IPL 2019: सामने वेळेत संपत नसल्याने खेळाडू, प्रेक्षक, पोलीस, ग्राउंडस्टाफ असे सगळ्यांचेच हाल

    • Author, ऋजुता लुकतुके
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

सलग पाच दिवस चालणारे कसोटी सामने आणि दिवसभर चालणारे एकदिवसीय सामने, यामुळे क्रिकेटचा खेळ इतर खेळांच्या तुलनेत धिमा वाटायला लागला होता. अशावेळी सध्याच्या कसोटी खेळणाऱ्या 9 देशांच्या पलीकडे खेळाला पोहोचवणं, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद किंवा ICCला कठीण जात होतं.

2005 मध्ये त्यांना पर्याय मिळाला T-20 क्रिकेटचा. आणि पुढे 2007 मध्ये झालेला पहिला वहिला T20 विश्वचषक प्रेक्षकांमध्ये सुपरहिट झाला. आणि क्रिकेटच्या नव्या पिढीसाठी खेळाचं भविष्य ठरून गेलं - T20 क्रिकेट.

भारतात तर क्रिकेटचीच लोकप्रियता अमाप. त्यामुळे भारताने T20 क्रिकेट आणखी एनकॅश करत 2008 मध्ये या प्रकारावर आधारित एक लीग सुरू केली - इंडियन प्रीमिअर लीग किंवा IPL. प्रथमश्रेणी दर्जाची ही लीग जगभरातल्या खेळाडूंमध्ये आणि क्रिकेट चाहत्यांमध्ये आपलं स्थान टिकवून आहे.

इथं फलंदाज बऱ्याचदा चौकार आणि षटकारांचीच भाषा बोलतात, गोलंदाजही चौकार दिले तरी बेहत्तर पण, पुढच्या चेंडूवर विकेट घेईन या आवेशाने गोलंदाजी करतात. मैदानावर ही आतषबाजी तर मैदानाबाहेर चिअर लीडर्सचा जल्लोष. आणि सामन्यांना बॉलिवुड, टॉलीवुड, बडे उद्योगपती यांची हजेरी. या सगळ्यामुळे या स्पर्धेला वेगळंच ग्लॅमर प्राप्त झालं.

पण या ग्लॅमरचा फटका आता सर्वसामान्य प्रेक्षक, ग्राउंड स्टाफ आणि पोलीसांना बसताना दिसतोय.

सामन्यांना होणारा उशीर

IPLचे बहुतेक सामने हे चार महानगरं आणि देशातल्या मोठ्या शहरात होत आहेत. आणि स्टेडियमपासून दूर राहणारे लोक क्रिकेटच्या प्रेमापोटी काही तासांचा प्रवास करून सामना बघायला पोहोचतात. आणि रात्री आठ वाजता सुरू होणारे सामने रात्री बारानंतरही न संपल्यामुळे अनेकदा शेवटची ट्रेन चुकून या लोकांसाठी घरी जायचा स्वस्त मार्गही बंद झाला आहे.

डोंबिवलीच्या अमित पाध्ये यांचं उदाहरण घ्या. बुधवारचा चेन्नई सुपरकिंग्ज विरुद्धचा सामना बघण्यासाठी त्यांनी दक्षिण मुंबईतल्या वानखेडे स्टेडिअमवर हजेरी लावली. तिथं पोहोचण्यासाठी दीड तास, मग सुरक्षा व्यवस्था आणि इतर दिव्य पार पाडण्यासाठी आणखी दीड तास. आणि मुंबईने सामना जिंकत असल्याचं समाधान त्यांना असलं तरी बारा वाजून गेल्यावर पुढचा सामना न बघताच उठून जावं लागलं, ही हूरहूरही त्यांना आहे.

"आम्ही एकटेच नव्हतो मॅच अर्धवट सोडणारे. आम्हाला मध्ये रेल्वेचं CSTM स्थानक गाठायचं होतं. शेवटची ट्रेन सोडून भागणार नव्हतं. आम्ही बाहेर पडत होतो तेव्हा पोलीस कर्मचारी आमच्याकडे बघत होते. तुम्ही निदान मॅच सोडून जाऊ शकता, आम्ही ड्युटी सोडूनही जाऊ शकत नाही, असे भाव त्यांच्या चेहऱ्यावर होते," अमित यांनी सांगितलं.

IPLचे सामने मध्यरात्रीनंतर चालणं हा खरंच यंदा चर्चेचा विषय ठरला आहे. आणि प्रेक्षकांबरोबरच ग्राउंड स्टाफ आणि पोलिसांनाही याचा फटका बसत आहे. टीव्हीवर सामना बघणारे प्रेक्षकही उशिरापर्यंत जागावं लागत असल्यामुळे तक्रार करत आहे.

