सातारा लोकसभा 2019: राष्ट्रवादीचे उदयनराजे भोसले - पोटतिडकीने बोललो नाही तर भारताचे रशियासारखे तुकडे होतील

    • Author, अभिजित करंडे
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

पोटतिडकीने बोललो नाही तर भारताचे रशियासारखे तुकडे झाल्याशिवाय राहणार नाही. मला देशाची अशी अवस्था बघायची नाहीये, असं सातार्‍याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार उदयनराजे भोसले बीबीसी मराठीशी बोलतना म्हणाले.

"मी असं नाही बोललो पोटतिडकीने तर काय होईल, मला समोर दिसतंय. या देशाचे तुकडे झाल्याशिवाय राहणार नाहीत. जसे रशियाचे तुकडे झाले, आजसुद्धा तिथे कौटुंबिक स्वास्थ नाही. मला देशाची अवस्था बघायची नाहीये," असं ते पुढे म्हणाले.

ऐन निवडणुकीच्या धामधुमीत बीबीसी मराठीला दिलेल्या मुलाखतीत उदयनराजे भोसले यांनी भाजपवर बोचरे वार केले. "भाजप सरकार म्हणजे ईस्ट इंडिया कंपनी आहे. या पाच वर्षांच्या काळात शेती, रोजगार, उद्योग सगळ्या क्षेत्रातील लोकांसमोर संकटांचा डोंगर उभा राहिला आहे. आणि ही परिस्थिती चिंताजनक असल्याने जनतेनं त्यांच्या हिताचा निर्णय घेण्याची वेळ आली आहे, नोटाबंदी, GST सारख्या निणर्यांचा फायदा कुणाला झाला, असा सवाल उपस्थित करतानाच खासदार उदयनराजे यांनी सामान्य लोकांचे या निर्णयामुळे प्रचंड हाल झाल्याचं ते म्हणाले.

यावेळी त्यांनी घराणेशाहीचा आरोप, ऐन निवडणुकीत राष्ट्रवादीतून झालेली पक्षांतरं, विरोधी उमेदवार आणि इतर प्रश्नावर रोखठोकपणे आपली भूमिका मांडली. देशाचं राजकारण, केंद्रातलं तसंच महाराष्ट्रातल्या भाजप सरकारवर टीका करताना उदयनराजे यांनी या मुलाखतीत स्थानिक प्रश्नांना, त्यांच्याविरोधात असलेली नाराजी तसंच इतर काही प्रश्नांना बगल देण्याचा प्रयत्न केल्याचं दिसतं.

छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट तेरावे वंशज म्हणून उदयनराजे भोसले ओळखले जातात. 2009 आणि 2014 अशा सलग दोन निवडणुकांमध्ये त्यांनी सातार्‍यातून विजय मिळवला आहे आणि यंदा ते तिसर्‍यांदा निवडणुकीच्या आखाड्यात आहेत. त्यांना आव्हान देत आहेत राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आणि आता भाजपमधून शिवसेनेत दाखल झालेले नरेंद्र पाटील. नरेंद्र पाटील हे मूळचे जावळी तालुक्यातले. त्यांच्याकडे देवेंद्र फडणवीस यांनी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची धुरा सोपवली आहे. माथाडी कामगारांचे नेते म्हणूनही त्यांची ओळख आहे. त्यामुळे उदयनराजेंना ते आव्हान ठरू शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

नरेंद्र पाटील यांच्या आव्हानाकडे तुम्ही कसं बघता, असं विचारल्यावर ते म्हणाले की, "लोकशाहीत प्रत्येकाला आपला निर्णय घेण्याचे अधिकार आहेत. मी कुणालाही आपला प्रतिस्पर्धी मानत नाही. इथं कोण कुठल्या पक्षाचा हा विषय नाहीए, तर देशातले मूलभूत प्रश्न काय आहेत, हा मुद्दा आहे."

दरम्यान, उदयनराजे भोसले यांनी भाजप सरकारच्या धोरणांवर टीका करताना नरेंद्र मोदींवर थेट तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला.

