हिमालयात खरंच 'येती' म्हणजेच हिममानव अस्तित्वात आहेत का?

येती हा हिमालयात राहणारा अत्यंत गूढ प्राणी आहे. तो खरंच अस्तित्वात आहे की नाही, यावरही शास्त्रज्ञांमध्ये एकमत नाही.

मात्र गेल्या अनेक दशकांपासून हिमालयातल्या बर्फाळ भागात माकडासारखा, खरंतर महावानरासारखा (ape like) दिसणारा हा हिममानव बघितल्याचा दावा अनेक लोकांनी केला आहे.

भारतीय सैन्य दलाच्या ADGPIने एप्रिल 2019 मध्ये काही फोटो ट्वीट केले होते आणि त्यावरून बराच वादही झाला होता. हे फोटो होते पावलांच्या ठशांचे. हे ठसे हिमालयात राहणाऱ्या 'येती' या हिममानवाचे असल्याचा दावा या ट्विटमध्ये करण्यात आला होता.

या ट्वीटमध्ये लिहिलं होतं की, "भारतीय सैन्याच्या गिर्यारोहण मोहिमेच्या पथकाला पहिल्यांदा दंतकथेतील 'येती' या राक्षसाच्या पावलांचे रहस्यमयी ठसे आढळले आहेत. 9 एप्रिल 2019 रोजी मकालू बेस कॅम्पजवळ 32X15 इंचाचे हे ठसे दिसले. हा मायावी हिममानव यापूर्वी केवळ मकालू-बरून नॅशनल पार्कमध्ये दिसला होता."

नेपाळ सैन्याचे प्रवक्ते ब्रिगेडियर जनरल बिग्यान देव पांडे यांनी हिंदुस्तान टाइम्सला सांगितलं होतं की, "भारतीय सैन्याच्या एका टीमला ते पावलांचे ठसे दिसले तेव्हा आमचेही काही लोक त्यांच्याबरोबर होते. आम्ही तथ्य तपासून पाहिले. काही स्थानिकांनी तसंच पिठ्ठूंनी आम्हाला सांगितलं की ते एका जंगली अस्वलाच्या पावलांचे ठसे असू शकतात. त्या भागात असे ठसे यापूर्वी अनेकदा दिसले आहेत."

पण खरंच तो हिममानव होता का? यात काही तथ्य आहे की ही एक दंतकथाच आहे?

याविषयावर काही वर्षांपूर्वी लूसी जोन्स यांनी Is the Himalayan Yeti a real animal?हा लेख प्रसिद्ध केला होता. त्याचा मराठी अनुवाद खास बीबीसीच्या वाचकांसाठी...

तुम्ही कधीही हिमालयात गेला नसलात तरीसुद्धा येती कसा दिसतो, याची कल्पना तुम्हाला असेल. गेली अनेक दशकं सिनेमे, कार्टून, व्हिडियो गेम्स यामधून येती तुमच्या परिचयाचा झाला असेल.

मोठमोठे पाय आणि अनकुचिदार सुळे असलेला महाकाय केसाळ प्राणी, असं येतीचं चित्र रंगवलं जातं. तो करड्या किंवा पांढऱ्या रंगाचा असतो. बर्फाळ हिमालयात तो एकटाच फिरताना दाखवलं जातं.

गेली अनेक दशकं या प्राण्याविषयी सांगितल्या जाणाऱ्या दंतकथा आणि त्याविषयीचा कल्पनाविलास वगळता या प्राण्याच्या अस्तित्वात खरंच काही तथ्य आहे का?

गेल्या काही वर्षांत आधुनिक अनुवंशशास्त्राच्या मदतीने हिमालयातील या येतीविषयी अधिकाधिक माहिती घेण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. परिणामी, या प्राण्याविषयीचं गूढ उकलण्याची शक्यता आहे.

येती हा महावानरसदृष्य मनुष्य (ape man) असल्याचा समज आहे. जगभरात 'बिगफूट' म्हणजेच महाकाय पावलांच्या ठशांच्या कथा सांगितल्या जातात.

फार पूर्वीपासून चालत आलेल्या लोककथांमध्ये येतीचा उगम आढळतो. पूर्व नेपाळमध्ये हिमालयाच्या पायथ्याशी राहणाऱ्या शेर्पा या समाजाचा इतिहास, त्यांच्या प्राचीन आणि पौराणिक कथांचा तो एक भाग आहे.

शिवा धाकल यांनी 'Folk Tales of Sherpa and Yeti' या त्यांच्या पुस्तकात 12 पुराणकथांचा समावेश केला आहे. या कथांमध्ये येती धोकादायक, भीतीदायक चितारण्यात आला आहे.

