्लेषण केलं होतं.
या अवशेषांच्या नमुन्यात हात, दात, हाताची त्वचा, केस मिळाले होते. हे नमुने तिबेट आणि हिमालयातील प्रदेशात मिळाले होते. उपलब्ध नऊ नमुन्यांपैकी एक कुत्र्याचा होता. अन्य आठ त्या प्रदेशात आढळणाऱ्या अस्वलांचे आहेत. जसं की आशियाई खंडात राहणारं काळं अस्वल, हिमालय आणि तिबेटमध्ये मिळणारे अस्वल.
एका संशोधनकर्त्यानुसार मी जेवढ्या नमुन्यांचं परीक्षण केलं ते अस्वलाचेच होते.
भारतीय सैन्याच्या या दाव्यानंतर नेपाळ सैन्याचे प्रवक्ते ब्रिगेडियर जनरल बिग्यान देव पांडे यांनी हिंदुस्तान टाइम्सला सांगितलं की, "भारतीय सैन्याच्या एका टीमला ते पावलांचे ठसे दिसले तेव्हा आमचेही काही लोक त्यांच्याबरोबर होते. आम्ही तथ्य तपासून पाहिले. काही स्थानिकांनी तसंच पिठ्ठूंनी आम्हाला सांगितलं की ते एका जंगली अस्वलाच्या पावलांचे ठसे असू शकतात. त्या भागात असे ठसे यापूर्वी अनेकदा दिसले आहेत."
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)