"नरेंद्र मोदी यांना देशानं संपूर्ण बहुमत दिलं. आम्हाला वाटलं की आता देशात सकारात्मक बदल होतील. नरेंद्र मोदी यांनी वर्षाला 2 कोटी रोजगार उपलब्ध करून देण्याचं आश्वासन दिलं होतं. 15 लाख प्रत्येकाच्या खात्यात टाकू असंही म्हटलं होतं. त्याशिवाय शेतकर्‍याला दीडपट हमीभाव देण्याची घोषणा केली होती. मात्र गेल्या 4 वर्षांत यातलं काहीच झालं नाही.

"उलट नोटाबंदीमुळे सामान्यांना रांगेत थांबावं लागलं, उद्योगांची वाताहत झाली, लोक बेरोजगार झाले. नोटाबंदी आणि GSTचा निर्णय घेताना मोदींनी थोडा विचार करायला हवा होता. आमच्याशी म्हणजे विरोधकांशी बोलायचं नव्हतं तर ठीक आहे, पण तज्ज्ञ लोकांशी बोलून काही निर्णय घ्यायला हवे होते. पण त्यांनी परस्पर निर्णय घेतल्याने देशावर ही वेळ आली आहे. आणि ती चिंतेची बाब आहे," असं उदयनराजेंनी म्हणाले.

दरम्यान गेल्या 5 वर्षात हे प्रश्न का मांडले नाहीत, असा प्रश्न विचारल्यावर उदयनराजे म्हणाले की "आम्ही कायम हे प्रश्न मांडले आहते. पण सरकार ऐकून घेत नाही."

सध्या देशभरात भाजप नेते स्वतःच्या नावापुढे चौकीदार लावत आहेत. त्यावर बोलताना उदयनराजे म्हणाले, "सध्या माझं स्टेटस आहे सुशिक्षित बेरोजगार उदयनराजे भोसले. ते कसं ते बघा. मला भेटायला अनेक तरुण येतात. ते म्हणतात की आता आमच्या हाताला काम नाही. त्यांची परिस्थती बिकट आहे. वेदना बघवत नाहीत. मी सुद्धा एक तरुण आहे आणि मी त्यांचा प्रतिनिधी, म्हणून मला हे सगळं बघवत नाही."

पण एकीकडे तुम्ही बेरोजगारीवर बोलता, मग सातार्‍यातली MIDC मोडकळीस का आली? त्यासाठी तुम्ही काय केलं? असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, "MIDC सुरू झाली तेव्हा मी कॉलेजला होतो. कारखाने सुरू करण्यासाठी अनेकांनी इथं जमिनी घेतल्या. पण कालांतराने तिथं काहीच उभं राहलं नाही. ज्या लोकांनी कर्ज घेऊन जमिनी घेतल्या होत्या, त्यांच्याविरोधात कोर्ट केसेस सुरू आहेत. त्यांच्यावर बँकांचा बोजा आहे. त्यामुळे जमिनी परत मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय, जेणेकरून नव्यानं कारखाने उभे करू इच्छिणार्‍यांना त्याचा फायदा होईल," असं उदयनराजे म्हणाले.

दरम्यान, ज्याप्रमाणे राष्ट्रवादीतील इतर नेत्यांना भाजपकडून ऑफर देण्यात आली, तशी ऑफर उदयनराजेंना कधी आली होती का? ते म्हणाले की, "मला ऑफरचं स्पेलिंगही येत नाही. मला ते काही माहिती नाही. आणि ऑफर द्यायला माझ्या गळ्यात सेलचा बोर्ड लागलेला नाही. कुणाच्यातही मला ऑफर देण्याची हिंमत नाही."

आपली सोशल मीडियावरील प्रचाराची काही स्ट्रॅटेजी आहे का, असं विचारल्यावर उदयनराजे सांगतात की आपला त्यावर विश्वास नाही. आपण फक्त इनकमिंग आणि आऊटगोइंग, एवढंच काम चालवणारा फोन वापरतो.

"आपलं कुठल्याही सोशल मीडया प्लॅटफॉमर्वर अकाउंट नाही. त्याचा काही उपयोग नाही. तरुण त्यात अडकून गेलाय. त्याचा बराच वेळ त्यात जातो. त्यापेक्षा आपल्याला ज्याच्याशी बोलायचं आहे, त्याची प्रत्यक्ष भेट घ्यावी," असा सल्ला उदयनराजे देतात.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)