उदाहरणार्थ "The Annihilation of the Yeti" ही कथा. यात लोकांना अतोनात त्रास देणाऱ्या येतींना धडा शिकवण्याचा संकल्प शेर्पा सोडतात. यासाठी ते एक युक्ती लढवतात. शेर्पा मद्यधुंद होऊन एकमेकांशी मारामारी करण्याचं नाटक करतात. आपलं बघून येतीसुद्धा एकमेकांना मारून टाकतील, असं त्यांना वाटतं. मात्र, येती तसं न करता पर्वतावर वर निघून जातात.

दुसऱ्या एका कथेत येती एका मुलीवर बलात्कार करतो आणि त्यानंतर तिची तब्येत ढासळते. तर तिसऱ्या कथेत सूर्य जसजसा वर येतो तसा येती अधिकाधिक उंच आणि मोठा होत जातो. त्याला बघून लोक घाबरतात. त्यांची शुद्ध हरपते. त्यांच्या शरिरातली सगळी ऊर्जा नष्ट होते.

प्रेरित करणे किंवा नैतिक-अनैतिकता सांगणे, हा लोककथांचा मुख्य उद्देश. येतींच्या या कथांमध्येदेखील हाच उद्देश दिसतो. विशेषतः या कथांमधून शेर्पांना जंगली किंवा धोकादायक प्राण्यांपासून दूर रहाण्याची शिकवण मिळते.

"लहान मुलं फार लांब कुठेतरी भटकू नये आणि त्यांना आपल्या माणसांजवळच रहावं, यासाठी एकप्रकारची भीती या येतीच्या लोककथांमधून लहानग्यांना दाखवली जाते", असं धाकल सांगतात.

"काहींच्या मते ही गिर्यारोहकांच्या मनात निर्माण करण्यात आलेली एकप्रकारची भीती आहे. त्यांना खराब वातावरणाची भीती वाटू नये, ते अधिक कणखर व्हावे, संकटाचा सामना करण्याची ताकद त्यांच्यात यावी, यासाठी या कथा रचल्या असाव्या."

मात्र, पाश्चिमात्य देशातले गिर्यारोहक हिमालय सर करू लागले आणि त्यानंतर तर या कथा अधिकच भीतीदायक आणि सनसनाटी होऊ लागल्या.

1921 साली गिर्यारोहक आणि ब्रिटिश राजकारणी चार्ले होवर्ड-बरी यांच्या नेतृत्वाखाली काही ब्रिटीश गिर्यारोहक एव्हरेस्ट मोहिमेवर गेले. त्यांना पावलांचे काही ठसे दिसले. ते ठसे खूप मोठे होते. हे 'मेतो-कंग्मी' म्हणजेच 'अस्वलासारख्या दिसणाऱ्या हिममानवाच्या' पावलांचे ठसे असल्याचं त्यांना सांगण्यात आलं.

मोहिमेवरून परतल्यावर या पथकातल्या काहींची पत्रकारांनी मुलाखती घेतली. यात एक पत्रकार होता हेन्री न्यूमन. त्याने मेतोचा अर्थ गलिच्छ असा घेतला. नंतर त्याला वाटलं किळसवाणा हा जास्त योग्य शब्द आहे.

आणि इथूनच लोककथांमध्ये नवं वळण आलं. शेर्पा जे सांगत परदेशी पर्यटक त्याचा अनुवाद करू लागले आणि यातून रहस्यमयी महावानरासारखा दिसणाऱ्या हिममानवाचा जन्म झाला.

1950च्या दशकात तर या हिममानवाविषयी उत्सुकता शिगेला पोहोचली होती. त्याच्या शोधासाठी गिर्यारोहकांनी अनेक मोहिमा आखल्या.

हॉलीवुड अभिनेते जेम्स स्टिवर्ट यांना हिममानवाचं बोट घेऊन जात असल्याचा आरोपावरून पकडण्यात आलं. मात्र, ते बोट मानवाचं असल्याचं 2011 मध्ये करण्यात आलेल्या डीएनए चाचणीत सिद्ध झालं.

हिमालयात कधी कुणाला एखादी कवटी, हाडाचे तुकडे किंवा केस सापडायचे. हे येतीचे असल्याचं सांगितलं जायचं. मात्र, निरीक्षणाअंती ते अस्वल किंवा माकडाचे असल्याचं सिद्ध व्हायचं.