खेळाडूंचंही बिघडलं वेळापत्रक

तसं बघितलं तर वेळापत्रकानुसार, IPLचा प्रत्येक सामना हा आठ वाजता सुरू झाला पाहिजे. एका षटकासाठी चार मिनिटं, दोन स्ट्रॅटेजिक टाईम-आऊट आणि दोन इनिंगमधली दहा मिनिटं, असं सरळ गणित केलं तर अकराच्या सुमारास संपला पाहिजे.

पण यंदाच्या हंगामात कित्येकदा सामने बारा वाजताच्या पुढे म्हणजे पुढच्या दिवसातच गेले आहेत. खरंतर आयोजक वेळेच्या बाबतीत यंदा कडक आहेत. म्हणून तर राजस्थान रॉयल्स संघाचा कर्णधार अजिंक्य रहाणे आणि मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहीत शर्मा यांना षटकांची गती न राखल्याबद्दल तब्बल बारा लाख प्रत्येकी, असा दंड झाला आहे. पण त्यामुळे होणारा उशीर टळलेला नाही.

मुंबईतल्या सामन्यानंतर चेन्नई सुपरकिंग्ज संघाचे व्यवस्थापक स्टिफन फ्लेमिंग यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. सामना उशिरापर्यंत चालल्यामुळे खेळाडूंना विश्रांती मिळत नाही. आणि पुढच्या दिवसाच्या सरावावर परिणाम होतो, असं त्यांनी मीडियाशी बोलून दाखवलं.

यावर उपाय काय?

हा प्रश्न खरंतर फक्त यावर्षीचा नाही. त्यामुळे यंदा स्पर्धा सुरू होण्यापूर्वी देशातील क्रिकेट नियामक मंडळ BCCIने सर्व संघांच्या मालकांबरोबर एक विशेष बैठक घेतली होती. सामने आठ ऐवजी संध्याकाळी सात वाजता आणि जर दोन सामने असतील तर पहिला सामना दुपारी चार ऐवजी तीन वाजता सुरू करण्याचा प्रस्ताव संघांसमोर ठेवण्यात आला. पण प्राईम टाईमचं कारण देत काही संघमालकांनी हा प्रस्ताव नाकारल्याचं क्रीडा पत्रकार शरद कद्रेकर यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं.

"स्पष्ट सांगायचं तर IPLची परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. क्रिकेट बोर्ड आणि राज्य संघटना IPL टीम मालकांना अक्षरश: शरण गेल्या आहेत," असं कद्रेकर सांगतात.

स्पर्धेच्या काळात स्टेडिअम टीम फ्रँचाईजींच्या ताब्यात असतं. ते हवा तसा वापर करतात असंही कद्रेकर सांगतात. "काही वर्षांपूर्वी अंबानींच्या मातोश्री कोकिला बेन यांना जिना चढता येत नाही म्हणून MCAच्या मालकीच्या इमारतीत रातोरात लिफ्ट बसवण्यात आली," याची आठवण कद्रेकर यांनी करून दिली.

"उशिरापर्यंत चालणारे सामने खेळासाठी बाधक आहेत, खेळाडूंचं नुकसान करणारे आहेत. आणि प्रेक्षक आणि एकूणच समाज वेठीला धरला जातोय," असं परखड मत शरद कद्रेकर यांनी व्यक्त केलं.

माजी खेळाडूंनी व्यक्त केली चिंता

न्यूझीलंडचे माजी तेजगती गोलंदाज सायमन डूल सध्या स्पर्धेच्या समालोचनासाठी भारतात आहेत. अलीकडेच एका वर्तमानपत्रातल्या आपल्या लेखात त्यांनी हा विषय हाताळला. सामन्यांना होणाऱ्या उशिरामुळे T20 सारख्या जलदगती क्रिकेटचा खेळ धिमा झालाय, असं निरीक्षण त्यांनी नोंदवलं आहे.

"खेळाडूंनी विचार करण्याची वेळ आली आहे. खासकरून कर्णधाराने क्षेत्रव्यूह ठरवताना, गोलंदाजाला सल्ले देताना फार वेळ घालवू नये. प्रेक्षक अशाने कंटाळतील," असं त्यांचं म्हणणं पडलं.

उशीर का होतो?

