You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
शत्रुघ्न सिन्हा: 'अडवाणींनी पक्ष सोडला नाही म्हणजे कोणीच सोडू नये असं नाही'
- Author, भूमिका राय
- Role, बीबीसी प्रतिनिधी
एकेकाळी भाजपचे स्टार प्रचारक राहिलेल्या शत्रुघ्न सिन्हा यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यांना पाटनासाहिब या मतदारसंघातून तिकीट मिळालं आहे.
शत्रुघ्न सिन्हा हे भाजपमध्ये होते आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते म्हणून त्यांची ओळख होती. अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना ते त्यांच्या सरकारमध्ये मंत्री होते.
मात्र बऱ्याच काळापासून ते पक्षावर नाराज होते. अनेकदा त्यांनी जाहीरपणे ही नाराजी दाखवली होती. नुकतेच ते महागटबंधनच्या रॅलीत सहभागी झाले होते. त्यांनी विद्यमान सरकारच्या विरोधात वक्तव्य केले आहे.
शत्रुघ्न सिन्हा पाटनासाहिबमधून खासदार आहेत. मात्र यावेळी पक्षाने त्यांना तिकीट दिलं नाही. तिथून यावेळी रविशंकर प्रसाद यांना तिकीट देण्यात आलं आहे.
गेली अनेक वर्षं ते मतभेद असूनही भाजपात होते. मात्र त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय का घेतला, काँग्रेस आणि भाजपच्या विचारधारेत ते कसा ताळमेळ साधतील या विषयांवर त्यांनी बीबीसीशी संवाद साधला.
30 वर्षं भाजपात राहून पक्ष सोडण्याची वेळ का आली?
काही तरी कारण असेलच ना त्याशिवाय कोण पक्ष का सोडेल? मी माझ्या मानापमानाबदद्ल बोलत नाही. भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्याबरोबर काय झालं हे सगळ्यांनीच पाहिलं. ते इतके प्रक्षुब्ध झाले की त्यांना ब्लॉग लिहावा लागला. तो ब्लॉग वाचून संपूर्ण देश विचलित झाला. अरुण शौरी, यशवंत सिन्हा, मुरली मनोहर जोशी यांना इतका त्रास झाला की त्यांनी पक्षाकडे पाठ फिरवली.
तरी मी तरलो आणि पाहत होतो की लोकशाही हळुहळू हुकूमशाहीत बदलली. सामूहिक निर्णय घेण्याचा काळ लोप पावला. जेव्हा सगळे निर्णय एकाच व्यक्तीभोवती केंद्रित झाले तेव्हा मी निर्णय घेतला. स्वत:साठी काहीही मागितलं नाही. नि:स्वार्थ भावनेने पक्षाचं काम करत राहिलो.
तुम्ही वारंवार अडवाणींबद्दल बोलता. मात्र कितीही गोष्टी झाल्या तरी अडवाणी अजूनही तिथेच आहे.
लालकृष्ण अडवाणी यांनी पक्ष सोडला नाही कारण ते पक्षाचे एक मोठे नेते आहेत आणि मुख्य म्हणजे परिपक्व आहेत. काँग्रेस पक्षात अनेक दिग्गज नेते आहेत. मला आज इथे येऊन फार आनंद झाला आहे. ऐन वर्धापन दिनालाच पक्ष सोडताना मला दु:खही झालं. मी आपल्या राजकीय कारकिर्दीची जिथून सुरुवात केली तो पक्षच मला सोडावा लागला.
नोटबंदी असो की जीएसटी मी कायमच हे मुद्दे उपस्थित केले. मात्र मी बंडखोरी करतोय असं चित्र उभं करण्यात आलं आहे. त्यामुळे मला पण सांगावं लागलं की खरं बोलणं जर बंडखोरी असेल तर मी बंडखोर आहे.
अडवाणींची प्रतिमा ज्येष्ठ व्यक्तीची आहे. त्यांनी पक्ष सोडला नाही याचा अर्थ कुणीच सोडू नये असा होत नाही. ज्याच्यात संघर्ष करण्याचं सामर्थ्य आहे, क्षमता आहे, जे जनतेच्या सातत्याने संपर्कात आहे, ज्यांनी जनतेच्या अपेक्षा पूर्ण केल्या आहेत त्यांनी पुढे जायला हवं. एक नवीन आणि योग्य दिशेचा त्यांनी शोध घ्यायला हवा.
इतके वर्षं तुमची नाळ भाजपच्या विचारधारेशी जुळलेली होती. काँग्रेस आणि भाजपचे अनेक प्रकरणात वेगवेगळे विचार आहेत. उदा. राममंदिर. अशावेळी विचारांचा ताळमेळ कसा साधाल?
मी राममंदिराच्या मुद्द्यावर काही बोलू शकत नाही. सर्वसंमतीने काही निर्णय व्हायला हवा किंवा सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर अवलंबून रहायला हवं हे ठरलं आहे.
मात्र निवडणुकीच्या वेळी हे मुद्दे घेऊन लोकांचं लक्ष विचलित करायचं आहे. कधी तिहेरी तलाकचा मुद्दा घेऊन निवडणूक लढवतात. कधी मोठी मोठी आश्वासनं देतात. विचारधारा वेगळी असली तरी देशाची आर्थिक प्रगती, धर्मनिरपेक्षता हेच दोन्ही पक्षांचं लक्ष्य आहे. विशेषत: विकास, शांती आणि समृद्धी हे काँग्रेसचं उद्दिष्ट आहे.
पाटनासाहिबची जागा किती आव्हानात्मक आहे?
मला तिथल्या जनतेवर पूर्ण विश्वास आहे. त्यांचा आशीर्वाद माझ्याबरोबर आहे. बिहारबरोबर माझं जुनं नातं आहे. मला संपूर्ण देश बिहारी बाबू या नावाने ओळखतो.
मागच्या वेळीही माझ्या नावाची घोषणा होण्यासाठी खूप उशीर जाला होता. माझ्या मार्गात अडथळे आणण्याचा अनेकांनी प्रयत्न केला होता. मात्र तरीही मी विजय मिळवला होता. याच आधारावर मी ही निवडणूक लढवत आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)