कुठलाच ठोस पुरावा नसतानाही आजही अनेक जण हिमालयात येतीच्या शोधात जातात. येती हे 'क्रिप्टोझुऑलॉजी'चं उदाहरण आहे. क्रिप्टोझुऑलॉजीमध्ये अशा प्राण्यांचा शोध घेतला जातो जे खरंच अस्तित्वात आहे की नाही, हे पुरावा नसल्याने खात्रीशीरपणे सांगता येत नाही.

येतीचा शोध घेणाऱ्यांमधलं सुप्रसिद्ध नाव म्हणजे रेनहोल्ड मेसनर. 1980च्या दशकात हिमालयामध्ये आपण येतीला बघितल्याचा दावा त्यांनी केला होता आणि मग याच येतीचा शोध घेण्यासाठी ते अनेकदा हिमालयावर गेले.

ते अतिशय सोप्या भाषेत सांगतात. येती म्हणजे अस्वल.

खरंखुरं अस्वल आणि जंगली पशुंपासून असणाऱ्या धोक्याविषयीच्या शेर्पा समाजाच्या कथा यांचं मिश्रण म्हणजे येती आख्यायिका, अशी मांडणी मेसनर करतात.

ते म्हणतात, "येतीच्या पावलांचे सर्व ठसे म्हणजे एका अस्वलाच्या पावलांचे ठसे आहेत. त्यामुळे येती हा काही मायावी प्राणी नाही. तर तो प्रत्यक्षात अस्तित्वात आहे."

हॉर्वड-बरी किंवा न्यूमनने सांगितल्याप्रमाणे येती म्हणजे माकडासारखा दिसणारा प्राणी असल्याच्या संकल्पनेचा त्यांनी नेहमीच इनकार केला आहे.

"लोकांना सत्य आवडत नाही. त्यांना विचित्र कथा आवडतात", ते म्हणतात. "लोकांना येती हा मानव आणि माकडाचं मिश्रण असलेला निअँडरथेल म्हणून अधिक भावतो."

2014 साली अनुवंशशास्त्रानेही मेसनर यांच्या मताला दुजोरा दिला.

युरोपातल्या ऑक्सफोर्ड विद्यापीठातील अनुवंशशास्त्राचे माजी प्राध्यापक ब्रायन सायक्स यांनी कथित येतींची चाचणी घेण्याचा निर्णय घेतला.

त्यांनी आणि त्यांच्या टीमने कथित येतीच्या केसांचे नमुने तपासले. यातले काही मेसनर यांनी दिलेले होते. मग त्यांनी 'येती'च्या डीएनएची इतर प्राण्यांच्या जिनोमशी तुलना केली.

यातले भारतातल्या लडाख आणि भुतान या दोन ठिकाणांहून मिळालेले दोन नमुने हे चाळीस हजार वर्षांपूर्वी अस्तित्वात असलेल्या पोलर बिअरशी जेनेटिकली साधर्म असणारे होते.

यावरून निष्कर्ष काढण्यात आला की हिमालयात पोलर बिअर आणि ब्राऊन बिअर यांचे हायब्रिड असणारे मात्र, अजूनही अज्ञात असे अस्वल आहेत.

त्या टीमने लिहिलं, "या जातीचे अस्वल हिमालयात मोठ्या प्रमाणात पसरलेले असतील त्यातूनच येतीच्या कथांचा जन्म झाला असेल."

मात्र, या निष्कर्षावरून बराच वाद झाला.

"पोलर बिअर आणि तेही हिमालयात. हे ऐकायला बरं आहे", डेन्मार्कच्या कोपनहेगन विद्यापीठातील रोस बर्नेट म्हणतात. ऑक्सफर्ड विद्यापीठात सीरिड्वेन एडवर्ड यांच्यासोबत काम करताना त्यांनी या दाव्याची पुन्हा एकदा शहानिशा करण्याचा निर्णय घेतला.

सायक्स आणि त्यांच्या टीमने त्यांच्याजवळचा सर्व डीएनए डेटा जेनबँकेला देत तो सार्वजनिक केला. बर्नेट सांगतात, "हा डेटा डाऊनलोड करणं खूप सोप आहे."

त्यांना डेटामध्ये त्यांना एक मोठी चूक दिसली. बर्नेट सांगतात, "येतीचे डीएनए आणि प्लेस्टोसेन पोलर बिअरच्या जिनोममध्ये तंतोतंत साधर्म नव्हतं. ते डीएनए आधुनिक पोलर बिअरच्या जिनोमशी साधर्म असणारे होते आणि हे साधर्मही खूप कमी बाबतीत होतं."