षटकार मारल्यामुळे चेंडू प्रेक्षकांमध्ये गेला, फलंदाजाला बॅट किंवा इतर उपकरणं बदलायची असतील, मैदानावर असलेल्या दवामुळे चेंडू वारंवार पुसावा लागत असेल तर खेळ लांबतो. आणि ही कारणं नियमांमध्ये बसणारीही आहेत.

सामन्याच्या वेळा निर्धारित करताना त्यासाठी वेळ राखून ठेवलेला असतो. मैदानावर एखाद्या खेळाडूला दुखापतही होऊ शकते. या सगळ्यासाठी होणारा उशीर गृहित धरून सुद्धा T20 सामन्यामध्ये 19वं षटक 89व्या मिनिटाला सुरू होणं अपेक्षित आहे. नाहीतर गोलंदाजी करणाऱ्या संघाला दंड बसतो. शिवाय मैदानावरचे पंच वेळोवेळी संघाच्या कर्णधाराला वेळेची आठवणही करून देत असतात.

या नंतरही सामने संपायला उशीर होतोय आणि म्हणूनच BCCIने उपाय योजना करावी, असं लोकांचं म्हणणं आहे.

प्रेक्षकांना फटका

आठही संघांच्या मालकांनी आतापर्यंत कुठलीही तक्रार केलेली नाही. पण प्रेक्षकांना मात्र फटका बसतोय. सामना संपवून घरी जायला उशीर. दुसऱ्या दिवशी सकाळी ऑफिस गाठण्याची कसरत, शाळकरी मुलांची झोपमोड, असा मनोरंजनासाठी भुर्दंड भरावा लागतोय.

सामन्यांच्या वेळी सुरक्षा पोहोचवण्याचं काम शहर पोलिसांचं असतं. सामना संपवून स्टेडिअम सामसून होऊपर्यंत त्यांना निघता येत नाही. शिवाय हे निवडणुकीचं वर्षं आहे. त्यामुळे बंदोबस्ताचं अतिरिक्त काम त्यांच्यावर आहे.

पोलीस कर्मचारी थेट मीडियाशी बोलायला तयार नाहीत. पण खासगीत त्यांनीही आपली व्यथा बोलून दाखवली आहे.

लवकर सुरुवात हे उत्तर ठरू शकेल?

सामन्यांना संध्याकाळी सात वाजता सुरुवात करावी, हा प्रस्ताव या स्पर्धेसमोर अनेकदा आलेला आहे. गेल्या वर्षी प्रयोग म्हणून 'प्लेऑफ'चे सामने साडेसात वाजता आणि उपान्त्य, अंतिम सामने सात वाजते सुरू करण्यात आले होते. 2016च्या T20 विश्वचषक स्पर्धेत सगळेच सामने सात वाजता सुरू करण्यात आले.

खेळाचे नियम ठरवणाऱ्या मेरिलबोन क्रिकेट क्लबसमोर आणखी एक प्रस्ताव आहे, तो म्हणजे गोलंदाजाने चेंडू टाकून फलंदाजाने तो फटकावे पर्यंतचा वेळ टायमरने नियंत्रित व्हावा. म्हणजे टिव्हीच्या पडद्यावर एक टायमर फिरत राहील आणि 45 सेकंदात एक चेंडू पूर्ण व्हायला हवा. एखादी विकेट पडल्यावर नवीन फलंदाजाने 60 सेकंदात मैदानावर यावं किंवा दर षटकानंतर पुढच्या गोलंदाजाने 80 सेकंदात पुढचा बॉल टाकावा.

या नियमांवर अजून ठोस निर्णय झालेला नाही. पण आता काहीतरी निर्णय घेण्याची वेळ कदाचित आली आहे. कसोटी क्रिकेटला आकर्षक करण्यासाठी त्या दिवस-रात्र खेळवण्याचा ICCचा विचार आहे. एकदिवसीय सामनेही दिवस-रात्र खेळवले जातातच. अशावेळी हा मुद्दा आणखी प्रखरपणे समोर येणार आहे.

नियम काय सांगतो?

  • एका षटकासाठी 4 मिनिटं, म्हणजे 20 षटकांसाठी एकूण 80 मिनिटं लागू शकतात.
  • स्ट्रॅटेजिक टाईमआऊटची वेळ धरून एका इनिंगसाठी 85 मिनिटं निर्धारित असतात.
  • दोन इनिंगच्या मध्ये जास्तीत जास्त 20 मिनिटं विश्रांती असावी.
  • हे सगळं धरून सामन्याची वेळ 190 मिनिटं किंवा 3 तास 10 मिनिटं असावी.
  • दर इनिंगचं 19वं षटक 89व्या मिनिटाला सुरू होणं बंधनकारक आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)