डायनासोरच्या आकाराचे हे पक्षी पृथ्वीवरून नामशेष झाले कारण...

    • Author, हेलन ब्रिग्स
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

प्रागैतिहासिक काळातल्या माणसांनी जगातल्या सगळ्यांत मोठ्या पक्ष्यांची शिकार करून त्यांना नामशेष केल्याचा संशय व्यक्त होत आहे.

या पक्ष्यांवर हत्याराने वार करण्यात आल्याच्या खुणा त्यांच्या हाडांच्या जीवाश्मांवर आढळल्यामुळे असा निष्कर्ष काढण्यास वाव आहे.

संशोधकांच्या मते या खुणा म्हणजे मादागास्करमधल्या महाकाय पक्ष्यांची माणसांनी अन्नासाठी शिकार केल्याचाच एक पुरावा आहे.

हे जीवाश्म सुमारे 10,000 वर्षें जुने आहेत.

आतापर्यंत असं मानलं जात होतं की मादागास्करमध्ये मानवाचा अधिवास हा सुमारे 2,500 ते 4,000 वर्षांपूर्वीपासूनच आहे.

"पण आता समोर आलेल्या माहितीवरून लक्षात येतं की हा अधिवास 6,000 वर्षांपूर्वीचा आहे,"असं लंडनच्या झुओलॉजी सोसायटीतल्या संशोधक डॉ. जेम्स हॅन्सफोर्ड सांगतात.

अर्थात, मानवी हस्तक्षेपाबरोबरच हे पक्षी नामशेष होण्यासाठी आणखीही काही कारणं असू शकतात, असंही या संशोधनात समोर आलं आहे.

या जगावेगळ्या बेटावरच्या खास वनस्पती ज्या कारणांमुळे नष्ट झाल्या तीच कारणं या पक्ष्यांच्या विनाशालाही कारणीभूत असू शकतात.

या महाकाय पक्ष्यांची शिकार करून त्यांचा नायनाट करण्याऐवजी मानव त्यांच्या सहवासात हजारो वर्षें राहिले असण्याचीही शक्यता आहे. हे पक्षी साधारण 1000 वर्षांपूर्वी नामशेष झाले आहेत.

"मानव आणि हे महाकाय पक्षी जवळपास 9000 वर्षें एकत्र एका अधिवासात राहिले असण्याची शक्यता आहे. त्यांच्या एकत्र राहाण्याने बेटावरच्या जैवविविधतेलाही फारसा धक्का लागला नाही. याचाच अर्थ असा की याबद्दल आपल्याला काही नवीन शोध लागू शकतात," डॉ. हॅन्सफोर्ड पुढे सांगतात.

या अजस्र पक्ष्यांचं दर्शन मादागास्करमध्ये नित्याचंच होतं.

त्यांचं वजन कमीत कमी अर्धा टन होतं तर उंची तीन मीटर एवढी होती. त्यांची अंडी डायनोसोरपेक्षा मोठी होती.

एपिओर्निस आणि म्युलरोर्निस नावाचे हे महाकाय पक्षी मादागास्कर बेटावर इतर अनेक जगावेगळ्या प्राण्यांसोबत राहात असल्याचे पुरावे आहेत. या प्राण्यांमध्ये भल्यामोठ्या आकाराचे लेमुर प्राणीही होते जे नंतर नामशेष झाले.

नेमकं काय झालं असावं, कधी झालं असावं, यात मानवी हस्तक्षेप किती होता याच्याविषयी अनेक मतमतांतरं आहेत.

या पक्ष्यांचे पाय प्रचंड मोठे होते, पंजे धारदार होते आणि त्यांची मान मोठी तसंच ताकदवान होती.

हे संशोधन मादागास्कर बेटावर पहिल्यांदा मानव कधी आले, याच्याविषयी आधी अस्तित्वात असलेल्या कल्पना खोडून काढतं.

"इथे माणसं कुठून आली होती हे आपल्याला माहिती नाही. ते कळण्यासाठी अजून पुरातत्वीय पुरावे लागतील," या शोधनिबंधाच्या सहलेखिका आणि स्टोनी ब्रुक विद्यापीठातल्या प्राध्यापिका पॅट्रिशिआ राईट सांगतात.

"तरी प्रश्न उरतोच, कोण होती ही माणसं? ती कुठे आणि कधी गायब झाली?

हा शोधनिबंध सायन्स अडव्हान्सेस या जर्नलमध्ये प्रसिद्ध झाला आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)