हा थोडासा भ्रमनिरास करणारा निष्कर्ष होता. बर्नेट आणि एडवर्ड यांनी आपल्या प्रयोगाच्या शेवटी लिहिले की केसांचा डीएनए हा डॅमेज झालेला होता.

केसातील कॅरेटिन पाण्याला दूर ठेवत असल्याने केसांना प्राचीन डीएनएचा उत्तम स्रोत मानलं जात. मात्र, तरीही त्याची गुणवत्ता ढासळू शकते.

बर्नेट म्हणतात, "मला वाटतं मी काहीसा निराश झालो होतो. अविश्वसनीय शोध अनेकांना आवडतात. मात्र, हे शोध चुकीचे होते, हे आम्ही सिद्ध केलं. हे जरा क्लेषकारकच होतं. मात्र, सरतेशेवटी सत्य शोधणं हेच महत्त्वाचं असतं."

वॉशिंग्टन डीसीतल्या स्मिथसोनिअन संस्थेतील एलिसर गॅटीएरेझ आणि लॉरेन्समधल्या कॅन्सस विद्यापीठातले रोनाल्ड पाईन यांनी नव्याने संशोधन केलं. डीएनए साखळीची तुलना केल्यावर येतीचे ते दोन डीएनए अस्वलाचेच असल्याचं त्यांनादेखील आढळलं.

सायक्स आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांची चूक कबूल केली. मात्र, "हे नमुने आतापर्यंत अज्ञात असलेल्या विशाल सस्तन प्राण्यांचे नाहीत, हा आपण काढलेला निष्कर्ष मान्य करण्यात आला आहे", असेही त्यांनी नमूद केलं.

दुसऱ्या शब्दात सांगायचं तर हे नमुने कुठल्याही महावानरासारख्या दिसणाऱ्या मानवाचे नसल्याचं सिद्ध झालं.

अशी अनेक संशोधनं होऊनदेखील महावानरासारखा दिसणारा महाकाय प्राणी हिमालयात राहत असल्याची कल्पना काही दशकांपूर्वी होती त्यापेक्षा आता जास्त विश्वसनीय वाटते. होमिनिड म्हणजेच मानवासारखे दिसणारे महावानर अजून दुर्लक्षित राहिले असू शकतात.

उदाहरणार्थ डेनिसोवन. डेनिसोवन एक लोप पावलेली मानव प्रजाती आहे. सायबेरियाच्या गुहांमध्ये या प्रजातीच्या मानवांचे काही मोडके तोडके अवशेष सापडले आहेत.

2008 साली हे अवशेष सापडले. या अवशेषांचं जेनेटिक संशोधन केल्यावर कळलं की जवळपास चाळीस हजार वर्षांपूर्वी ही प्रजाती नष्ट झाली. मात्र, त्यापूर्वी शेकडो हजारो वर्षं हे मानव अस्तित्वात होते.

अशीच आणखी एक मानव प्रजाती जी अगदी आताआतापर्यंत अस्तित्वात होती ती म्हणजे 'हॉबिट'. त्यांना होमो फ्लोरेसिन्ससिस असंही म्हणतात.

हॉबिट मानव इंडोनेशियाच्या भागात अगदी बारा हजार वर्षांपूर्वीपर्यंत अस्तित्वात होते. याचाच अर्थ मानवाच्या अशा आणखीही काही अज्ञात प्रजाती अस्तित्वात असू शकतात, ज्यांच्याविषयी अजूनही कुणाला माहिती नाही.

हॉबिटच्या शोधानंतर हेन्री गी यांनी 2004मध्ये 'नेचर' या मासिकात एक लेख लिहिला. त्यात ते म्हणतात, "होमो फ्लोरेसिएन्सिस अगदी आताआतापर्यंत अस्तित्वात होते, या शोधामुळे येतीसारख्या इतर मानवसदृष्य प्राण्यांवर आधारित पौराणिक कथांना सत्याचा आधार असावा, या शक्यतेला बळ मिळतं."

तार्किकदृष्ट्या हा निष्कर्ष योग्य आहे. मात्र, त्याला ठोस पुरावा नाही, ही मोठ समस्या आहे. आणि महावानरांसारखे मानव खरंच अस्तित्वात असतील तर काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे.

त्यांचा अधिवास बघितला तर लक्षात येईल की हे विशाल सस्तन प्राणी असामान्य असले तरी त्यांच्याकडे दुर्लक्ष होणं कठीण आहे. बर्नेट म्हणतात, "बोनोबोस आणि ओरांगुटान या दुर्मिळ प्रजाती आहेत. मात्र, त्यांच्या अस्तित्वाचे पुरावे सहज उपलब्ध आहेत. ते आपल्याला दिसतात."

"हिमालयात अशी ठिकाणं आहेत जिथे महावानरांची वस्ती असू शकते," असं हिमालयात काम केलेले नॉक्सव्हिलेतल्या टेनेसी विद्यापीठातील व्लादिमीर दिनेट्स सांगतात.

"मात्र, या ठिकाणांवर अनेक माणसं येत-जात असतात. त्यामुळे उंदरापेक्षा मोठ्या स्थानिक सस्तन प्राण्याची नियमित शिकार होत असते."

पुरेशा अन्नासाठी प्राण्यांना भटकावं लागतं. याचाच अर्थ ते लपून राहू शकत नाहीत.

याशिवाय इथलं वातावरण हा देखील एक मुद्दा आहे. हिमालयातल्या खराब वातावरणात टिकून राहण्यासाठी प्राण्यांना खूप कष्ट पडतात.

दिनेट्स म्हणतात, "जपानमधल्या मकॉक जातीची वानरं अतिथंड प्रदेशात राहतात. हिमालयातील महावानर त्यांच्याएवढे कणखर असले तरी हिवाळ्यात त्यांना खाली जंगलात जाणं भागच आहे."

अर्थात हा आणखी एक शोधच असेल. दिनेट्स म्हणतात, "इथलं जंगल छोट्या छोट्या पट्ट्यांमध्ये विखुरलं आहे. शिवाय फार पूर्वीपासूनच शेतीसाठी जंगलतोड झाली आहे."

एवढी जंगलतोड होऊनदेखील येती दिसलेला नाही.

2011 साली रशियाच्या एका गिर्यारोहक पथकाने येतीच्या अस्तित्वाचे ठोस पुरावे सापडल्याचा दावा केला होता. येतीचा पलंगही आपण पाहिल्याचा दावा त्यांनी केला होता.

मात्र, तो पब्लिसिटी स्टंट होता, असं रशियातच जन्मलेले दिनेट्स सांगतात. त्यांना कुठलाच ठोस पुरावा सापडला नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे. लोकांना मूर्ख बनवण्याची ती क्लुप्ती होती.

"गेल्या दोन दशकांपासून शहरी लोकांसाठी टाईमपास म्हणून उन्हाळ्यात खास येती दर्शनासाठीच्या गिर्यारोहण मोहिमा आखल्या जात आहेत", असं दिनेट्स सांगतात.

"या मोहिमांचा परिणाम केवळ एवढाच झाला की तजाकिस्तान आणि किरगिस्तानमधल्या पर्वतावर असलेल्या लहान लहान खेड्यांमध्ये 'येती बघितलेले' गाईड्स तयार झाले. पर्यटकांना येतींच्या सुरस कथा सांगणे, पर्वतावरच्या अतिशय दुर्गम भागातल्या कथित येती दर्शन ठिकाणांवर पर्यटकांना घेऊन जाणे आणि या सेवेसाठी त्यांच्याकडून भरपूर पैसे उकळणे, हा धंदा होऊन बसला आहे."

या सर्वांचा सारांश असा की हिमालयात कुठलातरी अज्ञात विशाल सस्तन प्राणी राहत असल्याचा कुठलाच ठोस पुरावा नाही आणि असा प्राणी अस्तित्वात असूच शकत नाही, यावर विश्वास बसण्यासाठी अनेक कारणंही आहेत.

इतकंच नाही तर हिमालयामध्ये पोलर बिअर असल्याचे पुरावेही ठोस मानता येत नाहीत. पुराणकथांमध्ये अस्वलाचा उल्लेख आहे. मात्र ते ब्राऊन बिअर म्हणजे जंगलात आढळणारे तपकिरी अस्वल असावेत. संपूर्ण आशिया खंडात असे अस्वल सर्वत्र आढळतात.

बर्नेट यांच्या मते अस्वल आणि अज्ञात प्राण्यांविषयी सुरस कथा रचण्याचा मानवी स्वभाव यातून येतीच्या आख्यायिकांचा जन्म झाला असावा.

असं असलं तरी येतीचा शोध संपला आहे, असं नाही.

"असा कुठलाच पुरावा नाही, ज्याचा आधारावर मानवाने येतीचा शोध थांबवला, हे वास्तव आहे." जोवर आपल्याला आख्यायिका आणि परीकथा आवडतात, तोवर आपण येतीला विसरणार नाही.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)